‘प्लेबॉय’चा दिवंगत संपादक हेफ्नर याच्या ‘प्लेबॉय मॅन्शन’मधील ‘बनी’कावतींप्रमाणेच अखेरच्या पत्नीनेही आत्मचरित्राचा मार्ग निवडला..
सगळय़ा खंडातील आबालवृद्धांना ५० वर्षांहून अधिक काळ ज्ञात असलेला ह्यू हेफ्नरचा मृत्यू २०१७ साली झाला. अन् त्याच्या प्ले-बॉय मासिकाचा शेवटचा अमेरिकी छापील अंक मार्च २०२० मध्ये निघाला. (आता दक्षिण आफ्रिका, मेक्सिको, फ्रान्समध्ये तो सुरू असला तरी आधीचा सर्वत्र वाचला जाणारा आंतरराष्ट्रीय अंक नाही.) १९५३ ते २०२० या कालावधीत दर अंकात ‘अर्धदिगंबर’ चाळीसहून अधिक स्त्रीसौंदर्याची सर्ववंशीय, सर्ववर्णीय खाण दाखविणाऱ्या या अलिबाबाच्या ऐषारामी जगण्याचे किस्से आणि त्याच्या (प्लेबॉय मॅन्शन) वाडय़ावर येणाऱ्या बायकांच्या छब्या वृत्तपत्रांतील ‘पेज-थ्री’ संस्कृतीला खत-पाणी पुरवत होत्या. २०१५ पर्यंत या मासिकाची फिक्शन एडिटर अॅलिस के. टर्नर हिने या मासिकातील कथालेखकांची ऊर्जा तेवत ठेवली होती. जपानी कथालेखक मुराकामी असो, अमेरिकी भयलेखक स्टीव्हन किंग असो, वेडाविद्रा पत्रकार हण्टर थॉम्पसन असो किंवा न्वार चित्रपटकर्ते कोएन बुंधूंपैकी इथन कोएन – अशा अनेकांच्या कथा या अॅलिस टर्नरने प्लेबॉयसाठी मिळविल्या. (इथन कोएन हा कवीदेखील असून त्याचे दोन काव्यसंग्रह उपलब्ध आहेत.) दरएक मासिकातील या कथांचे संकलन चाळले, तरी टर्नर यांची कथा हुडकण्याची दिव्यदृष्टी आणि हेफ्नर यांचे त्यांना मिळालेले स्वातंत्र्य लक्षात येईल. तरीही सुरुवातीपासून अखेपर्यंत सर्वसामान्यांच्या आणि दिखाऊ अभिरुची- आग्रहकांच्या नजरेत ‘प्लेबॉय’ हे ‘अनावृत ललनोत्तमांचे आगार’ इतकीच त्याची ओळख जपण्यात आली. त्यात आलेली गंभीर पत्रकारिता, रिपोर्ताज, दीर्घ मुलाखती आणि ललित साहित्य यांना मान्यता अंकांतून वगळून त्यांची संकलने झाली तेव्हाच मिळाली.
पोर्न संकेतस्थळांचा जगव्यापी मोफत प्रसार होण्याच्या काळातही प्लेबॉय तगून होते, हे आश्चर्यच. हेफ्नरच्या मृत्यूच्या अलीकडच्या वर्षांत प्लेबॉयने सोज्ज्वळ होण्याचा आणि उजळ माथ्याने पेपरस्टॉल आणि बुकस्टॅण्डवर मिरवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तो अनेकांना ‘उथळ’ वाटला. मग पुन्हा पुन्हा पूर्वीचे रूपडे देताना तो अंक पूर्णपणे संपला. तरीही हेफ्नर मात्र दरएक दोन वर्षांनी घाऊक प्रमाणात चर्चेत राहण्याचे कारण तयार होतेच.
त्याची वाडय़ावरची मुक्त पाटीलकी तिथे वावरणाऱ्या प्ले-बनीज वेगवेगळय़ा पद्धतीने नव्या रंजक माहितीसह उघड करीत आहेत. काहींच्या चरित्र(हनन)मोहिमांची धाव मासिका-साप्ताहिकांच्या लेख-मुलाखतबोंबांपर्यंत राहिली असली, तरी काहींनी न्यू यॉर्क टाइम्सच्या खूपविक्या यादींमध्ये स्थान पटकावले आहे. होली मॅडिसन या ‘बनी’कावतीची बखर ‘डाऊन द रॅबिट होल : क्युरिअस अॅडव्हेन्चर्स अॅण्ड कॉशनरी टेल्स ऑफ फॉर्मर बनी’ या नावाने हेफ्नर जिवंत असतानाच गाजत होती. हेफ्नरच्या वाडय़ातील काम-क्रीडांगणावर ‘अॅलिस इन वंडरलॅण्ड’ थाटात लिहिलेले आणि हे आत्मचरित्र लुईस कॅरलची १७ उद्धृते प्रकरणारंभी वापरून अतिरंजक बनविण्यात आले होते. त्यातील सारे आरोप आणि घटना खोटय़ा असल्याचे दावे खुद्द ह्यू हेफ्नर आणि त्यांची शेवटची (म्हणजे तिसरी) पत्नी क्रिस्टल हेफ्नर माध्यमांसमोर उच्चरवात करून थकली होती..
आता याच क्रिस्टल हेफ्नरने आपल्या ‘ओन्ली से गुड थिंग्ज : सव्र्हायिव्हग प्लेबॉय अॅण्ड फायंिडग मायसेल्फ’ आत्मचरित्रासह प्ले-बाबाच्या कामकर्तृत्वावर नवा उजेड पाडला आहे. गेली सात वर्षे अज्ञातात आणि प्लेबॉयच्या वाडाविरहित आयुष्य जगणाऱ्या क्रिस्टल हेफ्नरने वाडय़ातील ऐषारामी कामजीवनाचे विस्तृत तपशील स-छायाचित्र २२३ पानांपर्यंत धाववले आहे.
