प्रकाश अकोलकर
२०२५ वर प्रभाव टाकणारी २०२४ मधली मोठी घडामोड म्हणजे, अनेकांसाठी ‘अनपेक्षित’ ठरलेले लोकसभा निवडणूक निकाल! त्यामागचं अनपेक्षितपणाचं वलय भेदण्याचा प्रयत्न या पुस्तकात दिसतो…
‘अब की बार चार सो पार!’ या भारतीय जनता पक्षाच्या गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीतील प्रमुख घोषणेचा देशातील मतदारांनी पुरता बोजवारा कसा उडवला आणि भाजप २०१९ प्रमाणे ‘तीनशे पार’ही कसा जाऊ शकला नाही, हा निकाल देशातील जनतेला आश्चर्याचा मोठाच धक्का देणारा होता. पण ‘चार सो पार’ ही घोषणा नेमकी दिली होती कुणी? ती ना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली होती ना त्या पक्षाची निवडणूक यंत्रणा गेली १० वर्षे सक्षमपणे राबवणारे ‘चाणक्य’ अमित शहा यांनी! ही घोषणा शहा यांच्याच सुपीक डोक्यातून निघाली, असा सर्वसाधारण समज आहे. प्रत्यक्षात हा अपेक्षेबाहेरील अंदाज जाहीर करण्यास ते नाराजच होते. भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांच्या एका बैठकीत, एका नेत्यानं ही घोषणा दिली. शहा या बैठकीस अनुपस्थित होते. या निवडणुकीत आपण मोदीजींच्या नेतृत्वाखाली इतिहास घडवायचा आहे, असं त्या नेत्याचं म्हणणं होतं. गेल्या निवडणुकीत आपण तीनशे पार केले आता चारशे पार करूया, असं तो म्हणत होता… आणि बघता बघता ती घोषणा भाजपच्या या निवडणुकीचे प्रमुख घोषवाक्य बनले.
नरेंद्र मोदी प्रत्येक घटनेकडे ७० एम सिनेमास्कोप कॅमेऱ्याच्या नजरेतून कसे बघतात आणि त्यामुळे अगदी साध्यासुध्या कार्यक्रमाचा ते ‘बडा इव्हेन्ट’ करतात, हे आता परिचयाचे आहे. पण गुजरात भाजपमध्ये मोदी १९८० च्या दशकात सामान्य कार्यकर्ते म्हणून काम करत होते आणि तेव्हा तेथील प्रसारमाध्यमे भाजपला फारशी प्रसिद्धीही देत नव्हती. तेव्हा मोदींनी गुजरातेतील १८२ मतदारसंघात पाठवण्यासाठी अहमदाबादेत १८२ रथ एकाच वेळी मैदानात उभे करण्याची शक्कल बोलून दाखवली. खर्चाचे कारण देत ती प्रथम फेटाळून लावण्यात आली. पण अखेरीस मोदी यांची ही कल्पना प्रत्यक्षात आणली गेली आणि दुसऱ्या दिवशी सर्व वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर त्या ‘इव्हेन्ट’चे मोठे फोटो झळकले!
हेही वाचा >>> बुकमार्क : कल्पित विरुद्ध वास्तव
या आणि अशाच असंख्य रसाळ किश्श्यांसह या निवडणुकीतील मोदी तसेच शहा या भाजपच्या ‘जोडी नंबर १’चे आडाखे कसे फसले, याचं रोखठोक विश्लेषण राजदीप सरदेसाई यांच्या ‘२०२४ : द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया’ या सव्वापाचशे पानांच्या जाडजूड ग्रंथात वाचायला मिळतं. राजदीप यांची भारतातल्या सर्वभाषिक टीव्ही दर्शकांना ओळख करून देण्याची गरज नाही. गेली तीन-साडेतीन दशकं ते राजकीय बातमीदार तसंच टीव्ही अँकर म्हणून काम करत आहेत. १९९२ मध्ये अयोध्येत घडलेल्या ‘बाबरीकांडा’नंतर मुंबईत भीषण दंगली झाल्या. तेव्हाचं राजदीप यांचं वार्तांकन आजही अनेकांच्या स्मरणात आहे. तेव्हा ते ‘टाइम्स ऑफ इंडिया’त होते. पण काळाची पावलं अचूक ओळखून त्यांनी अल्पावधीतच ‘एनडीटीव्ही’च्या माध्यमातून ‘टीव्ही’च्या दुनियेत प्रवेश केला आणि ते आता ‘इंडिया टुडे’ मध्ये मोठ्या पदावर काम करत आहेत. ‘टीव्ही’मुळे आता त्यांचा चेहरा घराघरांत जाऊन पोचला असला, तरी लोकांना त्यांची खरी ओळख एक बातमीच्या मुळाशी जाणारा आणि बातमीमागच्या बातमीचा शोध घेणारा पत्रकार अशीच आहे. बातमी आपल्याला मुळापासून दिसली पाहिजे आणि दिसली तरी आपण तिच्याकडे बघतो कसं, हे अधिक महत्त्वाचं आहे, हे राजदीप यांना पक्कं ठाऊक आहे. त्यांच्या याच शोधपत्रकारितेचं आणि बातमीच्या मुळाशी जाण्याच्या प्रवृत्तीचं दर्शन ‘२०२४ : द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया’ या ग्रंथातून पानोपानी घडतं.
