सई केसकर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
लोक अशा कादंबऱ्या वाचतात कारण त्यांच्या आसपास, कदाचित थोडय़ा कमी तीव्रतेनं जे घडत असतं, त्याचंच प्रतिबिंब त्यांना इथं दिसतं..
डब्लिनमध्ये राहणाऱ्या स्टॅक कुटुंबातली आई- आयलिश- घरी भांडी घासत असताना खिडकीबाहेर एक चारचाकी येऊन थांबते. लॅरीनं- तिच्या नवऱ्यानं- आम्हाला भेटून जावं असं पोलीस सांगून जातात. त्यांनी सांगितल्याप्रमाणे तिचा नवरा त्यांना भेटून येतो. लॅरी शिक्षक संघटनेचा नेता असतो. सत्तेत असलेल्या ‘नॅशनल अलायन्स पार्टी’च्या धोरणांना लोकशाही पद्धतीनं विरोध करण्याची मोहीम त्यानं हाती घेतलेली असते. त्याच्याबरोबर काम करणारे काही सहकारी अचानक गायब झालेले असतात. तरीही, सरकारचं डोकं नक्कीच ठिकाणावर येईल, असा विश्वास सगळय़ांनाच वाटत असतो. एक दिवस मात्र एका मोर्चातून लॅरीलाच उचलून नेतात. एखाद्या कृष्णविवरानं गिळून टाकावं तसा लॅरी नाहीसा होतो. हे घडून गेल्यावरच परिस्थिती बिकट आहे याची जाणीव आयलिशला होऊ लागते. तरीही, ‘आपल्या’ देशात असं काही घडू शकत नाही हा विश्वास तिला झटकून टाकता येत नाही. लॅरी-आयलिशला वेगवेगळय़ा वयांची आणि वेगवेगळे मनोव्यापार असलेली चार मुलं असतात. त्यांतल्या सर्वात मोठय़ा मुलाला लवकरच सक्तीच्या सैन्यभरतीला सामोरं जावं लागणार असतं; आणि सर्वात धाकटय़ा बाळाला आयलिश अंगावर पाजत असते. वडिलांच्या अचानक गायब होण्यामुळे कळत्या वयातल्या तीनही मुलांच्या मनावर आघात होतो. ती मुलं आपापल्या परीनं त्याचा अर्थ लावत असतानाच परिस्थिती झपाटय़ानं बिघडत जाते. आयलिश एका संशोधन संस्थेत काम करता करता, या अवघड परिस्थितीत चारही मुलांचा आणि स्मृतिभ्रंशाच्या भोवऱ्यात अडकलेल्या आपल्या वृद्ध वडिलांचा सांभाळ करू लागते. सुटकेचे मार्ग एक-एक करून बंद होऊ लागतात. सुरुवातीला आयलिशच्या संस्थेत, महत्त्वाच्या पदांवर ‘त्यांच्यातले’ लोक नेमले जाऊ लागतात. शर्टावर पार्टीच्या आद्याक्षरांची चकचकीत पिन मिरवणारा मनुष्य सर्वोच्च पदावर नेमला जातो. सरकारविरोधी सूर असलेल्या लोकांना काढून टाकलं जातं किंवा सरळ गायब केलं जातं. आपल्यावर सतत पाळत ठेवली जाते आहे हे थेट सिद्ध करता येत नसलं, तरी ते खरं आहे याची खात्री सगळय़ांनाच पटू लागते. एका नियोजित प्रवासासाठी पासपोर्ट कार्यालयात गेल्यावर, तिच्या तान्ह्या बाळाचा पासपोर्टही नाकारला जातो. पाळत ठेवणारे गणवेशातले आणि साध्या कपडय़ांमधले ‘गार्दा’ सर्वत्र पसरलेले असतात. त्यांच्या जोडीला राष्ट्रवादानं पछाडलेल्या सर्वसामान्य नागरिकांच्या ‘सेमी-अधिकृत’ टोळय़ाही ‘देशद्रोह्यांना’ छळायला तत्पर असतात. अशीच एक टोळी एका रात्री येऊन आयलिशच्या चारचाकीवर ‘ट्रेटर’ हा शब्द रंगवून जाते. तिच्या नवऱ्याला सरकारनं तुरुंगात टाकलं हे कळल्यानंतर, अनेक वर्ष ओळख असलेला दुकानदारही तिला त्याच्या दुकानात खरेदी करू देत नाही.
