अजिंक्य कुलकर्णी
मी कुणी आहे, याची जाणीवच नसणारी एक ‘कुरूप’ मुलगी.. वयात आल्यावर, नाटकात काम मिळालं तेव्हा आत्महत्येचा विचार विसरली.. ‘ऑस्कर’ मिळवणारी अभिनेत्री ठरली! तिची ही कथा..
आठ वर्षांची एक गरीब मुलगी. घरी अठरा विसे दारिद्रय़ त्यात जगण्यास अभिशाप ठरावा असा तिचा वर्ण. ती कृष्णवर्णीय आहे. वडील अट्टल दारुडे. पिऊन आल्यावर ते तिच्या आईला इतकं बेदम मारायचे की त्या मारामारीत प्रत्येक वेळी तिच्या आईला जबरी दुखापत व्हायची. या भयंकर गृहकलहाचा त्या कोवळय़ा जीवावर व्हायचा तोच परिणाम झाला. ती दिवस-रात्र त्या भीतीच्या मानसिक दडपणाखाली जगू लागली. तिचं ते वयही असं नव्हतं की तिला नक्की काय झालंय हे कुणाला सांगता यावं. अर्थात कुणाला त्याच्याशी काही देणंघेणंदेखील नव्हतं. हा गृहकलह एकदा तर इतका विकोपाला गेला होता की तिच्या वडिलांनी एका अणकुचीदार काचेनं तिच्या आईवर हल्ला केला व तिच्या आईच्या डोळय़ाच्या खाली जेव्हा ती काच घुसली तेव्हा रक्ताची एक चिळकांडी उडाली आणि ती या मुलीच्या अंगावर पडली. आई-वडिलांच्या या भांडणात पडण्याची तिची हिंमत होत नसे. भीतीच इतकी वाटायची तिला की बास. पण चिळकांडी अंगावर उडाली तेव्हा मात्र तिच्यातील भीतीने परमोच्च बिंदू गाठला होता आणि त्यात ती मोठय़ांदा किंचाळत एकच शब्द बोलू शकली, ‘‘थांबा! बास झालं..’’
हे झालं फक्त घरातलं. घराबाहेर शाळेत तरी ती सुरक्षित होती का? तर अजिबात नाही. घराइतकीच भीती- किंबहुना त्यापेक्षा किती तरी पटीनं अधिक भीती – तिला शाळेत वाटत होती. का वाटायची इतकी भीती तिला? कारण तिच्या शाळेतले बहुतेक सर्व विद्यार्थी हे श्वेतवर्णीय होते. ते तिला तोंडावर ‘यू ब्लडी निगर’ म्हणून चिडवायचे. शाळा सुटण्याच्या शेवटच्या घंटेबरोबर तिच्या हृदयाची धडधड वाढायची. कारण शाळेबाहेरच्या मुलांचं एक टोळकं तिचा पाठलाग करत असे. त्या मुलांना हिला मारायला आवडत असे. त्या मुलांच्या टोळक्यामध्ये निम्मी कृष्णवर्णीय मुलंसुद्धा असायची. ती मुलंसुद्धा हिला ‘निगर’ म्हणून चिडवायची. का, तर त्या मुलांपेक्षा हिचा वर्ण जरा अधिकच काळा होता!
..कुणाला माहीत होतं की इतक्या भीतीदायक वातावरणात बालपण घालवलेली ही मुलगी पुढे जाऊन अभिनय क्षेत्रात देदीप्यमान कामगिरी करेल? नाटय़ क्षेत्रातील टोनी पुरस्कार व ऑस्करची सोनेरी बाहुली आपल्या खिशात टाकेल? ती अभिनेत्री म्हणजे व्हायोला डेव्हिस! नुकतंच तिचं आत्मचरित्र ‘फाइंिडग मी’ प्रकाशित झालं आहे.
