पंकज भोसले

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भ्रष्ट तपासयंत्रणा आणि क्रूर गुन्हेगार यांच्या चित्रपटांचं नवं पर्व सुरू करणाऱ्या क्वेन्टिन टेरेण्टिनोच्या चित्रपटांकडे ‘कलात्मक स्वातंत्र्य’ घेऊन पाहणारी एक मूळ स्पॅनिश कादंबरी जगभरात करोना वेगात सक्रिय असताना दीड वर्षांपूर्वी इंग्रजीत आली, त्यामुळे बऱ्यापैकी दुर्लक्षित राहिली. आता खुद्द टेरेण्टिनोनं इतरांच्या चित्रपटांबद्दल लिहिलेलं पुस्तक आलं आहे, त्याबरोबर तरी ही कादंबरी वाचायला हवी..

क्वेन्टिन टेरेण्टिनो या अमेरिकी चित्रपटकर्त्यांच्या ‘रिझव्हॉयर डॉग्ज’ आणि ‘पल्प फिक्शन’ या पहिल्या दोन चित्रपटांनी जगभरच्या गँगस्टरपटांचा-दरोडेपटांचा आणि गुन्हेगारी सिनेमांचा चेहरामोहरा बदलून टाकला. नंतरच्या तीसेक वर्षांत दोन हाताची बोटे पूर्ण होतील, इतकेच चित्रपट बनविणाऱ्या या दिग्दर्शकाचा प्रभाव सर्व खंडांमधील सिनेमांमध्ये झिरपत गेला. शैलीदार हिंसा-दरोडे-मारधाडी-सुटा-बुटातले गँगस्टर्स यांचे प्रत्येक देशात आपापल्या वकुब-प्रकृतीनुसार अनुकरण झाले. सिनेमा बनविण्यापूर्वी व्हिडीओ लायब्ररीत काम करताना जगभरातील ढीगच्या ढीग सिनेमे पाहून फस्त करणाऱ्या या दिग्दर्शकाने लगदा कागदावर छापल्या गेल्याने ‘पल्प फिक्शन’ हा छाप बसलेल्या साहित्यावर आधारित ‘फिल्म न्वार’, ‘वेस्टर्न’ चित्रपटांचे सार आणि अतिपूर्वेकडच्या सामुराई, कुंगफू सिनेमांचा साचा पकडून सरमिसळीची नवी शैली तयार केली. समाजात हीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोष्टींच्या असाधारण उदात्तीकरणाचा झपाटा लावला. इतिहास-साहित्य-सिनेमांतील आवडीच्या सर्व संदर्भाचे उत्खनन करून आपला ठाशीव चित्रपट जगासमोर आणला.

हे सारे अति-परिणामकारक होते. गेल्या दोनेक दशकांपासून अमेरिकी रहस्यकथांतील माफियांनाही टेरेण्टिनोच्या शैलीची लागण झाली. रसेल बँक्स, मेगन अबॉट, वॉल्टर मोस्ले, जेस वॉल्टर या लोकप्रिय लेखकांच्या कृतींतून ते समोर आलेच, पण अट्टल ब्रिटिश खूपविका लेखक निक हॉर्नबीच्या ‘हाय फिडेलिटी’ या १९९५ साली आलेल्या कादंबरीत कुठल्याही गोष्टीची यादी बनविणाऱ्या नायकाकडून आवडीच्या सिनेमांत टेरेण्टिनोच्या ‘रिझव्हॉयर डॉग्ज’चा उल्लेख सन्मानाने आला आहे. ‘सिनेमा स्पेक्युलेशन’ या टेरेण्टिनोने लिहिलेल्या सिनेनिबंधांच्या पुस्तकातूून सध्या या माणसाच्या डोक्यातला चित्रपट जाणून घ्यायची संधी जगभरातील टेरेण्टिनोप्रेमी साधत आहेत. याच भरात ज्युलिअन हर्बर्ट या मेक्सिकोमधील लेखकाची ‘िब्रग मी द हेड ऑफ क्वेन्टिन टेरेण्टिनो’ ही लघुकादंबरी वाचणं या दिग्दर्शकाचा पगडा किती खोल आहे, हे समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरेल.

‘ब्रिंग मी द हेड ऑफ क्वेन्टिन टेरेण्टिनो’ या नावाचा हा दहा कथांचा संग्रह. पण इतर नऊ कथांइतका आकार शीर्षक असलेल्या एकटय़ा लघुकादंबरीत आहे. टेरेण्टिनोचे चित्रपट कोळून प्यायलेल्या आणि जळी-स्थळी हा चित्रकर्ता दिसणाऱ्या या लेखकाने आपल्या देशातील गुन्हेगारी-अमली पदार्थाचा व्यापार, गँगस्टर्स यांचे चित्र टेरेण्टिनोच्या शैलीदार हिंसायुक्त सिनेमांप्रमाणे उतरवले आहे. हीन गोष्टींच्या उदात्तीकरणाचा टेरेण्टिनोचा पहिला नियम वापरत. नंतर हिंसा पेरत मोकाट सुटणाऱ्या व्यक्तिरेखांची माळ गुंफत. इथले गुन्हेगार क्रूर-उद्दाम आहेत त्याहून अधिक पोलीस मगरूर-बेशरम आहेत.