हेही वाचा >>> बुकमार्क : डिजिटल धोक्यांची यथार्थ जाणीव
२०२३च्या बुकर पुरस्कारासाठीच्या लघु यादीतली पॉल लिंच यांची ‘प्रॉफेट साँग’ ही कादंबरी वाचताना सतत असं वाटत राहतं, की कुणी तरी आपल्या राहत्या घरातला प्राणवायू संथ गतीनं काढून घेतं आहे. या कादंबरीतली सगळय़ात आधी लक्षात येणारी, आणि काहीशी खटकणारी गोष्ट म्हणजे या लेखनात विरामचिन्हांचा वापर अभावाने दिसतो. दोन व्यक्तींमधले संवाद वेगळे दाखवण्यासाठीदेखील काहीही प्रयत्न केलेले नाहीत. सगळे संवाद एका अखंड परिच्छेदाच्या रूपात आपल्यासमोर येतात. यामुळे सुरुवातीची काही पानं वाचताना इतकी तारांबळ उडते की, वाचायचं सोडून द्यावं असाही विचार मनात येऊन जातो. असं का केलं असावं याचं उत्तर मात्र शंभरएक पानं वाचून झाल्यावर मिळतं. पुढे येणारं वाक्य कुणाच्या तोंडी असेल याची जुळवाजुळव करताकरता आपण संपूर्णपणे कादंबरीतल्या डिस्टोपियात ओढले जातो. आयलिशचं स्वयंपाकघर; तिथल्या नळातलं उत्तरोत्तर मातकट होत जाणारं पाणी; बाबाच्या आयुष्यातून निघून जाण्याच्या धक्क्यामुळे अन्नावरची वासना उडालेली, उपासमार करून घेणारी तिची चौदा वर्षांची मुलगी; आयलिशची फोक्सवॅगन टूरान मोटारगाडी- अशा बारीकसारीक गोष्टींचंदेखील चित्र डोळय़ांसमोर स्पष्ट होतं.
आधी नवरा आणि काही काळानंतर उद्विग्न मन:स्थितीत सरकारविरोधी बंडखोरांना सामील झालेला मोठा मुलगा, हे दोघेही नक्की परतून येतील असं आयलिश स्वत:च स्वत:ला सांगत असते. स्वत:ला आणि मुलांना पुन्हा पुन्हा, ‘सगळं ठीक होणार आहे’ असं सांगून त्यांचे प्रश्न थोपवून धरत असते; त्यांच्यासमोर हतबल होत असते. ‘आपल्या नवऱ्याला न्यायालयीन अधिकार का दिले नाहीत?’; ‘आपल्या नवऱ्याचे सहकारी काहीच का करत नाहीत?’ असे सुरुवातीला पडणारे प्रश्न यादवी युद्ध सुरू झाल्यानंतर – ‘पिण्याचं पाणी कुठून आणायचं?’; ‘काय खायचं?’; ‘आहे त्या पैशांत भागवता यावं यासाठी यादीतल्या कोणकोणत्या वस्तू काढून टाकता येतील?’; ‘आपण या हल्ल्यात मेलो तर मुलांकडे कोण बघणार?’ – इथवर येऊन पोहोचतात. या प्रवासाचं वर्णन सहज ‘एका आईनं आपल्या मुलांसाठी दिलेला लढा’ अशा प्रकारे करता येऊ शकेल.. पण ही गोष्ट फक्त एका स्त्रीची किंवा एका कुटुंबाची नाही. एखादी असुरक्षित सत्ता जेव्हा नागरिकांवरच बारकाईनं लक्ष ठेवू लागते तेव्हा सत्ताधाऱ्यांची असुरक्षितता, माध्यमं- शिक्षण संस्था- सरकारी व्यवसाय- खासगी व्यवसाय- लोकसमूह- कुटुंबं- व्यक्ती अशी झिरपत जाते. अशा प्रकारच्या असुरक्षिततेला तोंड द्यावं लागल्यानं आपोआप समाजाचं ध्रुवीकरण होतं. अशा काळातल्या आयलिशच्या संघर्षांच्या अवतीभोवती, तिनं आजवर गृहीत धरलेल्या सगळय़ा व्यवस्था मोडून पाडण्याचं दर्शन घडतं.
