पंकज भोसले

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चित्रकादंबऱ्यांचा वाचक-प्रेक्षकवर्ग वाढतो आहेच; पण ‘न्यू यॉर्कर’ची मुखपृष्ठं करणाऱ्या आर. किकुओ जॉन्सनची नवी चित्रकादंबरी नव्वदीच्या दशकातले बदल न्याहाळत ‘समकालीन साहित्या’त प्रवेश करते..

सारनाथ बॅनर्जी यांच्या ‘कॉरिडॉर’ (२००४) या चित्रकादंबरीवर ‘पहिली भारतीय ग्राफिक नॉव्हेल’ असा शिक्का बसल्यानंतरच्या काळात हा साहित्यप्रकार भारतीय मातीत रुजविण्यासाठी इथल्या कलाकारांचे अनेक प्रयत्न झाले. तरी ते यशस्वी झाले नाहीत. आधीची कॉमिक्ससंस्कृती ही नव्वदोत्तरीत वाढायला वाव असतानाही वाढली नाही. पण पुढे टीव्ही वाहिन्यांचे जागतिकीकरण आणि ‘ओटीटी’ने केलेल्या दृश्यसाक्षरतेने तसेच ग्राफिक नॉव्हेल्सवरच्या गाजलेल्या चित्रपट- मालिकांनी तरुण वर्गाला या चित्रकादंबऱ्यांनी आकर्षित केले. शब्दांबरोबर चित्रेही वाचायची असतात, याची जाणीव झालेला वर्ग वाचकांमध्ये तयार होऊ लागला. सध्या रस्त्यावरच्या खूपविक्या पुस्तकदालनांत जपानी मन्गाचे (कॉमिक बुक) इंग्रजी अनुवादांसह आगमन हा ‘ग्राफिक नॉव्हेल’च्या देशातील उत्कर्षांचा भविष्यकाळ दाखविणारा आहे. शिवाय सध्या लहान मुलांना वाचनसजग करू पाहण्यासाठी अवतरलेल्या प्रादेशिक भाषांतील चित्रमय बालकादंबऱ्यांनी खऱ्या अर्थाने देशी ‘ग्राफिक नॉव्हेल्स’चा पाया रचायला सुरुवात केली आहे. अर्थात हा पाया मजबूत होण्याआधी अमेरिकेने जगाला निर्यात केलेल्या या साहित्य उत्पादनाची जुजबी माहिती वायुवेगाने करून घेणे महत्त्वाचे.

ग्राफिक नॉव्हेल म्हणजे चित्रांतून अधिकाधिक आणि शब्दांतून कमीत कमी सांगितला जाणारा चित्रचौकटींचा दीर्घ प्रकार. १९७८ मध्ये विल आयस्नरच्या न्यू यॉर्कमधील मुर्दाड झोपडवस्ती दाखविणाऱ्या ‘अ कॉण्ट्रॅक्ट विथ गॉड’ नामक पुस्तकाला जगातल्या पहिल्या ग्राफिक नॉव्हेलचा दर्जा मिळाला. मग नावे घेतली जावी असे डझनांनी चित्रकादंबरीकार तयार झाले. फ्रँक मिलर (थ्री हण्ड्रेड, सिन सिटी), अ‍ॅलन मूर (फ्रॉम हेल, वॉचमेन, व्ही फॉर व्हेण्डेटा), मर्जान सत्रापी (पर्सीपोलीस), जोनाथन एण्टविसल ( द एण्ड ऑफ द फकिंग वल्र्ड) या ग्राफिक नॉव्हेल्सवरच्या चित्रपट- मालिकांमुळे या चित्रकादंबऱ्यांचा वाचक कलाभोक्त्या वर्तुळापुरता उरला नाही, तर सामान्य वाचकांमध्येही या साहित्य प्रकाराबाबत कुतूहल वाढले. निक डनासो हा चित्रकादंबरीकार ‘सॅबरिना’ या चित्रग्रंथासाठी २०१८ मध्ये अन्य पुरस्कार मिळवून बुकर पारितोषिकाच्या लघुयादीत दाखल झाल्यानंतर या पुस्तकांना साहित्यिक वलय प्राप्त झाले. अ‍ॅड्रियन टोमिना यांच्या पुस्तकांनी आणि न्यू यॉर्करमधील चित्रांमुळे केवळ गोष्टींनाच नाही तर मासिक, साप्ताहिकांच्या वृत्त-लेखांनाही सजविण्यासाठी ग्राफिक नॉव्हेलिस्टांची गरज तयार झाली. सध्या ‘पॅरिस रिव्ह्यू’, ‘ न्यू यॉर्कर’, ‘न्यू यॉर्क टाइम्स’, ‘वायर्ड’, ‘जी क्यू’पासून जगात पोहोचणाऱ्या कित्येक नियतकालिकांमध्ये दीर्घ रिपोर्ताज या कलाकारांच्या चित्रांमधून समजावून सांगितला जात आहे. ‘नेटफ्लिक्स’क्रांतीमुळे दिवसेंदिवस तो वाढत जाणार आहे.

