अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत यंदा स्थलांतराचा मुद्दा असणारच, याची चुणूक तिथल्या रिपब्लिकन पक्षाचे उपाध्यक्षपदाचे उमेदवार जे. डी. व्हान्स यांच्या वक्तव्यांतून मिळालेली आहे. त्यात डेमॉक्रॅटिक पक्षाच्या उमेदवारीसाठी विद्यामान उपाध्यक्ष कमला हॅरिस यांचं नाव पुढे असल्यानं ‘ते बाहेरून येतात, आपल्यापुढे जातात’ या दुर्भावनेवर फुंकर घालण्याचं काम कमला हॅरिस यांचे विरोधक नक्कीच करणार आहेत. अशा काळात स्थलांतराची बाजू ठामपणानं कुणीतरी घेतं आहे…
‘अमेरिकेची दक्षिण सीमा सुरक्षितच आहे- उलट भिंती/ कुंपणं बांधल्यानं ती असुरक्षित होईल’, ‘असं कुंपण घालूनही, दक्षिण अमेरिकेतून उत्तर अमेरिकेत होणारं स्थलांतर थांबणार नाही’, ‘स्थलांतरितांचं गुन्हेगारीकडे वळण्याचं प्रमाण हे त्याच देशात जन्मलेल्या ‘देशजां’पेक्षा नेहमीच कमी असतं’, ‘स्थलांतरित लोक हे नव्या प्रदेशाची भाषा शिकायला तयार असतात’, ‘स्थलांतरित हे त्या देशाच्या कल्याणकारी योजनांवरला बोजा वाढवत नाहीत’, ‘स्थलांतरितांनी एखाद्या देशातून आपापल्या मायदेशी पाठवलेल्या रकमांमुळे त्या (पर)देशाचं आर्थिक नुकसान होत नाही’ , ‘ब्रेग्झिटमुळे ब्रिटनमधलं स्थलांतर थांबलं नसतंच, थांबणारही नाही’ आणि अखेर, ‘स्वागतशील (स्थलांतरितांना वाव देणारी) शहरं हीच दीर्घकाळात प्रगती करणारी ठरतात’ ही विधानं डोनाल्ड ट्रम्पसारख्या उमेदवारांच्या आणि स्थलांतरविरोधी ट्रम्पसमर्थकांच्या राजकीय प्रतिवादासाठी कुणी कुठल्या व्यासपीठावरून केलेली नाहीत. स्थलांतराचे अभ्यासक, वॉशिंग्टन डीसीतल्या ‘अमेरिकन युनिव्हर्सिटी’मधल्या स्थलांतर अभ्यास केंद्राचे प्रमुख व अमेरिकेखेरीज पॅरिस, बार्सिलोना आदी शहरांच्याही स्थलांतर व स्थलांतरविरोधाचा अभ्यास केलेले समाजशास्त्रज्ञ अर्नेस्टो कास्टानेडा यांच्या नव्या पुस्तकाच्या अनुक्रमणिकेचं भाषांतर म्हणजे ही विधानं!
‘इमिग्रेशन रिअॅलिटीज- चॅलेंजिंग कॉमन मिसकन्सेप्शन्स’ या नावाचं हे पुस्तक कोलंबिया विद्यापीठानं प्रकाशित केलं आहे. साहजिकच, यातलं प्रत्येक विधान आकडेवारीनिशी सिद्ध करण्याची जबाबदारी प्रा. कास्टानेडा आणि सहलेखिका कॅरिना सिओन यांनी पार पाडलेली आहे, म्हणून हे पुस्तक रोचक ठरतं…‘स्थलांतर’ हा मुद्दा अमेरिकेप्रमाणेच ब्रिटनमध्येही येत्या काही आठवड्यांत (सत्तेवर आलेल्या मजूर पक्षाच्या स्थलांतरित-विषयक धोरणामुळे) गाजणार आहे, त्या वादात राजकारण किती आणि तथ्य किती, हे लक्षात येण्यासाठी हे पुस्तक महत्त्वाची भूमिका बजावू शकतं.
हेही वाचा
काही महिन्यांपूर्वीच पॉल यामाझाकी यांचे ‘रिडिंग रूम : ए बुकसेलर्स टेल’ हे पुस्तक प्रकाशित होऊन खूपविके ठरले. गेली पन्नास वर्षे ते अमेरिकेतील सनफ्रान्सिस्को शहरात ‘सिटी लाइट बुक स्टोअर’ चालवत आहेत. या पुस्तकानिमित्ताने त्यांची ‘पॅरिस रिव्ह्यू’मधील मुलाखत…
https://shorturl.at/Yay73
उचे ओकोनक्वो ही नायजेरियामधील कथालेखिका. ‘केन’ पारितोषिकासाठी (आफ्रिकी बुकर) नामांकन मिळण्याआधी तिचा ‘ए काइंड ऑफ मॅडनेस’ नावाचा कथासंग्रह प्रकाशित झाला. दरवर्षी ‘केन’ पारितोषिकाच्या संकेतस्थळावर नामांकन मिळालेल्या कथा मोफत वाचता येतात. यंदा हा शिरस्ता मोडण्यात आला असला तरी ओकोनक्वो हिची कथा प्रकाशित करणाऱ्या मासिकाने उपलब्ध करून दिलेली ‘अॅनिमल्स’ ही केन नामांकित कथा.
https://shorturl.at/NJkab
मेरी गेटस्कील या कथालेखिका ‘ग्रँटा’ मासिकासाठी गेल्या काही वर्षांत उत्तम आत्मकथनात्मक निबंध लिहीत आहेत. २०१९ साली आपल्या हरवलेल्या बोक्यावर लिहिलेला ‘लॉस्ट कॅट’ हा निबंध गाजलेला होता. ‘न्यूमा इल्यूजन’ नावाचा त्यांचा नवा निबंध. (ज्यात लॉस्ट कॅटचाही दुवा ग्रॅण्टाने दिला आहे. तो वाचण्यासाठी…
https://shorturl.at/doqni
© The Indian Express (P) Ltd