अमेरिकन जमिनीला वर्णद्वेष हा काही नवा नाहीये. त्या देशात १८६१ ते ६५ पर्यंत झालेल्या यादवी युद्धापासून ते जॉर्ज फ्लॉइड या कृष्णवर्णीय व्यक्तीला भर रस्त्यावर पोलिसांनी मारून टाकण्यापर्यंत याला मोठा इतिहास आहे. काळाच्या पटलावर पुढे सरकत असताना भेदाभेद करणाऱ्या अशा अनिष्ट प्रथांना पूर्णविराम मिळत असेल अशी एक सामान्य धारणा असते. आधुनिकतेकडे वाटचाल करत असताना या गोष्टी मागे पडतात असतील असं वाटू शकतं. पण, ही अशी पुस्तकं वाचल्यावर आपल्या धारणेला धक्के बसू लागतात. एक तर घरी प्रचंड गरिबी; त्यात व्हायोलाचं बालपण गेलं ते ऱ्होड आयलंड प्रांतातल्या सेंट्रल फॉल्स या शहरात. अमेरिकेच्या उत्तरेकडे, अटलांटिकजवळ असलेल्या (पण नावात ‘आयलंड’ असूनही मुख्य भूमीशी बराचसा भाग जोडलेल्या) या प्रांतात प्रचंड बर्फ पडतो. त्यामुळे हिवाळय़ात नळातल्या पाण्याचा बर्फ होऊन ते गोठलेलं असायचं. घरात उष्णता राहावी म्हणून जी शेकोटीची व्यवस्था असते तीही गरिबीमुळे परवडेनाशी, त्यामुळे व्हायोलाचं घरच नव्हे तर वस्तीतली बरीच कुटुंबं कुडकुडत्या थंडीत दिवस काढत. ही मुलगी आठ-आठ दिवस आंघोळ करत नसे. मुळात आंघोळ नावाची गोष्ट करायची असते, कपडे ठरावीक वेळेनंतर धुवायचे असतात या मूलभूत गोष्टींपासूनही ती बरीच दूर होती. घराबाहेरील भीतीदायक वातावरणामुळे ही तिसऱ्या इयत्तेत शिकणारी व्हायोला रात्री अंथरूण ओलं करत असे. ही सवय तिच्या वयाच्या पंधराव्या वर्षांपर्यंत मोडली नाही. शाळेतही वर्गमित्र-मैत्रिणी, शिक्षिका तिच्या जवळ गेल्यावर नाक दाबत असायचे. ‘तू अत्यंत कुरूप आहेस,’ असं म्हणत असत. एकदा तर तिने वर्गातच लघुशंका केली तर शाळेचा कोणताही शिपाई तिच्याकडे आला नाही की कोणी दाई आली नाही तिला उचलून न्यायला. तिला शाळा सुटेपर्यंत तसंच लघवीमध्ये बसून राहावं लागलं होतं. हा अपमान तिच्या फार जिव्हारी लागला होता. त्यामुळे तिचा आत्मविश्वास जो खचला तो कायमचाच.
या खचलेल्या आत्मविश्वासातून, भीतीच्या वातावरणातून बाहेर पडण्याचा मार्ग तिला सापडत नव्हता. आज आपल्याला आंघोळ करणं, कपडे धुणं ही साधीसोपी कामं काय शिकवावी लागतात का, यांसारखे प्रश्न पडू शकतात. पण हे सगळं सांगायलाच जवळपास कुणी नसेल तर कोण वाट दाखवणार? जिथे दोन वेळचं पोटभर जेवण मिळण्याची भ्रांत होती तिथे कपडे धुणं, साबण लावून अंग घासणे या चैनीच्या गोष्टी ठरल्या असत्या. ती स्वत:शीच पुटपुटायची.. ‘मी कोण आहे? कोण आहे माझा आशेचा किरण? प्रत्येकाला मी जर नकोशी झाली आहे, तर अशा जगाला ओकून टाकण्याऐवजी मी ज्याच्यात नेमकी बसू शकेन असा माझा सूर्यप्रकाश कुठे आहे?’ याच तिरीमिरीत तिला आत्महत्या करण्याचा विचार भेडसावू लागला होता. त्या वेळी ती १४ वर्षांची होती. पण त्याच दरम्यान शाळेतील एका नाटकातील एक पात्र साकार करणारी मुलगी आजारी असल्याने तिची भूमिका व्हायोलाला मिळाली. नाटक संपल्यावर ही सर्व मुलं पुन्हा मंचावर येऊन ओळीनं उभी राहिली तेव्हा साऱ्या प्रेक्षकांनी टाळय़ा वाजवल्या.. या ‘कर्टन कॉल’च्या वेळी तिला वाटलं की ‘अभिनय’ हे क्षेत्र असं आहे जिथं मी कोणाला नकोशी झालेली नाहीये.