या कादंबरीला सुरुवात होते सिनेसमीक्षकाच्या अपहरणाने. सकाळी सकाळी कॉफी बनवत असताना बडय़ा गँगस्टरचे उजवे आणि डावे हात असलेले पंटर्स त्याच्या अपहरणाचे प्रकरण पार पाडतात. या अपहरणाचे निमित्त काय, तर हा सिनेसमीक्षक टेरेन्टीनोच्या सिनेमांचा अभ्यासक आहे आणि त्याने त्याच्या चित्रपटातील व्यक्तिरेखांवर-कथानकावर भलामोठा प्रबंधही लिहिला आहे. टेरेण्टिनोबाबत अगाध वैश्विक ज्ञानामुळे डझनभर स्पॅनिश वृत्तपत्रांमधून आठवडय़ाला तीन चित्रपट परीक्षणांचा रतीब देण्याचा उद्योग तो करीत असतो. अन् त्यामुळेच ८३ वर्षांच्या मावशीच्या घरात डोके टेकविण्यासाठी त्याला थारा मिळालेला असतो. मात्र दक्षिण अमेरिकेतील छोटय़ाशा देशातील छोटय़ाशा शहरात राहून टेरेन्टीनोतज्ज्ञ बनणे या सिनेपत्रकाराच्या जिवावर बेतते. कारण मेक्सिकोत अमली पदार्थाचा व्यापार करणाऱ्या गटाचा म्होरक्या याकोबो मोंटाना हा हुबेहूब चित्रपट दिग्दर्शक टेरेण्टिनोसारखा दिसणारा निघतो. आपल्या प्रत्येक चित्रपटात टेरेण्टिनोला अभिनय करताना पाहून खवळणारा हा याकोबो मोंटाना या सिनेपत्रकाला टेरेण्टिनोच्या चित्रपटांवर चर्चा करण्यासाठी पळवून आणतो. त्याच्या सिनेमांमधील बारकावे समजून घेणे हीदेखील एक चूष. एके-फोर्टीसेव्हनच्या धाकावर सिनेपत्रकाराची रवानगी मोंटानाच्या अधोलोकात होते. हे अधोलोक म्हणजे पोलिसांपासून बचावासाठी खरेखुरे जमिनीखाली भुयार खणून मोंटानाने तयार केलेले विश्व असते. ज्यात अपहरणाच्या पहिल्या दिवसापासून ‘स्टॉकहोम सिण्ड्रोम’ जडू शकेल इतक्या सुख-सोयी-सुविधा सिनेपत्रकाराला मिळू लागतात.

टेरेण्टिनो कोठे राहतो, या मोंटानाच्या पहिल्या प्रश्नावरचे ‘लॉस एंजेलिस’ हे सामान्यज्ञानी उत्तर सिनेपत्रकार देतो, तेव्हा आपल्या गिल्डाडरे आणि रोझेण्डो या लाडक्या पंटर्सना ‘वाटेल तेवढी कुमक, पैसा घेऊन लॉस एंजेलिसला जा आणि क्वेन्टिन टेरेण्टिनोचे शिर कापून आणा’ हा मध्ययुगीन सरदाराला शोभेलसा हुकूम मोंटाना सोडतो. काही क्षणांतच गिल्डाडरे आणि रोझेण्डो ही क्रूरकर्मा जोडगळी हुकमाच्या अंमलबजावणीसाठी लॉस एंजेलिसकडे कूच करतात आणि कादंबरीत नवनव्या प्रकारच्या नाटय़ाची नांदी-क्रीडा रंगायला लागते.

