पंकज भोसले
हारुकी मुराकामीची महत्ता शोधणारे डेव्हिड काराशिमा यांचे पुस्तक आणि मुराकामींचेच लेखकीय आत्मपरीक्षण यांची ही संयुक्त ओळख.. जपानची मेहनतनिष्ठ प्रज्ञा आणि अमेरिकी गुणग्राहकता (किंवा ग्राहकताच) यांचे धागेदोरे उकलणारी..
हारुकी मुराकामी या लेखकाचे कोणतेही नवे पुस्तक इंग्रजीत भाषांतरून आल्यानंतर त्याचा गाजावाजा खूपविकी यादी देणाऱ्या ‘न्यू यॉर्क टाइम्स’पासून युरोपीय देशांपर्यंत आणि युद्धग्रस्त देशांनी चालविलेल्या बुक-पायरसी विश्वापासून भारतातील शहरांच्या रस्ता पुस्तक दालनांपर्यंत जोमाने होतो. गेली ४० वर्षे अमेरिकेला तात्पुरते घर मानणारा, युरोपातील एका देशात कादंबरीचा पहिला खर्डा तर दुसऱ्या देशात मजकुराला अंतिम रूप देऊन चिमुकल्या देशातील जपानी वाचकांमध्ये पहिल्यांदा खळबळजनक आकडेवारीने खपणारा (किमान २० लाख ते कमाल दोन कोटी प्रती) आणि नंतर अमेरिकी प्रकाशकांकडून कैक लाखांच्या पहिल्या आवृत्तीसह जगभर गाजणारा हा लेखक भारतातील सर्वसामान्य वाचकांच्या परिघाला गेल्या दशकभरापासून परिचयाचा. खूपविका असला, तरी तो ‘बेस्टसेलर्स’मधील कचकडय़ा-अल्पजीवी ग्रंथांहून गांभीर्याने पाहिला आणि वाचला जातो. साहित्याच्या नोबेल पारितोषिकासाठी उमेदवार म्हणून सलग चारेक वर्षे वृत्तमाध्यमांनी चर्चेत ठेवल्याचे सोयर-सुतक न ठेवता सत्तराव्या वर्षांत नवी कादंबरी लिहिण्याची चूष राखणारा हा धावता लेखक. म्हणजे खरोखरीच दररोज तासभर धावण्याचा व्यायाम करणारा. या वयातही जगभरातील मॅरेथॉन स्पर्धामध्ये भाग घेणारा. २००७ मध्ये त्याने या धावण्याचे आत्मचरित्र लिहिले. ‘व्हॉट वी टॉक अबाउट व्हेन वी टॉक अबाउट रनिंग’. धावण्याच्या असोशीसह लेखनाच्या अगदी सुरुवातीपासूनच्या घटना त्यात रचल्या आहेत. म्हणजे बेसबॉलचा सामना पाहताना अचानक अपघाती ‘आपण कादंबरी लिहू शकतो’ या साक्षात्कारानंतर पुढले सहा महिने दररोज रात्री पाने खरडण्याचा अट्टहास ठेवत पहिली कादंबरी पूर्ण करण्याचा तपशील. त्या कादंबरीला मिळालेल्या पुरस्कारानंतर दुसरी कादंबरी पूर्ण करण्याची हौस. त्यानंतर आपला चालता-बोलता जॅझ क्लब विकून कादंबरी लिखाणालाच उपजीविकेचे साधन करण्याचा निवडलेला मार्ग. जो इतरांच्या लेखी हास्यास्पद असला, तरी त्याने मात्र गांभीर्याने घेतला आणि त्या दिशेने स्वत:ला घडविण्याची तयारी केली. फक्त जपानी भाषेत कादंबरी लिहून पोट भरण्याचा मुराकामीचा हा विचार फळलाच नाही, तर पुढे पन्नास भाषांमध्ये त्याच्या कादंबऱ्या पोहोचण्यास उपयुक्त ठरला. प्रत्येक दशकात कीर्ती, प्रतिष्ठा आणि प्रतिभा यांचा आलेख उंचावत गेलेल्या मुराकामीभोवतीचे वलय वाढत कसे गेले, तो घडविला गेला किंवा घडला कसा हे सांगणारी दोन जुळी पुस्तके अलीकडेच उपलब्ध झालीत. त्यापैकी पहिले डेव्हिड काराशिमा या जपानी कथापंडिताचे ‘हू वी आर रीिडग, व्हेन वी आर रीिडग मुराकामी’. ऐन करोनाकाळ बहरलेला असताना आणि देशोदेशी लाटांची क्रमवारी मोजली जात असताना दाखल झाल्यामुळे झाकोळलेले. दुसरे गेल्या महिन्यात आलेले आणि सध्या चाहत्यांच्या उडय़ा पडत असलेले खुद्द मुराकामीचे ‘नॉव्हेलिस्ट अॅज ए व्होकेशन’.
