इकोफिक्शन अनेकपदरी, गुंतागुंतीचं आणि वाचकांनाच नीतिनिर्णय घेऊ देणारं असू शकतं, याची जाणीव देणाऱ्या या कादंबरीची नायिका वाचकांची सहानुभूती न मिळवता, थेट ठाव घेते…

वाचकांना भरपूर नवीन माहिती – तीही रंजकपणेच वगैरे- देणारा मजकूर, भरपूर पात्रं असूनही वाचकांच्या लक्षात ठसून राहातील अशी किमान एकदोन पात्रं, स्थळवर्णनं, काळाचा बिनचूक धागा आणि विषयसुद्धा काळाशी संबंधित- ही वाचनीय कादंबरीची बाह्यलक्षणं मानल्यास ‘क्रिएशन लेक’मध्ये ती सर्व आहेत. पण ही अशी बेरीज तर नवखे लेखकसुद्धा हल्ली जुळवतात. चार कादंबऱ्यांसह अनेक निबंधांच्या लेखिका रॅशेल कुशनर यांनी गुप्तहेर कथेसारखा बाज कायम ठेवूनही भरपूर वैचारिक मंथनालाही वाव दिला आहे, हे ‘क्रिएशन लेक’चं खरं वैशिष्ट्य. यातली नायिका जणू ‘अॅण्टि-हिरोइन’ आहे- तीनतीन पेग ठोसूनही न गरगरणारी; कामाचा भाग म्हणून किंवा मजा म्हणूनही एखाद्यासह झोपायला तयार होणारी खासगी गुप्तचर आहे ती. बरं, मराठी गुप्तचर जसे दुष्टांच्या निर्दालनासाठी झटत असतात तसंही हिचं नाही. पृथ्वीला आणि साध्यासुध्या ग्रामीण शेतकऱ्यांना विघातक विकासापासून वाचवणाऱ्यांच्या विरुद्ध ही नायिका काम करते आहे. हे पर्यावरणवादी लोक हिंसक आहेत आणि म्हणून राज्ययंत्रणेला त्यांच्यापासून धोका आहे, हे ‘मालकां’साठी सिद्ध करून दाखवणं हेच तिचं काम आहे आणि त्यासाठी ती पर्यावरणवाद्यांमधलं कोण ‘आपल्याला हवी तशी’ हिंसक कारवाई करायला तयार होईल, याचा शोध घेते आहे!

Scientist Rahul Damale selected for Netaji Subhash ICAR International Fellowship
वडील तिसरी उत्तीर्ण तर आई निरक्षर, मुलगा शास्त्रज्ञ झाला, आता परदेशी शिक्षणासाठी निवड
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
Babasaheb Ambedkar , RSS , RSS Karad branch,
संघाविषयी आंबेडकरांच्या ‘आपुलकी’चे सर्व दावे संशयास्पद! 
upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
यूपीएससीची तयारी : ‘जीएस’ची तयारी
Yavatmal Bhumika Sujeet Rai, Bhumika Sujeet Rai,
दृष्टिहीन ‘भूमिका’ची वाचनाप्रती डोळस भूमिका! सलग १२ तास ब्रेल लिपीतील…
Jumped Deposit Scam
बॅलेन्स चेक करताना बँक खातंच रिकामं; काय आहे नवीन ‘Jumped Deposit Scam’?
21st edition of the third eye asian film festival started in mumbai
चित्रपटसृष्टीत लेखकांना अपेक्षित श्रेय मिळणे आवश्यक; गीतकार, सिनेलेखक जावेद अख्तर यांचे प्रतिपादन
ulta chashma
उलटा चष्मा: असला भुसभुशीतपणा नको!

हेही वाचा >>> बुकमार्क : विश्वभाषेतून शब्दसंचार…

तरीही ती खलनायिका ठरत नाही वाचकांशी ती मनमोकळं बोलते. पाषाणहृदयी बायकांबद्दल एकंदर मानवी संस्कृतीला असलेली नफरत हिच्याबाबत वाटत नाही. तिच्या बुद्धी/भावनांचा आदरच वाचक करू लागतात. ‘बाल्कन्यांमध्ये वाळत टाकलेले कपडे- गृहिणींच्या मोफत कामाचे झेंडेच’ अशा काहीशा आक्रमकपणे, किंवा ‘मला या लोकांनी जणू मानद पुरुषपण बहाल केलेलं होतं- मी त्यांच्याप्रमाणे बोलू शकणारी, त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देऊ शकणारी, त्यात अमेरिकन!’ अशा उपरोधातून स्त्रीत्वाबद्दलचे तिचे विचार वाचकांना भिडत राहातात. एकवेळ पृथ्वीचा सत्यानाश होईल असं मानणं सोपं; पण भांडवलशाहीच्या नायनाटाची कल्पनाही करणं कठीण, म्हणूनच बहुधा हे (पर्यावरणवादी) लोक प्रलयाची, पृथ्वीच्या ऱ्हासाची वार्ता सतत करत असावेत असं या नायिकेचं निरीक्षण तिलाही पटलंय… ब्रूनोला नावं ठेवणारा आणि याच परिसरातल्या (पण कम्यूनशी काही संबंध नसलेल्या) शेतकऱ्यांची संघटना बांधणारा जॉन हा फारच सरधोपट विचार करणारा; त्यापेक्षा जगाच्या स्थितीवर उदात्त एकटेपणा (म्हणजे तुटलेपणा नव्हे) असं तत्त्वनिष्ठ, जवळपास आध्यात्मिक उत्तर शोधणारा ब्रूनो लकॉम्ब नायिकेला जवळचा वाटतोय. त्याला कधीही पाहिलेलंच नसूनसुद्धा ती त्याच्यात गुंतत चाललीय.