२००८ साली हॅलोविन पार्टीसाठी प्लेबॉय मॅन्शनमध्ये निमंत्रित असलेल्यांपैकी एक क्रिस्टल हेफ्नर या होत्या. विशिष्ट पोशाखात सुंदर, सुनयना, सुडौल दिसणाऱ्या या ललनेवर हेफ्नर यांची नजर गेली आणि त्यांच्या ‘बनी’कावतींच्या ताफ्यात तिची नेमणूक झाली. चार वर्षांनंतर म्हणजे क्रिस्टल २६ वर्षांच्या असताना आणि ह्यू हेफ्नर फक्त ८६ वर्षांचे असताना त्यांचा थाटामाटात विवाह झाला. क्रिस्टल यांच्या आत्मचरित्रात शीर्षकातील अध्र्या भागाबरहुकूम भागही येतो. मनाच्या आत-आत ‘जेसीबी’ यंत्राने उत्खनन करता स्वत:ला शोधण्याचा अट्टहास. पण चांगल्या गोष्टी सांगण्याऐवजी वाडय़ाविषयीच्या आणि हेफ्नरविषयी खऱ्या खऱ्या शब्दश: ‘कुचकामी’ अवस्थेच्या वर्णनांनी हे आत्मचरित्र भरलेले आहे.
दोन लग्नांनंतर आपल्या वाडय़ावर बनिकावतींचा ताफाच हेफ्नरने ठेवला होता. त्यासाठी दरएक बनीकावतीला एक हजार डॉलर इतकी रक्कम मिळत होती. मॉडेल असलेली क्रिस्टल या ताफ्यातून हेफ्नरची विशेष प्रिया कशी झाली, त्याच्या ताफ्यामधील सुंदर आणि भरभक्कम स्त्रियांवरचे त्याचे प्रेमाचरण यांचे किस्से या आत्मचरित्रात सापडतात. बनीकावती बनण्यासाठी उत्सुक असलेल्या आणि हेफ्नरच्या दृष्टीस पडून पावन होण्यासाठी आतुर असलेल्या ललनांच्या फौजेविषयी माहिती मिळते. आधी वाटलेले वाडय़ातील धाडसकेंद्र लग्नानंतर स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या तुरुंगवासात कसे परिवर्तित झाले, याची भावोत्कटसदृश कहाणीही यात येते.
वाडय़ावरील प्राण्या-पक्ष्यांबद्दल, स्वत:च्या लाडक्या चार्ली नामक कुत्र्याबद्दल आणि अनेक कामभंजक तपशिलांनी हे आत्मचरित्र भरले आहे. अमेरिकेसह इतर जगात कामक्रांती घडविणाऱ्या ह्यू हेफ्नर या माणसाचे उतारवयातील कामजीवन म्हणून, हे पुस्तक खूपविक्यांच्या पंगतीत शिरले आहे. प्लेबॉय वाडय़ात राहताना तिथले भरभरून सुख ओरपून झाल्यानंतर क्रिस्टल हेफ्नर यांना आपल्या स्वशोधाच्या निमित्ताने तिथे जगलेल्या दु:खद आठवणींचा पाढा वाचावासा वाटत असल्याबद्दल टीका होत आहे. खुद्द हेफ्नरने जिवंत असताना म्हटले होते की वाडय़ावरच्या या ‘बनीकावती’ पुढे लोकप्रिय होण्यासाठी किंवा आपले लक्ष वेधून घेण्यासाठी माझ्यावर विविधांगी आरोप करणारी पुस्तके, लेख लिहितात. त्याच्या शेवटच्या बनीकावती पत्नीनेदेखील हाच मार्ग निवडला, ही या पुस्तकाची खरी गंमत आहे.
हेही वाचा
१९८० चा सुमार.. नुकतेच जपानी भाषा शिकलेल्या जे रुबेन यांनी हौस आणि अभ्यासाखातर जपानमधील ताज्या कथाकारांच्या कथा इंग्रजीत अनुवादित केल्या होत्या. त्यातील काही कथा मूळ लेखकांपर्यंत पोहोचविण्यात आल्या. मुराकामी यांनी रुबेन यांना फोन करून ‘तुम्ही केलेला हा अनुवाद मी प्लेबॉय मासिकासाठी देऊ का?’ अशी विचारणा करत त्यांचे कौतुक केले होते. हारुकी मुराकामी- जे. रुबेन ही लेखक-अनुवादकांची नावे पुढेही अनेक पुस्तकांवर झळकत राहिली. हारुकी मुराकामी याची ऐंशीच्या दशकात प्लेबॉय मासिकात प्रसिद्ध झालेली ‘सेकंड बेकरी अॅटॅक’ ही पूर्ण कथा.
https:// shorturl. at/ bnFH3
स्टीव्हन किंग हा सत्तरीपासून ते आजतागायत कथात्म आणि अकथनात्म साहित्य लिहिणारा लेखक. भयकथाकार ही त्याची छोटीशी ओळख. पण प्लेबॉयमध्ये १९८३ साली आलेल्या या दीर्घ मुलाखतीतून त्याच्याविषयी अनेक नव्या गोष्टी सापडू शकतील.
https:// shorturl. at/ jmzHS
प्लेबॉय मासिकाची फिक्शन संपादिका अॅलिस के. टर्नर यांच्या पडद्यामागच्या कार्याची दखल घेणारा मृत्युलेख.
https:// shorturl. at/ ejJK9