सागर अत्रे
मॉलपासून गल्लोगल्लीच्या किराणा दुकानांपर्यंत पोहोचलेल्या अन्नप्रक्रिया कंपन्यांचा नैतिक ताळेबंद मांडणारे पुस्तक..
अगदी काही दशकांपूर्वीपर्यंत जगात पुरेसे अन्न निर्माण होत नव्हते, आणि होत असले तरी ते जगातल्या कानाकोपऱ्यांत पोचवणे तितकेच अवघड होते. जगातील उपासमारीला अनेक कारणे असली तरी याचे एक मुख्य कारण म्हणजे, बहुतांश अन्नपदार्थ निसर्गत: नाशवंत असतात. ते अन्नपदार्थ त्यांच्या उगमापासून सर्वत्र कसे पोहोचवावेत या महत्त्वाच्या समस्येतून अन्न तंत्रज्ञान आणि प्रक्रिया शास्त्राचा जन्म झाला. परंतु मागील चार दशकांत या उद्योगाचे अफाट वित्तीय मूल्य लक्षात आल्यावर अन्नप्रक्रिया उद्योगाचा प्रचंड प्रमाणावर विस्तार झाला. आज हा उद्योग तीन ट्रिलियन डॉलर (भारताच्या अर्थव्यवस्थेएवढा) मोठा आहे. जगाची एक मूलभूत गरज म्हणून जन्माला आलेला हा उद्योग वाढला हे खरे. मात्र आज तो मुख्यत: फक्त स्वत:च्या नफ्यासाठी कार्यरत असल्याने, हाच उद्योग जगाला मोठे संकट ठरतो आहे. आज अन्नपदार्थ उत्पादन करणाऱ्या कंपन्या स्वत:चा खप वाढवायच्या नादात आरोग्य, पर्यावरण, अर्थकारण या सर्व मूलभूत बाबींना घातक ठरणाऱ्या धोरणांचा अवलंब करू लागल्या आहेत. त्यासाठी त्या प्रयोगशाळेत अत्याधुनिक रसायनशास्त्रापासून ते राजकीय पातळीवर अर्थ आणि राज्यशास्त्राचाही खुबीने वापर या कंपन्या करताहेत.
डॉ. ख्रिस व्हॅन टूयेकेन या इंग्लंडमधील वैद्यकीय शास्त्रज्ञाचे अलीकडेच ‘अल्ट्रा प्रोसेस्ड पीपल’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले. त्यांचा रोख आहे आज जगभर फोफावलेले ‘अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड’ (यूपीएफ) अर्थात, अतिप्रक्रिया केलेल्या अन्नावर. पण या पुस्तकात ते थेट आरोग्याबाबत किंवा आहाराबाबत कुठलेही सल्ले देत नाहीत. ते फक्त यूपीएफचे अर्थकारण, राजकारण आणि समाजकारण समजावून सांगतात. एका अर्थाने हे अन्न सहज सुलभरीत्या कुठेही, कधीही, कितीही कसे काय उपलब्ध होते आणि मुख्य म्हणजे त्याचा आपल्या आरोग्यावर आणि समाजावर काय परिणाम होतो हे ते समजावून सांगतात. त्यांच्या मताने या संकटावर लोकांना त्यांच्या जिभेवर आणि मनावर ताबा ठेवायला सांगून भागणार नाही. याचे कारण म्हणजे आज जगाच्या कानाकोपऱ्यांत हे पदार्थ पोहोचलेले आहेत, आणि ते उत्पादित करणाऱ्या कंपन्या आपण त्याला बळी कसे पडू याचा शास्त्रशुद्ध अभ्यास करूनच बाजारात उतरलेल्या आहेत. डॉ. ख्रिस यांचा सिद्धांत आहे की बाजारात उपलब्ध असलेले अतिप्रक्रिया केलेले अन्न कसे उत्पादित होते याचा जर कोणी अभ्यास केला, तर ती व्यक्ती ते अन्न खाऊच शकणार नाही. टूयेकेन यांच्या