विनील भुर्के
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मुंबई ही एकाच वेळी अनेक काळांमध्ये आणि अवकाशांमध्ये अस्तित्वात असते, त्यामुळे तिला त्यापैकी कुठल्याही एकाच कालावधीत बंदिस्त करून ठेवता येणार नाही. वेगवेगळ्या दशकांतील कथाकारांनी शब्दांमधून पकडलेल्या शहराचा हा अगदी ताजा संग्रहग्रंथ… जयंत पवारांपासून बाबूराव बागुलांपर्यंत आणि मोहन राकेश यांच्यापासून जयंत कायकिणींपर्यंत दिग्गजांना सामावणारा…
‘माया नगरी’ हे नाव भारतातल्या ज्या एकमेव शहराला अगदी चपखल लागू होतं ते शहर म्हणजे मुंबई! माया नगरी या नावाचे अनेकविध अर्थ लावता येतील. मुंबई म्हणजे अशी एक नगरी जी कोणालाही भुरळ पाडणारी मायावी अप्सरा आहे, देश-विदेशातून तिच्या आश्रयाला येणाऱ्या कोणालाही सहजपणे माया लावणारी मायाळू आई आहे, मेहनत करणाऱ्याला माया कमावून देणारी अत्याधुनिक रमणी आहे आणि देशातील इतर कुठल्याही शहरापेक्षा जास्त माया करांच्या रूपाने सरकारी तिजोरीत जमा करणारी श्रीमंत नगरीसुद्धा आहे! अतिश्रीमंत ते अतिगरीब अशा सर्वच आर्थिक-सामाजिक स्तरांवरच्या नागरिकांना सामावून घेत प्रत्येकाला जगण्याची संधी देणारी देशाची आर्थिक राजधानी आहे. इतके सारे अर्थ लावत गेलं तरी त्याहीपलीकडे मुंबई उरतेच. मुळात सात बेटांचा समूह असूनही कालानुरूप अवाढव्य होत पसरत असलेलं हे शहर आणि त्याची वैशिष्ट्यं नेमक्या शब्दांत पकडणं दुरापास्त आहे. मुंबईला शब्दबद्ध करण्याचे असे जे अनेक प्रयत्न आतापर्यंत झाले, त्या परंपरेत १८६३ मध्ये प्रकाशित झालेल्या गो. ना. माडगांवकर यांच्या ‘मुंबईचें वर्णन’ या आद्या वर्णनात्मक ग्रंथाची आठवण झाल्याशिवाय राहात नाही. त्याचप्रमाणे साहित्यिक, संपादक पु. रा. बेहेरे यांचं ‘महाराष्ट्राची मुंबई’सारखं आता दुर्मीळ झालेलं छोटेखानी वर्णनात्मक पुस्तक आठवतं. मुंबईसह अन्य शहरांमध्ये घडणारी गोष्ट असलेली सलमान रश्दी यांची ‘मिडनाइट्स चिल्ड्रन’ ही कादंबरी, तर मुंबई शहराच्या सहसा लक्षात न येणाऱ्या अंतर्गत स्वरूपाचा वेध घेत लिहिलेली किरण नगरकर यांची ‘रावण अॅण्ड एडी’ ही कादंबरी आणि जेरी पिंटो आणि नरेश फर्नांडिस यांचा ‘बॉम्बे मेरी जान’ हा लेखसंग्रह हीदेखील मुंबईचा वेध घेणाऱ्या लिखाणाची काही विशेष उदाहरणं सांगता येतील.
मुंबई शहराला कथांच्या माध्यमातून शोधण्याचा प्रयत्न करणाऱ्या ‘माया नगरी’ या संकलित इंग्रजी ग्रंथाच्या परिचयपर लेखातील शांता गोखले आणि जेरी पिंटो यांच्यातल्या संवादात जेरी म्हणतात की ‘‘तुम्ही एखादं शहर शब्दांत पकडू शकत नाही. तुम्ही शहर अजिबात पकडूच शकत नाही.’’ मुंबई म्हणजे सतत डोळ्यांसमोर सळसळणारी पण कधीच जाळ्यात न गावणारी मासोळीच जणू! पण मग भारताच्या या सर्वात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या महानगराचा, माया नगरीचा, किंवा तथाकथित स्वप्नांच्या शहराचा आत्मा पुस्तकाच्या स्वरूपात कसा पकडता येईल? नेमकं हेच साधण्याचा प्रयत्न शांता गोखले आणि जेरी पिंटो या कसलेले लेखक आणि भाषांतरकार असलेल्या दोन पक्क्या मुंबईकरांनी त्यांच्या आवडत्या कथा एकत्र आणून केला आहे.
