लवचीक व्याकरण व शाब्दिक शुद्धतेचा आग्रह न धरणे, अन्य भाषांतून उसनवारी, हे सारे करूनही इंग्रजी समृद्ध झाली…
शशी थरूर यांच्या दिसण्यावर, बोलण्यावर व लिहिण्यावर लोकांचे प्रेम आहे. या ‘लोकां’पैकी बहुतेक जण विशेषत: नवश्रीमंत, मध्यमवर्गीय लोक आहेत, ज्यांनी बर्नार्ड शॉच्या एलायझा डूलिटिल वा पुलंच्या मंजुळेसारखे ओळखले आहे की समाजाच्या वरच्या स्तरात प्रवेश करायचा असेल तर त्यांची भाषा आपलीशी केल्याशिवाय पर्याय नाही. ती भाषा अर्थातच इंग्रजी. खुद्द थरूर एखादा लांबलचक शब्द उदा.- floccinaucinihilipilification सारखा वापरतात, वर – आपल्या मुलांकडून तो शब्द पाठ करून घेणारे पालक सभासमारंभानंतर आपल्याला भेटून मुलाकडून तो शब्द आपल्यासमोर वदवून घेतात, हेही त्यांनीच एका मुलाखतीत हसत हसत सांगितले आहे.
‘अ वंडरलॅण्ड ऑफ वर्ड्स’ हे थरूर यांचे नवीन पुस्तक इंग्रजी भाषेभोवती, एखाद्या सुंदर तरुणीभोवती नुकत्याच कॉलेजात गेलेल्या तरुणाच्या उत्साहाने घोटाळते व तो जसा तिच्याबद्दल सारखे इतरांना सांगत सुटतो त्याची आठवण येते. ते अति झाले की त्याची थट्टाही होते. जी थरूर यांचीही अनेकदा झाली, हे त्यांनी या वाचनीय पुस्तकाच्या प्रस्तावनेत कबूल केले आहे. एखाद्या भाषेचा परिचय किती अंगांनी करून देता येतो याचे हे पुस्तक उत्तम उदाहरण आहे. डिजिटल युगात टेक्स्ट मेसेज वाचण्याची सवय वाढत चालल्याने काही गंभीर, चिकित्सात्मक, असे लिखाण वाचण्याची सवय सुटत चालली आहे अशी तक्रार सुरुवातीस ते करतात, पण निबंध लिहिताना त्यांनीच या वस्तुस्थितीची जाणीवही ठेवली आहे. केवळ My World of Words ही प्रस्तावना बारा पानांची आहे. बाकी तेरा भागात विभागलेले पुढले बहुतेक निबंध फक्त दीड ते पाच पानांचे आहेत.
हेही वाचा >>> अन्वयार्थ : आंदोलक ‘आत’; बलात्कारी बाहेर!
