परोमिता चक्रवर्ती

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लेखकाची एक प्रतिमा जनमानसात निर्माण झालेली असते. बहुतेकदा तिला उदात्ततेची चौकट लाभते. ही चौकट तुटते, प्रतिमा भंग पावते तेव्हा काय होते? नील गेमनवरील विनयभंगाच्या आरोपांच्या अनुषंगाने…

नील गेमन यांच्या साहित्याशी माझा इतरांपेक्षा बराच विलंबाने परिचय झाला आणि त्याला कारण ठरलेले पुस्तक ‘द सँडमॅन’ नव्हते. मी कुतूहलाने वाचलेले त्यांचे पहिले पुस्तक होते, ‘द ओशन अॅट द एन्ड ऑफ द लेन’. एखादी काल्पनिक परिकथा आठवून पाहा. जर्मन साहित्यात असते तसे- निबिड अरण्य, त्यातले अजब जीव, दुष्ट चेटुक आणि अशा वातावरणात हरवलेला एक सात वर्षांचा मुलगा. जगण्याचा अर्थ लावण्यासाठी धडपडणारा… आता हेच सारे नील गेमनच्या ससेस्क प्रांततील विश्वात आणा. जिथे अजब जीव माणसांच्या रूपात सामोरे येतात- अत्यंत कठोर, ज्यांना ‘प्रसन्न’ करणे कठीण अशी माणसे. इथेही अंधारच आहे. मात्र ज्याचा अर्थच लागत नाही अशा भयाचा अंधकार. जादू आहे, पण ती सुपरिचित डगला परिधान करून आलेली. आणि भीती आहे. इतकी भीती की त्या मुलाच्या आयुष्यातील रंग एखाद्या जळवेने रक्त शोषावे तसे शोषून घेते. या जगात त्याला सुरक्षित वाटेल, अशी एकमेव जागा म्हणजे त्याच्या शेजारी राहणारी तरुणी आणि तिचे जादूगारिणींचे कुटुंब.

पुस्तकाच्या शेवटाला पोहोचताना, तो लहान मुलगा, जो आता ४७ वर्षांचा झाला आहे त्याला या साऱ्या अर्थ लागण्याचा क्षण येतो. ‘मी माझ्या जन्मापासून आजवरच्या प्रवासात जे काही जग पाहिले, त्यातून मला एवढे कळले की माझा भोवताल किती क्षणभंगुर होता. मला जे वास्तव भासले, तो मोठ्या केकवरील आयसिंगसारखा केवळ एक पातळ थर होता. त्याच्या आत दडले होते, वळवळणाऱ्या कीटकांचे वारुळ, भयस्वप्ने आणि भूक.’ ही कादंबरी वाचणे, हा एखाद्या शवाचे अवशेष पाहण्यासारखा आणि काहीसा भरकटवणारा अनुभव होता, पण गेमनच्या संमोहित करणाऱ्या, भुरळ पाडणाऱ्या विश्वातून बाहेर पडणे कठीण होते.

हेही वाचा >>> बुकबातमी : यादवीपासून धर्मयुद्धाकडे

लिला शापिरो यांचा ‘द व्हल्चर’ हा लेख या ब्रिटिश लेखकाने केलेल्या विनयभंगांचे तपशीलवार वर्णन करतो. हे आरोप तुलनेने ताजे आहेत. जुलै २०२४मध्ये प्रसारित झालेल्या एका पॉडकास्टमधून ते पुढे आले. त्यातील वर्णने वाचणे हा किळसवाणा अनुभव ठरतो.

एका अधिवेशनात भेट होऊन तात्पुरते प्रेमसंबंध जुळलेल्या चाहतीच्या घरातील पूर्वीच्या आयाबाईंपासून अनेकांशी केलेल्या गलिच्छ लैंगिक गैरव्यवहारांचे तपशीलवार वर्णन यात आहे. ‘यापैकी अनेक महिला गेमनला भेटल्या तेव्हा साधारण त्यांच्या विशीत होत्या. त्यांच्यातील सर्वांत लहान १८ वर्षांची होती. दोघींनी त्याच्याकडे काम केले होते, तर पाचजणी त्याच्या चाहत्या होत्या,’ असे लेखात म्हटले आहे. गेमन त्या वेळी ४० वर्षांचा होता आणि लोकप्रियतेच्या शिखरावर होता. त्याच्या पुस्तकांच्या लाखो प्रती विकल्या जात होत्या आणि त्यांवर जे मुळातच प्रथितयश निर्माते आहेत, ते टीव्ही मालिकाही प्रदर्शित करत होते. हा लेख वाचून मला त्याच्या ‘द ओशन अॅट द एन्ड ऑफ द लेन’ या कादंबरीतील कथानायकाची दहशत आणि ज्यांनी त्याच्या पाठीशी उभे राहणे अपेक्षित होते, त्यांनी पाठ फिरवल्यानंतरची असहायता आठवली.