मराठी, उर्दू, गुजराती, तमिळ, हिंदी, कन्नड, मल्याळममधून इंग्रजीत अनुवादित केलेल्या आणि मूळ इंग्रजीत लिहिलेल्या कथा अशा एकूण आठ भाषांमध्ये लिहिल्या गेलेल्या २१ कथा या संग्रहात आहेत. यापैकी मराठीतून इंग्रजीत भाषांतर शांता गोखले यांनी, तर हिंदीमधून इंग्रजीत भाषांतर जेरी पिंटो यांनी केलं आहे. लेखकांमध्ये बाबुराव बागूल, इस्मत चुगताई, विलास सारंग, पु. ल. देशपांडे, ऊर्मिला पवार, सादत हसन मंटो, मोहन राकेश, मानसी, सायरस मिस्त्री, शांता गोखले, श्री. ना. पेंडसे, कृष्ण चंदर, अंबाई, जेरी पिंटो, उद्यान ठक्कर, जयंत कायकिणी, भूपेन खक्कर, युनिस डिसोझा, जयंत पवार, अनुराधा कुमार आणि तेजस्विनी आपटे-राह्म अशा चार ते पाच पिढ्यांच्या लेखकांचा समावेश यामध्ये केला आहे. या कथा ज्या कालावधीत लिहिल्या गेल्या आहेत तो कालावधीसुद्धा साधारण १९४० च्या दशकापासून तब्बल सात दशकांचा प्रदीर्घ कालावधी आहे. त्यामुळे सतत बदलत असणाऱ्या आणि झपाट्याने वाढत असलेल्या या शहराच्या बदलत्या रूपाची बोलकी छायाचित्रंच जणू या कथांमधून दिसू लागतात. ती सगळी कालानुक्रमे लावून पाहिली तर शहराच्या इतिहासाची बखर दिसू लागेल. पण ती कुठल्याही एका विशिष्ट क्रमानेच पाहायला हवी असंही नाहीच. म्हणूनच पुस्तकात या कथांचा क्रमदेखील मुद्दामच कुठल्याही विशिष्ट प्रकारे लावलेला नाही. शिवाय वाचत असतानाही वाचकांनी त्यांना हव्या त्या क्रमाने त्या वाचाव्यात, असंही शांता गोखले यांनी स्पष्ट केलं आहे. याचं कारण, मुंबई ही एकाच वेळी अनेक काळांमध्ये आणि अवकाशांमध्ये अस्तित्वात असते, त्यामुळे तिला त्यापैकी कुठल्याही एकाच कालावधीत बंदिस्त करून ठेवताच येत नाही.
या संग्रहातील कथांमधून आपल्या समोर येतं ते शहर कापड गिरण्यांमध्ये आणि रस्त्यांवर राबणाऱ्यांचं आहे, त्याचबरोबर ते पंचतारांकित ऐश्वर्य उपभोगणाऱ्यांचंही आहे. जयंत पवार यांच्या ‘तुझीच सेवा करू काय जाणे’मधल्या सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या सर्वसामान्य लोकांचं हे शहर आहे. जसं ते पु. ल. देशपांडे यांच्या ‘बटाट्याच्या चाळी’त सांस्कृतिक चळवळ उभी करू पाहणाऱ्या मध्यमवर्गीय ‘असामीं’चं शहर आहे, तसंच ते सादत हसन मंटो यांच्या ‘बाबू गोपी नाथ’मधल्या ‘झीनत’सारख्या अजाण वयात देहव्यापाराच्या बाजारात विकल्या गेलेल्या तरुणींचंही आहे. इस्मत चुगताई यांच्या ‘क्विट इंडिया’मधल्या स्वातंत्र्यपूर्व काळात ‘भारत छोडो’ आंदोलनात सहभागी होणाऱ्यांचं आहे आणि स्वातंत्र्यानंतर ब्रिटिश राजसत्तेची एक एक खूण मावळत जात असतानाच्या काळाचे साक्षीदार असणाऱ्यांचंही आहे. कृष्ण चंदर यांच्या ‘द चिल्ड्रन ऑफ दादर ब्रिज’मधल्या दादरच्या पुलाखाली राहणाऱ्या लहान मुलांचं आहे आणि बाबुराव बागूल यांच्या सुप्रसिद्ध ‘जेव्हा मी जात चोरली होती’ या संग्रहातल्या ‘वाटेवरची’ या कथेमधल्या स्त्रियांचंही आहे. कधी अनपेक्षितपणे जवळीक साधणारं, तर कधी निर्दयपणे नाकारणारं हे शहर आहे. गणपती, हाजी मलंग आणि व्हर्जिन मेरी अशा सर्वच धर्म-पंथांचं, प्रचंड विविधता असलेला जनसमुदाय असलेलं आणि त्यामुळेच त्यांच्या वेगवेगळ्या भाषांमधली बॉम्बे, बंबई, म्हमई, मुंबई आणि अशीच इतर अनेक नावं असलेलं आणि किमान डझनभर भाषा बोलणारं हे शहर आहे.
