सौरभ सद्याोजात

पुराणकथांमध्ये उल्लेख असलेल्या देवतांची ख्याती जशी सर्वदूर पोहोचली, तशी रानावनात राहणाऱ्या समाजाच्या दैवतांची माहिती पोहोचली नाही. अशा दैवतांची अधिष्ठाने ही मूलत: नैसर्गिक तत्त्वांना जोडलेली असतात. काही वेळा ती उग्रही भासतात. अशा देवता, त्यांच्या अनुषंगाने रूढ झालेल्या चालीरीती या संदर्भात माहिती देणाऱ्या पुस्तकाविषयी…

Fossilized dinosaur dung revealing Jurassic era secrets
Fossilized Dinosaur Dung: डायनासोरची विष्टा आणि उलटी सांगतेय त्याच्या अस्तित्त्वाची कथा; नवीन संशोधनाने ज्युरासिक कालखंडाचे कोणते रहस्य उलगडले?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Nikki Giovanni
व्यक्तिवेध : निक्की जियोव्हानी
What is LIC Bima Sakhi Yojana ?
LIC ची विमा सखी योजना काय आहे? महिन्याला ७ हजार रुपये देणाऱ्या खास स्कीमच्या अटी आणि नियम काय आहेत?
Devendra Fadnavis Nagpur visit cancelled
प्रथम १२, नंतर १३ आणि आता १५, फडणवीसांच्या नागपूर दौऱ्याचा मुहूर्त का लांबला ?
Rare book Exhibition organized by BNHS
बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीतर्फे दुर्मिळ पुस्तकांचे प्रदर्शन
public health department target tb screening of 1 crore people
३ कोटी लोकांची क्षयरोग तपासणी
Savlyachi Janu Savli
Video: “आई मला वाचव…”, सारंगचा जीव संकटात? ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत पुढे काय होणार? वाचा…

‘उजेड! उजेडात सगळ्यांना सगळं दिसतं. पण हा उजेड नसून हे ‘दर्शन’ आहे. भूत, वर्तमान आणि भविष्याचं कथन सांगणारं…’ कांतारा या सिनेमातलं ‘दैव’ म्हणजेच पंजुर्ली या दैवताच्या तोंडून आलेला हा मार्गदर्शनपर संवाद कदाचित अनेकांना आठवत असेल. अगदी वेगळ्या धाटणीचा आणि दुर्लक्षित परंतु समृद्ध परंपरांच्या अधिष्ठानावर उभा केलेला हा सिनेमा यातल्या लोककथा, त्यांचे सामाजिक संदर्भ आणि (सहसा माहीत नसलेल्या) दैवतांमुळे प्रचंड गाजला. सिनेमात अभ्यासपूर्वक दाखवलेलं पूजन ज्या भागांत प्रामुख्यानं होतं, तो भाग म्हणजे तुळू भाषकांचा प्रदेश. कर्नाटकातील किनारपट्टीचा भाग, दक्षिण कन्नड, उडुपी आणि केरळमधील कासरगोड या जिल्ह्यांत प्रामुख्यानं तुळू भाषा बोलणारे, वेगवेगळ्या ‘दैवां’चं पूजन करणारे लोक इथे आढळतात. के. हरी कुमार यांनी या परंपरेचं केलेलं अध्ययन, या संदर्भातील अभ्यासकाळात आलेला अनुभव ‘दैव’ या ग्रंथाद्वारे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. यासह लोकपरंपरेच्या मंथनातून निर्माण झालेल्या दैवांबाबतच्या कथा, हा ग्रंथ अधिक रोचक करण्यात यशस्वी ठरल्या आहेत, असं म्हणता येईल.

