गणेश मतकरी

‘इफ आय सव्‍‌र्हाईव्ह यू’मधलं कथानक मायामी शहरात स्थायिक झालेल्या एका स्थलांतरित कुटुंबाचा अवघड वाटावळणांवरून होणारा प्रवास उलगडून दाखवतं.

Gold seized Mumbai airport, Mumbai airport,
मुंबई विमानतळावरून पावणेतीन कोटींचे सोने जप्त, दोन कर्मचाऱ्यांना अटक
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
A bull attacked a scooter driver who came under the truck viral video on social media
बैलाने मारली उडी अन् स्कूटर चालक गेला ट्रकच्या खाली, पुढे नेमकं काय घडलं? पाहा धक्कादायक VIDEO
mumbai lhb coaches train
कोकण मार्गावरील एक्सप्रेसला जोडले जाणार एलएचबी डबे, प्रवाशांच्या सुरक्षेत होणार भर
Shocking viral video of ac local train crowd in Mumbai air conditioned local trains are disappointing shocking video goes viral
एसी ट्रेनचं तिकीट काढताय? मुंबईतल्या रेल्वे स्टेशनवरचा ‘हा’ VIDEO पाहून धडकी भरेल; पाहा नेमकं काय घडलं?
6 feet long snake entered the MIDC police station
पोलीस ठाण्यात साप आणि पोलिसांची तारांबळ
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
Grandfather shifted the camera towards his wife
“नातं इथपर्यंत पोहचलं… ” आजी येताच आजोबांनी मोबाईल वळवला अन्…; VIRAL VIDEO पाहून नेटकरी झाले भावुक

जोनथन एस्कोफरीच्या ‘इफ आय सव्‍‌र्हाईव्ह यू’मधल्या पहिल्या कथेतलं पहिलंच वाक्य आहे, ‘इट बिगिन्स विथ व्हॉट आर यू?’ हे वाक्य या पूर्ण पुस्तकाचं केंद्र आहे असं म्हणता येईल. एक व्यक्ती म्हणून आपण कोण आहोत, आपली ओळख काय, हे कशावरून ठरतं, हा प्रश्न एस्कोफरी आपल्याला त्याच्या लेखनामधून वारंवार विचारतो, विचारतच राहतो. तुम्ही कुठून आलात, कसे दिसता, तुमचा रंग काय, वर्ण काय, तुमची सांस्कृतिक पार्श्वभूमी कोणती, तुम्ही कोणत्या समूहाचा भाग आहात, तुमची भाषा कोणती, असे अनंत प्रश्न इथे उभे राहतात. एस्कोफरीची पात्रं या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी झगडत राहतात. कधी थकतात, कधी तडजोडी करतात, कधी हरतात, पण नव्या दमाने पुन्हा उभी राहतात. आपण जसं हे पुस्तक वाचत जातो, तसे त्यांना पडणारे हे प्रश्न आपल्यालाही भेडसावयला लागतात, आपलेच होतात आणि आपणही या आत्मशोधाचा भाग होऊन जातो.

हेही वाचा >>> ग्रंथस्मरण : इस्रायलसाठी ‘देवदूत’ ठरलेला इजिप्तचा गुप्तहेर

‘इफ आय सव्‍‌र्हाईव्ह यू’मध्ये परस्परांशी जोडलेल्या आठ कथा आहेत. त्या मायामी शहरात स्थायिक झालेल्या जमेकन कुटुंबाभोवती फिरतात. कुटुंबातला धाकटा मुलगा ट्रिलॉनी हे यातलं प्रमुख पात्र आहे, जे लेखकाचा दृष्टिकोन आपल्यापर्यंत थेटपणे पोचवतं. ट्रिलॉनी सुशिक्षित आहे, त्याचा जन्म कुटुंब अमेरिकेत आल्यानंतरचा असल्याने तो स्वत:ला अमेरिकन मानतो. त्याचं बोलणं, चालणं अमेरिकन वळणाचं आहे. पण त्यामुळेच तो उपरा ठरतो. कुटुंबात आणि कुटुंबाबाहेरदेखील. टॉपर आणि सान्या या त्याच्या आईवडिलांना डेलानो हा त्याचा मोठा भाऊ अधिक जवळचा वाटतो. वडिलांना भावाबद्दल वाटणारी जवळीक हे या संपूर्ण कथाचक्रातलं एक महत्त्वाचं सूत्र आहे, जे पुढे घडणाऱ्या अनेक घटनांना कारणीभूत ठरतं. ट्रिलॉनीला तो अमेरिकन आहे, असं वाटत असलं, तरी ते पुरेसं नाही, हे समाज त्याला दाखवून देतो. वडिलांबरोबरच्या एका वादामुळे ट्रिलॉनीला घर सोडणं भाग पडतं, तेव्हा तर हा प्रश्न अधिकच उग्र, विदारक रूप धारण करतो,

