लॅरी मॅकमरट्री या लेखकाला २००५ साली ‘ब्रोकबॅक माऊंटन’ या चित्रपटासाठी सहपटकथाकार म्हणून ऑस्कर मिळाले. पण त्यात फार नवल नव्हतेच. नवल होते, ते ऑस्कर पटकावल्यानंतर त्यांनी केलेल्या मिनिटभराच्या भाषणाचे. त्यात त्यांनी चित्रपटात पुस्तकांच्या महत्त्वावर एक वाक्य वापरले, तर पुढले सारे क्षण जगभरातील पुस्तक विक्रेत्यांचे स्तुतिस्तोत्र गायले. फुटपाथवर काही सेंट्समध्ये पेपरबॅक आवृत्त्या विकणाऱ्या ग्रंथविक्रेत्यांपासून वातानुकूलित काचेरी दालनांत पुस्तकाची ऊर्जा पसरवणाऱ्या या विक्रेत्यांना पुरस्कार समर्पित करीत असल्यासारखे त्यांचे भाषण ऑस्करच्या इतिहासातील सर्वात भिन्न-भाषण ठरले. ऑस्कर मिळाल्याच्या आनंदगमजा न व्यक्त करता ‘ग्रंथविक्रीची ही देशोदेशी-शहरोशहरी शेकडो वर्षे टिकून असलेली संस्कृती सर्वात सुंदर असून, ती टिकून राहणे अत्यावश्यक आहे.’ हा संदेश त्यांनी सिनेमाच्या जगप्रसिद्ध सोहळय़ात जमलेल्या कलाकारांना दिला होता. मॅकमरट्री स्वत: १०० खूपविक्या पुस्तकांचे लेखक. त्यांच्या कादंबऱ्यांवर अनेक सिनेमे आले आणि ऑस्करच्या स्पर्धेतही गाजले. पण ही त्यांची केवळ १० टक्केच ओळख. पुढली नव्वद टक्के ही जुनी-दुर्मीळ पुस्तके गोळा करण्यासाठी जुन्या पुस्तक बाजारांना प्रदक्षिणा घालणारा आणि जगातील सर्वात मोठे दुर्मीळ पुस्तकांचे दुकान उभारणारा ग्रंथविक्रेता म्हणून. आर्चर सिटी, टेक्सास येथे त्यांच्या ‘बुक अप’ दालनातील पुस्तकांची संख्या दोन लाखांहून अधिक! शिवाय त्यांच्या खासगी संग्रहातील दुर्मीळ पुस्तकांची संख्या ३० हजारांहून जास्त. २००८ साली त्यांनी ‘बुक्स’ या नावाचे आत्मचरित्र लिहिले. त्यात गेल्या ५०- ६० वर्षांतील अमेरिकेतील जुन्या-नव्या ग्रंथविक्री व्यवसायावर. बंद झालेल्या पुस्तक दुकानांबद्दल. तरीही टिकून राहिलेल्या पुस्तकवेडय़ांच्या खरेदीयात्रांवर, स्वत:च्या पुस्तकहव्यासाबद्दल आणि देशात विविध भागांत टिकून राहिलेल्या जुन्या-दुर्मीळ ग्रंथांच्या मेळय़ांबद्दल फारच तपशिलात प्रचंड रंजक शैलीत लिहिले आहे.
मार्च २०२१मध्ये मॅकमरट्री यांचा मृत्यू झाला. पण त्यांचे दुर्मीळ पुस्तकांचे दालन टिकून आहे. अमेरिकेत त्यांना अपेक्षित असलेली जुन्या-पुस्तक खरेदी-विक्रीची यंत्रणा जोमात कार्यरत आहे. दर वर्षीच्या एप्रिलमध्ये टेक्सास ते न्यू यॉर्क हा सुमारे २६०० कि.मी.चा पल्ला गाठून लॅरी न्यूयॉर्कला येत. खास ‘न्यू यॉक इंटरनॅशनल ॲण्टिक्वेरिअन बुक फेअर’साठी! गेली दोन वर्षे ते नव्हते, पण त्यांचे दुकान इथे येत असे.. यंदा तेही नाही.
परवा न्यू यॉर्क येथे हा ‘ॲण्टिक्वेरिअन बुक फेअर’ सुरू झाला. जुन्या आणि दुर्मीळ पुस्तकांच्या मेळय़ाचे हे ६३ वे वर्ष. यात तीनेकशे वर्षांतील पुस्तकांच्या टिकून राहिलेल्या, विलुप्त झाल्याची शंका असणाऱ्या एकमेव प्रती विक्रीला आल्या आहेत. १७ देशांतील २०० विक्रेते असलेल्या या मेळय़ांत करोडो डॉलरची उलाढाल होणार आहे. ती नव्या पुस्तकांसाठी नाही, तर दुर्मीळोत्तम पुस्तकांच्या प्रतींसाठी. शेक्सपिअर ते जे.के. रोलिंग्जच्या हॅरी पॉटरची पुस्तकपूर्व प्रत. मार्सेल डुशाँ ते ॲण्डी वॉरहॉल यांच्या चित्रवह्या असा ऐवज लाखो डॉलर किमान बोलीच्या लिलावासह तिथे विक्रीसाठी सजला आहे. जुन्या आणि दुर्मीळ पुस्तकांना महत्त्व असते, याची जाणीवसंस्कृती नसलेल्यांचेही डोळे तिथल्या उलाढालींचे आकडे पाहून दिपतील! ग्रंथोत्सव-मेळय़ांना भेट देण्याची आणि पुस्तक खरेदीची संस्कृती सध्या वाढली, तरी लॅरी मॅकमरट्रींची ऑस्कर भाषणातील अपेक्षा पूर्ण होईल.