पहिल्या – काराशिमाच्या – पुस्तकामध्ये जपानचा हा स्थानिक लेखक आंतरराष्ट्रीय पटलावर कसा पोहोचला, याचे विस्तारित वर्णन आहे. त्याच्या कादंबऱ्या, कथासंग्रह जागतिक वगैरे होण्यामागे किती हात पुढे आले, किती जणांनी या लेखकातले गुण हेरून कशा पद्धतीने त्याला अमेरिकेमध्ये ओळख मिळवून दिली. त्याची तिसरी कादंबरी ‘वाइल्ड शीप चेस’ अमेरिकी वाचकांसाठी पहिल्यांदा उपलब्ध करून देताना जपानी प्रकाशकांच्या यंत्रणेने कशी मेहनत घेतली; त्याच्या भाषांतरकारांनी त्याच्या कादंबऱ्यांमधील वादग्रस्त शृंगार-वर्णनांना सुरुवातीला कात्री कशी आणि किती लावली; अमेरिकी वाचकांनी, टीकाकार-समीक्षकांनी या कादंबरीला कसे स्वीकारले; या कादंबरीच्या गौरवार्थ न्यू यॉर्क टाइम्स, न्यू यॉर्करमधील परीक्षणांच्या बातम्या जपानी वृत्तपत्रांनी कशा दिल्या हे सगळे. सुरुवातीला जपानमध्ये समीक्षकांकडून ‘तद्दन अमेरिकी’ म्हणून हिणविल्या गेलेल्या आणि ‘हे साहित्यच नाही मुळी’ अशा टिप्पण्या जोडणाऱ्या टीकाकारांकडे दुर्लक्ष करीत तरुण वाचकांकडून स्वीकारल्या जाणाऱ्या या लेखकाची वाढत जाणारी लोकप्रियता जपानी नजरेतून रिपोर्ताजसारखी काराशिमा यांनी टिपली आहे.
तर मुराकामी यांच्या ‘नॉव्हेलिस्ट अॅज ए व्होकेशन’ या पुस्तकाची काहीशी ‘लेखक होऊ पाहणाऱ्यांना कादंबरी लिहिण्याचा सल्ला’ अशा प्रकारची जाहिरात होत असली, तरी ते तसे अजिबातच नाही. वाचायला गेलो, तर ‘व्हॉट वी टॉक अबाउट व्हेन वी टॉक अबाउट रिनग’ या लेखन आत्मचरित्राचा हा पुढला भाग म्हणता येईल किंवा काराशिमा यांच्या ‘हू वी आर रीिडग, व्हेन वी आर रीिडग मुराकामी’ पुस्तकातील सर्वच संदर्भाना अधिक तपशिलांची जोड दिलेला ग्रंथ म्हणून त्याच्याकडे पाहता येईल.
एक दिवस- दोन पुस्तके, दोन वर्णने
म्हणजे काराशिमा यांच्या पुस्तकामध्ये मुराकामी यांची पहिली अमेरिकावारी येते. कोडान्शा पब्लिशिंग हाऊस या बडय़ा जपानी प्रकाशन संस्थेने अमेरिकेमध्ये जपानी पुस्तकांची भाषांतरे गाजविण्यासाठी अमेरिकेत थाटलेल्या कार्यालयात मुराकामींना ऐंशीच्या दशकात बोलावले गेले तो प्रसंग साद्यंत येतो. मुराकामी सपत्नीक विमानतळावर पोहोचत असताना त्या दिवशी न्यू यॉर्क टाइम्समध्ये आलेल्या ‘वाइल्ड शीप चेस’वर पानभर आलेल्या परीक्षणासह कोडान्शा पब्लिशिंग हाऊसचे प्रतिनिधी दाखल झाले होते. त्यांच्या रोजच्या धावण्याची गरज लक्षात घेता न्यू यॉर्कमधील सेंट्रल पार्कजवळ त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. पण मुराकामी यांनी जुन्या-दुर्मीळ पुस्तकांची आणि रेकॉर्डसची दुकाने सर्वाधिक असलेल्या परिसराची राहण्यासाठी निवड केली, याची माहिती काराशिमा यांच्या पुस्तकातून होते.
