हेमिंग्वेच्या कथांबद्दल देव्हाऱ्यात ठेवण्याइतपत आदर असला तरी नवोदित काय लिहिताहेत, छोट्या मासिकांतून उत्तम लिहूनही प्रकाशझोतात न येणाऱ्यांना प्रोत्साहन कसे देता येईल, त्यांतून कदाचित पुढल्या पिढीतला हेमिंग्वेसारखा लेखक सापडतो का, हे तपासण्यासाठी सात वर्षांपूर्वी एक कथाखंड प्रकल्प उभारला गेला. त्याची ओळख…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अर्नेस्ट हेमिंग्वे हा विशेषणांच्या वजनात न बसणारा कथाकार जिथे जिथे राहिला, त्या देशातील शहरांना साहित्य पर्यटनस्थळ बनवून गेला. ज्या परिसरात त्याचा जन्म झाला त्या ओक पार्क इलिनॉयमधील घराचे संग्रहालय झाले. जानेवारी १९२२ ते ऑगस्ट १९२३ पर्यंत पॅरिसमधील ज्या इमारतीत तो राहिला, तिथे अद्याप आठवडाभर सशुल्क सहलींचे कार्यक्रम राबविले जातात. फ्लोरिडातील त्याच्या घरालादेखील म्युझियमचे स्वरूप प्राप्त झाले. त्यांच्या कहाण्या आणि त्यांत ‘हेमिंग्वेने लिहिलेल्या कहाण्यां’च्यादेखील पुढे बऱ्याच कहाण्या लिहिल्या गेल्या. मिशिगन प्रांतातील पेटोस्की या खेड्यात हेमिंग्वेच्या आई-वडिलांनी उन्हाळघर बांधले होते. हेमिंग्वेच्या जन्माच्या वर्षभर आधी वगैरे. तर जडणघडणीच्या वयात येतानापर्यंतच्या सुट्ट्या ते पहिल्या महायुद्धाच्या काळात वगैरे हेमिंग्वे या घरात राहिला. येथे काही कथा लिहिल्या. पुढे मृत्यूपर्यंत या घराची मालकी हेमिंग्वेकडे राहिली. या काळात फार कमी वेळा केवळ लिहिण्यासाठी हेमिंग्वेचा मुक्काम या घरात राहिला. या पेटोस्कीतल्या घरालादेखील हेमिंग्वेची वास्तूू म्हणून १९६८ साली राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळाला. पण लेखाचा मुद्दा हेमिंग्वेची घरे नसून त्याच्या पेटोस्कीतल्या वास्तव्यात घडलेल्या काही घटनांचा आहे.
हेमिंग्वेच्या पेटोस्की येथील वास्तव्याचा मौखिक इतिहास बरीच वर्षे घुमत राहिला. तो पेटोस्कीतील रॉबर्ट जेन्सन डाऊ नामक एका कथाप्रेमी तरुण व्यक्तीने आपल्या उमेदीच्या वर्षांत प्रत्येक खेडुताकडून गोष्टीरूपात ऐकला. कलांकडे कल असणाऱ्या या तरुणाने साहित्य लिखाणात कुठलीही कामगिरी केली नसली, तरी आपल्या गावात काही काळासाठी वास्तव्य करणाऱ्या, काही कथांमधून मिशिगन-पेटोस्कीचे संदर्भ पेरणाऱ्या हेमिंग्वेबाबतच्या या गजाल्यांना कित्येक वर्षे जपून ठेवले. पुढे आर्थिकदृष्ट्या सक्षम उद्याोजक झाल्यानंतर कलाकार आणि साहित्यिकांना मदतीचा धडाका लावला. २०१५ साली मृत्यूपूर्वी त्यांनी ‘डाऊ फाऊंडेशन’ची निर्मिती केली आणि ‘पेन अमेरिका’ या संस्थेशी तिला जोडून ‘नवा हेमिंग्वे’ शोधण्याचा प्रकल्प उभा केला. ‘बेस्ट डेब्यू शॉर्टस्टोरीज’ ही त्याची ओळख. हेमिंग्वेच्या कथांचा देव्हाऱ्यात ठेवण्याइतपत आदर असला तरी नवोदित काय लिहिताहेत, छोट्या मासिकांतून उत्तम लिहूनही प्रकाशझोतात न येणाऱ्यांना प्रोत्साहन कसे देता येईल, त्यांतून कदाचित पुढल्या पिढीतला हेमिंग्वेसारखा लेखक सापडतो का, हे तपासणे हा या प्रकल्पाचा उद्देश. विशेष म्हणजे भाबड्या आशेतून निर्माण झालेला हा प्रकल्प थांबला नाही. २०१७ पासून नव्या म्हणजे अगदीच पहिली कथा लिहिणाऱ्या कथाकारांच्या मासिकांत छापून आलेल्या सर्वोत्तम कथांचा जुडगा दरवर्षी प्रकाशित होतो. इतका की करोना काळामध्ये देखील त्यात खंड पडला नाही. दरवर्षी तब्बल १२ कथाकारांना प्रत्येकी दोन हजार डॉलर रकमेचे पारितोषिक आणि त्यांच्या कथांच्या प्रसिद्धीची जबाबदारी डाऊ फाऊंडेशन आणि पेन अमेरिका संस्था घेते. त्यासाठी नाणावलेल्या लेखक-संपादकांना आमंत्रित करते. विशी-पंचविशीपासून वयाच्या कुठल्याही टप्प्यावर लिहिल्या गेलेल्या पहिल्या कथांचा शोध घेतला जातो आणि त्यांतून सर्वोत्तम कथाखंड तयार होतो.