इंग्रजीसारखी जागतिक भाषा समजून घ्यायची असेल तर त्या भाषेची स्थानिक रूपे ध्यानात घ्यावी लागतात. यात विनोदी उदाहरणे लेखक देत गेल्याने ती सारी रंजक झाली आहेत. अमेरिकन व ब्रिटिश इंग्लिशचा झगडा आपल्याला माहीत आहे. यात ऑस्ट्रेलियन इंग्लिशवरही लहानसे प्रकरण आहे. ऑस्ट्रेलियन लोक ‘डे’चा उच्चार ‘डाय’असा करतात. कोमातून जागा झालेला पेशंट परिचारिकेला विचारतो, ‘‘हॅव आय कम हिअर टु डाय?’’ (मी येथे मरायला आलो आहे का?) तर ती म्हणते, ‘‘नो यू केम हिअर यस्टर-डाय. ‘‘(नाही. तू काल आला आहेस.) १९८८ साली आलेल्या ऑस्ट्रेलियन ऑक्सफर्ड इंग्लिश शब्दकोशात ऑस्ट्रेलियात जन्मलेले दहा हजार इंग्लिश शब्द होते. ती संख्या हळूहळू वाढत गेली. भारतातील आजकालच्या इंग्लिशबाबत, योगी, नमस्तेसारख्या इंग्लिशमध्ये रुळलेल्या शेकडो शब्दांबद्दल थरूर बोलत नसून ते भारतीयांनी इंग्लिशचे जे रूप बदलले आहे त्याबद्दल प्रामुख्याने लिहितात. ‘माझे डोके खाऊ नको’चे ‘डू नॉट इट माय हेड!’ हे खास भारतीयच… लेखक सांगतो, ‘यात चूक काही नाही हे भारतीय इंग्लिश आहे’. तर अर्थशास्त्र, राजकारण, संस्कृती आणि पाकशास्त्र यांत वापरल्या जाणाऱ्या इंग्लिश भाषेवर फ्रेंच शब्दांचे राज्य आहे. जर्मन, जपानी शब्ददेखील इंग्लिश भाषेने आयात केले. ज्या भाषेमधून इंग्लिश भाषेने आयात केले नाहीत अशी भाषा क्वचितच सापडावी हे लेखकाचे म्हणणे चूक नाही. या क्षमतेमुळे ती आज जागतिक भाषा बनली आहे. त्याला लेखकाने ‘एस्परँटो’ असा शब्द वापरला आहे. जिज्ञासूंनी त्याची माहिती मिळवावी. ७,५०,००० शब्द असलेल्या या भाषेत आजही अनेक संकल्पनांना शब्द नाहीत. ज्या गोष्टी स्थानिक परंपरेतून आल्या आहेत त्या इंग्रजीत आयात करता येत नाहीत. आणि तो शब्द आयात केला तरी इतरांना समजणे अवघड आहे. आपल्याकडचा लगेच आठवणारा ‘संस्कार’ हा शब्द तसा आहे.
इंग्रजी भाषेचे व्याकरण देखील नियमांनी घट्ट आवळलेले नाही. त्यामुळे शुद्धलेखनाचे महत्त्व व अशुद्ध लेखनाने होणाऱ्या गमती हे सारे मिसळून लिहिल्याने या भागातील हायफन्स, अपोस्ट्रॉफी ही प्रकरणे देखील अगदी वाचनीय. टिक- टॉक, डिंग- डाँग अशा प्रकारचे शब्द डाँग- डिंग किंवा टॉक- टिक असे का वापरले जात नाहीत? एखाद्या वर्णनात्मक वाक्यात विशेषणे वापरताना देखील नियम ठरलेला आहे. ‘मत – आकार – वय – आकृती – रंग – त्याचे मूळ – ते कशापासून बनलेले आहे – हेतू’ या क्रमाने ते वर्णन यायला हवे. थरूर यांच्या मते हा क्रम जर बदलला तुम्हाला भाषा माहीत नाही हे लक्षात येते.
काही शब्द निरर्थक असतात, पण ते अर्थपूर्ण शब्द आणि वाक्ये एकमेकांशी जोडतात. त्यांना ते ग्लू वर्ड्स म्हणजे गोंद शब्द असे म्हणतात. बेसिकली, अॅक्चुअली हे असे शब्द आहेत. पण हेच शब्द विचारातील गोंधळही ध्वनीत करतात. लोक बोलताना असे शब्द वापरतात कारण नेमके काय म्हणायचे आहे ते त्यांना माहीत नसते. त्याचा वापर टाळता येत नाही पण असे शब्द खूप आले की हे जोडकामच उठून दिसते. नाईस म्हणजे छान, हा ‘आळशी शब्द’ आहे कारण तुम्हाला जे म्हणायचे आहे त्यापेक्षा कमी अर्थ तो पोहोचवतो. एखादा ड्रेस छान आहे म्हणजे तो डौलदार आहे, का त्याचा रंग मोहक आहे, का तो महागडा आहे किंवा तो घालणाऱ्याचा बेढबपणा लपवतो आहे, हे तुम्हाला नेमके सांगता आले पाहिजे. ‘ग्लू’ आणि‘आळशी शब्द’ कमी वापरावे असा त्यांचा सल्ला आहे.