पुस्तकातल्या आठ कथांमधल्या पहिल्या दोन, म्हणजे ट्रिलॉनीचा दृष्टिकोन मांडणारी ‘इनफ्लक्स’ आणि जमेकन इमिग्रन्ट असलेल्या त्याच्या वडिलांचा दृष्टिकोन मांडणारी ‘अंडर द अ‍ॅकी ट्री’ या पुस्तकाची पार्श्वभूमी पक्की उभी करण्याचं काम करतात. वर्णीय तशीच सांस्कृतिक ओळख, आणि तिच्या शोधात ट्रिलॉनीपुढे तयार होणारे अनेक प्रश्न ‘इनफ्लक्स’मध्ये येतात, तर टॉपरचं तरुणपण, लग्न, देश सोडण्याची गरज तयार होणं, अमेरिकेतले दिवस, आणि संघर्ष, हा सारा भाग ‘अंडर द अ‍ॅकी ट्री’मध्ये येतो. एकूण पुस्तकाचं फ्रेमवर्क असं उभं राहिलं, की इतर कथा या विशिष्ट व्यक्तिरेखा, प्रसंग, काळ, समस्या अशा गोष्टींवर लक्ष केंद्रित करतात. या कथा स्वतंत्रपणे उत्तम म्हणाव्यात अशाच आहेत, पण एकत्रितपणे, इतर कथांच्या संदर्भासह त्या कितीतरी अधिक प्रभावी ठरतात. त्यामुळेच या पुस्तकाला कथासंग्रह वा कथामालिका म्हणण्यापेक्षा (जरी तेही चुकीचं ठरणार नाही) कादंबरी म्हणणंच मला अधिक बरोबर वाटतं. कथामालिकांमध्ये तीच पात्रं आपल्याला पुन्हापुन्हा भेटू शकतात हे खरं आहे. पण काळानुसार कथानकाचं एका विशिष्ट दिशेने पुढे सरकणं, किंवा एपिसोडिक न राहता संपूर्ण कथानकाचा सलग प्रभाव पडणं, हे कथामालिकांमध्ये क्वचित पाहायला मिळतं. इथे पाहायला मिळणाऱ्या आठ कथांमध्ये असा एकसंध परिणाम घडवण्याची क्षमता निश्चितच आहे.

एस्कोफरीने निवडलेली निवेदनशैली विशेष आहे, कारण ती सर्व कथांना सारख्या रीतीने वापरण्यात येत नाही. काही कथा सहभागी पात्रांचा दृष्टिकोन प्रथमपुरुषी निवेदनातून मांडतात, कधी तो तृतीय पुरुषी होतो, पण सर्वात इन्टरेस्टिंग निवेदन वर उल्लेख केलेल्या पहिल्या दोन कथा, आणि शेवटची ‘इफ आय सव्‍‌र्हाईव्ह यू’ यांमध्ये आढळतं. हे द्वितीय पुरुषी निवेदन आहे. म्हणजे निवेदक इथे ‘मी असं असं केलं’ असं न म्हणता ‘तुम्ही असं असं कराल’ असं सांगतो. या प्रकारचं निवेदन हे एकूणच कथासाहित्यात क्वचित आढळतं, आणि ते वापरलं जातं, तेव्हा त्यामागे काही एक तर्कसंगत भूमिका असावी लागते, अन्यथा ते वाचणाऱ्याला गोंधळात पाडण्याची शक्यताच अधिक असते. इथे त्याचा वापर अर्थपूर्ण आहे. शेवटच्या कथेत तर तो फारच तीव्रतेने जाणवणारा आहे, पण पहिल्या दोन कथांमध्येही या वापरातून एक इंटरॅक्टिविटी येते. लेखक आपल्याशी थेट संवाद साधतोय, आणि त्याला जोडूनच त्याचा स्वत:शीही एक संवाद सुरू आहे, असं आपल्याला जाणवत राहते. कथांमधून निवेदन पुढे नेणं हाच फॉर्म एस्कोफरी वापरत असल्याने, कादंबरीच्या परिचित शैलीप्रमाणे कथानकातलं प्रत्येक वळण घेण्याची त्याला आवश्यकता वाटत नाही. दर कथेचा तुकडा एकूण रचनेत कुठे बसतोय हे कळण्याएवढा संदर्भ निवेदनात दिला जातो, पण तिथे आपण रेंगाळत नाही. आपण पात्रांच्या आयुष्यातल्या संथ भागाला वगळून पुढल्या लक्षवेधी घटनेकडे सरकतो. हे मला थोडं चित्रपटात जम्प कट ज्या रीतीने वापरतात तसं वाटलं. सगळं संथपणे दाखवण्याची गरज काय आहे? आवश्यक ते दाखवून बाकी कात्री लावा आणि अर्थवाही घटनांचीच एक मालिका तयार करा.

