माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या कारकीर्दीतील घडामोडींवर विनोदी, मार्मिक भाष्य करणाऱ्या या कवितांमधली इंग्रजी भाषा साधीसोपी आहे…

कायदा आणि कविता हे भाषेच्या वापराचे दोन अगदी भिन्न मार्ग आहेत. म्हणजे असं की, ‘कायदा किंवा त्याबद्दलचे भाष्य किंवा तदनुषंगिक टिप्पणी ज्याअर्थी गांभीर्याने केलेली असते आणि ज्याअर्थी ती गांभीर्यानेच वाचली जाणार असते आणि/ किंवा त्यातून न्यायसंस्थेविषयीच्या तसेच कायदा या संकल्पनेबद्दलच्या आदराचे स्थान अढळ राहावे असा हेतू असतो, त्याअर्थी…’ एकवेळ भाषा कंटाळवाणी, निरस झाली तरी चालेल पण ती नेमकी हवी, तिच्यात गांभीर्य हवं, असा प्रकार एकीकडे. तर दुसरीकडे ‘नुस्त्या शब्दांचीच नाही तर व्याकरणाचीही मोडतोड जोवर ‘काहीतरी उमगतंय’ तोवर क्षम्य’. या दोन्ही प्रकारांची सांगड घालण्याचा मार्गही असू शकतोच- कायदे आणि न्यायपालिका यांच्याबद्दल टिप्पणी करणाऱ्या कविता करण्याचा हा मार्ग. पण तो निसरडा.

उदाहरणार्थ, सर्वोच्च न्यायालयातले अनुभवी ज्येष्ठ वकील असूनसुद्धा कपिल सिब्बल हे कविता करतात, त्यांच्या कविता कधी कधी कायद्यांबद्दलही असतात पण या कवितांसाठी त्यांना कोणी ओळखत नाही. याउलट राजू झेड. मोरे हे न्यायपालिकेवर सातत्यानं नर्मविनोदी भाष्य करतात, ते भाष्य कधी खुसखुशीत किस्सेवजा गद्यात असतं तर कधी कधी कवितांसारख्या रचनांमधून केलेलं असतं. हे राजू झेड. मोरे मुंबई उच्च न्यायालयात वकिली करतात; पण लेखक म्हणूनच ते अधिक परिचित आहेत. त्यांची तीन पुस्तकं याआधीच प्रकाशित झालेली आहेत, त्यापैकी दोन गद्या लिखाणाची होती आणि ‘द लॉकडाउन लॉयर’मध्ये कविता होत्या. आता चौथं पुस्तक आलंय, ते कवितांचं. एका सरन्यायाधीशांच्या कारकीर्दीत वेळोवेळी केलेल्या या कविता. हे सरन्यायाधीश म्हणजे अर्थातच ‘डीवायसी’ या आद्याक्षरांनी ओळखले जाणारे धनंजय यशवंतराव चंद्रचूड!

या कविता म्हणून कशा आहेत, हे नंतर पाहूच. पण एखाद्या सरन्यायाधीशांच्या अख्ख्या कारकीर्दीबद्दल फक्त ३४ रचनांमधून भाष्य करायचं असेल तर ‘कविता’ या संज्ञाप्रवाही प्रकाराची निवड उत्तम. ‘न्यायमूर्ती भाषेच्या मर्यादा आखतात; कवी त्या मर्यादांची परीक्षाच पाहतो’ हे गृहीत धरूनच या कविता करण्यात आलेल्या आहेत. सरन्यायाधीश म्हणून न्या. धनंजय चंद्रचूड यांची नियुक्ती झाली, तेव्हा या नीटनेटक्या न्यायमूर्तींच्या मुलाखती किंवा ‘बाइट्स’ घेण्यासाठी चित्रवाणी वृत्तवाहिन्या आणि २०२० नंतर चांगल्याच फोफावलेल्या कायदेविषयक वृत्त-संकेतस्थळांची (लाइव्ह लॉ, बार अॅण्ड बेन्च, द लीफलेट…) झुंबड उडाली. पण सरन्यायाधीश नवे असले तरी ‘हे नवे ‘हेड’ जुन्याच शरीरावर। पण इथं पोखरलेलं शरीरच जगतंय। सातत्य नाही, सुघटनही नाही, मग…। वाळल्याबरोबर ओलंही जळतंय।।’

