हल्ल्यानंतर आपल्याला दुसरं आयुष्य मिळाल्याच्या भावनेतून रश्दीनं जगतानाचं आतापर्यंतचं आपलं सगळं संचित या पुस्तकात ओतलेलं आहेच; पण प्रेम, स्वातंत्र्य, धर्मनिंदा, उदारमतवाद… यांबद्दलची मतं ठामपणे आणि खुसखुशीत भाषेत मांडल्यामुळे ते वाचनीय किंवा ‘रश्दींचं’ पुस्तक ठरतं!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
१२ ऑगस्ट २०२२ : विख्यात लेखक सलमान रश्दी (किंवा रुश्दी) एका ठिकाणी व्याख्यानाला गेला होता. व्याख्यानाचा विषय होता ‘लेखकांची सुरक्षितता’. या विषयावर बोलण्यासाठी इतर कुणी लेखक कदाचित रश्दीइतका सुयोग्य ठरला नसता. १९८८ सालच्या त्याच्या ‘सटॅनिक व्हर्सेस’ कादंबरीमुळे त्याचा जीव धोक्यात आला होता. पुस्तकात इस्लामची निंदा असल्याचा आरोप झाला. अनेक देशांनी त्यावर बंदी घातली. इराणच्या सर्वेसर्वा खोमेनीने रश्दीविरोधात मृत्युदंडाचा फतवा काढला. प्राणघातक हल्ल्याच्या सावटाखाली रश्दी जगू लागला. अशी काही वर्षं गेली. हल्ला काही झाला नाही (किंवा ब्रिटिश सरकारनं दिलेल्या सुरक्षाकवचामुळे हल्ला होऊ शकला नाही.) अखेर स्कॉटलंड यार्डनं सांगितलं की आता वातावरण निवळलं आहे; हत्येचा कट शिजत असल्याचं दिसत नाही. रश्दी निर्धास्त झाला. पुुन्हा भीतीच्या सावटाखाली जगावं लागेल असं त्याला वाटेनासं झालं. आणि मग १२ ऑगस्ट २०२२ उजाडला. व्याख्यानासाठी ७५ वर्षांचा रश्दी व्यासपीठावर गेला असता अचानक प्रेक्षागृहातून चोवीस वर्षांचा एक तरुण समोर आला. अवघ्या सत्तावीस सेकंदांत त्यानं रश्दीच्या शरीरावर चाकूचे पंधरा वार केले.
हेही वाचा >>> संविधानभान : अटकेच्या विरोधात संरक्षण
हल्ल्यातून तो वाचेल का, याविषयी काहीच सांगता येत नव्हतं. आठएक तास त्याच्यावर अनेक शस्त्रक्रिया करण्यात आल्या. डॉक्टरांच्या मते माणूस मारण्याच्या कामात हल्लेखोर अगदीच नवखा असल्यामुळेच रश्दीचा जीव वाचला. मात्र, एका डोळ्याची नस तुटली असल्यामुळे तो डोळा वाचवता आला नाही. चाकू एखादा मिलिमीटर आणखी घुसता तर मेंदूला इजा झाली असती. शरीर इतक्या ठिकाणी फाटलेलं होतं की जखमा भरेपर्यंत पुढचे काही दिवस ते स्टेपल लावून कसंबसं जोडून ठेवावं लागलं. त्यातून विविध द्रव स्रावत होते आणि पिशव्या लावून काढले जात होते. काही काळ रुग्णाला आरसा दाखवलाच गेला नाही. आपलं रूप पाहून बसलेला धक्का त्याला कदाचित सोसला नसता. नंतर कित्येक महिने वेगवेगळे उपचार चालू राहिले. मनावरचा आघात ही तर वेगळीच गोष्ट होती. या सगळ्यावर मात करून ‘नॉर्मल’ आयुष्य जगण्यासाठी रुग्णानं जे काही करणं गरजेचं होतं ते सारं रश्दीनं केलंच, पण ते पुरेसं नव्हतं. मग एका लेखकाला जे जमतं तेच त्यानं केलं – एक पुस्तक लिहिलं : ‘नाइफ’. जोवर आपण हे लिहून टाकत नाही, तोवर आपण अडकलो आहोत, आणि आपल्या हातून काही लिहिलं जाणार नाही, ही जाणीवच पुस्तकामागची प्रेरणा ठरली. आता आपल्याला दुसरं आयुष्य मिळालेलं आहे या भावनेतून रश्दीनं जगतानाचं आतापर्यंतचं आपलं सगळं संचित या पुस्तकात ओतलेलं आहे.
