एलिझाबेथ गिल्बर्ट यांचे नाव भारतात प्रत्येक ग्रंथ दुकानदारासाठी तर परिचितच. पण मुंबईच्या पांढऱ्या आणि बेंगळूरुच्या किंचित करडय़ा कागदांचा वापर करून पायरसीद्वारे ढिगाने पुस्तके विकणाऱ्या देशातल्या रस्ता पुस्तक दालनांच्या चालकांनाही ते माहिती आहे. कारण ‘ईट, प्रे, लव्ह’ हे गिल्बर्ट यांचे प्रवास आत्मचरित्र २००६ साली अमेरिकेत आले. पुढे १८७ आठवडे ‘न्यू यॉर्क टाइम्स’ची खूपविकी यादी गाजवत असताना भारतात सर्व अधिकृत विक्री यंत्रणात पोहोचत राहिले. २००८ पासून रस्त्यावरील पुस्तकालयांत तीन रंगी अक्षरांच्या मुखपृष्ठाचे हे पुस्तक अजूनही अधिक विकले जाणारे आहे. ‘ईट, प्रे, लव्ह’मुळे अखंड श्रीमंत झालेल्या एलिझाबेथ गिल्बर्ट यांची लेखन कर्तुमकी या एका पुस्तकापुरती मोजता यायची नाही. जरी काडीमोडाचा ‘आनंद’ घेण्यासाठी इटली, अध्यात्माचा अर्थ लावण्यासाठी भारत आणि पुनर्पीतीचा शोध घेण्यासाठी इंडोनेशियाची पायपीट करून ‘ईट, प्रे, लव्ह’ या प्रवासनाम्याला वैश्विक स्त्री-पुरुषीय पसंती लाभली.
त्या पसंतीचे रूपांतर या लेखिकेला कोटय़वधी डॉलरची संपत्ती मिळवून देण्यात झाले. शिवाय तिच्या लेखनबळाचा आणखी विस्तार करणारी ठरली. ‘टेड टॉक’ नामे सल्ला-व्यासपीठावर तिच्या संवादाचे व्हिडीओ किती गाजले आहेत, याची दर्शक आकडेवारी चक्रावून टाकणारी आहे. लेखकोच्छूंना केवळ लिहिण्याचीच नाही, तर आदर्श जगण्याचाही मंत्र देणारी ही ‘वक्ता दशसहस्र्षु’ पुढे ‘ईट, प्रे, लव्ह’चाच ‘कमिटेड’ हा भाग लिहून गप्प बसली नाही, तर पुढे ब्रायन ट्रेसी, रॉबिन शर्मा आदी ‘सेल्फहेल्प’ गुरुसंप्रदायाच्या पुस्तकांना टक्कर देणारे ‘बिग मॅजिक’ नावाचे पुस्तक घेऊन आली. ‘गृहिणी ते सेल्फहेल्प गुरुमाई’ असा काहीसा असाहित्यिक वळणावरचा तिचा प्रवास सुरू झाला. तोही जोरदार यशस्वी असा. मग सीरियन निर्वासितांसाठी काही तासांत लाखो डॉलरची मदत उभारण्यात आणि इतर सामाजिक कारणांसाठी आपल्या वक्तृत्वाचा आणि सेलिब्रेटीपणाचा गिल्बर्ट यांनी उपयोगही करून घेतला. गेल्या तीनेक वर्षांत गिल्बर्ट पुन्हा आपल्या साहित्याच्या भूमीवर लेखन दमसास घेत नव्या कादंबरीसाठी खटपट करीत होत्या. ‘स्नो फॉरेस्ट’ नावाची कादंबरी पूर्ण झाल्यानंतर तिच्या प्रकाशनाची साग्रसंगीत चर्चाही सुरू झाली होती. प्रसिद्धी यंत्रणा कामाला लागली होती आणि नव्या कादंबरीची तारीख गेल्या आठवडय़ात एलिझाबेथ गिल्बर्ट यांनी अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली. त्याचे कारण होते रशियाने युक्रेनवर लादलेले युद्ध.