अशा अर्थाचं भाष्य मोरे करतात. त्यांची इंग्रजी भाषा अतिशय साधीसोपी आहे. नव्या सरन्यायाधीशांचं शुभचिंतन करूनच ही सहा कडव्यांची कविता संपते; पण चौथ्या कडव्यातला ‘कडवा’ इशारा अधिक लक्षात राहतो. ‘वाळल्याबरोबर ओलंही जळतंय’ असं इथं जिचं भाषांतर केलं ती मूळ इंग्रजी ओळ ‘गुड इनिशिएटिव्ह्ज आर फरगॉटन’ इतकी थेट आणि साधी आहे. न्या. चंद्रचूड यांनी सरन्यायाधीश म्हणून, न्यायमूर्तींच्या नियुक्त्यांचा मुद्दा लावून धरला. पण सत्ताधारी आपापल्या मर्जीनंच या नियुक्त्या व्हाव्या यासाठीच्या खटपटीचा भाग म्हणूनच ‘नकोशां’च्या नियुक्त्यांबाबत निष्क्रिय राहतात, हा तिढा एखाद्या सरन्यायाधीशांनी मनावर घेतलं म्हणून सुटणारा नाही, असा इशारा दुसऱ्याच कवितेत आहे.

एकंदरीत, नव्या-नवलाईच्या काळातल्या बऱ्याच कविता न्या. चंद्रचूड यांच्यावर काही भाष्य करण्यापेक्षाही व्यवस्थेबद्दलची चिंता नोंदवणाऱ्या आहेत. अशातच सरकारनं २६ नोव्हेंबरचा ‘संविधान दिन’ थाटामाटात साजरा करण्याचं ठरवलं, त्याचा सोहळा झाला… त्या सोहळ्यात पंतप्रधान, कायदामंत्री यांच्यानंतर न्या. चंद्रचूड यांनी केलेल्या भाषणात ‘न्यायाधीशांनी आपापल्या पूर्वग्रहांची, समजुतींची फेरतपासणी सतत करत राहिले पाहिजे, तरच वंचितांचे देणे आपण चुकते करू शकू’ असा सूर लावला… याची दखल नेमक्या शब्दांत ‘फेअरी टेल्स’ नावाच्या कवितेत येते, पण या कवितेतल्या अखेरच्या कडव्यात, ‘ही सारी भाषणे अखेर परिकथांप्रमाणेच, रंजक तरीही कपोलकल्पित ठरतील’ असा (ज्याला ‘नांगी मारणारा शेवट’ -स्टिंगर एन्डिंग- म्हणतात, तसा) सूर मोरे लावतात.

विनोद कोण करतंय, विनोदामागे कोणती ‘वैचारिक भूमिका’ आहे, हे महत्त्वाचं असतंच. म्हणून तर पु. ल. देशपांडे जुन्या मध्यमवर्गीय चौकटीबाहेर गेले नसल्याची टीका सुधीर बेडेकर यांनी केली आणि पुलंनी ती वावदूक न मानता, त्यावर उत्तरही दिलं. इथं मोरे यांची कायदा व न्याय क्षेत्राबद्दलची भूमिका निराशावादीच आहे की काय, असा प्रश्न पहिल्या काही कविता वाचून पडेल. पण पुढल्या कवितांमधून स्पष्ट होत जातं की, मोरे निराशावादी नाहीत. त्यांना दूषणच द्यायचं तर, ‘ते स्थितीवादी आहेत’ असं म्हणता येईल. पण मग हा स्थितीवाद कुठून येतो? आपल्या न्यायपालिकेच्या वाटचालीचा जो दीर्घ अनुभव आहे, त्यातूनच ना? याचा अर्थ, मोरे यांची भूमिका वास्तववादीच ठरते. ‘सिस्टिम रिटेन्ड इट्स क्लॉग्ज। सम सेड दे अण्डरस्टुड। व्हाय इट हॅज गॉन टु द डॉग्ज।।’ असा शेवट असूनही, हे भाष्य वास्तवाधारित ठरतं. ‘द लीफलेट’ या कायदेविषयक, पण काहीशा डाव्या विचारांच्या नियतकालिक/ संकेतस्थळावर या कविता आधी प्रकाशित झाल्या होत्या. यातूनही कवीचा कल लक्षात येईल.

पुस्तकातल्या प्रत्येक कवितेच्या आधी त्या त्या कवितेला कारण ठरलेल्या तत्कालीन घडामोडींची पार्श्वभूमी सांगितलेली आहे. संदर्भ समजल्यामुळे कवितांमधल्या भाष्याचा आस्वाद अधिक मोकळेपणानं घेता येतो. या प्रत्येक संदर्भात न्या. चंद्रचूड यांच्या नावाचा उल्लेख असणं अटळच होतं; मात्र कवितांमध्ये नावाचा उल्लेख टाळलेला असून त्याऐवजी ‘द हेड’, ‘द बिग चीफ’, ‘मास्टर ऑफ रोस्टर’ असा सूचकच उल्लेख आहे. सर्वोच्च न्यायालयातल्या अन्य न्यायमूर्तींना ‘स्मॉल चीफ्स’ असंही मोरे यांनी म्हटलं आहे.