या ग्राफिक नॉव्हेलच्या दृश्यसंचिताला घेऊन आर. किकुओ जॉन्सन हा तरुण हवाई बेटांमधून अमेरिकेत व्यंग आणि रेखाचित्रकारिता करण्यासाठी दाखल झाला. ऱ्होड आयलंड येथे चित्रशिक्षणासह बाहेरखर्च भरून काढण्यासाठी त्याने हॉटेलमध्ये वेटरची नोकरी स्वीकारली. हौसेने एक ग्राफिक नॉव्हेलही पूर्ण केले. त्याच्या कौशल्यावर भाळून न्यू यॉर्कर साप्ताहिकाच्या कलाविभागात त्याला स्थान मिळाले. दहा वर्षांच्या उमेदवारीनंतर २०१६ मध्ये न्यू यॉर्करच्या मुखपृष्ठावर चित्र झळकवण्याचे भाग्य त्याला लाभले आणि त्यानंतर जगात त्याची चित्रे अनुभवण्याचा भाग्यसोहळाच सुरू झाला. न्यू यॉर्करच्या मुखपृष्ठांसह, व्यक्तिचित्रण (प्रोफाइल), कथाचित्रांमध्ये त्याचे काम कधी झळकते, तर वायर्ड या तंत्रमासिकातील अत्यंत प्रदीर्घ आणि किचकट लेखाला त्याची चित्रे अधिक आकलनक्षम करण्यासाठी उपयुक्त ठरतात. न्यू यॉर्क टाइम्सच्या आठवडी ‘रिव्ह्यू ऑफ बुक्स’ची मुखपृष्ठे त्याच्या शैलीसह सहज ओळखता येतात. ‘द डे ट्रिपर्स’ या १९९५ सालच्या चित्रपटाच्या नव्याने तयार करण्यात आलेल्या सीडी-डीव्हीडी कव्हरवर त्याचे चित्र झळकलेले दिसते. तर मियामी शहरात रस्तोरस्ती लावलेल्या, शहराची ओळख करून देणाऱ्या चित्रफलकांमध्ये त्याची रेखाकला उमटलेली असते. विल्यम गोल्डिंगच्या प्रसिद्ध ‘लॉर्ड ऑफ द फ्लाइज’ या कादंबरीची या दशकातील आवृत्ती त्याच्या चित्रासह ग्रंथदालनात दाखल होते, तर हेमिंग्वेची ‘सन ऑल्सो रायझेस’ची या शतकातील आवृत्ती त्याचे चित्र असलेल्या मुखपृष्ठाने उठून दिसते. अ‍ॅड्रियन टोमिना यांच्यासारखीच पकडून ठेवणारी आणि डोळय़ा- डोक्यात गोंदली जाणारी अशी आर. किकुओ जॉन्सन याची चित्रशैली आहे. (rkikuojohnson.com या त्याच्या नावाने असलेल्या संकेतस्थळावर यातील बहुतांश कामे सहज पाहायला उपलब्ध आहेत.) दोन वर्षांपूर्वी पाच एप्रिलच्या न्यू यॉर्करच्या अंकावर त्याचे झळकलेले ‘डीलेड’ नावाचे पुरस्कार-विजेते मुखपृष्ठ न्यू यॉर्कच्या अंतरंगात असलेल्या सर्व मजकुराहून अधिक गाजले. वंशविद्वेषी हिंसेमुळे भयग्रस्त बनलेल्या आशियाई-अमेरिकी आई-लेकीचा रेल्वे फलाटावरचा क्षण चित्रातून टिपणारे हे चित्र करोनाकाळात विविध देशांमध्ये व्हायरल झाले. आर. किकुओ जॉन्सनचे काम त्यामुळे अधिकच झळाळून उठले.