हेही वाचा >>> बुकबातमी : ब्रिटिश बुकर यादीवर अमेरिका स्वार…

‘दैव : डिस्कव्हरिंग द एक्स्ट्राऑर्डिनरी वर्ल्ड ऑफ स्पिरिट वर्शिप’ हा ग्रंथ एका विशिष्ट प्रांतातल्या, विशिष्ट प्रकारच्या दैवतांबाबत आणि त्यायोगे येणाऱ्या चालीरीतींबाबत माहिती देतो. तुळू भाषक भागांतील आराध्य देवतांचे प्रकार, स्थाने, त्यांचं मूळ आणि प्रत्येकाच्या पूजन पद्धतींत असलेली साम्य स्थळं आणि त्यातील फरक असे घटक नीटपणे मांडलेले आहेत. ग्रंथाच्या पहिल्या भागात तुळू भाषेचं क्षेत्र, चैतन्यपूर्ण आत्म्यांची/उपदेवतांची उत्पत्ती, दैवांच्या आराधनेचा केंद्रबिंदू असलेलं ‘भूथ कोला’ सारखं नृत्य आणि त्याबाबत असणारी लेखकाची भूमिका स्पष्ट केली आहे. तर दुसऱ्या भागात पंजुर्ली, कोरगज्जा, मंत्रदेवता, गुलिगा/ गुलिकन आणि मातृदेवता अशा विविध दैवांच्या उत्पत्तीच्या आणि त्यांचे विशेष दाखवणाऱ्या लोककथा प्रस्तुत केल्या आहेत. आत्मा, दैव, भूत आराधना अशा अनेक भयकारी वाटणाऱ्या आणि चुकीच्या अर्थानं घेतल्या जाण्याचा संभव असलेल्या संज्ञा लेखकाने सोप्या भाषेत उलगडून दाखवल्या आहेत. पुराणकथांमध्ये उल्लेख असलेल्या देवतांची ख्याती जशी सर्वदूर पोहोचली, तशी रानावनात राहणाऱ्या दुर्लक्षित समाजाची ही दैवतं, त्यांच्या दंतकथा तितक्याशा पोहोचल्या नाहीत, हे सत्य आहे. समाजाने काळानुरूप आराध्य देवता, दैवते आणि परंपरा यांच्यात बदल केल्याचंही दिसून येतं. कोण कुठल्या स्थानी आणि राजवटीत राहिला यावरही ते अवलंबून होतं याचा अंदाज बांधणं फारसं कठीण नाही. उदा. वेदकाळात इंद्र, वरुण, अग्नी आणि रूद्र या एकेका निसर्गतत्त्वाशी जोडल्या गेलेल्या देवतांचं महत्त्व त्यावेळच्या समाजस्थितीनुसार ठरत गेलं. वेदिक काळात पुजल्या जाणाऱ्या देवतांचं महत्त्व नंतरच्या काळात कमी झाल्याचं आढळून येतं. पुढे गुप्त राजवटीच्या काळात विष्णू ही देवता केंद्रस्थानी आल्याचं पाहायला मिळतं. पण या काळात सीमा भागांत, जंगलात ढकलल्या गेलेल्या जनजातींचीही आपापली दैवतं आणि त्यांचं पूजन करण्याच्या पद्धती होत्या. अशा दैवतांची अधिष्ठाने ही मूलत: नैसर्गिक तत्त्वांना जोडलेली असत. या पूजन पद्धती त्यांच्या जीवनचर्येशी निगडित असण्याचा संभव अधिक असल्यानं त्या उग्र आणि आक्रमक वाटणंही स्वाभाविक आहे. उदा. बौद्ध धर्माची मूळ परंपरा मध्यवर्ती राज्यात जशी दिसून आली तशी ती पूर्वेकडे प्रसार होताना सीमा भागात दिसत नाही. वज्रयान ही बौद्ध धर्मातील परिवर्तित आवृत्ती हा त्याचाच भाग आहे.