प्रखर प्रकाशातला ससा
भाषाप्रभू रश्दीची चमकदार शब्दकळा आणि प्रभावी शैली सुरुवातीपासूनच वाचकाचा ताबा घेते. चाकूहल्ल्याचं वर्णन करून झाल्यावर तो म्हणतो : ‘११ ऑगस्टची संध्याकाळ माझ्यासाठी अखेरची निरागस संध्याकाळ ठरली.’
आपल्या कथात्म साहित्याप्रमाणेच इथेही रश्दी एक विलक्षण प्रतिमाविश्व उभं करतो. स्टेजवर जाण्यापूर्वी मिळालेला मानधनाचा चेक रश्दीनं खिशात ठेवला होता. त्याच्या रक्तानं माखलेला तो चेक आता पुरावा म्हणून पोलिसांच्या ताब्यात आहे. रक्तबंबाळ अवस्थेत तो खाली कोसळल्यावर तातडीच्या उपचारांसाठी त्याचे कपडे फाडून काढले गेले. तेव्हा त्याच्या मनात विचार आला : ‘माझा राल्फ लॉरेनचा (महागडा) सूट!’ हल्लेखोर समोरून येताना दिसला तरी आपण स्वरक्षणासाठी एकही पाऊल उचलू शकलो नाही, हे सांगताना तो स्वत:साठी प्रखर हेडलाइट्समुळे गांगरून गेलेल्या सशाची प्रतिमा वापरतो. त्याची विनोदबुद्धीही दिसत राहते. उपचारांदरम्यान कुणी तरी त्याला त्याचं वजन विचारतं. ते सांगताना आपल्याला शरम वाटली होती हे तो कबूल करतो. प्रचंड रक्तस्राव झाल्यामुळे आपलं वजन कमी झालं हे सांगताना तो म्हणतो, वजन कमी करण्यासाठी चाकूहल्ला हा काही उपाय नाही.
आपल्याच शरीराचं शैलीदार वर्णन रश्दी करतो. जो डोळा गमवावा लागला तो काही काळ खोबणीतून बाहेर लोंबत होता. त्यासाठी रश्दी सॉफ्ट-बॉइल्ड अंड्याची प्रतिमा वापरतो. इंटेन्सिव्ह केअरपासून रिहॅबपर्यंतचा त्याचा प्रवास पुस्तकात तपशीलवार येतो. त्यातही विनोदाची पखरण आहे. उदा. कालांतरानं सगळ्या जखमा भरल्या तेव्हा त्याला स्वत:त वूल्व्हरीनचा भास होतो. हॉस्पिटलच्या खोलीबाहेर बसलेले पोलीस एकमेकांना अश्लील विनोद सांगून पहाटे तीन वाजता खदाखदा हसत का असावेत, असा प्रश्न त्याला पडतो.
हेही वाचा >>> अन्वयार्थ : ‘विशेष वागणुकी’ला मुदतवाढ नाही!
पलंगाला खिळलेला असूनही रश्दीचा विचारप्रवाह सर्वत्र फिरत राहतो. कधी त्याला इंगमार बर्गमनच्या ‘सेवन्थ सील’ चित्रपटातला मृत्यूशी बुद्धिबळ खेळून मरण टाळू पाहणारा सरदार आठवतो. तर कधी ‘शालिमार द क्लाऊन’ या आपल्या काश्मीरवरच्या कादंबरीचा उगम एका चाकूहल्ल्याच्या प्रतिमेतून झाला हे त्याला स्मरतं.