वास्तववादी कथनाचंही एक वैशिष्टय़ आहे, मग ते चित्रपटातलं असो वा साहित्यातलं. खऱ्या आयुष्यात मागचापुढचा काहीच संदर्भ नसणारा आयसोलेटेड एपिसोड अस्तित्वातच असू शकत नाही. प्रत्येकच घटनेचे धागे भूतकाळ आणि भविष्यातही पसरलेले असतात. त्यामुळे जेव्हा त्यातल्या विशिष्ट घटनाक्रमाभोवती आपण कथेची चौकट टाकतो, तेव्हा हे धागेदोरे कथेपलीकडे जाणं, आणि वाचकाच्या ते लक्षात येणं, हे स्वाभाविक आहे. तसं न करता लेखकाने सुविहितपणे सारं आखलेल्या चौकटीत कोंबण्याचा प्रयत्न केला, तर ते कृत्रिम वाटू शकतं. आयुष्यात ‘सेल्फ कन्टेन्ड’ असं काही असू शकत नाही, आणि वास्तवाचं प्रतिबिंब मानल्या जाणाऱ्या कथाप्रधान माध्यमांनीही हे लक्षात घेतलं, तर त्यांचा प्रयत्न अधिक अस्सल होण्याची शक्यता वाढते. ‘इफ आय सव्‍‌र्हाईव्ह यू’मध्ये असे कथेतून बाहेर जाणारे धागे जागोजागी आहेत. पात्रांच्या आयुष्यातला दर प्रसंग समोर पानावर न घडताही आपण या व्यक्तिरेखांच्या आयुष्याचाच आढावा घेत असल्याचाच परिणाम साधला जातो, तो या दोन कथांमधल्या अवकाशात पसरलेल्या नाजूक धाग्यांमुळेच. कादंबरी म्हणून पाहायचं तर जो संपूर्ण आलेख साहित्यकृतीला यायला हवा तो बराचसा संकल्पनेच्या पातळीवर इथे अस्तित्वात आहे. कुटुंबातील व्यक्तिरेखांचे बदलते संबंध, बापमुलांमधलं प्रेम आणि दुरावा, ट्रिलॉनी आणि डेलानो यांचा जगण्यासाठी चाललेला संघर्ष, वारसा हक्काने मिळणाऱ्या (वा न मिळणाऱ्या) घराची कथा, हे घटक इथे वारंवार येत राहतात, आणि त्यांचं काय होतंय हा विचार एक वाचक म्हणून आपण करत जातो. त्याबरोबरच फ्लॉरिडाच्या किनारपट्टीवर १९९२ मध्ये धडकलेल्या अ‍ॅन्ड्रू वादळापासून ते २००८ च्या रिसेशनमुळे ओढवलेल्या कठीण परिस्थितीपर्यंत अनेक तपशीलही आपल्याला हे कथानक ज्या काळात घडतंय त्याची जाणीव करून देत राहतात.