मग मुराकामींच्या पुस्तकात याच भेटीच्या दिवसाबद्दल अधिकचा तपशील मिळतो. कोडान्शा पब्लिकेशनच्या अमेरिकी कार्यालयात असलेले सर्व अमेरिकी आणि न्यू यॉर्कमध्ये राहणारे कर्मचारी त्यांच्या पुस्तकाच्या प्रसिद्धी आणि विक्रीसाठी किती उत्साही होते, याच्या तपशिलांसह नवी माहिती न्यू यॉर्कर या साप्ताहिकाच्या भेटीबद्दल येते. आल्फ्रेड बर्नबाऊम यांनी मुराकामी यांच्या पहिल्या कादंबऱ्यांची इंग्रजी भाषांतरे केली. त्यांच्या कथांमधील वेगळेपणही जगाला समजावून दिले. पण १० सप्टेंबर १९९० रोजी न्यू यॉर्करमध्ये ‘टीव्ही पीपल’ ही कथा प्रसिद्ध झाल्यानंतर न्यू यॉर्करच्या कथासंपादिकेपासून रॉबर्ट गॉटलिब या संपादकाने विशेष करून मुराकामींच्या कथांना प्रसिद्ध करण्याचा कसा धडाका लावला; न्यू यॉर्कर या साप्ताहिकातील प्रसिद्धीमुळे त्यांची जगाला खऱ्या अर्थाने ओळख कशी झाली, हे विस्ताराने येते.
काराशिमा यांच्या पुस्तकामध्ये आल्फ्रेड बर्नबाऊम, फिलिप गॅब्रिएल, जे रुबीन, टेड गुसन या इंग्रजी भाषांतरकारांनी हारुकी मुराकामीच्या कादंबऱ्यांना कसकसा आकार दिला याची छान माहिती दिली आहे. जपानमध्ये प्रसिद्ध झालेल्या तीन कादंबऱ्यांच्या मालिकेला अमेरिकेत एकाच कादंबरीत आणताना जागतिक बाजारपेठेचा विचार करून मूळ मजकुरातील पंचवीस हजार शब्दांना लावलेली कात्री आणि त्याचे समर्थन येते. तर मुराकामी यांच्या पुस्तकात, या सर्व भाषांतरकारांनी आणि जपानी भाषेच्या अभ्यासकांनी सुरुवातीलाच त्यांच्या लेखनातील गुण हेरून स्व-प्रेरणेने केलेली भाषांतरे आणि त्यावरची चर्चा यांवर भर दिला जातो.
मुराकामी यांचे ताजे पुस्तक म्हणजे ११ निबंधांचे कडबोळे आहे. त्यापैकी सहा ‘मंकी बिझनेस’ या जपानी मासिकासाठी लिहिलेले आणि पाच नव्याने खास या पुस्तकासाठी रचलेले. २०१५ साली जपानमध्ये प्रसिद्ध झालेल्या या पुस्तकाला इंग्रजीत येण्यासाठी तब्बल सात वर्षांचा कालावधी लागला. कारण दोन वर्षांचा करोनाकाळ आणि त्याने मंद केलेले प्रकाशनचक्र. या काळात न्यू यॉर्कर, ग्रँटा आणि ग्रँटाचेच प्रतिरूप असलेल्या जॉन फ्रीमन्सच्या ‘फ्रीमन्स’ या साहित्यिक मासिकात त्याच्या काही कथा येऊन गेल्या. ‘फस्र्ट पर्सन सिंग्युलर’ हा कथासंग्रहसुद्धा येऊन गेला.
‘नॉव्हेलिस्ट अॅज ए व्होकेशन’ सुरू होते ‘ आर नॉव्हेलिस्ट ब्रॉड-माइंडेड?’ या शीर्षकाच्या निबंधाने आणि संपते ‘गोइंग अब्रॉड : ए न्यू फ्रण्टिअर’ या पूर्णपणे परदेशी बनूनही जपानी लेखक म्हणून राहिलेल्या अस्तित्त्वाचे. या दरम्यान जपानपासून जगभरातील पारितोषिके मिळण्या/ न मिळण्याबद्दलची मुराकामी यांची मते, आपल्या लेखनातील नावीन्यावर चर्चा करताना लेखक आणि संगीतकारांच्या कलेमधील ‘ओरिजिनॅलिटी’वरचे – व्युत्पन्नतेवरचे- भाष्य. आपल्या लेखनासाठीची रोजची दहा पाने, ज्यांची जपानी भाषेतील आणि इंग्रजी भाषेतील शब्दसंख्या किती होईल याचे ठरलेले गणित सांगत कादंबरी लेखनाच्या स्वीकारलेला व्यवसाय सुकर व्हावा म्हणून वेचलेल्या कष्टांची माहिती होते. बरे हे सांगताना ‘नवोदित लेखकांना कसे लिहावे हे सांगणारा’ सल्लागाराचा अभिनिवेश दिसत नाही. ‘कादंबरी लिहिण्याची ही प्रक्रिया मला जमली बुवा. तुम्हाला जमली नाही तर तुमची तुम्हाला शोधायला हवी.’ ज्याने-त्याने आपली लिखाणाची पद्धत शोधून काढायला हवी ही मुराकामीची भूमिका आहे. स्टीव्हन किंग यांचे ‘ऑन रायटिंग’, वॉल्टर मोस्ले यांचे ‘धिस इयर यू राइट युअर नॉव्हेल’ किंवा ‘हाऊ टू बिकम अ रायटर’सारख्या शीर्षकांनी ढिगांनी लिहिली जाणारी पुस्तके एकीकडे आणि मुराकामी यांचे कादंबरी लेखन जगण्याचा मुख्य व्यवसाय म्हणूून स्वीकारल्यानंतर झालेल्या जगण्याचे हे पुस्तकरूपी आत्मपरीक्षण एकीकडे असे या पुस्तकाबद्दल म्हणावे लागेल. मुराकामीच्या अनेक कथा-कादंबऱ्यांतील, अकथनात्मक पुस्तकांमध्ये जॅझ संगीताची आवड, शाळकरी वयात कोबे बंदराजवळील जुन्या पुस्तकविक्रेत्यांकडून घेतलेल्या ढिगांनी अमेरिकी कादंबऱ्यांच्या वाचनाबद्दल, रेमण्ड चॅण्डलरपासून एफ. स्कॉट फिट्झेराल्डच्या ‘ग्रेट गॅट्सबी’च्या प्रभावाबद्दल, धावण्याबद्दल, रेकॉर्डसबद्दलच्या संदर्भाची पुनरावृत्ती होते. इथे ती अधिक वाटली, तरी नव्या कित्येक गोष्टी आहेत.
अनुवादक मुराकामी!
रेमण्ड काव्र्हर या सत्तर-ऐंशीच्या काळात अमेरिकेसह जगभरात गाजणाऱ्या कथालेखक मुराकामी यांनी सगळाच्या सगळा जपानीत अनुवाद केला आहे, याचा तपशील इथे वाचायला मिळतो. या काळात आपल्याकडे मराठीत ‘कोंदण-गोंदणांच्या’ विशेषणांत रमलेल्या, पाश्चात्त्य प्रतिभांनी िपगटलेल्या लेखकांनी जगात रेमण्ड काव्र्हरचा आजच्या मुराकामीइतका दबदबा असताना ‘हेिमग्वेच्या संध्याकाळी’ची बुरसटलेली लेखनमात्रा देत इथल्या जगाला काव्र्हरचा गंधही लागू दिला नाही. (अनुवादातही रेमण्ड काव्र्हर आपल्याकडे फारसा किंवा थोडय़ा मात्रेने आल्याचे ऐकिवात नाही.) तिसाव्या वर्षी लेखक म्हणून अचानक म्हणून उगवून आलेल्या या पूर्वेच्या ताऱ्याने आपल्या लहानपणी शाळकरी वयापासून किती वाचन केले होते, याचा सगळा लेखाजोखा येथे सापडतो. कादंबरी लिहिताना मेंदूपेशींना आहार म्हणून मुराकामीची इंग्रजी कादंबऱ्यांचा जपानीत अनुवाद करण्याची खोड येथे लक्षात येते.
शिवाय हे सगळे वाचताना लोकप्रिय कादंबरीकार, कथाकार म्हणून जगभर मान्यता मिळाल्यानंतरही प्रसिद्धीपासून लांब राहण्याची मुराकामींची वृत्ती समोर येते. दहा-पाच कादंबऱ्या आणि चारेक मान-सन्मान मिळाल्यानंतर ‘मी-मीत्वाचे स्वामित्व’ लेखकाच्या कलाकृतीतून सातत्याने तरंगू लागते. मग तो स्थानिक पातळीवरचा लेखकू असो किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा साहित्यिक. कादंबरी व्यावसायिक म्हणून सारेकाही मिळूनदेखील ‘मी-मीत्वाच्या स्वामित्वा’पलीकडे मुराकामी कसे जगतो, हे काराशिमा यांच्या ग्रंथासह मुराकामीच्या ताज्या पुस्तकातून अधिक स्पष्ट होऊ शकेल. चाहत्यांसाठी अनिवार्यच; पण मुराकामीचे एकही पुस्तक न वाचलेल्यांनाही मुराकामी कळण्यासाठी ही उत्कृष्ट पुस्तके आहेत.
‘नॉव्हेलिस्ट अॅज अ व्होकेशन’
लेखक : हारुकी मुराकामी
प्रकाशक : हार्विल सेकर
पृष्ठे : ३४०; किंमत : ५७५ रु.
‘हू वी आर रीडिंग, व्हेन वी आर रीडिंग मुराकामी’
लेखक : डेव्हिड काराशिमा
प्रकाशक : सॉफ्ट स्कल प्रेस
पृष्ठे : ३०४ ; किंमत : १०९८ रु.
pankaj.bhosale@expressindia.com