हल्लेखोराशी ‘संवाद’
पुस्तकाची रचना साधारण कालक्रमानुसार आहे. हल्ल्यापासून सुरुवात आणि त्यानंतरचा हॉस्पिटल ते रिहॅब ते नॉर्मल आयुष्याकडे असा हा प्रवास आहे. पण रश्दी आपल्या इतर पुस्तकांप्रमाणेच त्यात अधूनमधून विविध वळणं घेत राहातो. त्यांपैकी एक वळण म्हणजे आपण हल्लेखोराला भेटायला तुरुंगात जातो अशी कल्पना करून रश्दी त्याच्याशी काल्पनिक संवाद साधतो. हल्लेखोराची काही प्रत्यक्षातली वक्तव्यं आणि त्याच्या पूर्वायुष्याविषयीची उपलब्ध माहिती यावरून हे प्रकरण बेतलेलं आहे. हल्लेखोराची मानसिकता किंवा त्याचं हल्ल्यामागचं तर्कशास्त्र समजून घेण्याचा हा प्रयत्न फारसा जमलेला नाही. ‘सॅटनिक व्हर्सेस’ लिहिल्याबद्दल मला आजही पश्चात्ताप होत नाही, पण त्याचं इथे पुन्हा समर्थन करायची आपली इच्छा नाही असं रश्दी म्हणतो. धर्माविषयीची आपली धारणा मात्र तो स्पष्ट करतो : स्वेच्छेनुसार खासगी आयुष्यात धर्म पाळता यावा, पण धर्मावर जाहीर टीका किंवा धर्माची चेष्टा करण्याचं स्वातंत्र्य माणसाला असायला हवं. एकीकडे धर्माधिष्ठित राजकारण अधिक प्रभावी होतंय आणि त्याच वेळी अनेक उदारमतवादी लोक सर्वधर्मांप्रति सहिष्णुतेची गुळमुळीत भूमिका घेऊन धर्मावर टीका करणं टाळतायत याची त्याला खंतही वाटते.
भारतानं माझ्याबद्दल पुरेसं प्रेम व्यक्त केलं नाही अशीही एक खंत रश्दीला आहे, पण तरीही त्याच्या मनातलं भारताचं स्थान अढळ आहे. उदा. यापुढे एका डोळ्यानं कसं जगायचं, असा विचार करताना पतौडी एका डोळ्यानं क्रिकेट खेळायचा हे त्याला आठवतं. हल्ल्यानंतरचा तिसराच दिवस १५ ऑगस्ट होता. नेमक्या त्याच दिवशी डॉक्टरांनी जिवावरचा धोका टळल्याची अखेर ग्वाही दिली. तेव्हा त्याला ‘मिडनाइट्स चिल्ड्रेन’मधला १५ ऑगस्टला जन्मलेला सलीम आठवतो. आपण जगणार ही जाणीव त्याला नव्यानं मिळालेल्या स्वातंत्र्यासारखी वाटते. ज्या ‘सॅटानिक व्हर्सेस’ कादंबरीवरून पुढचं सगळं रामायण घडलं त्याची सुरुवात तो उद्धृत करतो : जिब्रिल फरिश्ता स्वर्गातून पडतापडता म्हणाला, ‘‘पुन्हा जन्माला येण्यासाठी आधी तुम्हाला मरावं लागतं.’’