या लेखाच्या पानापानांतून व्यक्त होणारा सत्तेचा असमतोल, सारे काही स्वयंस्पष्ट करणारा आहे. त्यातील घटनांचे स्पष्टीकरण गेमनच्या कल्पनाविश्वातही शक्य नाही. त्यांना दु:स्वप्न म्हणून सहज झटकून टाकता येणार नाही आणि नातेसंबंध परस्परसहमतीने ठेवले होते, असेही म्हणवणार नाही.

साहित्यातील आदर्श मानल्या गेलेल्या व्यक्तीचे पाय मातीचे असल्याचे स्पष्ट होते, तेव्हा काय होते? आजवर त्याने जी मते मांडली, महिलांबद्दल, जखमांवर फुंकर घालण्याच्या कलेच्या क्षमतेबद्दल जे लिहिले, मुक्ततेचे स्वप्न दाखविणाऱ्या आश्वासक कथा सांगितल्या ते सारे काही झूठ होते? गेमन हा काही सदोष चारित्र्य असलेला पहिला लेखक नाही. लैंगिक छळाचा आरोप असलेला पुलित्झर पुरस्कार विजेता जुनोट डियाझ आणि ‘थर्टीन रिझन्स व्हाय’ या पुस्तकाचा लेखक जय आशर, एझ्रा पाउंड यांचे राजकारण, टी. एस. एलियॉट, व्ही. एस. नायपॉल किंवा अगदी नजीकच्या काळातील घटना म्हणजे अॅलिस मुन्रो यांनी त्यांच्या दुसऱ्या पतीने त्यांच्याच मुलीच्या केलेल्या लैंगिक शोषणाबद्दल धारण केेलले मौन… इतिहासाची पुनरावृत्ती वारंवार होत राहते.

साहित्यिक त्यांच्या प्रभावाचा वापर करून कोणाचीही मुस्कटदाबी करू शकतात. या क्षमताच महिला हक्कांचा आवाज ठरलेल्या गेमनसारख्या व्यक्तीला श्वापदात परिवर्तित करतात. त्याच्याविरोधात आवाज उठवला जाऊ लागला तेव्हा सुरुवातीला त्याचा कंपू त्याच्या बाजूने उभा राहिला. जसे काही त्याची प्रतिभाच त्याच्या कृत्याचे स्पष्टीकरण असावे.

नोबेल पारितोषिक विजेत्या मुन्रो यांची मुलगी आंद्रिया स्किनरने आपल्या आईचा दुसरा पती जेराल्ड फ्रेमलिनने केलेल्या गैरवर्तनाची माहिती दिल्यानंतरही तिची आई तिच्या पाठीशी उभी राहिली नसल्याची व्यथा अलीकडेच मांडली. त्यामुळे मुन्रोने आजवर साहित्यिकविश्वात निर्माण केेलेली स्वत:ची प्रतिमा भंग पावली. तिची स्त्रीपात्र क्रांतिकारी प्रवृत्तीची होती. क्रांतीचे त्यांचे स्वत:चे खास मार्ग होते. ही पात्रे स्वत:च्या मुलीने केलेले लैंगिक शोषणाचे आरोप नाकारणाऱ्या मुन्रोसारखी कठोर नक्कीच नव्हती. नोबेल समितीने तिला दिलेल्या प्रशंसापत्रात म्हटले होते की, ‘मानवी हृदय आणि त्याचा लहरीपणा या सर्वांत मोठ्या रहस्याचा उलगडा करण्याच्या जवळ पोहोचणारी लेखिका.’ पण प्रत्यक्षात ती ‘गप्प बसण्यात आणि बसविण्यात स्वारस्य असलेली’ व्यक्ती असल्याचे समोर आले.