गिल्बर्ट यांची ही आगामी कादंबरी ऐतिहासिक असून ती शंभर वर्षांपूर्वीच्या रशियात (सैबेरिया) घडते. ‘युक्रेनमधील माझ्या वाचकांना सध्या ज्या तणावातून सामोरे जावे लागत आहे, ते पाहता रशियामध्ये घडणाऱ्या या कादंबरीला प्रकाशित करणे मला योग्य वाटत नाही. अनिश्चित काळासाठी या कादंबरीचे प्रकाशन मी पुढे ढकलत आहे. जोपर्यंत युद्ध पूर्णपणे थांबून युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित होत नाही, तोवर या कादंबरीच्या प्रकाशनाचा विचार मी करू शकत नाही,’ असे गेल्या आठवडय़ात गिल्बर्ट यांनी व्हिडीओद्वारे जाहीर करताच त्यांच्यावर माध्यमांचा जोरदार प्रकाशझोत पडला आणि गेल्या आठवडय़ापासून त्यांच्या या निर्णयाचे कौतुक होत आहे.
गिल्बर्ट यांनी आपले पुस्तक मागे घेण्याचे तात्कालिक कारण ठरले, ते ‘गुड रिड्स’ हे संकेतस्थळ. पुस्तकाला प्रकाशनपूर्व आणि उत्तरकाळात प्रसिद्धी देणाऱ्या या व्यासपीठावर सामान्य वाचकांनाही प्रतिक्रिया देता येतात. या संकेतस्थळावर फेब्रुवारी २४ मध्ये (युद्धाला दोन वर्षे पूर्ण होणाऱ्या महिन्यातच) प्रकाशित होणार होते. त्याचे मुखपृष्ठ या संकेतस्थळावर पोहोचताच काही तासांत युक्रेनमधील वाचकांनी प्रतिक्रियांचा पाऊस पाडला. ‘रशियाचे अतिरेकी युक्रेनची नासधूस करीत असताना या प्रसिद्ध लेखिकेला त्यांची पाठराखण करणारी पुस्तके छापायची सुरसुरी येते,’ अशा अर्थाच्या अनेक प्रतिक्रिया पाहिल्यानंतर गिल्बर्ट यांनी तातडीने ‘युक्रेनमधील नागरिकांच्या आणि माझ्या तेथील वाचकांच्या भावनांचा आदर करून तिथे शांतता नांदल्यानंतरच मी माझ्या या पुस्तकाचा विचार करेन’ हे जाहीर केले. गेल्या वर्षी सुरू झालेल्या युद्धानंतर अमेरिका आणि कॅनडामधील अनेक कलासंस्थांनी रशियाविरोधी आपली भूमिका जाहीरच नाही केली, तर प्रत्यक्षात अमलात आणली. मे महिन्यात ‘पेन अमेरिका’ संस्थेच्या एका साहित्यिक महोत्सवात युक्रेनमधील सदस्यांनी रशियाच्या चमूला महोत्सवातून बाहेर ठेवण्याची मागणी केली. ती तातडीने पूर्ण करण्यात आली. न्यू यॉर्कमधील मेट्रोपोलिटन ऑपेराने रशियातील गायकांशी असलेले कार्यक्रम करार रद्द केले. आता या लेखिकेने आपल्या नव्या कादंबरीचे बाडच रशियाच्या युद्धखोरीविरोधात अनिश्चित काळासाठी मागे घेण्याचा निर्णय हा या लेखिकेचे रशियाशी असलेले युद्ध स्पष्ट करतो. ‘ईट, प्रे, लव्ह’आधी ‘जीक्यू’सारख्या बडय़ा मेन्स मॅगझीनमध्ये लिहिणारी आणि ‘स्टर्न मॅन’, ‘द लास्ट अमेरिकन मॅन’ आदी पुस्तकांद्वारे आपल्या बंडखोरीची जातकुळी दाखविणारी ही लेखिका या पुस्तकांसाठी आणि ‘पिल्ग्रिम्स’ नावाच्या कथासंग्रहासाठी अधिक ओळखायला हवी होती. पण गिल्बर्टमधील बंडखोरी अजूनही तरुण असल्याची खूण यानिमित्ताने समोर आली.
वाचनानंदासाठी दुवे
ईट, प्रे, लव्ह देशोदेशी गाजण्याआधीचा एक प्रवासलेख : https:// www. gq. com/ story/ provence- walking- tour- elizabeth- gilbert- wine
लोकप्रिय लेखिका होण्याआधी एका बारमध्ये काम केलेल्या अनुभवांवरचा लेख : https:// www. gq. com/ story/ elizabeth- gilbert- gq- march-1997- muse- coyote- ugly- saloon