मृत्यूचं सावट
रश्दीच्या पत्नीनं अतिशय धीरानं या काळात त्याला प्रेम आणि आधार दिला. त्यामुळे पुस्तकाचा काही भाग तिच्याविषयी आणि त्यांच्या प्रेमकहाणीविषयीही आहे. हल्ल्यानंतर अनेक लोकांकडून अनपेक्षित प्रतिसाद मिळाल्याचं तो सांगतो. १९८९च्या फतव्यानंतर ‘कादंबरी कशी वाईटच आहे,’ किंवा त्यानं ‘हे संकट स्वत:वर ओढवून कसं घेतलं’ अशा प्रकारच्या अवाक करणाऱ्या प्रतिक्रिया काही परिचितांकडून त्याला मिळाल्या होत्या. यावेळी मात्र परिस्थिती त्याच्या उलट होती. अनेक परिचित-अपरिचित लोकांनी हल्ल्याचा जाहीर निषेध केला आणि रश्दीला पाठिंबा दिला. हल्ला झाला तेव्हा त्याची ‘व्हिक्टरी सिटी’ ही कादंबरी प्रकाशित होऊ घातली होती. यथावकाश ती झालीही, पण तिच्या प्रसिद्धीसाठी जगभरात आयोजित केलेल्या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याच्या अवस्थेत रश्दी नव्हता. तेव्हा मार्गारेट अॅटवूडसारख्या त्याच्या स्नेह्यांनी कादंबरीच्या प्रसिद्धीला हातभार लावला. कादंबरीची परीक्षणं समीक्षकांनी ‘बिच्चारा रश्दी’ असा विचार न करता मनापासून लिहिली. भारतीय माध्यमांतूनही कादंबरीची स्तुती झाली त्यानं तो हरखून गेला. ह्या सगळ्यातून त्याला जी उमेद आणि जो दिलासा मिळाला त्याविषयी तो कृतज्ञतेनं लिहितो. पण तरीही पुस्तकावर मृत्यूचं सावट असल्याचं सातत्यानं जाणवतं. त्याच्या अनेक लेखक मित्रांचं या काळात निधन झालं (उदा. मार्टिन एमिस, मिलान कुंदेरा). हे मित्र आता नाहीत आणि आपण मात्र जीवघेण्या हल्ल्यातून वाचल्यामुळे आनंदी आहोत; जणू मृत्यू चुकीची माणसं घेऊन जातोय, अशी सल रश्दीला बोचत राहते. ती त्यानं अतिशय हृद्या शब्दांत मांडली आहे.
एका बैठकीत पुस्तक वाचून काढावंसं वाटेल अशी ताकद आजही रश्दीकडे आहे. प्रेम आणि स्वातंत्र्य या दोन मुद्द्यांकडे पुस्तक जेव्हाजेव्हा येतं तेव्हा ते अंतर्मुख करतं. आपण काही म्हणालो तर त्याचे काय परिणाम भोगावे लागतील याविषयी जर भीती वाटत असेल तर तुम्ही स्वतंत्र नाहीत हे रश्दी ठामपणे बजावतो. याउलट, ‘मी जिवंत आहे, मी स्वतंत्र आहे,’ हा घोष तो करत राहतो. इतक्या भयावह हल्ल्यातून उभं राहून आणि त्यामागच्या पराकोटीच्या द्वेषाला सामोरं जाऊन पुन्हा जगण्याची इच्छा आपल्यात तेवत ठेवण्यासाठी प्रेम किती गरजेचं होतं याचीही जाणीव तो करून देतो.
कवितेनं गोळी थांबवता येत नाही, आणि कादंबरीनं बॉम्ब निकामी करता येत नाही, पण मारामारी करायची वेळ आलीच, तर भाषा हाच माझा चाकू असेल; मला विरोध करणाऱ्या लोकांपेक्षा अधिक चांगल्या कथा मी सांगितल्या तर त्या माझ्या मृत्यूनंतरही टिकून राहतील, असा आश्वासक सूर पुस्तकात आहे. आणि हे सगळं विनोदबुद्धी शाबूत ठेवून करायला रश्दीला जमतं. खोमेनीच्या फतव्याची तारीख १४ फेब्रुवारी होती. आपल्या पुस्तकाविषयीचा वाद म्हणजे विनोदबुद्धी असलेले आणि ती नसलेले यांच्यातला वाद आहे हे लक्षात घ्या असं तो सांगतो. हे असं सगळं तोच म्हणू जाणे, आणि असं सगळं म्हणतो म्हणूनच तो सलमान रश्दी आहे, याची पुन्हा एकदा प्रचीती हे पुस्तक देतं.
‘नाइफ ’
लेखक : सलमान रश्दी
प्रकोशक : पेन्ग्विन (हॅमिश हॅमिल्टन),
पृष्ठे : ३२०; किं मत : ६९९ रु .