दहा महिन्यांपूर्वी, २२ एप्रिल २०२२ रोजी ‘राष्ट्रीय हरित लवादा’ने (नॅशनल ग्रीन ट्रायब्यूनल- एनजीटी) कोडाइकॅनाल येथील प्रदूषण- नियंत्रणात ‘हिंदूस्तान युनिलीव्हर’ या कंपनीकडून कोणतीही हयगय झालेली नसल्याचा आणि पर्यावरणवादी कार्यकर्त्यांचे आक्षेप चुकीचे असल्याचा स्पष्ट निर्वाळा दिला. या कंपनीने  https://www.hul.co.in/planet-and-society/our-position-on/kodaikanal-mercury-factory-contamination/ या दुव्यावर उप-दुवे देऊन, आपली भूमिका प्रदूषण-नियंत्रणाचीच असल्याचे पुरेसे स्पष्ट केलेले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मग प्रश्न पडेल की, ‘हेवी मेटल : हाउ अ ग्लोबल कॉर्पोरेशन पॉइझन्ड कोडाइकॅनाल’ हे अमीर शाहुल यांचे पुस्तक आता येऊन उपयोग काय? मुळात, तमिळनाडूच्या या परिसरात पाऱ्यामुळे विषारी प्रदूषण झाल्याचे हे प्रकरण २००१ सालातले. तेव्हा जरी संबंधित कंपनीने प्रदूषणाचा आरोप थेट मान्य केला नसला, तरी पुढे याच कंपनीने मृदा-संधारण प्रकल्प हाती घेऊन, जमीन पारा-प्रदूषणापासून पूर्णत: मुक्त करण्याचा विडा उचलला. संकेतस्थळावरील माहितीतून असेही समजते की, स्वयंसेवी संस्थांना विश्वासात घेऊनच कंपनीने हे काम केले. मग तक्रार काय?

कदाचित, कंपनीने हे प्रकरण लावून धरल्यास पुस्तकाचे नाव बदलूही शकते. सध्या तरी ‘पॅन-मॅकमिलन’ सारख्या नावाजलेल्या प्रकाशकांनी याच नावाने हे पुस्तक प्रकाशित केले आहे आणि त्यात, कंपनीची भूमिका ‘प्रदूषण नाहीच’ इथपासून ‘आम्ही संधारण करतो’ इथपर्यंत कशी बदलली, का आणि कोणामुळे, याचा लेखाजोखा आहे. लेखक अमीर शाहुल हे त्या वेळी पत्रकार म्हणून काम करत होते. आता ते ‘ग्रीनपीस’चे कार्यकर्तेही आहेत. लेखकामध्ये हा बदल कसा झाला, याचीही माहिती पुस्तकातून मिळत राहाते. कोडाइकॅनाल हे पर्यटनासाठी प्रसिद्ध असले तरी तमिळनाडूतले ते आडबाजूचे गाव. तिथल्या बातम्या चेन्नईच्या ‘द हिंदू’ आदी प्रभावी दैनिकांमध्ये येण्यासाठी कसा आटापिटा करण्याची तयारी ठेवली, पण प्रकरणाचे गांभीर्य कळताच वृत्तपत्रांनी  या बातम्या कशा लावून धरल्या, स्थानिकांनी कशी साथ दिली, याची वर्णने पुस्तकात पानोपानी आढळतात. मात्र कंपनीने आजही पुरेसे प्रयत्न केलेले नाहीत, या पर्यावरणवाद्यांच्या (एनजीटीने फेटाळलेल्या) तक्रारीकडेच पुस्तकाचा कल आहे. शिवाय, ही एकच कंपनी प्रदूषण करते आहे का, याच प्रकारचे प्रदूषण देशात किंवा किमान दक्षिण भारतात अन्य कोठे होते आहे का, याचा तपशील पुस्तकात नाही, तो असता तर या पुस्तकाबाबत एकांगीपणाची शंका आली नसती. तरीही, अशी पुस्तके काढण्याचे धाडस मोठे प्रकाशक करतात, हे महत्त्वाचेच. यातूनच इतरांनाही कार्यरत होण्याची प्रेरणा मिळत राहाते!