रुपेश मडकर

हर्षवर्धन किंवा गुप्त आणि दिल्ली सुलतान यांच्यामध्ये ६०० वर्षांचे अंतर होते. या कालखंडाच्या इतिहासाविषयी..

भारतीय इतिहास लेखनामध्ये दक्षिण भारताच्या इतिहास लेखनावर अन्याय झाल्याचे अनेक इतिहासकारांनी दाखवून दिले आहे. येथील इतिहास लेखन ‘उत्तरकेंद्री’ असल्याचाही आरोप होतो. वासाहतिक काळातील गरजेतून ब्रिटिशांनी भारतीय ऐतिहासिक वाटचालीवर टीका केली. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी इतिहासकारांनी जो इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला त्यातून ‘उत्तरकेंद्री’ मांडणी झालेली दिसते. पुढे भारतीय इतिहास लेखनावर तोच प्रभाव टिकून राहिला. भारतीय इतिहासाच्या अशा मांडणीला काही प्रमाणात दुरुस्त करण्याचा प्रयत्न अलीकडचे इतिहासकार करताना दिसतात. त्यापैकी मनू पिल्लै व अनिरुद्ध कनिसेट्टी यांचे लिखाण महत्त्वाचे आहे. याच मालिकेतील अनिरुद्ध कनिसेट्टी यांचे ‘लॉर्ड्स ऑफ द डेक्कन’ हे पुस्तक महत्त्वाचे आहे.

भारतीय इतिहास लेखनात दक्षिणेला वगळण्याचे जे प्रयत्न झाले त्यावर कनिसेट्टी टीका करतात. ‘शाही क्षणांना’ जे महत्त्व दिले गेले त्यातून उत्तरकेंद्री मांडणी झाल्याचे ते स्पष्ट करतात. भारतीय इतिहास लेखनात कालानुक्रम सांगताना वैदिक, मौर्य, गुप्त, हर्षवर्धन यानंतर थेट दिल्ली सुलतान यावर उडी मारली जाते व पुढे मुघल, ब्रिटिश आणि भारतीय स्वातंत्र्यलढा असा भारताचा इतिहास मांडला जातो. हर्षवर्धननंतर किंवा गुप्तनंतर दिल्ली सुलतान यांच्यामध्ये असलेले ६०० वर्षांचे अंतर व त्याचा इतिहास फारसा सांगितला जात नाही, हे कनिसेट्टी स्पष्ट करतात.

या ६०० वर्षांतील घडामोडींचा भारतीय उपखंडावर मोठा प्रभाव आहे. इतिहासाच्या अनेक विद्यार्थ्यांनाही महाराष्ट्राचा संगतवार इतिहास सांगता येत नाही. याचे कारण आणखी भिन्न आहे. त्र्यं. शं. शेजवलकर यांनी ते पूर्वीच स्पष्ट केले आहे. शेजवलकर म्हणतात त्याप्रमाणे ‘महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसलेला समंध’ हे त्याचे कारण! अर्थात हा समंध दुहेरी आहे.

महाराष्ट्रावर मराठय़ांच्या इतिहासाचा इतका पगडा आहे की त्याआधीचा इतिहास महाराष्ट्राला आहे की नाही, असा प्रश्न पडावा इतके कमी संशोधन या काळावर झाले. मराठय़ांआधीच्या घडामोडींनीही महाराष्ट्राचे व दख्खनचे वर्तमान घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे, हेच आपण विसरून जातो, हा शेजवलकर यांना अपेक्षित असलेला अर्थ! या समंधाचा दुसरा अर्थ म्हणजे इतिहासाची उत्तरकेंद्री मांडणी हा होय. या कचाटय़ात महाराष्ट्रातील इतिहास लेखन अडकून पडले आहे. मराठय़ांनी अटकेपार झेंडा फडकवला, हे जसे महत्त्वाचे तसेच राष्ट्रकुटांनी एकेकाळी उत्तर व दक्षिण दोन्ही भागांवर वर्चस्व गाजवले हेदेखील तेवढेच महत्त्वाचे.