मला सर्वात प्रभावी वाटलेल्या कथा म्हणून मी यातल्या दोन कथांचा उल्लेख करेन. या दोन्ही कथांचे निवेदन तृतीयपुरुषी आहे, पण आशयसूत्र, पार्श्वभूमी यांमध्ये फार साम्य नाही. दोन्हीतलं वातावरण त्या त्या कथेच्या विषयाबद्दलचा प्रचंड तपशील बरोबर घेऊन येतं आणि कथासूत्रांचा विचार केला, तर पुस्तकाच्या एकूण रचनेत त्या चपखल बसतात. यातली पहिली कथा ‘स्प्लॅशडाउन’ ही मुख्य कुटुंबाशी फार जोडली नसली, तरी बापमुलाच्या नात्याचं अवघडलेपण ती अचूक पकडते. ट्रिलॉनी/डेलानोच्या नात्यातला कुकी आणि तो दीड महिन्याचा असतानाच त्याला टाकून गेलेला त्याचा बाप ऑक्स, यांची ही कथा आहे. ती कादंबरीच्या ऐवजाबरोबर येतात त्या वर्गात मोडणारी, मोठय़ा कालावधीत घडणारं गुंतागुंतीचं कथानक मांडणारी आहे. तेरा वर्षांचा कुकी आपल्या बापाला पहिल्यांदा भेटायला त्याच्या बोटीवर जातो, तिथे ही कथा सुरू होते. कालांतराने कुकी स्वत: बाप होईपर्यंतचा तिचा प्रवास आहे. या कथेतला ट्विस्ट आपण आधी ओळखू शकतो, पण त्यामुळे त्याचा प्रभाव कमी होत नाही.

दुसरी कथा आहे, ती लांबच लांब नावाची. ‘इफ ही सस्पेक्टेड ही वुड गेट समवन किल्ड धिस मॉर्निग, डेलानो वुड नेव्हर लीव्ह हिज काउच.’ हे कथेचं नावच तिचं पहिलं वाक्य म्हणता येईल, कारण कथा या शीर्षकाला जोडूनच पुढे सुरू राहते. ‘स्प्लॅशडाऊन’सारखी ही कथा मोठा काळ व्यापत नाही. इथल्या मुख्य घटना एकाच दिवसात घडणाऱ्या आहेत, पण बॅकस्टोरी लांबलचक आणि पुस्तकातल्या मूळ कथानकाशी जवळून संबंध असलेली आहे. आपला बागकामाचा डबघाईला आलेला व्यवसाय टिकवून ठेवण्याची डेलानोची धडपड या कथेत येते आणि आधी तसा दुय्यम वाटणारा डेलानो, इथे सशक्त व्यक्तिरेखा म्हणून समोर येतो.

या पुस्तकात दोन जागा अशा आहेत, ज्या थोडय़ा वेगळय़ा असत्या तर आवडलं असतं. पहिली म्हणजे सान्यावर फोकस असलेल्या कथेचा अभाव. इथल्या सर्व कथा पुरुषांच्या ‘इमिग्रन्ट एक्सपिरिअन्स’विषयी बोलतात, पण कुटुंबात आईची व्यक्तिरेखा असताना, आणि तिचे अनेक उद्योग चालू असताना, ती पार्श्वभूमीलाच राहते. इतरांच्या कथांमध्ये तिचा संदर्भ येत राहतो, पण त्यापलीकडे तिला महत्त्व मिळत नाही, तिची बाजू आपल्याला पुरती कळत नाही. दुसरी जागा म्हणजे ‘ऑड जॉब्स’ या कथेचा तुटक शेवट. वडिलांनी घराबाहेर काढलेल्या ट्रिलॉनीची परिस्थिती सांगणारी ही कथा, जेवढी आहे, तेवढीदेखील फारच सुंदर आहे. पण तिचा शेवट एस्कोफरीने हातचं राखून केल्यासारखा वाटतो. ती आणखी पुढे गेली असती तर तिचा परिणाम अधिक गहिरा होऊ शकला असता.

‘इफ आय सव्‍‌र्हाईव्ह यू’ या शीर्षकातला ‘सव्‍‌र्हाईव्ह’ हा शब्द महत्त्वाचा आहे, कारण ‘सव्‍‌र्हायव्हल’साठीच तर सगळं चाललेलं आहे. इथल्या प्रमुख पात्रांचा अवघड वाटेवरून होणारा हा प्रवास ही एका अस्वस्थ काळाची नोंद आहे. भेदक, आणि कायम लक्षात राहील अशी.

इफ आय सव्‍‌र्हाईव्ह यू लेखक : जोनथन एस्कोफरी प्रकाशक : हार्पर कॉलिन्स पृष्ठे : २७२; किंमत : ४९९ रुपये 

वाचनदुवे

जोनथन एस्कोफरीची मुलाखत..

https://hazlitt.net/feature/sink-back-what-was-lost-interview-jonathan-escoffery

एस्कोफरीच्या या पुस्तकातील एक भाग

https://www.oprahdaily.com/entertainment/books/a40653557/splashdown-excerpt-if-i-survive-you-jonathan-escoffery/ ganesh.matkari@gmail.com