सर्वोच्च न्यायायलातल्या नवनव्या दालनांचं सरन्यायाधीशांच्या हस्ते उद्घाटन, मग त्याचे फोटोबिटो, हे सारं अनाठायी असल्याचं भाष्य मोरे करतात, ते जरा वात्रट म्हणावं असं आहे. ‘फक्त स्वयंपाकघराचं उद्घाटन करून कशाला थांबायचं? एकेका ताटवाटीचंही करूया की उद्घाटन’ इतक्यावरच न थांबता शेवटी ही कविता, ‘फक्त स्वच्छतागृहाचं उद्घाटन करून कशाला थांबायचं? एकेका ‘पॉट’चंही करूया की उद्घाटन’ इथवर जाते, हे जरा जास्तच.

कारकीर्दीचा आरंभ, मध्य आणि अंत असे तीन भाग या संग्रहात आहेत, त्यापैकी तिसऱ्या भागातल्या दोन कवितांचा उल्लेख करावाच लागेल. ‘सरन्यायाधीशांच्या घरच्या गणपतीची पंतप्रधानांकडून आरती’ आणि ‘डोळ्यांवरली पट्टी काढलेल्या, हातात तलवार नसलेल्या न्यायदेवतेचा पुतळा सर्वोच्च न्यायालयाच्या ग्रंथालयात’ या घटनांची पार्श्वभूमी त्या कवितांना आहे.

‘बिग चीफ’च्या घरी ‘बिग बॉस’ येतात तेव्हा जणू सारे कॅमेरामनही घरातच असतात आणि हा सोहळा पाहून उंदीरमामाही खूश होतात, अशी कवितेची सुरुवात असली तरी, न्यायपालिका आणि कार्यपालिका यांचा हा भाईचारा आपल्याला कुठे नेणार आहे, हे पुढल्या काळातल्या बातम्यांतून कळेलच, पण सध्या तरी हात कुणी जोडावेत आणि घंटानाद कुणी करावा इतकीच काय ती ‘अधिकारांची विभागणी’ दिसते, अशा भविष्यवेधी भाष्याने ही कविता संपते. न्यायदेवतेच्या नव्या रूपाबद्दलची कविता ही तिची कैफियत अशा स्वरूपाची आहे, त्यातही, ‘अहो मला भारतीय देवीचेच रूप द्यायचे होते, तर माझ्याही हातात नाणी चालली असती की… कशाला हवे पुस्तक?’ असा मार्मिक सवालही आहे.

‘लिमेरिक’ हा इंग्रजी काव्यप्रकार सिब्बल यांनी वापरला होता. पाच ओळींची कविता, पाचव्याच ओळीत भाष्य असा तो प्रकार त्यांना जमला नाही. मोरे यांनी या काव्यप्रकाराचे बंधनच मानलेले नाही. कधी चार ओळी, कधी सहा ओळींची कडवी या कवितांमध्ये आहेत. यमकबाजी नसती तर यांना कविता म्हणता आले नसते, याचे भान मोरे यांनाही असणारच. एकंदरीत या कविता ‘केलेल्या’ आहेत. त्यात काव्यगुण पाहायचे नसून भाष्याचाच आस्वाद घ्यायचा आहे. त्या अर्थाने, या कवितांचा परिणाम शब्दप्रधान व्यंगचित्रांसारखा आहे.

मात्र ‘टीकाटिप्पणीच्या वर, आदरणीय उच्चस्थानी’ असलेल्यांचेही मोजमाप करण्यासाठी कविता उपयोगी पडाव्यात, त्याचे पुस्तकही निघावे आणि (डिसेंबर २०२४ मध्ये प्रकाशन झाल्यानंतर आता तीन महिने होत आले तरी) त्यावर अनाठायी गदारोळ वगैरे न होता ते वाचले जावे, हा ‘काव्यात्म न्याय’च म्हणायचा!

डीवायसी : फॉर बेटर ऑर व्हर्स

लेखक : राजू झेड. मोरे

प्रकाशक : नवीन पब्लिकेशन्स

पृष्ठे : ७८ ; किंमत : ३९५ रुपये.

abhijeet.tamhane@expressindia.com