दक्षिण भारतात सातवाहनानंतर चालुक्यांनी सत्ता स्थापन केली. तुंगभद्रा नदीच्या दक्षिणेस मलप्रभा खोऱ्यात प्रथमच अशी सत्ता निर्माण होत होती. चालुक्यांनी मंदिरांपासून धार्मिक विधी, राज्य पद्धती, संस्कृत भाषा, व्यापारातील प्रयोग अशा गोष्टी प्रथमच दक्षिणेत रुजवण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. हर्षवर्धन या उत्तरेकडील सर्वात प्रबळ राजास नर्मदेच्या तीरावर पराभूत करून चालुक्यांनी दक्षिणेत आपले स्थान पक्के केले. चालुक्य हे दख्खनचे अधिपती झाले. या सुमारास मलप्रभा खोऱ्यात शैव पंथ रुजवण्यातून या प्रदेशातील धार्मिकतेला आकार देण्याचा प्रयत्न केला. अश्वमेधसारख्या विधींतून धर्माची अधिमान्यता मिळवली. शेतकरी पार्श्वभूमीच्या या राजांनी संस्कृत भाषेचा वापर राजकीय कार्यासाठी करून आपली राज्यकर्ता म्हणून नवी ओळख अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला.

तामिळ प्रदेशातील पल्लवांशी चालुक्यांचा संघर्ष होत राहिला. संपूर्ण दक्षिणेवर ताबा मिळवण्याच्या प्रयत्नांतून चालुक्य व पल्लव यांच्यात जो राजकीय संघर्ष निर्माण झाला त्याने पुढे पिढीजात संघर्षांचे रूप धारण केले. चालुक्यांनी पल्लवांची राजधानी कांचीपुरम लुटून जाळली. याचा बदला म्हणून पल्लवांनी वातापी ही चालुक्यांची राजधानी नेस्तनाबूत केली.  शत्रूवर विजय मिळवल्यावर त्याचे स्मरण म्हणून तसेच प्रजेवर आपल्या शौर्याचा अमीट ठसा उमटावा म्हणून मोठमोठी मंदिरे बांधली जाऊ लागली. पट्टदक्कल येथील लोकेश्वर मंदिर चालुक्यांनी पल्लवांवर विजय मिळवल्यावर बांधले. मग पल्लवांनी चालुक्यांना पराभूत केल्यानंतर राजाच्या नावाने शहर वसवले ते महामल्लपूरम अर्थात महाबलीपुरम! येथे मंदिरे बांधली तसेच एका मोठय़ा शिळेवर अर्जुनाची तपश्चर्या अथवा गंगावतरण ही कथा दर्शवणारे शिल्पचित्र करून घेतले. या शिल्पचित्रांतून राजकीय संदेश दिला जाई. त्या अर्थाने मंदिरे, शिळा, मंदिरांच्या िभती हे त्या त्या राज्याचे महत्त्व व शक्ती प्रदर्शित करण्यासाठीच्या जागा झाल्याचे कनिसेट्टी नमूद करतात. पुढच्या पिढीत चालुक्यांना जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्यांनी महाबलीपुरम येथील अर्जुनाची तपश्चर्या अथवा गंगावतरण या अप्रतिम शिल्प चित्रातील तीन पल्लव राजांच्या शिल्पाचे शीर उडवले व आपली सुडाची भावना शमवली. 

 ती आपल्यासारखीच हाडामांसाची माणसे होती. क्रोध, मान, माया, लोभ आदी षड्रिपू  त्यांनाही ग्रासून होते. मध्ययुगीन राजे हे फक्त महान होते, सर्व सद्गुण धारण करणारे होते, असे जे एकरंगी चित्र ऐतिहासिक कादंबऱ्या वा मालिकांतून रंगविले जाते ते पूर्णपणे एकांगी असल्याचे कनिसेट्टी आवर्जून नमूद करतात. त्या काळात काय प्रकारची घुसळण होत होती, विविध राजवटींसमोर असलेले प्रश्न, अन्य राज्यांसोबतचे संबंध कसे हाताळले जात होते याचा एक बहुरंगी व बहुढंगी आणि अत्यंत रसरशीत इतिहास आहे. मात्र तत्कालीन परिस्थितीचे एकांगी चित्रण केले गेल्यामुळे तो काळ निरसपणे आपल्यासमोर येतो, हा मुद्दा कनिसेट्टी अधोरेखित करतात. भारतीय उपखंडात दक्षिणेच्या प्रभुत्त्वाची पहाट चालुक्य रूपाने झाली. त्याच आकाशातील तळपता सूर्य राष्ट्रकूट राज्यसत्ता होती व दक्षिणेच्या प्रभुत्त्वाचा अस्त उत्तर चालुक्य किंवा कल्याणी चालुक्यांच्या राजवटीत झाला, या अर्थाचे  सूचन करणारे, प्रस्तुत ग्रंथाचे तीन भाग लेखकाने केले आहेत. राष्ट्रकूट हे चालुक्यांच्या अधिपत्याखाली असणारे स्थानिक अधिकारी व सत्ताधारी होते. त्यांनी खिळखिळय़ा होणाऱ्या चालुक्य राजवटीचा फायदा घेऊन स्वत:चे राज्य निर्माण केले. त्यांचे सुरुवातीचे स्थान वेरूळ परिसरात होते. उरल्यासुरल्या चालुक्य राजवटीला नष्ट करून तसेच चालुक्यांच्या नातेसंबंधांतील अन्य महत्त्वाच्या राजांना पराभूत करून राष्ट्रकूट राजांनी आपले राज्य स्थिर केले. आपल्या वाढत्या शक्तीचे वलय मांडण्यासाठी मंदिराचा पर्याय राष्ट्रकुटांनीही निवडला.