मताने ते मुळात अन्नच नाही, तर अन्नातले मूळ घटक घेऊन, त्यांच्यावर अनन्वित रासायनिक अत्याचार करून निर्माण केलेले अन्नसदृश पदार्थ आहेत. घरी ५-६ घटक वापरून बनवलेला एखादा पदार्थ बाहेरून आणल्यावर त्यात २५-३० घटक असतात. त्यातले बहुतांश घटक हे फक्त तो पदार्थ जास्तीत जास्त काळ टिकावा, स्वस्तात विकता यावा, आणि मुख्य म्हणजे प्रमाणाबाहेर खाल्ला जावा यासाठी त्यात घातलेले असतात. आज मिळणारे अतिप्रक्रिया केलेले अन्न हे कोणाच्याही आरोग्यासाठी किंवा भूक भागवण्यासाठी उत्पादित केले गेलेले नाही. हे अन्न मानवी मेंदू, पचनसंस्था, त्यातील भुकेचे नियंत्रण आणि संतुष्टी ( २ं३्री३८) याचा, आणि मुख्य म्हणजे त्या नैसर्गिक संतुष्टीला बगल कशी देता येईल याचा सखोल अभ्यास करून निर्माण झालेले आहे. अर्थातच, त्यामुळे जगभरात मधुमेह, हृदयविकार, कर्करोग आणि इतर असंसर्गजन्य रोग झपाटय़ाने वाढत आहेत हे स्पष्ट आहे.
अतिप्रक्रिया केलेले अन्न उत्पादित करणाऱ्या मुख्य कंपन्या जरी आपल्याला माहीत असल्या (नेसले, युनिलीव्हर, कार्गिल, कॉनॅग्रा, टायसन, मॅकडॉनल्ड्स, कोका कोला), तरी ही यादी अपुरी आहे. टूयेकेन आपल्यासमोर अतिप्रक्रिया केलेले अन्न आणि त्याच्या आजूबाजूला उभे राहिलेले एक अख्खे नवे विश्व उलगडून दाखवतात. याची सुरुवात ते काही माहिती देऊन करतात. उदा.- आज सर्रास वापरला जाणारा सॅक्करीन हा कृत्रिम गोड पदार्थ कोळसा आणि डांबरापासून औषधनिर्मिती करताना अनवधानाने निर्माण झाला. आज असे इतर अनेक पदार्थ त्यांच्या पोषणमूल्यामुळे नाही, तर त्यातील रासायनिक गुणधर्मामुळे आपल्या अन्नात आहेत. डय़ूपॉन्ट ही कंपनी एरवी औद्योगिक रसायने पुरवणारी कंपनी; पण तीच आपल्या अन्नात जाणारे काही घटक बनवते हे ऐकून सहजासहजी पटत नाही. अनेक अळय़ा, कीटके, जिवाणू, वृक्ष यांच्यापासून निर्माण होणारे पदार्थ अन्नामध्ये फक्त टिकाऊपणा वाढवण्यासाठी वापरले जातात. पॉलीसॉरबेट-८०, कॅराजीनान गम, सोडियम कारबॉक्सी मिथाईल सेल्युलोज, डेटेम, मालटोडेक्सट्रीन असे अनेक पदार्थ वेगवेगळय़ा उद्योगांत वापरली जाणारी रसायने आहेत, पण ती आपल्या अन्नातही असतात. त्यांचा असा वापर होणे हे दरवेळी चुकीचे असतेच असे नाही; पण त्यांच्या वापरामागचे कारण महत्त्वाचे आहे. त्यातून जगातील शासनांना या ८०,००० रसायनांचा आरोग्यावर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी वेळ आणि निधी दोन्ही उपलब्ध नाही (किंवा तो अन्न कंपन्यांच्या ‘आग्रहास्तव’ उपलब्ध करून दिला जात नाही!). त्यामुळे ही रसायने शरीरात गेल्यावर नेमके काय करतात हे खूप वर्षांनंतर कळते, आणि तोवर लाखो लोकांनी हे अन्न वर्षांनुवर्षे खाल्लेले असते.
