‘काश्मीर टाइम्स’ या दैनिकाचं कार्यालय बंद करण्याची कारवाई अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतरच्या काळात झाली, तेव्हा अनुराधा भसीन यांना काहीतरी बदलल्याची जाणीव पहिल्यांदा झाली असेल. एरवी, वडील वेद भसीन यांनी स्थापलेल्या या इंग्रजी वृत्तपत्रात १९८९ पासून पत्रकारिता करणाऱ्या आणि आज या दैनिकाच्या कार्यकारी संपादक असलेल्या अनुराधा यांनी बराच मोठा काळ पाहिला आहे. पण गेल्या तीन वर्षांत काहीतरी बदललं.. ते काय, याचा मागोवा घेणारं हे पुस्तक २८ डिसेंबरपासून अधिकृतरीत्या प्रकाशित होतं आहे.
अनुराधा भसीन या काश्मिरींच्या मानसिकतेचं नेमकं वर्णन करू शकणाऱ्या पत्रकार म्हणून विख्यात आहेत. याचं प्रतिबिंब या पुस्तकात असेलच. परंतु ‘रक्ताचा एकही थेंब न सांडता आम्ही काश्मिरात लोकशाही आणतो आहोत’ हा सरकारी दावा कितपत खरा, याचाही शोध हे पुस्तक घेतं. हार्पर कॉलिन्सनं प्रकाशित केलेल्या या ४०० पानी पुस्तकाची (पेपरबॅक) किंमत ६९९ रुपये आहे.