 चालुक्यांनी पट्टदक्कल येथे उभारलेल्या मंदिरापेक्षा दुप्पट मोठे मंदिर एका शिळेत कोरण्यात आले व पुढील अनेक पिढय़ा आश्चर्यचकित होतील अशी कारागिरी तत्कालीन कारागिरांनी केली. हे मंदिर म्हणजे राष्ट्रकूट कृष्ण याने आपल्या नावे स्थापन केलेले शिवाचे कृष्णेश्वर अथवा कैलास मंदिर होय. कनिसेट्टी यांनी या ग्रंथात अनाम स्थपती असा उल्लेख अनेक ठिकाणी केला असला तरी या मंदिराचे मुख्य स्थपती म्हणून कोकसवर्धक यांचे नाव टी. व्ही. पथी व अन्य अभ्यासकांनी केलेल्या संशोधनातून पुढे आणले आहे. कनिसेट्टी यांनी हे नाव का स्वीकारले नाही याचे कुठलेही स्पष्टीकरण त्यांनी दिलेले नाही. पुढे जसे राज्य वाढले तसे राष्ट्रकुटांनी मान्यखेत (उत्तर कर्नाटक) येथे आपली राजधानी स्थापन केली. भारतीय उपखंडातील उत्तरेकडचे सर्वात महत्त्वाचे राजकीय ठिकाण म्हणून कनौजचे महत्त्व निर्विवाद होते. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी गुजरातचे प्रतिहार व बंगालमधील पालांचे प्रयत्न सुरू होते. त्यावर मात करत राष्ट्रकुटांनी कनौज ताब्यात घेतले. तसेच दक्षिणेकडे कांचीपर्यंतचा प्रदेश ताब्यात घेतला. त्यांनी भारतीय उपखंडामध्ये निर्विवाद वर्चस्व निर्माण केले.

त्यांनी वाढत्या व्यापारावर नियंत्रण प्रस्थापित केले. व्यापारासाठी सवलती दिल्या. अनेक व्यापारी महत्त्वाच्या बंदरांत स्थायिक झाल्याचे दिसते.  अमोघवर्ष या राष्ट्रकूट राजाने राजकीय आक्रमणे न करता शांततापूर्ण राज्य केले. त्याच्या ५० वर्षांच्या राजवटीत या प्रदेशात शांतता होती. या काळात कला, संस्कृती व व्यापाराच्या भरभराटीला हातभार लागला. अमोघवर्षने राजदरबारात संस्कृतऐवजी कन्नड भाषेच्या वापराला प्रोत्साहन दिले. राज्य व्यवहार आणि साहित्यनिर्मितीही कन्नडमध्ये होऊ लागली. यातून हळूहळू कन्नड भाषेची भरभराट झाली आणि दक्षिणेकडील प्रादेशिक भाषांच्या वाटचालीला चालना मिळाली. पुढे वेंगीच्या राजांनी हाच कित्ता गिरवून तेलुगु भाषेतून साहित्यनिर्मितीला प्रोत्साहन दिले.

या राजांनी दरबारी कवींद्वारे शौर्याविषयी स्थानिक भाषेत काव्य निर्माण करवून घेतले आणि आपल्या राजवटीला जनतेची मान्यता मिळवण्याचे प्रयत्न केले. धार्मिक सलोखा टिकवण्याचा प्रयत्न केला. शैव पंथ, जैन व बौद्ध धर्मीयांना आश्रय दिला. कोकण परिसरावरील वर्चस्वावरून माळवा परमारांशी राष्ट्रकुटांचा संघर्ष निर्माण झाला. यातून परमारांनी मान्यखेत ही राष्ट्रकूट राजधानी लुटली आणि जाळली. पुढील काही काळातच राष्ट्रकूट राजघराणे लयास गेले. राष्ट्रकुटांच्या अवशेषांवर वातापी चालुक्यांचा वारसा सांगून उत्तर चालुक्य अथवा कल्याणी चालुक्य राजवट सत्तेत आली.

