पंकज फणसे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘ज्युरासिक पार्क’ या जगप्रसिद्ध कादंबरीचा लेखक मायकल क्रायटन यांची २००६ मध्ये ‘नेक्स्ट’ ही कादंबरी आली होती. जैवतंत्रज्ञानाचे चमत्कार आणि त्याचा मानवी जीवनावर होणारा परिणाम यांचे कल्पनाचित्र स्तिमित करणारे होते. गेल्या १० वर्षांत तंत्रज्ञानाने असाध्य गोष्टी साध्य करण्याचा सपाटा लावला आहे. जीवशास्त्र आणि डिजिटल तंत्रज्ञान यांची सांगड घालताना कोणी मानवी मेंदू, विचारप्रक्रिया, निर्णयक्षमता यांच्यावरच पाळत ठेवू लागले तर? दोन गोष्टींमधून एकाची निवड करताना होणारा संभ्रम टाळण्यासाठी कोणी तुमच्या मेंदूमध्ये घुसखोरी करून भलत्याच ‘अंतरात्म्याचा आवाज’ तुमच्यापर्यंत पोहोचवला तर? तुमच्या सुखाची ‘नस’ ओळखून कोणी फक्त मेंदूमध्ये केवळ सुख निर्माण करणाऱ्या संवेदना कृत्रिमरीत्या निर्माण केल्या तर? अशा अचंबित करणाऱ्या अनेक बाबींचा आढावा घेत नीता फरहानी या इराणी-अमेरिकन लेखिकेचे ‘द बॅटल फॉर युअर ब्रेन – डिफेंडिंग द राइट टू थिंक फ्रीली इन द एज ऑफ न्यूरोटेक्नॉलॉजी’ हे पुस्तक तंत्रज्ञानाचा आणि मज्जातंतू विज्ञानाचा होणारा संगम, त्याचे फायदे-तोटे यांचा परामर्श घेत गोपनीयतेच्या हक्काच्या दोन पावले पुढे जाणाऱ्या आणि मानवी मेंदूमध्ये घुसखोरी करणाऱ्या तंत्रज्ञानाच्या धोक्याची जाणीव करून करून देतं.

हेही वाचा >>> चिंतनधारा: गुरुकुंज आश्रम सहकार्य केंद्र व्हावे!

नीता फरहानी या अमेरिकास्थित डय़ूक लॉ स्कूलमध्ये प्राध्यापिका असून उभरत्या तंत्रज्ञानाचा नैतिकता, कायदेशीर बाबी आणि समाजावर होणारा परिणाम या विषयांमध्ये तज्ज्ञ आहेत. हे पुस्तक आटोपशीर असून दहा घटक, दोन भागांमध्ये विभागलेले आहेत. पहिल्या भागात मज्जातंतू तंत्रज्ञानाचा (न्यूरोटेक्नॉलॉजी) बौद्धिक क्षमतांचा मागोवा घेण्यासाठी करण्यात येणारा वापर (ब्रेन ट्रेडिंग) यावर भर देऊन विविध उदाहरणांद्वारे तुमच्या संमतीसह आणि संमतीविना मेंदूमध्ये चालणाऱ्या घडामोडींवर कशा प्रकारे लक्ष ठेवले जाते यावर भर दिला आहे. लेखिकेच्या म्हणण्यानुसार २०२० मध्ये सुमारे एकपंचमांश अमेरिकन नागरिक न्यूरोटेक साधनांचा वापर करत होते. ज्याप्रमाणे मोबाइलमधील विदा गोळा करणाऱ्यांमार्फत तुमच्यावर वैयक्तिक नजर ठेवून तुमच्या आवडी-निवडी, संभाषण आदी गोष्टी संकलित केल्या जातात, त्याचप्रमाणे न्यूरोटेक साधने थेट तुमच्या मेंदूलाच हात घालतात. मेंदूमध्ये निर्माण होणाऱ्या विद्युत- चुंबकीय लहरींचे विश्लेषण करून तुमची विचारप्रक्रिया या साधनांद्वारे अधिक चांगल्या रीतीने जाणली जाते. मायग्रेन (अर्धशिशी) या आजारावर उपाय म्हणून लावण्यात आलेला हा शोध आता न्यूरोटेक्नॉलॉजीमध्ये आधारस्तंभ ठरत आहे. फरहानी हे सांगतात की, तंत्रज्ञानाच्या युगात ‘मेंदू’ हा गोपनीयतेचा शेवटचा गड आहे आणि न्यूरोतंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रभावामुळे त्याचे चिरेदेखील ढासळत आहेत. वाढत्या लोकप्रियतेमुळे २०२६ पर्यंत या साधनांची बाजारपेठ सुमारे १०० बिलियन डॉलपर्यंत पोहोचेल. त्याच वेळी ज्याप्रमाणे विदा-घुसखोरीबद्दल समाजात सजगता आणि नियम बनविण्यासाठी धडपड चालू आहे, तसे प्रयत्न न्यूरोतंत्रज्ञानाच्या अवकाशात अभावानेच आढळतात.

