उर्वीश कोठारी हे गुजरातमधल्या ‘विचारवंत, बुद्धिजीवी’ लोकांपैकी एक. आचार्य कृपलानींचा थेट सहवास या कोठारींना लाभला होता आणि त्यामुळे आणीबाणीच्या काळातील अनेक नेत्यांशीही कोठारींचा चांगला परिचय होता. पण खुद्द कोठारींचा पिंड कार्यकर्त्यांचा नसून अभ्यासकाचा. ‘सरदार पटेल : साचो माणस साची वात’ हे त्यांनी संशोधनपूर्वक सिद्ध केलेले पुस्तक गुजरातीत प्रथम प्रसिद्ध झाले, तेव्हा गुजरातभरचे लोक देशावर सत्ता गाजवण्याच्या ईर्षेने पेटलेले होते. त्या गंभीर पुस्तकाची दखल साहजिकच फार कमी जणांनी घेतली. मात्र आता याच उर्वीश कोठारींचे ‘अ प्लेन, ब्लन्ट मॅन’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. सरदार पटेल यांचे हे चरित्र नव्हे- पटेल यांचीच पत्रे, त्यांचीच भाषणे, यांचे हे सुविहित संपादन आहे.
अर्थात, कोठारींनी या पुस्तकाच्या दीर्घ प्रस्तावनेत स्वत:ची निरीक्षणे नोंदवल्यामुळे ते वाचनीय झाले आहे. विखुरलेल्या संदर्भाना एकत्र आणणारी ही प्रस्तावना आहे. उदाहरणार्थ कोठारी लिहितात : ‘सरदारांबद्दलचा सर्वात मोठा गैरसमज म्हणजे ते मुस्लीमविरोधी होते.. सरदारांच्या मुस्लिमांबद्दलच्या दृष्टिकोनाचा सारांश ‘मी गांधी नाही, पण गांधीजींचा शिष्य नक्कीच आहे’ या त्यांच्या विधानासंदर्भात पाहावा लागेल’! साधीसोपी पण अर्थगर्भ वाक्ये हे या प्रस्तावनेचे वैशिष्टय़ आहे.
सरदार पटेल यांच्याबद्दलचा प्रचार कसा चुकीचा ठरतो, याची साधार स्पष्टीकरणे गेल्या नऊ वर्षांत अनेकदा- अनेकांनी दिलेली आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर गांधीजींच्या हत्येनंतर बंदी, पाकिस्तानात जाऊ इच्छिणाऱ्या आणि फेब्रुवारी १९४८ पर्यंत भारतात विलीनही न झालेल्या जुनागढ संस्थानात १२ नोव्हेंबर १९४७ रोजीच्या जाहीर सभेत ‘सोमनाथ मंदिर पुन्हा उभारू’ हे सरदार पटेल यांनी दिलेले आश्वासन आदींबद्दल बरेच बोलले/ लिहिले गेले. पण कोठारी अनेक नवे प्रश्न उपस्थित करतात आणि त्यांची सहसा चर्चेत नसणारी उत्तरेही देतात. सरदार पटेल यांनी गांधीजींना १९४८ मधील उपोषणापासून तात्काळ का रोखले नाही, हा कोठारी यांनी उपस्थित केलेला प्रश्न. त्याचे आजवर सर्वज्ञात असलेले उत्तर असे की, गांधीजींनी या संदर्भात पटेल वा नेहरूंचे अजिबात ऐकले नसते. पण गांधीजी ऐकणार नाहीत ते का, आणि त्यांनी उपोषण करण्यामुळे काही फरक पडेल का, असा विचार सरदार पटेल यांनी केला असावा. ‘पटेल यांना स्वत:लादेखील, बिहारच्या मुस्लीम समाजातून गांधीजींना साथ देणारे नेतृत्व उभे राहावे असे वाटत होते. तसे उपोषणाने काही झाले नाही’ – असे कोठारी नोंदवतात. संदर्भ म्हणून सरदार पटेल यांचे (मुस्लिमांकडून साथ मिळण्याबद्दलचे) वाक्यच उद्धृत करतात.
उद्योगपती बिर्ला कुटुंबाशी जसे गांधीजींचे संबंध होते, तसे सरदार पटेल यांचेही होते. या कुटुंबातील घनश्यामदास (जी.डी.) बिर्ला सर्वाना माहीत असतात, पण ‘बिट्स पिलानी’सह बिर्ला प्लॅनेटोरियम आणि पहिल्या ‘बिर्ला मंदिरा’चीही उभारणी करणारे ब्रिजमोहन बिर्ला फार कुणाला माहीत नसतात. या ब्रिजमोहन बिर्लाशी सरदार पटेलांचा बराच पत्रव्यवहार गुजरातीत होई. त्यापैकी काही पत्रे या पुस्तकात आहेत.
एका पत्रात सरदार पटेल म्हणतात : ‘‘प्रिय ब्रिजमोहन, .. हिंदूस्तान हिंदूंचा’ असे मानणे आणि या देशात हिंदू धर्माला राज्याचा धर्म मानणे शक्य होईल असे मला वाटत नाही. आपण हे विसरू नये की इतर अल्पसंख्याक आहेत, ज्यांचे संरक्षण ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे. राज्य हे सर्वासाठी अस्तित्वात असले पाहिजे, मग ते कोणत्याही जाती-धर्माचे असो.’ – हे पत्र आहे १० जून १९४७ रोजीचे! वारंवार, अनेक पत्रांतून सरदार पटेल यांचे धर्मनिरपेक्ष रूप या पुस्तकातून दिसत राहते.
लोकांमध्ये अंत:करणपूर्वक बदल घडवण्याचा गांधीजींचा आग्रह सरदार पटेल यांना महत्त्वाचा तर निश्चितच वाटे, पण स्वत:ची राजकीय प्रकृती ही हाती घेतलेले काम तडीस नेऊन दाखवण्याची आहे, तेथे या आग्रहाचा मार्ग उपयोगी नाही हेही त्यांना पटे. त्यामुळे गांधीजींच्या या शिष्याचे राजकारण गांधीजींपेक्षा निराळे ठरले, असा निर्वाळा अभ्यासपूर्ण आधारांच्या साह्याने कोठारी देतात. पटेल यांच्यावरचा हा नवा प्रकाश, ही यंदाच्या स्वातंत्र्य दिनाची उत्तम भेट आहे! ‘अलेफ बुक्स’ने प्रकाशित केलेल्या या ३२८ पानी पुस्तकाची (सवलतीविना) किंमत आहे ७९९ रुपये.