हेही वाचा >>> देशकाल: राष्ट्रराज्य हवे की राज्य-राष्ट्र?
साधारणपणे, कोणत्याही डिस्टोपियाई कादंबरीबद्दल बोलायला लागलं, की कुणी तरी हमखास एक मुद्दा मांडतं. ‘हे असलं कशाला वाचायचं? आपल्या काहीशा कंटाळवाण्या पण सुरक्षित, आणि मुख्य म्हणजे सुरळीत चाललेल्या आयुष्यात हे विकतचं दु:ख कुणी वागवायला सांगितलं आहे?’ याची उत्तरं कितीही ठोस माहीत असली, तरी ती न देणंच हिताचं आहे. पण आपल्याला जे दिसतं ते कदाचित हा प्रश्न विचारणाऱ्या लोकांनाही दिसत असावंच. ऑर्वेलच्या ‘नाइनटीन एटी फोर’ला आता ७५ वर्ष होतील. पण आजही माध्यमांत रोज कुठं तरी त्या कादंबरीची आठवण काढली जाते. लोक अशा कादंबऱ्या वाचतात कारण त्यांच्या आजूबाजूला, कदाचित थोडय़ा कमी तीव्रतेनं जे घडत असतं, त्याचंच प्रतिबिंब त्यांना या कादंबऱ्यांतून दिसतं. या कादंबरीतली अशी एक गोष्ट म्हणजे कथेत येणारे समाजमाध्यमांचे संदर्भ. आयलिशचा मोठा मुलगा मार्क आणि मुलगी मॉली दोघंही विशीच्या आतली आहेत आणि आपापले स्मार्टफोन घेऊन वावरणारी आहेत. यादवी सुरू झाल्यानंतर, शाळा-कॉलेज बंद होऊन जमावबंदी लागू होते. या आणीबाणीच्या काळात, या दोन मुलांचं आपापल्या फोनमध्ये तल्लीन होऊन हरवून जाणं हताशपणे बघण्याशिवाय आयलिशकडे काही मार्गच उरत नाही. ती परिस्थिती कादंबरीत घोटाघोटानं फार प्रभावीपणे मांडली आहे. संपूर्ण तारुण्य समाजमाध्यमांविना घालवलेले लोक आज साठीचे आहेत. त्यानंतरच्या सगळय़ाच पिढय़ांनी ऐन तारुण्यात कोणत्या ना कोणत्या प्रकारे समाजमाध्यमं वापरली आहेत आणि त्यांचे फायदे-तोटे अनुभवले आहेत. पण आज जी पिढी विशीच्या आत आहे, त्यांना कदाचित आयुष्यातली पहिली चिऊकाऊची गोष्टही समाजमाध्यमांकडून समजली असेल. त्यांच्यासाठी समाजमाध्यमं म्हणजे ‘असत्य’, आणि तीन मितींचं, हाडामासाच्या माणसांचं जग म्हणजे ‘सत्य’ अशी जगाची विभागणी होतच नाही. त्यांच्यासाठी समाजमाध्यमं शाळा-कॉलेजांइतकीच खरी आहेत.
डॉक्टर व्हायची स्वप्नं काहीच महिन्यांपूर्वीपर्यंत बघणारा, थोडा बुजरा, अबोल मुलगा, फोनवर काय करत असेल? तो बाहेर नक्की कुणाला जाऊन भेटत असेल? अशा विचारांतून तिच्या मुलाबरोबर दिसणाऱ्या प्रत्येक मुलाकडे आयलिश संशयानं पाहात असते. हातातल्या फोनमुळेच गार्दा आपल्यापर्यंत पोहोचू शकतील ही जाणीव जशी तीव्र होऊ लागते, तसे स्मार्टफोनही नाहीसे होऊ लागतात. तरीही, नाहीशा झालेल्या व्यक्तींचे शांत झालेले फोन कधी तरी पुन्हा वाजू लागतील या आशेवर आयलिश पुन्हा पुन्हा नवऱ्याला आणि मुलाला फोन करत राहाते.
