संगीत आणि अर्थव्यवस्थेचा काय संबंध? पण दक्षिण कोरियात मात्र या दोन घटकांचा अतिशय घनिष्ट संबंध आहे. ‘के पॉप’ने या देशाला जगाच्या कानाकोपऱ्यांत पोहोचवले. या एका सादरीकरण कलेतून तिथे दरवर्षी हजारो रोगार संधी निर्माण होतात. के पॉपशी निगडित अनेक उत्पादनांची तुफान विक्री होते. या यशोगाथेची सुरुवात करून दिली ती बीटीएस या ग्रूपने. आज जगभरातील टीन एजर्सच्या गळय़ातला ताईत झालेल्या या ग्रूपमधील सदस्यांच्या आठवणींवर आधारित ‘बियॉण्ड द स्टोरी – टेन इयर रेकॉर्ड’ हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले. प्रकाशनाच्या आधीच लोकप्रिय होण्याची क्षमता अगदी मोजक्याच पुस्तकांमध्ये असते. ‘बियॉन्ड द स्टोरी’ या गटात मोडते.
‘टू कूल फॉर स्कूल’ या २०१३ च्या अल्बमपासून सुरू झालेल्या बीटीएसच्या प्रवासाला यंदा १२ जून रोजी १० वर्षे पूर्ण झाली. या दशकभरात ग्रूपच्या सदस्यांचे आयुष्य ३६० अंशांत बदलले. बीटीएसच्या गाण्यांविषयी जेवढी उत्सुकता असते तेवढीच या ग्रूपच्या प्रत्येक सदस्याच्या वैयक्तिक जीवनाविषयीही असते. त्यामुळे या पुस्तकाची घोषणा झाल्यापासूनच त्याविषयीचे कुतूहल शिगेला पोहोचले होते. त्याचे प्रतिबिंब पुस्तक विक्री करणाऱ्या संकेतस्थळांवर उमटले. भारतातील चाहत्यांनी या पुस्तकाच्या सुमारे पाच हजार प्रतींची प्रकाशनपूर्व नोंदणी करून ठेवली होती. पहिल्या पाच दिवसांत जगभरात पुस्तकाच्या २५ हजार प्रतींची विक्री झाली.
बीटीएसच्या सदस्यांचे अनुभव आणि त्यांच्या आठवणी पत्रकार मेयांगसोक कांग यांनी शब्दबद्ध केल्या आहेत. मूळ पुस्तक कोरियन भाषेत असून अॅन्टॉन हर यांनी त्याचा इंग्रजीत अनुवाद केला आहे. बीटीएस हा ग्रूप जेवढा संगीतासाठी ओळखला जातो तेवढाच तो आकर्षक सादरीकरणासाठीही प्रसिद्ध आहे. त्यामुळेच त्यातील सदस्यांची केशरचना, वेशभूषा इत्यादींचे अनुकरण करण्यास तरुण उत्सुक असतात. पुस्तकाचे सादरीकरणही ग्रूपच्या या प्रतिमेला साजेसे आहे. उत्तम दर्जाचा कागद आणि छपाई, आकर्षक छायाचित्रे, लक्ष वेधून घेणारे सादरीकरण आणि पुस्तकात उल्लेख केलेली गीते त्वरित ऐकण्यासाठी पानोपानी बारकोड यामुळे हे पुस्तक वाचणे हा चाहत्यांसाठी आगळावेगळा अनुभव ठरणार आहे. पुस्तक ऑडिओ बुकच्या स्वरूपातही उपलब्ध असून त्याला किम योंग जी आणि पार्क चॅन वॉन यांनी आवाज दिला आहे. सध्या पुस्तक ‘अॅमेझॉन’ आणि ‘बार्नस् अँड नोबेल’च्या चार्टवर सर्वात वरच्या स्थानी आहे. प्रकाशित झाल्यापासून चाहत्यांनी विविध समाजमाध्यमांवर पुस्तकातील काही अंश पोस्ट केले आहेत. ते वाचून उत्सुकता अधिकच वाढू लागली आहे. हे ४५० पानी, पुठ्ठा बांधणीतील पुस्तक भारतात सोळाशे ते एकवीसशे रुपयांदरम्यान ऑनलाइन आणि २२५० रुपयांना ऑफलाइन उपलब्ध असून ते ‘बिग हिट म्युझिक’ आणि ‘फ्लॅटिरॉन बुक्स’ने प्रकाशित केले आहे.
दक्षिण कोरियात १८ ते ३५ वर्षे वयोगटातील सुदृढ व्यक्तींना किमान १८ ते २१ महिने लष्करी सेवा करणे बंधनकारक आहे. बीटीएसमधील बहुतेक सदस्य २८-२९ वर्षांचे झाले असल्यामुळे अनेकजण सध्या लष्करी सेवेत आहेत. या कालावधीत त्यांना अन्य कोणतेही काम करता येत नाही. याविषयी घोषणा झाली तेव्हा चाहत्यांचा विरस झाला होता. मात्र ग्रूप कार्यरत नसतानाही चाहत्यांशी असलेले नाते या पुस्तकासारख्या विविध प्रकल्पांतून कायम ठेवले जात आहे. ग्रूपने आधीच काही म्युझिक अल्बम्स आणि एका माहितीपटाचे काम करून ठेवले आहे.