हेही वाचा >>> व्यक्तिवेध: राजा शिरगुप्पे

यापुढे जाऊन फरहानी विविध उदाहरणांद्वारे, तुमच्या विचारप्रक्रियेमध्ये घुसण्याची भांडवलशाही व्यवस्थेची धडपड अधोरेखित करतात. ‘आयकिआ’ या जगप्रसिद्ध ब्रँडचे बेल्जियममधील उदाहरण देताना त्या सांगतात की, तिथे काही जगप्रसिद्ध डिझायनरचे गालिचे ठेवले होते. ग्राहकांना त्यांनी विनंती केली की ‘ईईजी’ (इलेक्ट्रोएन्सेफॅलोग्राफी) संवेदकांचा वापर करून मेंदूमध्ये उत्पन्न होणाऱ्या विद्युत लहरींचे निरीक्षण करण्याची परवानगी दिली जावी. याचाच उपयोग पुढे लहरींचे विश्लेषण करून ग्राहकांचा पसंतिक्रम निश्चित करण्यात झाला. मात्र कोणीही या घुसखोरीवर आक्षेप घेतला नाही. चीनचे उदाहरण देताना फरहानी सांगतात की, हेल्मेटमध्ये न्यूरोटेक साधने वापरून कर्मचाऱ्यांच्या बौद्धिक घडामोडींवर निरंतर नजर ठेवण्याचे काम केले जाते. यातून एखादा कर्मचारी किती एकाग्र आहे याचा सुगावा मिळतो. विचार करा- सक्तीच्या निगराणीखाली राहण्याचा प्रसंग आला तर? या धोक्याची जाणीव करून देताना फरहानी न्यूरोतंत्रज्ञानाचा वापर नियंत्रणासाठी न करता सक्षमीकरणासाठी करण्याचे आवाहन करतात.