या अर्थकारणामुळे फक्त जगाच्या आरोग्याचेच नाही, तर पर्यावरणाचेही मोठे नुकसान होत आहे. मलेशिया, इंडोनेशिया, घाना, लायबेरिया, ब्राझील, कोलम्बियासारख्या अनेक देशांमध्ये पाम, सोयाबीन, मका, कॉफी अशा फक्त वित्तीय मूल्य असणाऱ्या झाडांची लागवड झाली आहे; तीही त्या देशांमध्ये मोठय़ा प्रमाणावर जंगलतोड करून, आदिवासी जमातींची जमीन बळकावून, कधीतरी कत्तल करून आणि तेथील नैसर्गिक अन्न आणि वृक्षांची हानी करून झालेली आहे.
मग या कंपन्यांना विरोध होत नाही का? तर होतो; पण हेही खरे ही या कंपन्यांइतकी व्यापारी बुद्धिमत्ता, चलाखी आणि मुख्य म्हणजे पैसा क्वचितच त्यांना विरोध करणाऱ्यांकडे असतो. शास्त्रीय पुराव्यांपासून ते सरकारी आणि न्यायालयीन लढाई लढण्यासाठी, या कंपन्या सर्वत्र सज्ज असतात. याचे एक उदाहरण पाहू या. अमेरिका आणि युरोपमधील आधुनिक वितरण प्रणाली इतरत्र चालणार नाही हे कळल्यावर १९९०-२०१० या काळात ‘नेसले’ने ब्राझीलमधील अॅमेझॉन नदीच्या दुर्गम भागात वसलेल्या खेडय़ांपर्यंत पोचायला अनेक नामी युक्त्या केल्या. त्यांनी तिथे एक सुंदर सजवलेली, त्यांच्या उत्पादनांनी खचाखच भरलेली एक बोट पाठवली. ती बोट १८ दिवस नदीकाठच्या दुर्गम भागांतील गावागावांत फिरत होती. रोज एक गाव निवडून सकाळ ते संध्याकाळ तिथे ठाण मांडून ती नौका लोकांना आकर्षित करत होती. तेथील लोकांनी इतके आकर्षक पद्धतीने मांडलेले अन्न कधी पाहिलेच नव्हते. मुख्यत: लहान मुलांना आणि तरुणांना तर ते स्वप्नवतच होते. हळूहळू त्यांना त्या पदार्थाशिवाय जगणे अशक्य झाले. याचा फायदा करून पुढील काही वर्षांत नेसले आणि इतर कंपन्यांनी ब्राझीलमध्ये ७.५ लाख फेरीवाल्या महिला विक्रेत्या नेमल्या, ज्या आजही घरोघरी जाऊन हे पदार्थ विकतात. जगभरातील शास्त्रज्ञांनी आणि वैद्यकीय सल्लागारांनी अनेकदा शासनांना या व्यापारावर बंधने घालायची मागणी केलेली आहे, पण आज ब्राझीलमधील स्थूलपणाचे प्रमाण १९९०च्या ७% वरून १८% इतके वाढलेले आहे. आफ्रिकेतील काही देशांत आणि चीनमध्ये तर स्थूलपणा सात ते पंधरा पटीने वाढलेला आहे. इतकेच नाही, तर शेतजमिनीवर वरील नमूद केलेल्या ठरावीक पिकांचे आक्रमण झाल्यामुळे अनेक पारंपरिक अन्नपद्धती कोलमडल्या आहेत. जगात अनेक फळभाज्या, उसळी, डाळी, कंदमुळं, फळे, वेगवेगळे मांस, मासे असे विविध पदार्थ खाल्ले जात असत. आज त्यातील अनेक पिके हद्दपार झालेली आहेत, आणि त्यामुळे अनेक देशांतील लोकांना त्यांच्या पारंपरिक अन्नाकडे वळणेही परवडेनासे झाले आहे. आणि अर्थातच, याउलट अतिप्रक्रिया केलेले अन्न आज सर्वत्र, सहज आणि स्वस्त दरात उपलब्ध आहे!