पण सध्या आर. किकुओ जॉन्सन गेल्या आठवडय़ापासून वेगळय़ाच गोष्टीमुळे चर्चेत आहे. ‘व्हायटिंग फाऊंडेशन’ ही संस्था लेखकांना पहिल्या कलाकृतीसाठी (कथा-कादंबरी-नाटक आदी) पूर्ण करण्यासाठी पन्नास हजार डॉलरचा पुरस्कार जाहीर करते. यंदा पहिल्यांदाच या संस्थेने एका चित्रकादंबरीकाराची निवड केली. तीही पहिल्या नाही तर ‘नो वन एल्स’ नावाच्या तिसऱ्या चित्रकादंबरिकेसाठी. कारण आर. किकुओ जॉन्सन याच्या कामाचा पसरत चाललेला आवाकाच इतका मोठा आहे, की कुणीही अवाक् होऊन जावे.

‘नो वन एल्स’ ही चित्रकादंबरिका केवळ १०३ पानांची आहे. ‘वाचायला’ गेलो तर पंधरा मिनिटांत संपणारी आणि चित्र-वाचनाचा रवंथ प्रकार केल्यास तास-दोन तासांत पूर्ण होणारी. पण त्यातल्या चित्रप्रतिमा डोक्यात बरेच दिवसांसाठी मुरत राहणारी. ही कथा आर. किकुओ जॉन्सनच्या मोई या हवाई बेटाजवळच्या शहरगावात घडणारी. सुरू होते, ती कुटुंबातल्या जर्जर वृद्ध व्यक्तीच्या मृत्यूनंतर. मुख्य पात्रे तीन. या मृत वृद्धाची दु:खसागरात बुडालेली मुलगी शर्लीन, एकल माता असलेल्या शर्लीनचा लहान मुलगा ब्रॅण्डन आणि ब्रॅण्डनचा आयुष्यभर दूर भरकटून, कुटुंबातलं दु:ख वाटून घेण्यासाठी शहरगावाला आलेला मामा. उपपात्रांमध्ये बँडनचे बॅटमन नावाचे मांजर (तिच्या हातात खेळण्यासारखे पकडून ठेवलेले उंदीर) तसेच उसाने लगडलेले हवाई बेटावरचे शेत आणि जवळचा साखर कारखाना. आकाशातून ड्रोनद्वारे घेतलेल्या छायाचित्रासारख्या कैकदा यातल्या चित्रचौकटी वाटू लागतात (सोबतचे आडवे चित्र पाहा). या तिघा व्यक्तींच्या आयुष्यासह, त्यांच्यातील तुटत जाणाऱ्या संवादासह एका शहराचे जगणे अवलंबून असलेल्या साखर कारखान्याला टाळे लागण्याच्या, उसाला आग लागण्याच्या वाईट घटनांची मालिकाच या कथेत सुरू होते. टेकडीवर चालणाऱ्या मामा-भाच्याच्या गप्पा, बॅटमॅन मांजरीचे गायब होणे. त्याला दु:स्वप्नांमध्ये त्याचे बिकट स्थितीतील दर्शन असा बराचसा चित्रकथाभाग पूर्णपणे आकलनीय-अनाकलनीयाच्या सीमारेषेत फिरत राहतो.

ही चित्रकादंबरी आवडो किंवा नावडो. त्यातील चित्रकथा आर. किकुओ जॉन्सन याच्या शैलीसाठी पकडून ठेवतात. त्याने आपल्या बालपणीच्या दृश्यनोंदींनी आपले शहरगाव पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न ‘नो वन एल्स’मधून केला आहे. १९८०मध्ये जन्मलेल्या आणि नव्वदीत डोळय़ासमोर आपल्या भवतालाला विद्युतवेगाने बदलताना पाहिल्यानंतर तो परिसर जसाच्या तसा उभा करण्याचा प्रयत्न जगभरच्या साहित्यातून ज्या जोमाने होतोय, तोच चित्रकादंबरी प्रांतातही होतोय. आर. किकुओ जॉन्सनच्या या कादंबरीबाबत त्याच्या चित्रांच्या आवाक्याने अवाक् होता होता हे विधान ठामपणे करता येऊ शकेल.

नो वन एल्स

लेखक : आर. किकुओ जॉन्सन

प्रकाशक:  फँटाग्राफिक बुक्स

पृष्ठे : १०४ ; किंमत: १२६२ रुपये

pankaj.bhosale@expressindia.com

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Book review no one else book by by r kikuo johnson zws
Show comments