व्हायोलाचं आयुष्य हे जणू एखादा युद्धपट असावा तसं आहे. युद्धपटात जसा नायक शेवटी रक्तबंबाळ झालेला असतो, आजूबाजूला सैनिकांच्या शवाचा खच पडताना त्याने पाहिलेला असतो आणि त्या मानसिक धक्क्याच्या पडझडीतून, झालेल्या अतोनात नुकसानीतून तो आपल्या प्रेयसीकडे पुन्हा पहिल्यासारखा जाऊ शकत नाही.. तसंच बालपणापासून पाहिलेली गरिबी, खायला अन्न नसल्याने झालेली उपासमार, यातून व्हायोला आज जरी एक यशस्वी अभिनेत्री झालेली असली तरी, आयुष्यात उपभोगायचा राहून गेलेल्या आनंदाकडे आता ती परत जाऊ शकत नाही. व्हायोलाचे वडील डॅन हे शर्यतीच्या घोडय़ांच्या पागेत कामाला होते. घोडय़ांचे मालक त्यांना जवळजवळ गुलामाप्रमाणे वागणूक देत असत. त्यांच्याकडून दिवसभर प्रचंड काम करून घेत. त्या कामाचा डॅन यांच्यावर ताण येत असे. मालकाचा खूप राग येत असे, पण ते काम करण्याशिवाय त्यांच्यासमोर दुसरा पर्याय नव्हता. व्हायोलाचे आई-वडील हे असे होते ज्यांना स्वत:च्या स्वप्नांचा, आशा-आकांक्षांचा कधी शोधच लागला नाही. एका अशा जगाचा त्या दोघांना कधी शोधच लागला नाही जिथे शांती किंवा आनंदाचा ते अनुभव घेऊ शकतील. डॅन कधीकधी घरापासून दोन-तीन महिने दूर जात, कुठे तरी गायब असत. त्या दरम्यान त्यांचा काहीच पत्ता नसायचा, पण ते परत मात्र येत असत. व्हायोलाला त्यांच्या या कृतीचा अर्थ उशिराने समजला. घरापासून असं दूर राहणं हे त्यांच्या दृष्टीनं एक उत्तर होतं, आयुष्यात भेडसावत असलेल्या प्रश्नांवरचं.
व्हायोला आणि तिची लहान बहीण डिलोरिस या दोघींनी उपासमारीमुळे व त्या अनुषंगानं येणारे अपमान खूप झेलले. चौकातील दुकानदार या दोघांच्या तोंडावर अन्नपदार्थाची पाकिटं फेकून मारायचे आणि म्हणायचे, ‘‘खा एकदाचं मेल्यांनो!’’ व्हायोलाच्या शाळेच्या मुख्याध्यापक मिसेस प्रॉसर मात्र एकदा व्हायोलाला म्हणाल्या, ‘‘व्हायोला, मला फार वाईट वाटतंय तुझ्या परिस्थितीबद्दल, पण तू स्वत:ला कमी समजू नकोस.’’ असं म्हणत त्यांनी या चौदा वर्षांच्या व्हायोलाच्या गालावरून हात फिरवला. व्हायोलासाठी, प्रेमाचा पहिला स्पर्श होता तो. कोणाच्या तरी प्रेमास आपण पात्र आहोत. आपल्यालाही किंमत आहे. कोणी तरी आहे ज्याला मी कुरूप वाटत नाही. शाळेतल्या नाटकाच्या अनुभवातून तिनं अभिनयाचं प्रशिक्षण घ्यायचं ठरवलं. ती रॉन स्टीव्हन्सन यांच्या अकॅडमीत दाखल झाली. रॉन ही दुसरी व्यक्ती होती ज्याला व्हायोलामधलं आंतरिक सौंदर्य दिसलं. या अभिनय प्रशिक्षणात व्हायोला जरा खुलू लागली. नाटकाच्या मंचावर व्हायोलाला सुरक्षित वाटू लागलं.