राजदीप यांच्या कामाचा झपाटाही विलक्षण आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपनं २०१४ मध्ये प्रथमच लोकसभेत निखळ बहुमत मिळवलं आणि भारताचं राजकीय नेपथ्य आरपार बदलून गेलं. त्या निवडणुकीत देशव्यापी भ्रमण केल्यानंतरही अवघ्या काही महिन्यांत त्यांचं ‘२०१४ : द इलेक्शन दॅट चेंज्ड इंडिया’ हे पुस्तक आलं. तर २०१९ मधल्या निवडणुकीनंतर आलेल्या त्यांच्या पुस्तकाचं शीर्षक ‘२०१९ : हाऊ मोदी वन इंडिया’ असं होतं! त्यांच्या पुस्तकांची ही शीर्षकंच खरं तर या निवडणुका नेमक्या कशा झाल्या त्यावर नेमकं बोट ठेवणारी आहेत.
आपल्या ‘२०२४ : द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया’ या ताज्या ग्रंथात गोष्टीवेल्हाळ शैलीतून त्यांनी या निवडणुकीची रंगलेली प्रचार मोहीम आणि त्या दरम्यान बदलत गेलेलं मोदी तसंच ‘इंडिया’ आघाडी यांचं कथन (नॅरेटिव्ह) यांचं खोलात जाऊन विश्लेषणही केलं आहे. या निवडणुकीत भल्याभल्या राजकीय विश्लेषकांचे अंदाज पूर्णपणे तर चुकलेच; शिवाय निकालानंतरही लोकांच्या मनात अनेक प्रश्न उभे राहिले. ‘एग्झिट पोल’विषयी तर लोकांचा पूर्ण भ्रमनिरास झाला. त्यामुळे राजदीप यांनी या पुस्तकाच्या प्रारंभी आणि अखेरीस त्याच बहुचर्चित प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. बहुतेक सर्वांचीच या निवडणुकीची भाकितं मतदारांनी फोल कशी ठरवली, याचा जाहीर कबुलीजवाब त्यांनी प्रारंभीच ‘फ्रिक्वेंटली आस्कड क्वेश्नन्स’ अशा नावाच्या प्रकरणात दिला आहे. पण त्याच वेळी योगेन्द्र यादव या राजकीय विश्लेषकाचे अंदाज अचूक ठरल्याचेही त्यांनी नमूद केलं आहे. दहा वर्षांच्या बहुमतशाहीच्या राजवटीत झालेल्या आणि ध्रुवीकरणाच्या राजकारणामुळे समाजात निर्माण झालेल्या खोल दरीला जनता कंटाळली होती, असा राजदीप यांचा दावा आहे. या दहा वर्षांच्या राजवटीचं वर्णन त्यांनी ‘जातीयवादाची शिसारी आणि हुकूमशाहीचं गुदमरून टाकणारं सावट’ या प्रतापभानू मेहता यांच्या शब्दांत केलं आहे.
