‘मी अप्पाजींना (मतिकुल्लु बसप्पा) योगायोगाने भेटले. एकदा बस थांब्यावर पैसे मागत उभी होते. तेवढय़ात दुरून चौंडकीचा आवाज कानी पडला. गर्दी दिसत होती. तिथे काही नसले तरी किमान गर्दीकडून थोडे जास्त पैसे तरी मिळतील, अशा विचाराने तिथे गेले. एक वृद्ध गृहस्थ चौंडकी वाजवत होते आणि लांब वेणी घातलेला एक तरुण त्या तालावर नृत्य करत होता. ते सारेच एवढे लयबद्ध होते की मी नकळत माझ्या हातातली काही नाणी त्यांना दिली. मला ते नृत्य शिकायचे होते. ते सहज शिकवायला तयार झाले. त्या रात्री मी माझ्या छोटय़ाशा खोलीत कितीतरी वेळ डोक्यावर घडा घेऊन नाचायचा प्रयत्न करत होते..’ पद्मश्री पुरस्काराने सन्मानित मंजम्मा जोगती यांनी अशा अनेक आठवणी ‘फ्रॉम मंजुनाथ टू मंजम्मा’ या पुस्तकात नोंदवल्या आहेत.
बालपणी आपल्यातील वेगळेपण लक्षात येऊन गोंधळून गेलेल्या मंजुनाथची पुढे अठराव्या वर्षी मंजम्मा होऊन राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार स्वीकारण्यापर्यंतचा प्रवास या पुस्तकात उलगडण्यात आला आहे. लहानपणी खचून जाऊन दोनदा आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या मंजम्मांची जोगती नृत्य शिकण्याची जिद्द, त्यात आलेले अडथळे आणि या कलेच्या बळावर त्यांचे ‘कर्नाटक जनपद अकॅडमी’ या राज्य शासनाच्या अखत्यारीतील संस्थेच्या अध्यक्षस्थानावर नियुक्ती होण्यापर्यंतचा प्रवास.. अशा अनेक प्रेरक प्रसंगांच्या नोंदी यात आहेत. कलेच्या प्रामाणिक उपासनेतून अतिशय उपेक्षित वर्गातील व्यक्तीही समाजात स्वत:चे स्थान कसे निर्माण करू शकते हे स्पष्ट करणारा हा प्रवास आहे. ‘मी तृतीयपंथीयांचे पदपथावरचे आयुष्यही पाहिले आहे आणि देशातील एक महत्त्वाचा सन्मानही अनुभवला आहे. लोक आज तृतीयपंथीयांकडे कोणत्या नजरेतून पाहतात, हे मी जाणून आहे. माझ्यासारख्याच अन्य अनेकांविषयीचे गैरसमज दूर व्हावेत आणि समाजाने सकारात्मकतेने या वर्गाकडे पहावे, म्हणून हा लेखनप्रपंच केला,’ असे मंजम्मा सांगतात. ‘हार्पर कॉलिन्स’ने प्रकाशित केलेले हे २४० पानी पुस्तक गेल्या आठवडय़ापासून ३९९ रुपये किमतीत उपलब्ध आहे.