हेही वाचा >>> बुकबातमी : ‘बिघडलेल्या’ कुटुंबाची कथा

हा ग्रंथ केवळ दैवतांची परंपरा आणि त्यांबाबत माहिती देऊन थांबत नाही. लेखकाचा उद्देश त्याहून अधिक काही असावा हे यातले काही भाग वाचताना स्पष्ट होतं. पाश्चिमात्य सत्ताधीशांनी, ख्रिास्ती धर्मप्रचारकांनी आपल्या अहवालात दैवपूजनाच्या उग्र पद्धतींना आक्रमक, आक्रस्ताळं आणि राक्षसी म्हणून नमूद केल्याचं लेखकानं दाखवून दिलं आहे. अर्थात यामागे त्यांचे अनेक पूर्वग्रह आणि दुर्भावनापूर्ण हेतू तर होतेच पण त्याहून अधिक त्यांच्या विचारक्षमतेची मर्यादाही होती. आपल्या लक्षात येतं की दैव, त्यांचं अनोखं पूजन आणि एकंदर जग हे अद्भुताच्या धुक्यात आहे, अस्पष्ट आहे. त्यामुळे लेखक हे स्पष्ट करतो की हा अनेक अर्थांनी खासगी अनुभव आहे. मौखिक स्वरूपात हस्तांतरित झालेलं कथन आहे आणि तर्काचं, वैज्ञानिक दृष्टिकोनाचं हनन करण्याचा विचार या मागे नाही. अशी स्पष्टता आपल्या भूमिकेतून मांडणं गरजेचं यासाठी आहे की अनेक वेळा धर्म, संस्कृती आणि चालीरीतींचा गैरवापर करणारे शोषण, अंधश्रद्धा वाढीस कशी लागेल याची काळजी घेत असतात. त्याची हजारो उदाहरणे आसपास आहेतच. समाजाने अशा शोषणाचा बळी ठरू नये म्हणून तुकोबाराय ठामपणे सांगतात –

नव्हे जाखाई जोखाई। माय राणी मेसाबाई

बळिया माझा पंढरीराव। जो या देवांचाही देव

अर्थात तुकाराम महाराज, एकनाथ महाराज आणि भक्ती परंपरेतील इतर संतांनी या लोकदेवतांना तुच्छ लेखलेले नाही. तशी गल्लत करून घेऊ नये. त्यांनी ओढलेले आसूड हे जसे पुरोहितशाहीसाठी होते तसेच ते अंधश्रद्धा आणि शोषणावर आघात करण्यासाठीही होतेच. म्हणून अगदी सामान्य व्यक्तीला समजेल असा भक्तीचा, नामस्मरणाचा सोपा पण प्रभावी मार्ग त्यांनी आपल्याला दिला.

हा ग्रंथ तसा आटोपशीर असला तरी तो एका विशिष्ट विषयाला धरून आहे. त्याबाबतचे अनेक संदर्भ, कथा आणि नोंदी यात आहेत. त्यामुळे अशा विषयात रुची असणाऱ्या वाचकांना तो अधिक आवडू शकेल. अर्थात लेखकाची भाषा, मांडणी सहज समजणारी आहे. त्यामुळे प्रत्येक प्रकारचा वाचक हे वाचू शकेल, पण पहिल्या भागात माहितीचा भडिमार अधिक असल्यानं तिथे लिखाण कंटाळवाणं वाटू लागतं. एक निश्चितच मान्य करायला हवं की अशा प्रकारच्या ग्रंथांमुळे वैविध्यपूर्ण परंपरा, त्यांचं माहीत नसलेेलं वेगळेपण आणि लोककथा यांची माहिती आणि महत्त्व वाचकांच्या माध्यमातून समाजाच्या इतर घटकांना ज्ञात होईल. यामुळे महाराष्ट्रातील लोकदेवतांबाबत जाणून घेण्याची जिज्ञासा वाढू शकेल. सुखवस्तू आयुष्य जगणाऱ्या समाज घटकांच्या मनातले अनावश्यक गैरसमज आणि अहंकार या निमित्तानं गळून पडतील आणि स्वीकृती वाढेल. कांतारा सिनेमाच्या शेवटी, पंजुर्ली देवतेसाठी कोला नृत्य करणारा साधक ग्रामस्थांचे हात आपल्या हृदयावर ठेवून एकदिलाने राहण्याचं संकेताने सुचवतो. धर्म, संस्कृती, जातीपातीच्या कोलाहलात तो एकोप्याचा स्वर शोधून, कान देऊन ऐकण्याची गरज आहे हे निश्चित!

‘दैव : डिस्कव्हरिंग द एक्स्ट्राऑर्डिनरी वर्ल्ड ऑफ स्पिरिट वर्शिप’

लेखक – के. हरी कुमार

प्रकाशक – हार्पर कोलिन्स इंडिया

पृष्ठे – २७२ मूल्य – ३९९ रुपये

iamsaurabh09@gmail.com

Story img Loader