या ब्रूनो फ्रान्सच्या डोंगराळ आग्नेय भागातल्या एका गुहेत राहातो. गुहा खोल आणि तिच्यात एकापाठोपाठ जोडलेल्या गुहा. पाणीसुद्धा. ‘निअँडरथाल’ आदिमानवाचं इथं वास्तव्य असावं, असं तो सांगतो… त्या आदिमानवाबद्दल भरपूर माहितीदेखील देतो. कशी? हा ब्रूनो वेळोवेळी गुहेबाहेर येऊन त्याच भागात कुठंतरी त्याचा मुलगा आणि अविवाहित मुलगी राहातात त्या बांधीव घरातून पास्काल बामीला ईमेल पाठवतो, त्यांत ही माहिती आहे. पास्काल बामी हा याच प्रदेशात ‘ल मूलँ’ नावाचा कम्यून स्थापणारा पर्यावरणनिष्ठ कार्यकर्ता. मूळचा पॅरिसच्या उच्चभ्रू समाजातला, पण गी डिबोर्डच्या ‘सोसायटी ऑफ द स्पेक्टॅकल’मधल्या विचारांनी प्रेरित होऊन ‘खरीखुरी’ सामाजिकता शोधू पाहणारा. त्याला आणि त्याच्या त्या कम्यूनला मार्गदर्शक ठरू पाहणारे, ब्रूनोलिखित सारे ईमेल ‘हॅक’ करून नायिका वाचतेय. या ब्रूनोच्या फ्रेंच पुस्तकाचं इंग्रजी भाषांतर ‘ल मूलँ’साठीच करण्याचं काम पास्कालकडून मिळावं आणि त्या मिषानं या लोकांमध्ये राहून त्यांच्यामार्फत हिंसाचार घडवावा, असा तिचा डाव आहे. त्यासाठी पास्कालचा बालमित्र आणि आता चित्रपट-दिग्दर्शक झालेला ल्युसिआन डुबॉइस याला तिनं गटवलंय. मनाविरुद्ध ल्युसिआनसह झोपून, तिला तो आवडतोयच अशा प्रकारे विव्हळून तिनं पास्कालच्या थेट मर्जीत जाण्याची शिडी तयार केलीय. ल्युसिआनचं वडिलार्जित घर याच प्रदेशात आहे, तिथं एकटी राहून नायिका ‘ल मूलँ’पर्यंत रोज ये-जा करते. दिवसेंदिवस तिचा ‘कोण होणार हिंसाचारी’वाला खेळ सुरूच राहातो. दर रात्री ब्रूनोची ईमेल वाचणं, नवं त्यानं लिहिलं नसेल तर जुनाच मजकूर पुन्हा वाचणं, हे मात्र ती स्वेच्छेनं करते.

इथंच खरं काम काय आणि का आहे तिचं? या भागात एक मोठं सरोवर आहे. त्यातलं पाणी उपसून ते आसपासच्या दोन-तीन प्रांतांत खेळवायचं, त्याद्वारे औद्याोगिक विकासासाठी पाण्याची मुबलक उपलब्धता करायची, असं सरकारनं ठरवलंय. आपल्याकडे उत्तर महाराष्ट्रातल्या नद्या जशा सातपुड्यातल्या आदिवासींसाठी नव्हे तर गुजराती उद्याोजकांसाठी जोडण्याचा विडा दिल्लीकरांनी उचललाय, तसंच काहीसं हे- फ्रान्समधलं. ‘क्रिएशन लेक’च्या गुप्तचर नायिकेला तिच्या ‘मालकां’नी काम सोपवलंय, कारण पास्कालच्या ‘ल मूलँ’ कम्यूनकडूनच या प्रकल्पाला संघटित विरोध होऊ शकतो, अशी त्यांची खात्री आहे. ‘हे पर्यावरणवादी नव्हेत, अतिरेकीच आहेत’ असं सिद्ध करणारा एखादा उत्पात घडवून आणण्याची जबाबदारी नायिकेची. ‘सेडी स्मिथ’ हे तिनं घेतलेलं नाव, वाचकांना पाचव्या प्रकरणातल्या एका उपकथानकातल्या एका पात्रामुळे कळतं. तोवर तिची इतकी सवय झालेली असते की नाव काही का असेना! ही नायिका चंट आहे, पण ती ‘जिंकावी’ असं मात्र विवेकी वाचकांना वाटणार नाही. ती सहानुभूती मिळवत नाही. पण वाचकाचा ठाव मात्र घेते.