लेखक भाषेविषयी लिहिताना संभाषण-चातुर्याविषयीही सांगतो. भाषेला धार दुसऱ्याला अपमानित करताना चढते तशी इतरवेळी क्वचितच चढते. अशा काही अपमानांची उदाहरणे देताना थरूर यांनी ‘शालजोडी’चे सम्राटपद शेक्सपिअरला दिले आहे. आजच्या डिजिटल विश्वात पूर्व मैत्रिणीस ‘अनफ्रेंड’ करण्यापेक्षा, ‘आय डिझायार दॅट वुई बी स्ट्रेंजर्स.’ हे त्याचे ‘अॅज यू लाइक इट’मधील वाक्य कितीतरी चांगले! ‘चलो एकबार फिरसे अजनबी बन जाय हम दोनो’ हे साहिरने तिथूनच तर घेतले नसावे?
एफ्युमिझम्स म्हणजे एखादी अप्रिय गोष्ट सौम्य शब्दात सांगणे तर डाय्स्पेमिझम हा त्याच्या उलट शब्द पण या दोन्हींचे अर्थ ठरीव नसतात. तुम्ही कोणापुढे बोलत आहात यावर ते अवलंबून असते. मेल्यावर सभ्य भाषेत एखादा कमी परिचित माणूस ‘निधन पावतो’ पण जवळच्या माणसाबद्दल हे सांगताना आपण हा शब्द न वापरता सरळ सांगितले की ‘तो वारला’ तर तो असभ्यपणा ठरत नाही. म्हणून शब्दांचे अर्थ काळ, वेळ व प्रसंगाप्रमाणे बदलत असतात. पाब्लो नेरुदांनी म्हटल्याप्रमाणे शब्दांना हवेत पकडावे लागते. याचप्रमाणे अॅप्टाग्राम, अॅनाफोरा, बॅक्रोनिम्स, कांट्रोनिम्स, अॅपोनिम्स, होमोनिम्स अशा सर्वसाधारण वाचकाला परिचित नसलेल्या अनेक शब्द-संकल्पनांचा परिचय लेखकाने प्रत्येकी दीड-दोन पानांत करून दिला आहे. हे शब्द आपण वापरतसुद्धा असतो; पण त्याची जाणीव आपल्याला नसते. हे पुस्तक वाचल्यावर आपले नेहमीचे वाचनदेखील अधिक सजग होत जावे.
थरूर यांच्या मते शब्दसंपत्ती वाढवण्यासाठी वाचनाला पर्याय नाही. पुस्तके ‘ऐकणे’ हा नवीन पर्याय सध्या उपलब्ध आहे पण तो शब्दसंपत्ती वाढवण्यासाठी प्रभावी नाही असा इशारा त्यांनी दिला आहे. स्क्रॅबल या शब्दखेळानेही थरूर यांना शब्द संपत्ती वाढवण्यासाठी मदत केली आहे. नेटवर ‘वर्ड्स’ नावाचा खेळ ते आवर्जून खेळतात. इंटरनेट आल्यापासून त्यांचाही कागदी शब्दकोशाचा वापर कमी होत गेला आहे. शब्दकोशदेखील परिपूर्ण नव्हते; कारण अस्तित्वात नसलेले काही शब्द त्यात असायचे. या दृष्टीने पुस्तकातील ‘घोस्ट वर्ड्स’ प्रकरण उद्बोधक आहे. काही वेळा टायपिंगच्या चुकांनी असे शब्द जन्माला घातले आहेत. तर काही वेळेला कॉपी राइट सुरक्षित करण्यासाठी शब्दकोशांच्या कंपन्या मुद्दाम असा एखादा शब्द त्यात सोडून देतात. कुणी दुसऱ्या प्रकाशकाने शब्दकोशाची नक्कल केली की मूळ कंपनीच्या ते लगेच लक्षात येते.
