श्रीरंग सामंत
‘वाटाघाटींना पर्याय नाही’, ही झाली एक बाजू. आक्रमण टाळावे, ही दुसरी. पण हे पुस्तक तिसरी बाजू दाखवते..
भारत-पाकिस्तान तिढा सोडवण्यासाठी बऱ्याच वेळा उभय देशांत वाटाघाटी झाल्या आहेत, पण त्यातून कायमचा तोडगा अजून निघू शकलेला नाही. तरीही किचकट प्रश्न सोडवण्यासाठी अनौपचारिकरीत्या चर्चा चालू ठेवण्याची ‘बॅक चॅनल’ राजनीती हितावह असते. या संदर्भात ‘इन परस्यूट ऑफ पीस’ हे सितदर लांबा यांचे हल्लीच प्रकाशित झालेले पुस्तक; त्याची ओळख ‘बुकमार्क’च्या वाचकांना ‘पाकिस्तानशी चर्चा शक्य आहे?’ (बुकमार्क- ३ जून) या लेखामुळे असेलच. पण इतकी वर्षे चालू असलेल्या अनौपचारिक चर्चातून काही निष्पन्न का होऊ शकले नाही? याचे उत्तर शोधण्यासाठी, गेल्या वर्षभरात प्रकाशित झालेले दुसरे पुस्तक वाचले पाहिजे!
हे दुसरे पुस्तक म्हणजे शरत सभरवाल यांचे ‘इंडियाज् पाकिस्तान कॉनन्ड्रम – मॅनेजिंग अ कॉम्प्लेक्स रिलेशनशिप’. सभरवाल २००९ ते २०१४ पर्यंत पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्त होते आणि भारतीय परराष्ट्र सेवेत त्यांनी इतर अनेक महत्त्वाची पदे भूषविली आहेत. प्रत्यक्ष रिंगणातून अनुभवल्यामुळे त्यांचे विश्लेषण पाकिस्तानची संस्थात्मक जडणघडण समजण्यास उपयुक्त ठरते.
पाकिस्तानी सैन्य आणि आयएसआय यांच्या भारताबाबतच्या दृष्टिकोनात मूलभूत बदल होण्याची शक्यता फारशी नाही. भारताशी व्यवहार करताना पाकिस्तानने सौदी अरेबिया, अमेरिका आणि चीनच्याही पाठिंब्याचा उपयोग केला होता; पण आता चीन-पाकिस्तान यांचे गूळपीठ चांगलेच जुळले आहे. सैन्य हे पाकिस्तानात सत्तेचे केंद्र म्हणून ठामपणे प्रस्थापित आहे आणि पडद्यामागून राजकीय परिस्थिती नियंत्रित करण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. यामुळे लष्कराला राष्ट्रीय महत्त्वाच्या मुद्दय़ांवर नकाराधिकार मिळतो. म्हणूनच पाकिस्तानशी व्यवहार करताना पाकिस्तानी लष्कराला सोबत ठेवणे हितावह आणि आवश्यक होते. या सर्व आयामांचा उदय आणि त्यांची शांतता-प्रयत्नांवर असलेली पकड समजून घेण्यास सभरवाल यांचे पुस्तक उपयोगी ठरते.
सभरवाल यांनी विषयाची मांडणी दोन भागांत केली आहे. पहिला भाग पाकिस्तान या राज्याचे स्वरूप, त्याचे आंतरिक शक्ति-संघर्ष आणि या सर्वाचा भारतावर परिणाम यावर भाष्य करतो, तर दुसऱ्या भागात भारत-पाकिस्तान द्विपक्षीय संबंधातील प्रमुख मुद्दे, धोरणात्मक पर्यायांचे मूल्यांकन आणि पुढे जाण्याचा मार्ग याची मीमांसा येते.