या संग्रहग्रंथाला आकार देताना त्यामागची भूमिका काय आहे हे एरवी संपादकीय लिहून व्यक्त करता आलं असतं, पण इथे मात्र ती भूमिका सहजपणे उलगडत जाते ती शांता गोखले आणि जेरी पिंटो यांच्या संवादाच्या स्वरूपात! पुस्तकाची प्रस्तावना किंवा विषयप्रवेश लिहिण्याची ही पद्धतसुद्धा रोचक आहे. कारण ती वाचत असताना नकळत वाचक मुंबईच्या आठवणीत गुंगत जातोच, शिवाय या पुस्तकाची कल्पना सुचण्यापासून ती प्रत्यक्षात येत असताना कसकशी उत्क्रांत होत गेली हे वाचण्यातही आनंद घेऊ लागतो. या संवादात शांता गोखले म्हणतात की मुंबईला शब्दांत पकडणे ही कल्पना इतकी भव्यदिव्य आहे की आम्ही ती मुळातच बाजूला ठेवली आणि अतिशय साध्यासरळ पद्धतीने आम्हाला आवडलेल्या कथा निवडत गेलो. साहजिकच एकामागून एक कथा त्या यादीत येत गेल्या तसतशी वेगवेगळ्या भाषा आणि वेगवेगळ्या काळात लिहिलेल्या तसंच मुंबईच्या वेगवेगळ्या भागांमध्ये घडलेली गोष्ट असलेल्या अशा कथा त्यात येत गेल्या. या कथांमध्ये ही जी समृद्ध विविधता दिसते, ती खरं तर मुंबईत असलेली माणसांची विविधताच दर्शवते. त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे अशी विविधता जोपासण्याचं काम मुंबई करत असते.
याच संवादात जेरी पिंटो म्हणतात की, कथा ही जिवंत माणसांची असते, त्यांच्या जिवंत असण्याचीच ती गोष्ट असते. म्हणूनच वाचकाला त्या कथेतील पात्रांची ओढ असते. कारण त्या पात्रांविषयी जाणून घेत असताना त्याला नकळतपणे स्वत:चीच नव्याने ओळख होत असते! या कथांमध्ये अनेक पात्रं आहेत आणि सर्वांत मुख्य पात्र आहे ती म्हणजे मुंबई. याच संवादादरम्यान जेरी पिंटो म्हणतात, मुंबईच्या गर्दीत हजारो माणसं अतिशय वेगाने एकमेकांच्या विरुद्ध दिशेने जात-येत असतात तेव्हा असं वाटतं की, ती नक्कीच एकमेकांवर आदळणार! पण तसं न होता अगदी शेवटच्या क्षणी ती बाजूला होऊन एकमेकांना अगदी निसटता स्पर्श करत आपापल्या दिशेने निघून जातात! आणि अगदी याच प्रकारे या संग्रहातील कथा जणू काही एकाच महानगरीत चालणाऱ्या माणसांप्रमाणे एकमेकांवर न आदळता त्यांच्या हालचालींनी अशी स्पंदनं निर्माण करत राहतात, आणि त्यामधून एक अतिशय चंचल प्रकृतीचा प्रवाह तयार होतो. हा संग्रह वाचताना वाचकांना आपापल्या प्रकृतीनुसार तो प्रवाह अनुभवता यावा, हीच या पुस्तकाच्या संपादकद्वयीची सदिच्छा आहे!
माया नगरी: बॉम्बे- मुंबई-अ सिटी इन स्टोरीज
संपादक: शांता गोखले, जेरी पिंटो
प्रकाशक: स्पिकिंग टायगर बुक्स
मूल्य: ७९९ रुपये vineelvb@gmail.com