गायत्री लेले
कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांसाठी नोकरी, करिअर हे सगळे सहज आणि सुखद असल्याचा एक समज आहे. पण त्यांचीही वाट सोपी नसते, हे या पुस्तकातून समजते.
काही पुस्तके आपण नेहमी वाचता त्यापेक्षा वेगळय़ा धाटणीची असतात. पण तरीही त्यातून आपल्या विश्वाबाहेरचे असे काही, नव्याने विचार करण्याजोगे मिळते. अनिता भोगले यांचे हल्लीच प्रकाशित झालेले ‘इक्वल यट डिफरंट : करिअर कॅटॅलिट्स फॉर द प्रोफेशनल वुमन’ हे पुस्तक वाचल्यानंतर याचा प्रत्यय येतो.
अनिता भोगले या सुप्रसिद्ध क्रिकेट समालोचक हर्षां भोगले यांच्या पत्नी. अर्थात ही एवढीच त्यांची ओळख नाही. त्या अनेक वर्षे जाहिरात, मार्केट रिसर्च आणि मार्केट कन्सल्टन्सी इ. क्षेत्रांत कार्यरत आहेत. त्यांचा आणि हर्षां भोगले यांचा ‘द विनिंग वे’ नावाचा मोटिव्हेशनल कार्यक्रम प्रसिद्ध आहे. क्रीडा क्षेत्रातील अनुभव कॉर्पोरेटमधील मॅनेजर्सच्यादेखील कसे उपयोगी पडू शकतात याची चर्चा या कार्यक्रमात होते. ‘द विनिंग वे’ हा कार्यक्रमही आत्तापर्यंत अनेक ठिकाणी झाला आहे आणि तो प्रसिद्ध मोटिव्हेशनल कार्यक्रमांपैकी एक मानला जातो. अनिता यांनी त्यांच्या ‘इक्वल यट डिफरंट’ पुस्तकात कॉर्पोरेट क्षेत्रातील महिलांचे अनुभवविश्व मांडण्याचा प्रयत्न केला आहे. येथे महिलांना येणाऱ्या समस्या, त्यांचे प्रश्न, त्यांना येणारे अडथळे आणि त्यावर मात करण्याचे काही उपाय अशी साधारण या पुस्तकातील आठ प्रकरणांची धाटणी आहे. अनिता आणि हर्षां दोघेही आयआयएम अहमदाबादचे विद्यार्थी. त्यामुळे या पुस्तकात अनिता त्यांचे आयआयएममधील अनुभव, काम करतानाचे अनुभव आणि पूर्वीच्या आणि आत्ताच्या परिस्थितीत पडलेला फरक यांचीही चर्चा करतात. त्यासाठी त्यांनी स्वत:चे अनुभव आणि निरीक्षणे यांच्यासोबतच अनेक प्रथितयश महिलांच्या मुलाखतींचा आधारही घेतला आहे. या सर्व महिला रूढार्थाने ‘यशस्वी’ आहेत, पण उच्चपदी पोहोचण्याकरिता त्यांनी काय आणि किती कष्ट घेतले असतील आणि एक महिला म्हणून कोणत्या अडथळय़ांना तोंड दिले असेल याचा अंदाज या पुस्तकातून येतो.
पुस्तकाची ओळख करून देतानाच अनिता भोगले कॉर्पोरेटमधील महिलांच्या प्रश्नांकडे बघण्याची त्यांची भूमिका स्पष्ट करतात. यातले अनेक मुद्दे भावतात. ते केवळ कॉर्पोरेटसाठीच नव्हे, तर सर्वच क्षेत्रांसाठी लागू आहेत. जसे, महिला नेहमीच ‘यश’ या संकल्पनेकडे पुरुषांपेक्षा वेगळय़ा दृष्टिकोनातून पाहतात. त्यांची अस्मिता ही केवळ त्यांच्या नोकरीला बांधलेली नसते. करिअर करत असतानाच इतर अनेक भूमिका पार पाडण्यात त्यांचा बराच वेळ जातो आणि त्यातही आपण यशस्वी असावे असा बऱ्याच जणींचा आग्रहदेखील असतो. आपल्या कुवतीचा नीट अंदाज नसल्याने सतत स्वत:ला कमी लेखणे व मोठी स्वप्ने न बघणे हेही त्यांच्याकडून सर्रास होते. काळ बदलला आहे, तसे महिलांच्या प्रश्नांचे स्वरूपही निश्चित बदलले आहे. परंतु काही प्रश्न जसेच्या तसे आहेत. लग्न, संसार, मुलं वगैरे या गोष्टी अनेक स्त्री-पुरुषांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असतात. या सगळय़ा निवडी दोघेही करतात, पण त्यांचा दूरगामी परिणाम आजही महिलांवर अधिक होतो. महिला अजूनही स्वत:ला पत्नी, आई, सून इ. भूमिकांमध्ये पाहात असतात. स्वत:ची ओळख अशी वेगवेगळय़ा भूमिकांमध्ये विखुरलेली असणं याचा सहज स्वीकार महिला करतात.