सुरुवातीच्या प्रकरणाचे शीर्षक ‘त्रासलेले आणि त्रासदायक’ (ट्रबल्ड अॅण्ड ट्रबलसम) असे आहे! यात धार्मिक अतिरेक तेथे कसा फोफावला, त्याला राज्यव्यवस्थेची फूस आणि सैन्याचा आश्रय हे दोन्ही कसे मिळत गेले, याचा तपशील येतो. तेथील शिक्षणव्यवस्था ही कट्टरवादास प्रोत्साहन देण्यासाठी कशी वापरली गेली याचेही वर्णन इथे आहे. पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेची स्थिती ‘कर्जाच्या टेकूवर.. आणि प्रार्थनेवर अवलंबून’ इतकी तोळामासा आहे. मुख्यत्वे महसुलाचा मोठा वाटा सैन्यावर खर्च होणे हे त्याचे कारण. पाकिस्तानविषयी कुठलेही विवेचन त्याच्या सैन्याच्या भूमिकेशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. थोडक्यात, पाकिस्तानी सैन्य हे ‘स्टेट विदिन अ स्टेट’ असे म्हटले जाते व पाकिस्तानची राज्यव्यवस्था ही सैन्याच्या दावणीला बांधलेली आहे हे आता सर्वमान्य आहे. पाकिस्तानातील वांशिक भेदांचाही आढावा येथे येतो. पंजाबी, सिंधी, बलोच आणि पख्तून ह्यातील पंजाब वगळता इतर सर्व वांशिक-प्रादेशिक लोकांना कमीअधिक प्रमाणात आपापली स्वायत्तता हवी आहे आणि पंजाब/पंजाबी यांचे वर्चस्व जे सगळीकडे दिसून येते याबाबत असंतोष आहे. त्यात भारतातून निर्वासित लोकांचा गट, ज्याला ते मोहाजिर म्हणजे अजूनसुद्धा शरणार्थी असे वर्गीकृत करतात, यांची कराचीवर नियंत्रणासाठी लढाई चालू असते. पख्तून समस्येस अफगाणिस्तानची जोड आहे कारण कुठल्याही अफगाण सरकारने डुरँड लाइन- अफगाणिस्तान आणि विभाजन पूर्व भारत यांची सीमारेषा – मान्य केलेलीच नाही. याचे कारण या रेषेच्या दोन्ही बाजूंस पख्तून हा एकच वांशिक गट आहे.
अशा बहुविध समस्या असूनसुद्धा पाकिस्तानचे भारताशी शत्रुत्व का अबाधित चालू आहे? सभरवाल यांचा निष्कर्ष असा की, शत्रुत्वाच्या मुळाशी पाकिस्तानला त्यांची स्वत:ची ओळख नसणे, हा न सुटलेला प्रश्न आहे. पाकिस्तानचे भारतविरोधी धोरण ‘आम्ही भारत नाही’ या भावनेने प्रेरित आहे, त्यामुळेच काश्मीरला ‘फाळणीचा अपूर्ण राहलेला कार्यभाग’ समजण्यासारखे प्रकार पाकिस्तान करतो. पुस्तकाचे प्रतिपादन असे की भारत-विरोध हा आता पाकिस्तानी आस्थापनेच्या व जनतेच्या रक्तात भिनलेला आहे आणि या तिरस्काराची सुरुवात होते ती ‘अ-भारतीय असणे हे आपण विसरल्यास पाकिस्तान कोलमडून पडेल या भीतीने! त्यास खतपाणी मिळते ते तेथील शिक्षण पद्धतीने, जेथे भारताचा उल्लेख हा एक हिंदू राज्य म्हणून करण्यात येतो आणि हिंदूंच्या बाबतीत नकारात्मक धारणा पसरवण्यात येतात. सरकारपुरस्कृत भारतविरोधी प्रचार तर चालूच असतो. त्यात काश्मीरमध्ये चालू असलेले ‘अत्याचार’ आणि भारतात मुस्लिमांना दिली जात असलेली वागणूक याविषयी अतिरंजित वर्णन असते. या सर्व धारणांच्या वर आहे पाकिस्तानी सैन्य, ज्याची पाकिस्तानी राजकारण, समाज आणि सर्वसाधारण जनता यावरची पकड भारताचा बागुलबुवा उभा करण्यात दंग असते.
विश्व-समुदायास वेळोवेळी भेडसावत असलेला सर्वात मोठा प्रश्न- पाकिस्तान ‘वाया गेलेले (फेल्ड) राष्ट्र’ किंवा ‘वाया जाणारे’ राष्ट्र आहे का, हा आहे. त्यावर सभरवाल यांचे मत असे की पाकिस्तान हे ‘अकार्यक्षम राष्ट्र’ या श्रेणीमध्ये असण्याची शक्यता अधिक आहे.