या पुस्तकाचा एक भाग डॉ. टूयेकेन यांनी स्वत:वर केलेल्या एका प्रयोगाला वाहिलेला आहे. काही वर्षांपूर्वी त्यांनी एक महिना फक्त अतिप्रक्रिया केलेले अन्न खाऊन त्याचा आरोग्यावर होणारा परिणाम अभ्यासायचे ठरवले. परिणाम भयावह होते. त्यांचे वजन ८-१० किलोने वाढले, त्याचबरोबर त्यांच्या शरीरातील स्नायू आणि मेदाच्या प्रमाणाचे संतुलन पूर्णत: बिघडले, त्यांना झोप येईनाशी झाली, सतत भूक लागून गोड किंवा चटपटीत अन्न खावेसे वाटू लागले. ते खात असलेल्या पदार्थात काही घटक असेही होते ज्यामुळे त्यांच्या पोटातील नैसर्गिक जिवाणूंचे (मायक्रोबायोम) प्रमाण पूर्णपणे बिघडले. हे जिवाणू आपल्या पचनसंस्थेचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग असतात, त्यांच्याशिवाय मानवी शरीर अनेक अन्नघटक पचवू शकत नाही, आणि यामुळे आज सर्वत्र आढळणारे ‘इरिटेबल बॉवेल सिण्ड्रोम’ तसेच यकृताच्या आजारांची शक्यता अनेक पटीने वाढते. पण टूयेकेन यांना शारीरिक परिणामांच्या पलीकडेही एक मोठी समस्या दिसली. त्यांच्या आहारपद्धतीमुळे त्यांच्या ४-५ वर्षांच्या मुलींनाही या पदार्थाची, त्यांच्या मोहक चवीची भुरळ पडू लागली. त्या सहज बर्गर, चिप्स, कॉर्नफ्लेक्स आवडीने, आणि प्रचंड प्रमाणात खाऊ लागल्या, आणि मग घरगुती अन्न खायला नाके मुरडू लागल्या. टूयेकेनना जगभरात दिसणारे सत्य त्यांच्यासमोर घडताना दिसले : ही अन्नपद्धती फक्त आरोग्यावरच नाही, तर संस्कृती, जीवनशैली आणि आर्थिक नियोजनावरही गंभीर, दूरगामी परिणाम करते आहे.
अलीकडेच भारतीय शास्त्रज्ञांनी देशात १० कोटी मधुमेही आणि १३ कोटी मधुमेहाच्या उंबरठय़ावर (प्री-डायबेटिक) असलेले रुग्ण आहेत असे जाहीर केले. त्यासाठीची शासकीय आणि वैद्यकीय सज्जता निर्माण करण्यापासून आपण अनेक योजने लांब आहोत. यातून हे स्पष्ट आहे की या लढाईत आपली निष्क्रियता आपल्याला एका असाध्य परिस्थितीकडे खेचून नेते आहे, आणि ती रोखायला जगाने खडबडून जागे होणे गरजेचे आहे.
‘अल्ट्रा-प्रोसेस्ड पीपल- व्हाय डू वी ऑल ईट स्टफ दॅट इजन्ट फूड अॅण्ड व्हाय कान्ट वी स्टॉप?’
लेखक: डॉ. ख्रिस व्हॅन टूयेकेन (Chris Van Tulleken)
प्रकाशक: कॉर्नरस्टोन प्रेस (वितरक : पेन्ग्विन)
पृष्ठसंख्या: ३८४ ; किंमत : ७९९ रु.