‘आर्ट मॅटर्स : बीकॉज युअर इमॅजिनेशन कॅन चेंज द वर्ल्ड २०१८’ या कादंबरीत गेमन लिहितो. ‘समाज प्रचंड मोठा आहे आणि त्यात व्यक्ती नगण्य आहे, कोणीच काहीच बदल घडवू शकत नाही, असा देखावा निर्माण करणे सोपे आहे. मात्र सत्य हेच आहे की व्यक्तीच भविष्य घडवितात. ते भविष्य घडवू शकतात कारण ते बदलांची कल्पना करू शकतात.’ मुन्रोची मुलगी स्किनर आणि गेमनविरोधात आवाज उठविणाऱ्या महिलांचा यावर विश्वास होता की त्यांचे वास्तव हा या लेखकांच्या कथांचा भाग असला पाहिजे, कारण त्यांनी सुसह्य भविष्याची कल्पना करण्याचे आपले दायित्व पूर्ण केले आहे. त्यांच्या कथा आणि त्यांच्या वास्तवात बदल घडवण्याची क्षमता आहे.

गेमन असो वा मुन्रो. त्यांच्या कथांतील वास्तव अस्वस्थ करते, कारण त्यांच्या लेखनात सचोटी असते. त्यांचा आशावाद अनेक वाचकांना त्यांच्यात एखाद्या सहृदाप्रमाणे गुंतवून ठेवतो. पण कदाचित कल्पित कथांचा हाच उद्देश असावा- गोंधळामागचा कार्यकारणभाव स्पष्ट करणे. प्रत्यक्ष आयुष्यात लोक समूहाचा भाग असतात- प्रतिभावान आणि टोकाची मग्रूर, अतिशय उत्तम आणि अतिशय क्षुद्रही, उदारही आणि कद्रूही. आयुष्य एकसाची नसते. कदाचित त्यामुळेच कल्पितकथा तशा असत असाव्यात.

paromita.chakrabarti@expressindia.com

बुक-नेट

साहित्याबद्दल आस्था असणाऱ्या वाचकांची पुस्तक असोशी वाढविणारे नवे सदर. यात उत्तम लेखांबरोबरच दृक-श्राव्य मुलाखती, लेखक- पुस्तकासंबंधींचे लघुपट, माहितीपट आणि अवांतर विषयांचा दुवा दिला जाईल.

कलात्मक लिखाणाचा उपयोग..

सकिना हॉफ्लर या बहुप्रिय लेखिका आहेत. त्यांच्या संकेतस्थळावर पारितोषिक विजेत्या कथांचा गुच्छच मोफत वाचायला मिळू शकतो. पण इथे त्यांचा सर्वाधिक लोकप्रिय ‘टेड’संवाद. कथात्मक लिखाणाची महत्ता सांगणारा.

surl.li/gotsmt

ग्रंथदालनाचे अंतिम दिवस…

ब्रुकलीनच्या कोर्ट स्ट्रीट, कॉबल हिल येथे ‘कम्युनिटी बुक शॉप’ तीस वर्षांहून अधिक काळ चालविणाऱ्या जॉन सिऑली यांच्यावर चितारलेला हा सहा मिनिटांचा व्हिडीओ. न्यू यॉर्कर साप्ताहिकामधील टिप्पणीसह तयार केलेला. त्यात वाचक आहेत आणि थोडक्या तपशिलात आपण पाहतोय ते आवाढव्य इतिहासजमा होणार असल्याची भयंकर जाणीव. आठ वर्षे पुन्हा पुन्हा जगभरातून पाहिला जात आहे.

https://shorturl.at/BolrF

पिको परतले…

केवळ भारतीय नाव असलेले, ब्रिटनमध्ये जन्मलेले आणि आता जपानमध्ये राहत असलेले पिको अय्यर जगभरात ओळखले जातात ते त्यांच्या प्रवास वर्णनात्मक लिखाणासाठी. त्यांची नव्या पुस्तकानिमित्ताने तीन दिवसांपूर्वी घेण्यात आलेली मुलाखत येथे ऐकता येईल. पुढल्या काही दिवसांत भारतातल्या महत्त्वाच्या लिट फेस्टमध्ये ते दिसणारच आहेत. त्याआधीची तयारी म्हणून उपयोग होऊ शकेल.surl.li/wwcrpf

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Book reivew the ocean at the end of the lane by neil gaiman zws