दुसऱ्या भागामध्ये न्यूरोटेड साधनांकडून मिळालेल्या विदाचा वापर वैचारिक प्रक्रियेमध्ये घुसखोरी करण्यासाठी कसा केला जातो याचा ऊहापोह केला गेला आहे. सदर विदा, तुमच्या निर्णयक्षमतेची गती वाढविण्यासाठी अथवा कमी करण्यासाठी, नैसर्गिक विचारप्रक्रियेशी छेडछाड करण्यासाठी वापरून ‘मज्जातंतू केंद्रित व्यवस्थेची उभारणी’ कशा प्रकारे होत आहे यावर हे पुस्तक प्रकाश टाकते. कोकाकोला, मॅक्डॉनल्ड आदी कंपन्यांनी ग्राहकांच्या उपभोग आकृतिबंधाचा (कन्झम्शन पॅटर्न) वापर करून पसंतिक्रमांमध्ये कशा प्रकारे छेडछाड केली याचे उदाहरण देत फरहानी सांगतात की, मोबाइलपासून विविध खाद्यपदार्थाचे व्यसन हा कृत्रिम हस्तक्षेपाचा परिणाम आहे आणि प्रत्येकाला व्यसनापासून मुक्त राहण्याचा हक्क असला पाहिजे, पण यासाठी न्यूरोतंत्रज्ञानाचे नियमन गरजेचे आहे. अमेरिकेच्या ‘सीआयए’ या गुप्तहेर संस्थेतील ‘एम अल्ट्रा प्रोग्राम’चा तसेच २०२० मधील नाटोचा अहवाल- ज्यामध्ये आकलनात्मक युद्ध (कॉग्निटिव्ह वॉरफेअर) हे लढाईचे नवीन प्रारूप सांगितले गेले आहे, त्यांचाही दाखला देऊन लेखिकेने न्यूरोतंत्रज्ञानाचा आवाका दर्शविला आहे.

हेही वाचा >>> देशकाल: राष्ट्रराज्य हवे की राज्य-राष्ट्र?

अंतिमत: ट्रान्सह्यूमॅनिझम म्हणजेच विज्ञान-तंत्रज्ञानाच्या मदतीने मानवाचे अस्तित्वात असलेले भौतिक स्वरूपच पालटून टाकण्याचा अभ्यास यावर भाष्य करताना लेखिका सांगतात, न्यूरोतंत्रज्ञान अशा दिशेने वाटचाल करत आहे की एक दिवस मृत्यूनंतर मानवी देहातील मेंदूचे संवर्धन केले जाईल आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने सदर व्यक्तीशी संभाषण करता येईल! मात्र त्याच वेळी संपूर्ण पुस्तकात या तंत्रज्ञानाचे धोके वारंवार अधोरेखित करताना वैचारिक स्वातंत्र्य, आकलन स्वातंत्र्य यांच्या संरक्षणाची आणि त्यांचा मानवी हक्कांमध्ये समावेश करण्याची गरज सातत्याने दाखवलेली आहे.

पुस्तकाबद्दल विशेष गोष्ट म्हणजे न्यूरोविज्ञान, जीवशास्त्र, नीतिशास्त्र, राज्यशास्त्रातील हक्कांचा सिद्धांत, तत्त्वज्ञान आदी किचकट विषयांना पुस्तक स्पर्श करत असले तरीही पुस्तक समजण्यासाठी विशेष ज्ञानाची गरज भासत नाही. लेखिकेने क्लिष्टता टाळण्याची काळजी घेतली आहे. आपली मते संदर्भासह व्यक्त केल्यामुळे (४० पानांचे सखोल संदर्भ शेवटी आहेत) या विषयात आणखी रस असणाऱ्या वाचकांसाठी तर हे पुस्तक म्हणजे पर्वणी आहे. समर्थानी ‘मनाचे श्लोक’ रचून सुमारे ३५० वर्षे झाली, म्हणजे तेव्हापासून मनाबद्दल मराठीतही भरपूर बोलले/ वाचले गेले आहेच, पण ते मन तंत्रज्ञानाच्या कह्यात गेलेले नव्हते. हे पुस्तक मनावर नियंत्रण ठेवणाऱ्या तंत्रज्ञानावर प्रकाश टाकून, डिजिटल सुरक्षिततेच्या पुढे असणाऱ्या धोक्यांची यथार्थपणे जाणीव करून देते.

लेखिका : नीता फरहानी

प्रकाशक : पॅन मॅकमिलन लि.

पृष्ठे : २८८;  किंमत : ५९९ रु. 

लेखक जवाहरलाल नेहरू विद्यापीठात रिसर्च स्कॉलर आहेत.

phanasepankaj@gmail.com

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Book preview the battle for your brain author nita a farahany zws