टेरेण्टिनोने आपल्या प्रत्येक चित्रपटामध्ये रचनेतल्या कौशल्याची परिसीमा गाठली आहे. त्यात काळा विनोद, आपल्याला आवडलेल्या चित्रपटांतील दृश्यांचे संदर्भ ओतत आकर्षक व्यक्तिरेखांची मोट बांधली आहे. ज्युलिअन हर्बर्टचे इथले कथानक हेच जाणीवपूर्वक ठसविण्याचा प्रयत्न करते. दोन हजार पोर्न मासिकांचा संग्रह आणि भरपूर ‘सिल्व्हर’ डीव्हीडींचा साठा असलेल्या सिनेपत्रकाराचा (अपहरणनाटय़ावेळी हे छंदो-व्यसन उघडे पडते) प्रबंधाचा विषय असतो ‘टेरेण्टिनोच्या सिनेमांतील व्यक्तिरेखांना जाणवणारे विडंबन आणि उद्दात्तता’. या प्रबंधामुळेच त्याला अनेक पारितोषिके मिळतात आणि मोंटानाच्या अधोलोकातला प्रवेशही. पुढे कादंबरीतील एक प्रकरण सिनेपत्रकाराच्या प्रथम पुरुषी निवेदनातून सिनेमा आणि कलाविचार यांच्याविषयी गंभीर चर्चा करत सरकते, तर दुसरे प्रकरण तृतीय पुरुषी निवेदनातून क्वेन्टिन टेरेण्टिनोचे शिर कापून आणण्याच्या मोहिमेवर निघालेल्या गिल्डाडरे आणि रोझेण्डो यांच्या हिंसाचारी कर्तृत्वाच्या वर्णनांनी. पहिल्यांदा व्यायामाआधीच्या सरावासारखे ते एका पिझ्झा बनविणाऱ्या गोऱ्या स्वयंपाक्याची हत्या करतात. त्याआधी या गोऱ्या स्वयंपाक्या व्यक्तीच्या बाता ऐकून घेतात. बॅरी व्हाइट या गायकाशी संबंधित असलेली ही आठवण पूर्ण झाल्यानंतर पाककृतीसारखी चालणारी गिल्डाडरे आणि रोझेण्डोची हत्याकृती टेरेण्टिनोच्या सिनेमांत घडू शकेल इतकी उग्र आहे.

‘स्टॉकहोम सिण्ड्रोम’ पातळी उत्तरोत्तर वाढत सिनेपत्रकाराचे एका बाजूला विशुद्ध समीक्षेच्या थाटात शेक्सपिअरच्या नाटकांपासून ते हेरॉल्ड पिंटरच्या व्यक्तिरेखा -हेरॉल्ड ब्लूमच्या समीक्षेसह कलाजगतातील कैक संदर्भाची यादी उभी करत चालणारे निवेदन आणि लॉस एंजेलिसला पोहोचून टेरेण्टिनोला ‘क्विन्टीन्टिनो’ संबोधत शोधणाऱ्या दोन पंटरपैकी एकाचे वक्ष-सुंदरीने लक्ष विचलित होणे, अशा अनेक घोटाळय़ांची मालिका पुढे सादर होते. टेरेण्टिनोच्या सिनेमांमध्ये फसणाऱ्या दरोडय़ासारख्या अनेक नियोजित घटनांचे फसणे क्रमप्राप्त होते. पुढल्या प्रकरणात निवेदक म्हणून जेकब मोंटानाच समोर येतो आणि क्वेन्टिन टेरेण्टिनोचे शिर कापून आणण्याच्या गरजेची कहाणी विस्तृतरीत्या व्यक्त करतो. टेरेण्टिनोला मारून अभिनेता – दिग्दर्शक म्हणून त्याचा मान-सन्मान आणि जगण्यावर ताबा मिळविण्याची मोंटानाची मनीषा त्याच्यासारखा चेहरा लाभूनही मिळालेल्या अनेक अपयशांतून तयार होते. ती उपकहाणीदेखील हिंसाचाराने ओतप्रोत भरलेली आणि मोंटानाला सहानुभूती प्रदान करणारी आहे.

एकूण या कादंबरीची आणि इतर नऊ कथांची रचना आधुनिक असली, तरी टेरेण्टिनोच्या चाहत्यांना त्याचाच सिनेमा पाहत असल्यासारखी जाणीव देणारी.

कथानकाचा क्रम सोडून चालणाऱ्या विचित्र व्यक्तिरेखांच्या विक्षिप्त चर्चाचाही या कादंबरीतल्या अनेक उपकथानकांत समावेश आहे. हिंसेबरोबर सुंदर ललनांचीही धारदार वर्णने आहेत. मेक्सिकोमधील हिंसा-गुन्हेगारी आणि अमली पदार्थाची चालणारी यंत्रणा या सर्वाचा ‘टेरेण्टिनोएस्क’ नजरेतून घेतलेला हा कथात्मक आढावा आहे. तो अधिकाधिक उमजण्यासाठी टेरेण्टिनोच्या सिनेमांची आणि त्यातल्या हिंसेच्या तत्त्वज्ञानाची किमान ओळख असणे आवश्यक आहे. अन्यथा बाचकायला होण्याची शक्यता अधिक.

जगभरात करोना वेगात सक्रिय असताना दीड वर्षांपूर्वी ही कादंबरी इंग्रजीत आली, त्यामुळे बऱ्यापैकी दुर्लक्षित राहिली. टेरेण्टिनोच्या सिनेमा निबंधाच्या पुस्तकाबरोबरच आता तिची पाने उलटणे म्हणजे पुरती वाचन मेजवानी आहे.

ब्रिंग मी द हेड ऑफ क्वेन्टिन टेरेण्टिनो

लेखक : ज्युलिअन हर्बर्ट , इंग्रजी अनुवाद : ख्रिस्टीना, प्रकाशक : ग्रेवूल्फ प्रेस, पृष्ठे : २०८ , किंमत : ९४२ रु.

pankaj.bhosale@expressindia.com

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Book review bring me the head of quentin tarantino by author julian herbert zws