अनिता म्हणतात, की या प्रश्नांचा धांडोळा बऱ्याच वेळा घेतला गेलेला आहे. पण त्यांना या पुस्तकातून सगळय़ा अडचणींतून तग धरून राहिलेल्या महिलांच्या कहाण्यांमध्ये अधिक रस आहे. त्यांनी असे काय केले ज्यामुळे त्या इथवर पोहोचू शकल्या याचा शोध घ्यायचा प्रयत्न अनिता यांनी केला आहे.
‘इक्वल यट डिफरंट’ हे वाक्य क्रिकेटपटू शेन वॉर्न यांनी वापरले होते. एक कप्तान म्हणून इतर खेळाडूंना कशी वागणूक द्यावी, तर ती ‘समान तरीही वेगळी’ (इक्वल यट डिफरंट) अशी असावी असे ते म्हणाले होते. अनिता यांनी तेच वाक्य महिलांच्या संदर्भात वापरले आहे. महिलांना त्यांच्या कार्यक्षेत्रात ‘इक्वल यट डिफरंट’ अशी वागणूक मिळाली, तर त्यांची प्रगती अधिक शक्य होऊ शकते. या विधानाला आधार म्हणून अनिता काही आकडे मांडतात, ज्याद्वारे आपल्याला एकूण परिस्थितीची कल्पना येऊ शकते. जसे, भारतात जवळजवळ ५० टक्के महिला ‘व्यावसायिक’ आपले करिअर निम्म्यापर्यंत पोहोचण्याआधीच थांबतात, नोकरीतून बाहेर पडतात. नोकरीतून बाहेर पडलेल्या महिलांपैकी जवळपास १८ टक्के महिला पुन्हा कामावर रुजू होत नाहीत. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे बाळंतपण एवढेच कारण नसते. इतर अनेक गोष्टी याला कारणीभूत आहेत. या पुस्तकाचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे ही सगळी आकडेवारी ताजी आहे. कोविडकाळात झालेल्या बदलांचाही यात मागोवा घेतलेला आहे.
अनिता आपल्या पुस्तकात फक्त समस्या सांगत नाहीत, तर त्यावरच्या उपायांचीही चर्चा करतात. त्यासाठी त्यांनी घेतलेल्या प्रथितयश महिला व्यावसायिकांच्या मुलाखती उपयोगी पडतात. उदाहरणार्थ स्त्रियांनी ‘नाही’ म्हणायला शिकायला हवं, आपल्याला आयुष्यात नेमकं काय हवं आहे याचा प्राधान्यक्रम ठरवायला हवा, आपली स्वप्ने काय आहेत हे ठासून सांगायला हवं आणि त्याप्रमाणे आपल्या वैयक्तिक आयुष्यालाही वळण द्यायला हवं, आपली शक्ती आणि बुद्धी योग्य ठिकाणी खर्च करायला हवी, महिला म्हणून झालेल्या कुठल्याही प्रकारच्या खच्चीकरणाला तोंड देत पुन्हा उभं राहायला हवं अशा या मुद्दय़ांचे स्पष्टीकरण वेगवेगळी उदाहरणे देऊन केले आहे.
लग्न करणे आणि मूल होणे हे आजही महिलेच्या आयुष्यातील महत्त्वाचे टप्पे मानले जातात, ज्याचा तिच्या करिअरवर परिणाम होतो. पूर्वीपेक्षा परिस्थिती निश्चित बदललेली असली, तरीही अजूनही महिलांच्याच मनात असलेले गंड आणि त्यांच्यावर महिला म्हणून झालेले संस्कार त्यांना सहजासहजी मागे टाकता येत नाहीत. त्यामुळे बाहेरच्या आव्हानांसोबतच ही आंतरिक आव्हाने पेलणेही तितकेच महत्त्वाचे आहे. अनिता यांनी या दोन्ही प्रकारच्या आव्हानांचे विचार करण्याजोगे विश्लेषण केलेले आहे. बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्या एका महिलेने आपल्या मुलाखतीत म्हटल्याप्रमाणे, ‘कोणत्याही स्त्रीला तिचे ध्येय माहीत असण्याआधी त्या ध्येयासहित येणाऱ्या अडचणींचीच आधी कल्पना असते वा दिली जाते.’ ही आणि अशा प्रकारची वाक्ये केवळ बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या महिलांचेच नव्हे, तर सगळय़ाच क्षेत्रांत काम करणाऱ्या महिलांचे चपखल वर्णन आहे.