समृद्धीची प्रचीती!
थरूर यांना मध्येच अनवट शब्द वापरायची चटक आहे. काही वर्षांपूर्वी farrago हा शब्द वापरून त्यांनी धुरळा उडवून दिला होता. त्यानंतर ‘ऑक्सफर्ड डिक्शनरी’ने ट्वीट केले की, त्यांच्या वेबसाइटवर भारतातल्या लाखो लोकांनी हा शब्द पाहिला. हे एकप्रकारे मार्केटिंग देखील असू शकते. या पुस्तकातही प्रस्तावनेच्या तिसऱ्याच पानावर obstreperous असा शब्द गोंधळ घालणाऱ्या मुलांसाठी वापरून त्यांनी वाचकाच्या टपलीत मारली आहे. पी. जी. वूडहाऊसने शोधलेल्या किंवा प्रचारात आणलेल्या शब्दांवर एक वेगळे प्रकरण यात आहे. असे अनेक शब्द या पुस्तकात आपल्याला मिळत राहतात. थरूरांचा प्रतिवाद आहे की हे शब्द अनवट नाहीत, कारण त्यांच्या कॉलेजच्या दिवसापासून ते असे शब्द वापरत आहेत. या पुस्तकातही अनेक नवीन इंग्रजी शब्दांचा परिचय होईल. पण वाचक ते वापरणार कुठे? तेव्हा यातील नवनवीन शब्दांचा हव्यास न धरता भाषा कशी विकसित होत गेली याकडे आपण लक्ष दिले तर पुस्तक वाचताना लक्षात यावे की व्यापार, सागरी मोहिमा, युद्ध, राजकीय व औद्याोगिक क्रांती, साम्राज्यवाद, संसदीय लोकशाहीची दीर्घ परंपरा, लवचीक व्याकरण व शाब्दिक शुद्धतेचा आग्रह न धरणे यातून इंग्रजी भाषा विकसित होत गेली आहे.
हे आपले इंग्रजी सुधारण्याचे पुस्तक नाही तर भाषेवर कसे प्रेम करावे, जागरूकपणे कसे वाचावे, हे जाणण्याचे पुस्तक आहे.
शशी थरूर भारतीय तर आहेतच, पण ते जगाचे नागरिकही आहेत याची प्रचीती हे पुस्तक वाचताना येत राहते. त्याचबरोबर हिंदीविषयी लहानसा ग्रह त्यांच्या मनात असावा असे त्यांनी त्या भाषेला आणि भाषकांना लहानसा चिमटा काढला आहे त्यावरून वाटते. एस्किमोंच्या भाषेत बर्फाला १५ शब्द आहेत असे म्हणतात असे सांगून ते लिहितात, ‘‘हिंदीत बरफ हा एकच शब्द यासाठी आहे. अर्थात स्नो आणि आईस या दोन्हीशी त्यांचा संबंध क्वचितच येतो.’’
पुस्तकातील सर्व भागांचा परिचय करून देणे येथे शक्य नाही. पुस्तकप्रेमींसाठी यात सापडलेले दोन शब्द महत्त्वाचे, चॅप्टीग (Chaptigue) म्हणजे रात्रभर पुस्तकाची प्रकरणांमागून प्रकरणे वाचून सकाळी आलेला थकवा आणि बुकक्लेम्प्ट (Bookklempt) म्हणजे पुस्तक वाचून संपले आता पुढे काही नाही यावर विश्वास न बसणे. वाचकांना या दोन्ही शब्दांची प्रचीती या पुस्तकासंदर्भात यावी!
‘अ वंडरलॅण्ड ऑफ वर्ड्स- अराउंड द वर्ड इन १०१ एसेज्’
लेखक : शशी थरूर
प्रकाशक : अलेफ बुक्स
पृष्ठे : ४७० ; किंमत : ९९९ रु.
kravindrar@gmail.com