डॉ. सुनीलकुमार लवटे

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी समग्र वाङ्मय’ प्रकल्पातील ११ वा खंड ‘पुस्तक परीक्षण संग्रह’ असून त्यात सुमारे ३० पुस्तक परीक्षणे आहेत. तर्कतीर्थांनी पुस्तकांना प्रस्तावना विपुल लिहिल्या, त्या तुलनेत परीक्षणे अल्पच म्हणावी लागतील. पुस्तक परीक्षणाच्या सूचीवर नजर फिरविताना लक्षात येते की, परीक्षणार्थ तर्कतीर्थ चोखंदळपणे ग्रंथांची निवड करतात. तो ग्रंथ नवे काही सांगतो का? तो व्यवच्छेदक आहे का? अशा निकषांच्या आधारे तर्कतीर्थ परीक्षणार्थ ग्रंथनिवड करत असत, असे लक्षात येते.

तर्कतीर्थ संपूर्ण ग्रंथ वाचून त्यासंबंधीचे स्वत:चे आकलन तयार करत, त्यानंतरच परीक्षण लिहीत. ही परीक्षणे समीक्षेपेक्षा विश्लेषणाकडे झुकलेली दिसतात. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे विविध ज्ञान-विज्ञानात रुची व गती असलेले गृहस्थ होते. परीक्षणार्थ निवडलेल्या ग्रंथ विषयासंबंधीचे मूलभूत वा पार्श्वभूमी विश्लेषण करणे, हे त्यांच्या परीक्षणांचे खास वैशिष्ट्य असे. ही परीक्षणे त्या अर्थाने अपारंपरिकच म्हणायला हवीत. अधिकांश परीक्षणे वेद, धर्म, तत्त्वज्ञान, साहित्य, चरित्र अशा ग्रंथांचीच आहेत. हे ग्रंथ बहुधा मान्यवरांनी लिहिलेले दिसून येतात. जे ग्रंथ वैचारिक, संशोधनावर आधारित वा विशेषत्वाने लिहिले गेले, त्यांचीच परीक्षणे करण्याचा रिवाज तर्कतीर्थांनी पाळलेला दिसतो. ही परीक्षणे ‘नवभारत’ मासिकासाठी लिहिलेली आढळतात. ती ‘टीका’ या सदरात न मोडता, ‘ग्रंथ परिचय’ वा परीक्षित ग्रंथांच्या अनुषंगाने परंपरा, इतिहास, चिंतन असे त्यांचे स्वरूप असते. त्यामुळे तर्कतीर्थांची वैचारिक परीक्षणे विश्लेषणकारी असतात. आशय, विषय, शैली, मांडणी, भाषा, सौंदर्य, भाष्य यांची चर्चा व चिकित्सा करणारी ही परीक्षणे, समीक्षा त्या ग्रंथांचा व्यापक पट चोखंदळ वाचकांपुढे उलगडून त्या ग्रंथवाचन, विचाराची एक नवी दृष्टी व दिशा देताना दिसतात.

तर्कतीर्थांनी अनेक मान्यवरांच्या ग्रंथांच्या समीक्षा केल्या आहेत. ‘ऋग्वेदकालीन सांस्कृतिक इतिहास’, ‘संयुक्त महाराष्ट्राची समस्या’, ‘संशोधनमुक्तावली’, ‘मराठी साहित्यातील मधुरा भक्ती’, ‘उपनिषदार्थव्याख्या’, ‘लज्जागौरी’, ‘मनुस्मृती : काही विचार’, ‘कृष्णाकाठ’, ‘बाळ गंगाधर टिळक’ या ग्रंथशीर्षकांवर नजर फिरवताच लक्षात येते की, सर्वसामान्य समीक्षक ज्या ग्रंथांना हात लावण्यास धजावणार नाहीत, अशा ग्रंथ वा ग्रंथकारांच्या साहित्याची समीक्षा करण्याचे शिवधनुष्य तर्कतीर्थांनी लीलया पेलून दाखविले आहे.

परीक्षणात विषय, पार्श्वभूमी वा परंपरेचा ते प्रथम ऊहापोह करतात. नंतर चर्चित ग्रंथांतील गुण-दोष चर्चेऐवजी ग्रंथाशयाचे आकलन वाचकांना व्हावे, हे या समीक्षांचा हेतू असतो; त्यामुळे संदर्भ, उद्धरणे, तुलना करत ग्रंथकारास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने लिहिली असली, तरी त्यास त्याच्या मर्यादा वा दोषांची निसटती जाणीव करून देत मार्गदर्शन करतात. वाचक दृष्टिकोन घडविण्याचा उपक्रम तर्कतीर्थ या समीक्षांमधून करताना दिसतात.

विसाव्या शतकातील वृत्तपत्रे आणि नियतकालिके आपल्या अंकांमधून नियमितपणे ग्रंथ समीक्षांना विवक्षित जागा देत असत. वृत्तपत्रांतील समीक्षांचा पूर्व विस्तृत प्रदेश वर्तमानात आकसत गेल्याने मराठी वाचक घडणीची प्रक्रिया थंडावली आहे. हल्ली उत्पन्नवृद्धीच्या नादात वृत्तपत्र, नियतकालिके, दृक्-श्राव्य प्रसारमाध्यमे यांनी मराठी साहित्याशी वैर पुकारल्यासदृश परिस्थिती सार्वत्रिक असताना अद्यापही काही द्रष्टी वृत्तपत्रे अपवाद असून, ती मराठी अभिरुची अभिजात ठेवण्याचे कर्तव्य चोख बजावतात; पण त्यापेक्षा फेसबुक, व्हॉटस्पअॅप युनिव्हर्सिटीजमधील वाचक समूहांमार्फत ज्या समीक्षा वा चर्चा केल्या जातात, त्या समीक्षेस जिवंत ठेवत वाचनसंस्कृतीची अभिवृद्धी अधिक जोम नि उत्साहाने करतात, असे दिसू लागले आहे. विद्यापीठीय अभ्यासक्रमात समीक्षेस दुय्यम स्थान राहणे मात्र अधिक चिंताजनक आहे. यापेक्षा निराळ्या काळात, तर्कतीर्थांनी लिहिलेल्या परीक्षणांकडे आपण या आठवड्यात साकल्याने पाहू.

drsklawate@gmail.com