महिलांची करिअर करण्याची इच्छा वाढीस लागणे, त्यांनी अधिकाधिक घराच्या बाहेर पडणे वगैरे गोष्टींचा इतर सामाजिक घटकांवर आणि संबंधांवरही परिणाम होतो. अनुरूप जोडीदार शोधणे, लग्न करणे, मूल होऊ देणे हे सगळेच निर्णय महिलांना आता पूर्वीसारखे ‘वेळेत’ घेता येत नाहीत. त्यामुळे आजकाल कुटुंबव्यवस्था, स्त्री-पुरुष संबंध आणि साहचर्याची संकल्पनाही खूप बदलली आहे. लेखिकेने पुस्तकात अशा सर्व बदलांचा आढावा घेतला आहे. परंतु या सगळय़ाचा आणखी खोलात जाऊन विचार करता येईल. पुस्तकाच्या मूळ विषयामुळे हे सगळे घटक काहीसे दुर्लक्षित राहिलेले वाटले. कदाचित समाजशास्त्रज्ञांच्या मदतीने या विश्लेषणात आणखी सखोल भर घालता येईल.
या पुस्तकाचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे आपल्याला आत्तापर्यंत माहीत असलेल्या चर्चामध्ये वेगळय़ा पद्धतीने घातलेली भर. उदाहरणच द्यायचे झाले, तर नोकरी करत असणाऱ्या बऱ्याच महिलांमध्ये एक प्रकारची अपराधीपणाची भावना असते. नोकरीमुळे मुलांकडे, घराकडे नीट लक्ष न देता येत नाही, सण समारंभांना वेळ देता येत नाही, घरच्यांसाठी वेळ देता येत नाही अशा अनेक कारणांमुळे ती बळावते. अनिता या ‘अपराध भावने’वर मात करण्यासाठीच्या उपायांची एका प्रकरणात चर्चा करतात. यशस्वी व्हायचे कानमंत्र अनेक मिळतील, परंतु स्त्रियांना खऱ्या अर्थाने यशस्वी व्हायचे असेल तर धोरणांच्या पातळीवर काय बदल करायला हवेत याबाबत या पुस्तकात तपशिलाने सांगितले आहे. उदा. लहान मुलांना आणि वयस्क मंडळींना सांभाळण्यासाठी उत्तम सेवा निर्माण व्हायला हव्यात. अनिता यांच्या मते हे एक असे क्षेत्र आहे ज्यामध्ये भविष्यात अनेक उद्योजकांना संधी आहेत. त्यादृष्टीने आणखी जोरकस प्रयत्न व्हायला हवेत.
अनिता म्हणतात त्याप्रमाणे सगळे खाचखळगे ओलांडून यशस्वी होणे ही सोपी गोष्ट नाही. त्यासाठी बायकांनी जाणीवपूर्वक ‘थिक स्किन’ (गेंडय़ाची कातडी) विकसित करायला हवी. आपण पुरुषांच्या बरोबरीने वावरतो आहोत, पण ती समानता आपल्या वागण्या-बोलण्यात, आचरणातही भिनवायला हवी. अगदी घरून काम करणाऱ्या महिलांनीही ‘वर्क फ्रॉम होम’ करताना स्वत:ची एक वेगळी जागा आणि ओळख राखावी. त्यांच्या कामाचे महत्त्व घरच्या इतर मंडळींच्याही लक्षात आणून द्यावे. अशा अनेक बारीकसारीक मुद्दय़ांना अनिता स्पर्श करतात.
आधी म्हटल्याप्रमाणे, पुरुषांचे विशेषाधिकार, महिलांना महिला म्हणून घडवले जाणे, यात कुटुंबाचा, समाजाचा असलेला वाटा या सगळय़ावरची चर्चा या पुस्तकातील प्रकरणांशी जोडून घेता येईल. महिलांची कामाच्या ठिकाणी होणारी लैंगिक छळवणूक याबाबतची चर्चा पुस्तकात थोडक्यात येते, ती अधिक विस्ताराने करता येईल. महिलांबाबतच्या कायद्यांचा, त्यात झालेल्या बदलांचा आणि वेगवेगळय़ा देशांत महिलांसाठी केलेल्या विशेष तरतुदींचा आढावा घेता येईल. परंतु त्यासाठी सद्य:परिस्थितीची विस्ताराने कल्पना येणे आवश्यक आहे. अनिता त्यांच्या पुस्तकाद्वारे हे यशस्वीपणे करतात असे निश्चित म्हणता येईल.
इक्वल यट डिफरंट : करिअर कॅटॅलिट्स फॉर द प्रोफेशनल वुमन
लेखिका : अनिता भोगले प्रकाशक : पेंग्विन प्रकाशन पृष्ठे : २५६ किंमत : ३९९ रु.
gayatrilele0501@gmail.com