कल्याणी ही राजधानी होती. या राजांनी वातापी चालुक्यांचा संबंध दाखवण्यासाठी राजकीय वापरात संस्कृत भाषेला स्थान दिले. रायचूर दुआब व वेंगी प्रदेशावरील वर्चस्व राखण्यासाठी या चालुक्यांचा चोळ या पल्लवांच्या वारसदारांशी संघर्ष होत राहिला. चोळांनी तंजावर परिसरात आपले बस्तान बसवले. व्यापारातील बदलांचा अंदाज घेऊन त्यांनी पूर्व व पश्चिम दोन्ही किनाऱ्यांवर व पर्यायाने बंदरे व व्यापारावर नियंत्रण प्रस्थापित केले. उत्तर श्रीलंकेवर वर्चस्व मिळवले व तिथल्या राजास अधीनस्थ करून घेतले.

राजराजा चोळ याने आपल्या विजयाची स्मृती चिरकाल टिकावी म्हणून पुन्हा मंदिराचाच पर्याय निवडला. प्रत्येक राजाने आधीच्या राजांनी निर्माण केलेल्या मंदिरांना झाकोळून टाकेल अशा निर्मितीचा ध्यास घेतला होता. अर्थात मंदिर बांधणीचा उद्देश इतकाच नव्हता. प्रतिस्पर्ध्याला आपण वरचढ आहोत हे दर्शवणे, आपल्या जनतेवर प्रभाव पाडणे व भक्ती परंपरेच्या लोकप्रिय होत असलेल्या लाटेवर स्वार होणे, हे सगळे मंदिर बांधणीतून साध्य होत होते. कनिसेट्टी म्हणतात, आजच्या काळात जशी विविध देशांमध्ये शस्त्रास्त्र स्पर्धा दिसते त्याचेच हे मध्ययुगीन रूप होते. राजराजाने निर्माण केलेले बृहदेश्वर मंदिर हे आजही त्याची साक्ष देत उभे आहे. मध्ययुगीन अनेक मंदिरे आज युनेस्कोने जागतिक वारसा स्थळे म्हणून घोषित केली आहेत.

चोळ राजांनी या स्पर्धेत ईर्षेने सहभाग घेतला. समुद्रमार्गे चालणाऱ्या व्यापारावर नियंत्रण मिळवले. पूर्व किनाऱ्यावर दूपर्यंत वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी पूर्व किनाऱ्याला समांतर ते थेट गंगेच्या खोऱ्यापर्यंत हल्ले केले. गंगेच्या पाण्यात घोडे घातले म्हणून गंगै-कोंड-चोळ-पुरम नावाचे शहर वसवले. ‘प्रपोगंडा’चा वापर इतिहासात सगळीकडेच दिसतो. ती काही आधुनिक काळाची मक्तेदारी आहे असे नाही! चोळांनी व्यापारवृद्धीसाठी आपले दूत चीनच्या दरबारात पाठवले. किमती नजराणे देऊन चीनच्या सम्राटाला खूश केले व काही व्यापारी सवलती मिळविल्या. याचा फायदा तामिळ व्यापारी श्रेण्यांना व पर्यायाने चोळांना झाला.

