‘‘भारतात जे अव्वल ‘निबंधकार’ आहेत, त्यांपैकी आकार पटेल यांचं नाव महत्त्वाचं’’- हे अनेक जाणकारांचं मत, गेल्या कैक वर्षांपासून कायम आहे. आकार पटेल हे नेहमीच संपादकीय उच्चपदांवर होते, त्यामुळे त्यांची लेखणी गेली तीसेक वर्ष सुरू आहे. अलीकडे या लेखणीला निराळी धार आली आहे (आणि त्यामुळे अनेक ठिकाणचं त्यांचं स्तंभलेखन बंदही झालं आहे), आणि ‘द अॅनार्किस्ट कुकबुक’ (नोव्हेंबर २०२१), ‘प्राइस ऑफ द मोदी इयर्स’ (जून २०२२), ‘अवर हिंदू राष्ट्रा’ (ऑक्टोबर २०२२) ही त्यांची पुस्तकं धारदार लिखाण म्हणजे काय, याची साक्ष देणारी आहेत. मात्र येत्या सप्टेंबरात आकार पटेल यांची पहिलीवहिली कादंबरी प्रकाशित होते आहे!
कादंबरी या ललितगद्य प्रकारात आकार यांचं कुठलंही लेखन यापूर्वी प्रकाशित झालेलं नाही. पन्नाशी ओलांडल्यानंतर ते या प्रकाराकडे वळले आहेत. त्यांची याआधीची ललितेतर पुस्तकं प्रकाशित करणाऱ्या ‘पेन्ग्विन’तर्फेच कादंबरीही येते आहे. ‘आफ्टर मसीहा’ ही कादंबरी सत्ताकेंद्रामध्येच घडते. यातला ‘मसीहा’ ठरलेला तथाकथित महान नेता वारल्यावर जयेशभाई आणि स्वामीजी यांना मागे टाकून मीरा हिच्याकडे पद दिलं जातं. जयेशभाई आणि स्वामीजी एका गटातले, तर मीरेच्या गटात आयेषा, प्रभू आणि डय़ुबॉइस अशी (विविध धर्मीय!) मंडळी. या दोन गटांचा राजकीय संघर्ष तर एरवीही होणारच होता, पण मीरा केंद्रस्थानी आल्यामुळे त्यात काय फरक पडतो? मीरा ही कादंबरीची नायिका- म्हणून ती जिंकणारच, असं होतं का इथं? की मीरेच्या मिषानं राजकारणाची सफर कादंबरी घडवते? म्हणजे ‘आकार कादंबरीचा- प्रकार वैचारिक लेखनाचा’ असं तर नाही ना? – या प्रश्नांच्या उत्तरांसाठी सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवडय़ापर्यंत थांबावं लागेल!