व्हायोला आपल्या पहिल्या बॉयफ्रेंडबद्दल फार बोलू इच्छित नाही. त्याच्याबरोबरचे वाईट अनुभव तिला आठवायचे नाहीत. व्हायोला म्हणते की, ‘जे कलाकार सुखवस्तू, स्थिरस्थावर (प्रिव्हिलेज्ड) कुटुंबांतून येतात त्यांच्या बातम्या, मुलाखती ज्या आपण माध्यमांतून पाहत असतो ते एक प्रकारे ओकारीसारखं असतं. आपण ते त्या लोकांचं सत्य म्हणून स्वीकारतो.’ व्हायोलाला २००१ मध्ये ‘किंग हेडली टू’ या नाटकातल्या तिच्या भूमिकेबद्दल अमेरिकेच्या नाटय़ क्षेत्रातला प्रतिष्ठित ‘टोनी पुरस्कार’ मिळाला, त्याआधीची आठ वर्ष तिनं न्यूयॉर्कला ‘ब्रॉडवे’ भागात सादर होणाऱ्या – म्हणजे अमेरिकी मुख्य प्रवाहातल्या- नाटकांमध्ये कामं केली होती. तिला चित्रपटांतही भूमिका मिळू लागल्या होत्या. मग २०११ सालच्या ‘द हेल्प’ या चित्रपटाबद्दल ऑस्कर आणि (ब्रिटनमधल्या) ‘बाफ्टा’ पुरस्कारांसाठी तिचं नामांकन झालं. त्या वेळी दोन्ही पुरस्कारांनी हुलकावणी दिली, पण २०१६ सालच्या ‘फेन्सेस’साठी हे दोन्ही पुरस्कार व्हायोलानं मिळवले!
असे पुरस्कार मिळाले तर त्या कलाकाराला पुढे आणखी चांगल्या भूमिका पटापट मिळत जातात असा सर्वसामान्यांचा समज असतो. व्हायोलाच्या बाबतीत मात्र हे सत्य नाही. या दोन्ही पुरस्कारांच्या वेळी तसंच इतर मुलाखतींत तिनं कृष्णवर्णीय कलाकारांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीसंदर्भात आवाज उठवला होता. त्यामुळे तिला कामं मिळायची कमी झाली. दहा वर्षांत तीनदा ऑस्करसाठी नामांकनं किंवा थेट पुरस्कार मिळूनसुद्धा, तिला मुख्य स्त्री भूमिकेसाठी एकदाही संधी मिळाली नाही.
व्हायोलाला आपल्या वडिलांचा राग होता, पण एकदा तिचा एजंट मार्क तिला म्हणाला- ‘‘पण आज तू जे काही आहेस ते त्यांच्यामुळेच तर आहेस.’’ व्हायोला यावर विचार करू लागली व तिची आपल्या पालकांबद्दलची मतं हळूहळू बदलू लागली. अभिनय चाचणीच्या वेळी तिला सांगितलं जात असे की, तू फार काही करू शकशील असं वाटत नाही. ती फार देखणी नव्हती हे तिलाही मान्य होतं, पण काही निर्मात्यांनी, ती स्त्री वाटत नाही, असं सुचवण्यापर्यंतची मजल गाठली. या सर्व कटू अनुभवानंतरही व्हायोला म्हणते की, माझी ताकद ही इतरांना माफ करण्यातून कमावली आहे.. ‘‘मला माहीत आहे की एका लहान मुलीची उपासमार म्हणजे काय असते. मला माहीत आहे की घरातली गरिबी म्हणजे काय असते, घरात दारुडा बाप असणं म्हणजे काय असतं. मला हेही माहीत आहे की या सर्व गोष्टींचा एका लहान मुलीच्या मनावर काय परिणाम होतो. लोकांची माझ्या अभिनयाच्या माध्यमातून सेवा करता यावी, हीच लोकांना मी दिलेली सर्वात मोठी भेट ठरेल.’’
‘फाइंडिंग मी’
लेखिका : व्हायोला डेव्हिस
प्रकाशक : कॉरोनेट/ हार्पर वन
पृष्ठे : ३०४; किंमत : ७३६ रुपये
ajjukul007@gmail.com