अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच या निवडणुकीतील उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या कुटुंबातील विक्षिप्तपणा कथन करणारे पुस्तक- ‘ऑल इन द फॅमिली : द ट्रम्प्स अॅण्ड हाऊ वुई गॉट धिस वे’ प्रकाशित झाले आहे. हे किस्से लिहिले आहेत, ट्रम्प यांचेच पुतणे फ्रेड सी. ट्रम्प तिसरे यांनी. निवडणुकीच्या मुहूर्तावरच अध्यक्षपदाच्या शर्यतीतील उमेदवाराच्या पुतण्याने स्वत:च्याच कुटुंबातील विक्षिप्तपणा, असा चव्हाट्यावर आणणे, हे पुस्तकातील मुद्दा सिद्ध करणारेच ठरते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुस्तकात फ्रेड यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यात मुरलेल्या वर्णभेदाचे अनेक किस्से कथन केले आहेत. काकांच्या आवडत्या कॅडिलॅक एलडोरॅडो कन्वर्टिबल या गाडीचा सॉफ्ट टॉप कोणीतरी फाडला. हे कृत्य कोणी केले याविषयी काहीच माहीत नसतानाही डोनाल्ड ट्रम्प यांनी आक्षेपार्ह शब्द वापरून कृष्णवर्णीयांनाच दोष देण्यास सुरुवात केली. फ्रेड यांना किशोरवयातही ती वक्तव्ये वर्णभेदी असल्याचे लक्षात आल्याचे त्यांनी नमूद केले आहे. आपल्या आजोबांविषयीही त्यांनी अशीच आठवण सांगितली आहे. आजोबा फ्रेड्रिक सी. ट्रम्प सीनियर कृष्णवर्णीयांविरोधात एक विशिष्ट अपमानास्पद शब्द वापरत. ट्रम्प कुटुंबीय त्यांच्या मालमत्ता भाडेतत्त्वावर देताना कृष्णवर्णीयांना अधिक भाडे आकारत असल्याचा आरोप झाल्याचेही ते लिहितात. १९८० मध्ये सेंट्रल पार्कमध्ये जॉगिंग करणाऱ्या एका श्वेतवर्णीय महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप असलेल्या कृष्णवर्णीय आणि लॅटिन तरुणांना कायदेशीर तरतुदींच्या पलीकडे जाऊन कठोर शिक्षा देण्याची सूचना डोनाल्ड ट्रम्प यांनी केल्याची आठवण ते करून देतात.

हेही वाचा >>> अन्वयार्थ: ताठ कण्याचा क्रिकेटपटू

आपल्या कुटुंबात अशी विक्षिप्त आणि विकृत वृत्ती कुठून आली असावी, याची पाळेमुळे शोधण्याचा प्रयत्न फ्रेड यांनी केला आहे. यात ते त्यांच्या जर्मन वंशाच्या पणजोबांविषयीही लिहितात. त्यांच्या पणजोबांचे नाव फ्रेड्रिक हेन्रिच ट्रम्प. त्यांचा उल्लेख लेखक ‘फ्रेड झिरो’ असा करतात. हे पणजोबा १८८० साली लष्करी सेवेच्या आदेशातून सुटका व्हावी म्हणून जहाजातून अमेरिकेत आले. कालांतराने ते अलास्कातील कुंटणखान्यांचे मालक झाले. यावरून लेखक म्हणतो की याचा अर्थ लष्करी सेवा टाळणारे डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या कुटुंबातील पहिलेच सदस्य नव्हते. ट्रम्प यांनी अस्थिव्यंगाचे कारण देऊन व्हिएतनाम युद्धाच्या काळात लष्करी सेवा टाळली होती.

फ्रेड हे डोनाल्ड ट्रम्प यांचे ज्येष्ठ बंधू फ्रेड ट्रम्प ज्युनियर ऊर्फ फ्रेडी यांचे पुत्र. तर हे फ्रेडी १९८१ साली अवघ्या बेचाळिसाव्या वर्षी मृत्युमुखी पडले. त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरली व्यसनाधीनता आणि व्यावसायिक पायलट होण्याचे अधुरे स्वप्न. फ्रेड यांच्या बहिणीचेही ‘टू मच अॅण्ड नेव्हर इनफ : हाऊ माय फॅमिली क्रिएटेड वर्ल्डस मोस्ट डेंजरअस मॅन’ हे पुस्तक २०२० मध्ये प्रकाशित झाले होते.