मोदी आणि शहा तसंच राहुल गांधी यांची ठळकपणे आणि मुख्य म्हणजे त्यांच्या गुणांबरोबरच दोषांचीही चर्चा करत उभी केलेली व्यक्तिचित्रं हे या पुस्तकाचं आणखी एक वैशिष्ट्य. या तिघांबद्दल अनेक किस्से नमूद करतानाच त्यांनी त्यांच्या राजकारणाचं केलेलं विश्लेषण हे मुळातूनच वाचण्यासारखं आहे. ‘प्रत्यक्ष परमेश्वरानंच मला या धरतीवर पाठवलं आहे!’ या मोदी यांच्या वक्तव्याचं विश्लेषण करताना, २०१२ मध्येच मोदी यांनी ‘ज्योतिग्राम यज्ञा’च्या वेळी काढलेल्या ‘माझ्या कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी ईश्वरानंच मला काही दैवी शक्ती प्रदान केली आहे’ या उद्गारांचं स्मरण राजदीप यांनी करून दिलं आहे. ‘मोदी की गॅरंटी’ अशा घोषणा आणि सादरीकरणाचे नित्य नूतन प्रयोग यातून ‘ब्रॅण्ड इंडिया’पेक्षा ‘ब्रॅण्ड मोदी’ हीच प्रतिमा अधिक मोठी झाल्याचे राजदीप यांनी साधार दाखवून दिलं आहे. तर शहा हे आपली ‘कट्टर हिंदुत्ववादी’ ही प्रतिमा लपवू तर पाहत नव्हतेच; उलट ते ती प्रतिमा अभिमानानं सर्वांना दाखवत सर्वत्र फिरत होते, असेही लेखक नमूद करतो. त्यामुळे कोणे एके काळी गोविंदाचार्य यांनी वाजपेयी आणि अडवाणी यांना उद्देशून दिलेल्या ‘मुखवटा आणि चेहरा’ या रूपकाची अपरिहार्य आठवण येते.
पुस्तकातील प्रकरणांची शीर्षकंही लक्षवेधी आहेत. अमित शहा यांच्यावरील प्रकरणाचं शीर्षक ‘ये हिंदुत्व की सरकार है’ असं आहे तर कोविड साथीनं झालेल्या प्रकरणांचा ऊहापोह ‘ताली बजाओ; थाली बजाओ’ या प्रकरणात आहे. भाजपच्या ‘वॉशिंग मशीन’ राजकारणाची चर्चा ‘हमारे पास ईडी है’ या प्रकरणात आहे. राहुल गांधी आणि ‘इंडिया’ आघाडीचं राजकारण ‘ये अदानी की सरकार है’ या प्रकरणातून सामोरी येते.
भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यात या निवडणुकीच्या तोंडावर पडलेली काहीशी दरी आणि मुख्यत्वे संघाची या निवडणुकीतील भूमिका या संदर्भात मात्र या तपशीलवार विश्लेषणात्मक पुस्तकात फारसा उल्लेख का नाही, हा प्रश्न पुस्तक संपवताना सहज मनात येतो. तरीही या पुस्तकाचं मोल या निवडणुकीत जनतेनं मोदी-शहा दुकलीला (ज्यांचा उल्लेख ‘जोडी नंबर १’ असा लेखकानं केला आहे) दिलेल्या धक्क्याचं राजदीप यांनी केलेलं विश्लेषण आणि काढलेले निष्कर्ष महत्त्वाचेच आहेत. पुस्तकाच्या शेवटी लेखक स्वत:लाच प्रश्न विचारतो, ‘‘मोदी युगा’नंतरही भारतात लोकशाही तरून जाईल का?’ त्याचं त्यानंच दिलेले उत्तर आहे : सध्याच्या अत्यंत वाईट आणि नैराश्याचं सावट असलेल्या काळात या निवडणुकीचे निकाल निश्चितच दिलासा देणारे आहेत. भारतातील विविधतेवर कोणी हल्ला करत असेल तर तो जनता खपवून घेत नाही, हेच हे निकाल सांगत आहेत. घटनाकारांनी दिलेल्या अधिकारांचा वापर करत अहिंसक मार्गाने जनतेनं हे दाखवून दिलं आहे. त्यामुळे याच कधीही न तुटणाऱ्या ‘इंडियन स्पिरिट’कडे आशेने बघतच पुढील वाटचाल करावी लागणार आहे.
पुस्तकाच्या अखेरीस परिशिष्टात दिलेली आकडेवारी आणि आलेख अभ्यासकांसाठी अत्यंत मोलाचे आणि उपयुक्त आहेत. ते मुळातूनच बघायला हवेत.
akolkar.prakash@gmail.com