श्रीविजय (आजच्या इंडोनेशियाचा भाग) साम्राज्यातील राजाने चीनच्या दरबारात चोळांना आपले अधीनस्थ सांगितल्यामुळे संतापलेल्या चोळांनी बंगालचा उपसागर ओलांडून श्रीविजयवर हल्ला केला. भारतीय उपखंडातील राजांनी अशा प्रकारचा हल्ला करण्याची इतिहासातील ही एकमेव घटना! त्यातून चोळांनी सागरीसामर्थ्यांत घेतलेली आघाडी स्पष्ट होते. तिकडे उत्तर चालुक्य माळवा परमारांशी संघर्ष करत अस्तित्व टिकवून होते. चोळांनी एक वेळ कल्याणी ही चालुक्यांची राजधानी जाळून टाकली होती. भोज हा माळव्यातील महत्त्वाचा राजा होता. कनिसेट्टी म्हणतात, संस्कृतसाठीचा ‘सुवर्णकाळ’ गुप्तांच्या कालखंडात नसून तो भोजच्या काळात मानला पाहिजे. कारण या काळात मोठय़ा प्रमाणात संस्कृतमधील रचना झाल्या (एखाद्या कालखंडाला सुवर्णकाळ मानणे या संकल्पनेवरच इतिहासकारांनी आक्षेप नोंदवले आहेत हे लक्षात घेऊनच त्यांनी हे मत मांडले आहे). जमीनदान, प्रशस्ती काव्य यांच्या रचनांसाठी संस्कृतचा मोठय़ा प्रमाणात वापर झाला. या भोज राजास चालुक्यांनी पराभूत केले. चोळांच्या बृहदेश्वर मंदिरापेक्षा मोठे मंदिर उभारण्याचा भोज राजाने हाती घेतलेला प्रकल्प अर्धवटच राहिला. चालुक्यांच्या अवशेषावर त्यांच्याच सेऊन यादव या आधिपत्याखालील राजांनी देवगिरी येथे स्वतंत्र सत्ता स्थापन केली.

दिल्ली सुलतानांनी ते राज्य ताब्यात घेतले. पुढे त्यातून बहामनी सत्ता व दक्षिणेकडे विजयनगर साम्राज्य अस्तित्वात आले. त्यांनी चालुक्यांशी वारसा जोडण्याचा प्रयत्न केला. नंतरच्या हिंदू-मुस्लीम दोन्ही सत्तांनी हा वारसा मिरवला. अगदी ब्रिटिश काळातही जो मिताक्षर हा कायदा ब्रिटिशांनी सर्वासाठी (बंगाल सोडून) लागू केला त्याची रचना उत्तर चालुक्यांच्या काळात झाली होती. त्या अर्थाने मध्ययुगातील भारतीय उपखंडाच्या दक्षिणेच्या इतिहासाने आजच्या वर्तमानाला घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे दक्षिणेला वगळून भारताच्या इतिहासाची आपली समज अपूर्णच राहील हे अनिरुद्ध कनिसेट्टी यांचे मत लक्षात घ्यावेच लागते.

अर्थात हा दक्षिणेच्या मध्ययुगाचा इतिहास किती अपूर्ण आहे याची लेखकास जाण आहे. त्यांनी सुरुवातीलाच म्हटले आहे की, जी साधने उपलब्ध आहेत त्यातून फक्त तत्कालीन राजकीय वर्तुळाचा, उच्च अभिजन वर्गाचाच इतिहास मांडता येतो. त्याच्या अनेक बाजू, सामान्यांचे जीवन, सामाजिक इतिहास, त्यातील गुंतागुंत सांगण्यासाठी अशा अनेक प्रकल्पांची गरज ते अधोरेखित करतात. इतिहासलेखन दक्षिणकेंद्री व्हावे, असेही नाही हेही ते प्रांजळपणे नमूद करतात.

कथन पद्धतीने इतिहास लिहिण्याची ही पद्धत (अर्थात इतिहासलेखनाचा काटेकोरपणा सांभाळून) मराठीमध्ये फारशी होत नाही. मराठीत एक तर ऐतिहासिक कादंबरी/ नाटक असेल किंवा थेट संशोधनपर लेखन असते. मध्ये सर्वसामान्य वाचकांसाठी परंतु इतिहासलेखनशास्त्राशी, त्यातल्या शिस्तीशी तडजोड न करता लेखन व्हावे. असा मार्ग इंग्रजीतले नव्या दमाचे लेखक प्रशस्त करत आहेत. त्यातील आपले पहिलेच पुस्तक अनिरुद्ध कनिसेट्टी यांनी अत्यंत ताकदीने सादर केले आहे. इतिहासाच्या अभ्यासकांनी अभ्यासावे व सामान्य वाचकांनी आवर्जून वाचावे असे हे पुस्तक दक्षिण भारताबद्दल एक नवा दृष्टिकोन देते. 

लॉर्ड्स ऑफ द डेक्कन : सदर्न इंडिया फ्रॉम द चालुक्याज टू द चोलाज

जगरनॉट बुक्स, न्यू दिल्ली

२०२२ – पहिली आवृत्ती

पृष्ठे : ४६०

किंमत : ६९९ रुपये

rupeshmadkar02@gmail.com