ट्रम्प कुटुंबाचे काही कार्यक्रमानिमित्त एकत्र येणे हे दु:स्वप्नासम असल्याचा फ्रेड यांचा अनुभव आहे. त्याविषयी ते लिहितात की अशा वेळी सर्वाधिक नतद्रष्टपणा कोण करणार, याची स्पर्धाच लागलेली असते. हे सिद्ध करणारा एक किस्साही ते नमूद करतात. अशाच एका कार्यक्रमात त्यांची आजी मेरीअॅन भयंकर चिडली. कारण काय, तर पेप्सी आणण्यास सांगितले असताना फ्रेड यांनी कोक आणला. डोनाल्ड ट्रम्प यांची बहीण मेरीअॅन ट्रम्प बेरी, फ्रेडीच्या पत्नीला- लिंडाला नेहमी तुच्छ लेखत असे. त्यानंतर डोनाल्ड यांची तत्कालीन प्रेयसी मार्ला मॅपल्सशीही ती तशीच वागू लागली. मेपल्स यांचे कुटुंबीय डोनाल्ड आणि मार्लाच्या विवाहासाठी एकत्र आले असता, मेरीअॅन यांनी त्यांचे वर्णन ‘ते सामान्य नव्हेत, अतिसामान्य आहेत,’ असे केल्याचेही फ्रेड नमूद करतात.

आपल्या अजब कुटुंबातील सदस्यांशी असलेले संबंध कायम ठेवणे किती कष्टप्रद होते, याचा उल्लेख लेखक अनेकदा करतो. या पुस्तकामुळे पुढच्या वेळी जेव्हा ट्रम्पकाकांशी भेट होईल, तेव्हा त्यात अवघडलेपण असेल याची जाणीवही लेखकाला असल्याचे दिसते. फ्रेड यांना एक मुलगाही आहे- विलियम. तो अपंग आहे. विलियमसारख्या मुलांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आपल्या प्रसिद्ध नावाचा वापर करून घ्यावा, हा उद्देशही पुस्तकामागे असल्याचे फ्रेड लिहितात.

फ्रेडचा मुलगा विलियम याच्याविषयीचा या दोघांचा संवाद ट्रम्प यांची मानसिकता अधोरेखित करणारा आहे. ट्रम्प यांना जाणून घ्यायचे होते, की त्यांच्या पुतण्याच्या मुलाला काय झाले आहे. फ्रेड यांनी सांगितले, काही निश्चित सांगता येणार नाही, पण डॉक्टरांचे म्हणणे आहे की अपंगत्वाचे मूळ तुमच्या कुटुंबातच आहे. शक्यच नाही. आपल्या कुटुंबात काहीही कमतरता नाही, असे म्हणत ट्रम्प यांनी हा मुद्दा ताबडतोब उडवून लावला. ट्रम्प कुटुंबाविषयीचे असे अनेक चमत्कारिक किस्से या पुस्तकात आहेत. त्यामुळे अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीत यावरून किती वाद निर्माण होतात, हे येत्या काळात कळेलच.

हेही वाचा :

दूर ए अझीझ अमना ही गेल्या काही वर्षांत आंग्लवर्तुळात ओळखली जाणारी रावळपिंडी येथील लेखिका. तिच्या काही कथा मासिकांमध्ये पारितोषिक विजेत्या ठरल्या आहेत. ‘प्लोशेअर’ या अमेरिकेतील प्रसिद्ध मासिकाच्या ‘समर फिक्शन’ अंकात तिची ताजी ‘हवालदार इन रंगून’ ही कथा प्रसिद्ध झाली आहे. पुढील काही दिवसांसाठी ती मोफत वाचनासाठी उपलब्ध राहील.

https://shorturl.at/UsdlT

बुकरच्या दीर्घयादीमुळे सर्व पुस्तकी जगाचे लक्ष गेलेल्या डच लेखिका याएल वान डर वाडन हिचे लेखन कसे असेल, याचे कुतूहल शमविण्यासाठी ‘ऑन (नॉट) रीडिंग अॅन फ्रँक’ हा कथेसारखा असलेला निबंध इथे वाचता येईल.

https://shorturl.at/DoeFW

मानव कौल हा अभिनेता आणि लेखक म्हणून भरपूर लोकप्रिय. २०१६ पासून आत्तापर्यंत कथा, कविता, कादंबरी आणि प्रवासकथनाची त्याची १३ पुस्तके आली आहेत. २०२२ साली काश्मीरवरील त्याचे प्रवासकथन ‘रुह’ बरेच गाजले. त्यावरची त्याची थोडी जुनी मुलाखत नव्याने. कारण याचा मराठी अनुवाद नुकताच बाजारात दाखल झाला आहे.

https://shorturl.at/rPdM7

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Book review all in the family the trumps and how we got this way book by fred trump zws