आपल्या हातात असलेल्या चकचकीत यंत्रातून आपण सगळेच सतत दोन मितींच्या जगात वावरत असतो. त्या जगातल्या चोररस्त्यांनी आणि भुयारांनी सत्य आणि असत्यामधल्या सीमारेषा धूसर केल्या आहेत. किंबहुना, आपण सत्य-असत्याच्या पलीकडे गेलेल्या अनेक मितींच्या जगातच राहतो आहोत. एकदा आयलिशच्या मुलीची, मॉलीची, मैत्रीण घरी आलेली असते. तिच्याबरोबर आंतरराष्ट्रीय माध्यमांवरच्या बातम्या बघताना मॉलीच्या तोंडी अगदी सहज येणारं, पण वाचकाला अस्वस्थ आणि अंतर्मुख करून जाणारं एक वाक्य आहे – ‘आपल्या देशातलं युद्ध ही आता जगासाठी करमणूक आहे’. हल्ली भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यादरम्यान जाहिराती लागल्या की आपण सहज चॅनेल बदलून ‘युद्ध’ बघू लागतो. आपल्याला ज्या बाजूचं समर्थन करायचं आहे त्याच बाजूचं समर्थन करणारं माध्यम आपण निवडतो. आपल्या हाती नवी माहिती लागली की ती लगेच फोन उचलून समाजमाध्यमांवर ‘आपल्या’ ‘विरोधात’ असलेल्या लोकांच्या तोंडावर फेकून मारतो, आणि पुन्हा भारत-पाकिस्तान सामन्याकडे वळतो. माहिती जितकी सहजस्वस्त, तितकीच बोथट आपली संवेदना! आज, अगदी आत्तादेखील जी युद्धं जगात चालली आहेत, त्यांचा एक परिणाम म्हणजे माणसं सतत येणाऱ्या माहितीच्या ओघानं सुन्नही होत चालली आहेत आणि व्याकूळही. ‘प्रॉफेट साँग’च्या कथेतून काही अंशी आपलंच वास्तव आपल्यासमोर उभं राहिलं आहे असं वाटू लागतं.
एखाद्या राष्ट्राची अस्मिता, ओळख पुन्हा पुन्हा अधोरेखित करण्यासाठी निष्पाप लोकांची आयुष्यं उद्ध्वस्त करणं आपल्या सवयीचं झालं आहे का? देशातल्या तरुणांना दिशाहीन करणाऱ्या लढाईला राष्ट्रवाद म्हणावं का? असे प्रश्न ही कादंबरी वाचताना पडतात. शेवटी मात्र एक हताश करणारी जाणीव होते : जगाचा अंत कुणा प्रेषिताच्या, सूर्य काळवंडण्याच्या आणि चंद्र रक्ताळण्याच्या दैवी भाकितासारखा अचानक होत नसतो. माणसांनी केलेल्या बॉम्बहल्ल्यांत जीव गमावणाऱ्या प्रत्येक लहान मुलागणिक हे जग थोडं थोडं संपत असतं. ते पुन्हा काहीसं जोडलंही जातं, पण ते आधीसारखं नक्कीच उरत नाही. आणि आपल्याला त्यातून वाचवायला कुणीही मसीहा कधीच अवतरत नाही.
‘प्रॉफेट साँग’
लेखक : पॉल लिंच
प्रकाशक : वनवल्र्ड पब्लिकेशन्स
(सायमन अॅण्ड शूस्टर इंडिया)
पृष्ठे : ३२०; किंमत : ७४१ रु.
वाचनदुवे :
पॉल लिंच यांची मुलाखत – https://www.thewiseowl.art/the-interview-paul-lynch
पुढील आठवडय़ात : सुकल्प कारंजेकर यांचा बुकर लघुयादीतील ‘द बी स्टिंग’ या पुस्तकावर लेख
saeekeskar@gmail.com