पुस्तकाच्या दुसऱ्या भागात सभरवाल भारत-पाकिस्तानचे संबंध आणि धोरणात्मक पर्यायांचा ऊहापोह करतात. त्यांचे मत असे आहे की, जम्मू काश्मीरबाबत पाकिस्तानचे धोरण हे त्या राज्याच्या विशेष दर्जानी (स्पेशल स्टेटस) प्रेरित नसल्यामुळे हा दर्जा रद्द करून आपण त्यांचा आणखी रोष ओढवून घेतला असे काही नाही. पाकिस्तानविषयी कुठल्याही विश्लेषणात असणाऱ्या दहशतवाद समस्येवर ते नमूद करतात की आता पाकिस्तानने पाळलेले दहशतवादी त्यांनाच त्रास देत आहेत. एकमेकाच्या जनतेशी संबंध वाढवणे, व्यापार वाढविणे हे उपाय ठीक, पण पाकिस्तानचे खरे शक्तिकेंद्र असलेली संथा म्हणजे सैन्य- जोपर्यंत सैन्यास भारताशी संबंध सुधारणे महत्त्वपूर्ण वाटत नाही तोपर्यंत पाकिस्तानचे कुठलेही सरकार या दिशेने पाऊल उचलू शकत नाही. आपल्याकडील काही खुर्ची-बहाद्दरांना ‘लष्करी पर्याय’ वापरण्याची जी खुमखुमी येते, त्याबाबत सभरवाल यांचे विश्लेषण समर्पक वाटते. पाकिस्तानकडे अण्वस्त्रे आहेत आणि ती भारताविरुद्ध वापरासाठीच आहेत हे जगजाहीर आहे. पण भारताशी संघर्ष झाल्यास ती कोणत्या टप्प्याला वापरण्यात येतील हे गूढ पाकिस्तानने राखून ठेवलेले आहे (यालाच ‘न्यूक्लियर ब्रिंकमनशिप’ म्हणतात) – पाकिस्तानच्या मते त्यांची अण्वस्त्रे भारताला पाकिस्तानशी निर्णायक युद्ध लढण्यापासून परावृत्त करतील. म्हणूनच अण्वस्त्रांचा एक साइड इफेक्ट म्हणजे भारताला पाकिस्तानी सैन्याची वर्तणूक बदलण्यास यश मिळण्याची शक्यता धूसर होत चालली आहे.
शेवटच्या प्रकरणात ते पुढची वाटचाल कशी असू शकते यावर मते मांडतात. पाकिस्तानच्या विघटनाला चालना देणाऱ्या कोणत्याही धोरणाचे परिणाम भारतावरही होऊ शकतात, हे त्यांचे म्हणणे महत्त्वाचे आहेच. पाकिस्तान आपल्या विद्यमान बाह्य सीमांवर नियंत्रण ठेवण्यास सक्षम असला तरीही त्याच्या आंतरिक विरोधाभासामुळे तेथील अराजकता चालू राहील व त्यामुळे हे एक अकार्यक्षम राज्य राहील ज्याचा मुख्यत्वे भारतालाच त्रास होणार. त्यामुळे भारताला संयम राखणे आवश्यक आहे कारण काळ भारताच्या बाजूने असेल. आपले आंतरिक समस्याग्रस्त भाग हे काळजीपूर्वक हाताळले पाहिजेत, ज्यात काश्मीर हे मुख्य आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते लांबा यांच्या बॅक चॅनल प्रयत्नांचा उल्लेख करीत नाहीत आणि हे मानण्यास जागा आहे की बॅक चॅनल वार्ता पाकिस्तानच्या सैन्याची मनोवृत्ती बदलेपर्यंत सफल होणार नाहीत.
सभरवाल यांचे एकूण मत असे दिसते की, आपण आपली अर्थव्यवस्था इतकी मजबूत करायला हवी की इतर देश भारताची बाजू घेण्यातच शहाणपण समजतील. त्याबरोबरच आपण आपल्या इतर शेजारी देश यांच्याशी चांगले आणि गाढ संबंध प्रस्थापित करण्यावर महत्त्व दिले पाहिजे. पाकिस्तानमधील लोकांना आपल्या ‘सौम्य शक्ती’चे (सॉफ्ट पॉवर) आकर्षण वाटावे यासाठी प्रयत्न करावयास हवे. आपले इतरांस आकर्षण वाटावे अशी मुख्य गोष्ट म्हणजे भारत या उपखंडातील जवळजवळ सर्व भाषिक, धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरांचे घर आहे, आणि म्हणून दक्षिण आशियाई विविधतेचे एक उदाहरण आहे. लोकशाही आणि सर्वसमावेशक राजकीय व्यवस्था या परंपरेचे जतन आणि प्रबळीकरण हा केवळ पाकिस्तानच्याच नव्हे तर कोणत्याही विभाजनवादी विचारसरणीच्या विषाणूवर उतारा ठरेल.
‘इंडियाज् पाकिस्तान कॉनन्ड्रम – मॅनेजिंग अ कॉम्प्लेक्स रिलेशनशिप’
लेखक : शरत सभरवाल
प्रकाशक : रूटलेज इंडिया
पृष्ठे : २२८ किंमत : ९९५ रुपये
shrirang2306@outlook.com