कथानकातला उत्कंठावर्धक वगैरे भाग सातव्या प्रकरणात सुरू होतो. याच परिसरात सरकारपुरस्कृत ‘कृषक मेळावा’ होणार आहे. या भागातले जॉनच्या नेतृत्वाखालचे शेतकरी दूध ओतून निदर्शनं करतील, त्यांना साथ देण्यासाठी कम्यूनवालेही उभे राहातील. अशात नायिकाच बातमी घेऊन येते- कृषी खात्याचे उपमंत्री मेळाव्याला ‘अनौपचारिक आणि आकस्मिक भेट’ देणार आहेत! त्यांना घेराव घालण्यापर्यंत आंदोलकांची तयारी असते. पण नायिकेला हिंसाच हवी… त्यासाठी कम्यूनमधल्याच, गुन्हेगारी इतिहास असलेल्या एका वयस्कर अमेरिकनाला ती स्वत:जवळचं पिस्तूल देते. हा वयस्कर अमेरिकन कम्यूनकर पिस्तूल ठेवून घेतो, पण कृषी उपमंत्र्याला मारत मात्र नाही… तरीही उपमंत्री मरतोच! तो कसा? पौगंडावस्थेतच ‘जन्मदाता’ झाल्यामुळे कम्यूनच्या शाळेतून काढून टाकला गेलेल्या कुणा पोराचा उपयोग याकामी होऊनही तो पोरगा खुनी नाही ठरत… हे कसं?

या रहस्यांपेक्षा लेखिकेची निरीक्षणं जास्त रसाळ आहेत. समीक्षकी भाषेत सांगायचं तर, ‘आजच्या समाजाविषयी आणि समाज-सुधारणेच्या विचार-आचारांविषयी मार्मिक अंतर्दृष्टी’ लेखिकेकडे आहे. गेल्या वर्षी बुकरच्या लघुयादीतली ‘धिस अदर ईडन’ ही कादंबरी ‘इकोफिक्शन’ प्रकारात मोडणारी होती; पण इकोफिक्शन सरळच असलं पाहिजे असं कुठेय- ते अनेकपदरी, गुंतागुंतीचं आणि वाचकांनाच नीतिनिर्णय घेऊ देणारंही असू शकतं, ही पातळी ‘क्रिएशन लेक’मधून रॅशेल कुशनर यांनी गाठली आहे. ही लेखका संवादांतूनही पर्यावरणवादी, परिवर्तनवादी चळवळींतले अपरिहार्य खाचखळगे निर्लेपपणानं दाखवून देते. ‘स्त्रीपुरुष समानता’ यासारख्या संकल्पना समूहपातळीवर राबवणं किती अवघड आहे याचाही वेध घेते. त्याहीपुढे, ‘धृवताऱ्याविना समुद्र ओलांडणारे करणारे लोक’ , ‘गुहेत ब्रूनोला दिसलेलं अस्वलाचं चित्र’ किंवा ‘फसणारे गुप्तचर’ यांच्या जणू गोष्टीच सांगतासांगता लेखिका तात्त्विक प्रश्न उपस्थित करते आहे. तिला इथे-आत्ता पटलेलं ‘एकटेपणा (पण तुटलेपणा नव्हे)’ हे उत्तर कितीतरी नायकांनी (पुरुषांनीच) यापूर्वी शोधलंय. थोरोनं स्वत:तून, आपल्या मराठीत अरुण साधूंनी ‘शोधयात्रे’तून, भाऊ पाध्यांनीही ‘बॅरिस्टर अनिरुद्ध धोपेश्वरकर’मधून. ‘क्रिएशन लेक’मधला ब्रूनो आणि त्या मार्गावर जपून पावलं टाकणारी नायिका हे आत्ताचे.

पण गोष्ट आणि गोष्टीचा शेवट काय यापेक्षा, गोष्ट सांगितली जाणं- ऐकलीवाचली जाणं महत्त्वाचं. ती गोष्ट जर वाचकांना विचारप्रवृत्त करणारी, आपापल्या मगदुराप्रमाणे निष्कर्ष काढू देणारी असेल तर अधिकच महत्त्वाची. हे महत्त्व ‘क्रिएशन लेक’नं जपलं आहे. म्हणूनच ‘बुकर पारितोषिक’ या कादंबरीला नाही मिळालं, तरी ही महत्त्वाची कादंबरी आहे.

‘क्रिएशन लेक’ लेखिका : रॅशेल कुशनर प्रकाशक: पेंग्विन रॅण्डम हाउस,पृष्ठे : ४०४ ; किंमत : ७९९ रु.

abhijit.tamhane@expressindia.com

Story img Loader