‘बेस्ट अमेरिकन शॉर्ट स्टोरीज’ आणि ‘ओ हेन्री प्राइझ स्टोरीज’ आणि त्यांची देशोदेशीची भावंडं (कॅनडा, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, नायजेरिया) यांच्यात आणखी एक भर म्हणून या संग्रहाकडे अजिबातच पाहता येऊ शकत नाही. ‘बेस्ट अमेरिकन शॉर्ट स्टोरीज’सारख्या इतर संग्रहांमध्ये त्या त्या देशातील आघाडीच्या, आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजत असलेल्या कथाकारांचा समावेश असतो. ‘न्यू यॉर्कर’, ‘पॅरिस रिव्ह्यू’, ‘हार्पर्स’ आणि डझनभर अमेरिकी-ब्रिटिश आंतरराष्ट्रीय नियतकालिकांत त्या छापून आलेल्या असतात. २०१७ पासून प्रसिद्ध होणाऱ्या ‘बेस्ट डेब्यू शॉर्टस्टोरीज’मधील कथालेखकाच्या नावापासून त्याच्या लेखनाचा पहिलाच पण सर्वोत्तम खर्डा वाचकाला या खंडातून सुपूर्द होतो.
तीनेक महिन्यांपूर्वी म्हणजे २०२४ च्या अखेरीस प्रकाशित झालेल्या ‘बेस्ट डेब्यू शॉर्टस्टोरीज’ या खंडातील पहिलीच कथा आहे जोझी अबुगोव्ह या लॉस एंजेलिसमधून हल्लीच पदवीधर झालेल्या तरुणीची. ‘डेझी द व्हेल’ या नावाची. १९३८ सालात दहा वर्षांच्या निवेदिकेच्या तोंडून येणारी ही कथा अजब जगाची आणि माणसांची नवलकथा आहे. ज्या काळात मौजेसाठी ‘व्हेल शिकार’ रूढ होती तेव्हाचा दुसऱ्या महायुद्धापूर्वीचा अमेरिकी किनाऱ्याचा परिसर असलेली ही कथा वाचकाला जखडून ठेवणाऱ्या वर्णनांनी रंगत राहते.
या मुलीचे वडील स्वत:ला संशोधक-निर्माते संबोधतात. पकडून आणलेल्या अजस्रा मृत व्हेल माशाच्या शरीराला रसायने आणि औषधांद्वारे जतन करण्याचा उद्योग ते करीत असतात. त्यासह विविध संशोधनांसाठी पैसा पुरविणाऱ्या दानशूर व्यक्तीचा आर्थिक आधार घेऊन त्याच्यासाठीच विमान आराखडा बनविण्याचा वेगळा प्रयोगही अवांतर वेळेत करीत राहतात. गावातल्या संग्रहालयात चालणाऱ्या या प्रयोगाला स्थानिक प्रशासन आक्षेप घेते, तेव्हा व्हेल माशाचे धूड निवेदिकेच्या घराच्या परसदारी दाखल होते. घराला लागून तब्बल एक एकराचा परिसर या मृत माशाने व्यापतो. त्याचा दर्प, रसायनांचा रोजचा त्यावर होणारा मारा आणि वडील संशोधकाचा लहरी स्वभाव यांनी कातावलेल्या निवेदिकेच्या आईचा कठोर पवित्रा समोर यायला लागतो. त्यातच दानशूर व्यक्ती संशोधनाच्या खर्चात हात आखडता घेतो. तेव्हा घरात नवरा-बायकोची धुसफुस भांडणाच्या टोकाला जाऊ पाहते. पण संशोधक बाप त्यावर तोडगा म्हणून घराच्या परसदारालाच संग्रहालयाचा दर्जा देण्याची शक्कल बायकोसमोर लढवतो. दुसऱ्या दिवसापासून मृत व्हेल माशाचे धड पाहण्यासाठी स्थानिक पर्यटकांकडून तिकीट विक्री सुरू होते. त्या पर्यटकांसाठी घरी बनविलेले केक, आइस्क्रीम आणि शीतपेयांचा नवा व्यापार सुरू होतो. पैशांचा ओघ पाहून निवेदिकेची आई आता ‘व्हेलदर्शन’ उद्याोगाची ऐच्छिक वाटाडी बनते. ‘मॉबी डिक’ कादंबरीचे आणि व्हेल माशाबद्दलचे वाचन करून व्हेलदर्शकांना माहिती पुरवत त्यांचे पुरेपूर पैसे वसूल करण्याचा सपाटा लावते. पुढे त्या व्हेलच्या धुडाचे आणि या अस्थिर कुटुंबाचे काय होते, ती कथेची गंमत आहे. पर्यावरण पत्रकार म्हणून स्थानिक वृत्तपत्रात अलीकडेच उमेदवारी करणाऱ्या या लेखिकेची ही लिहिली आणि छापून आलेली पहिलीच कथा. या संग्रहातील आणि गेल्या वर्षात छापून आलेल्या सर्वोत्तम कथनमजकुरापैकी एक. पण ‘बेस्ट अमेरिकन शॉर्ट स्टोरीज’च्या संपादक मंडळाने जाहीर केलेल्या उल्लेखनीय १०० कथांच्या पैसातदेखील तिला स्थान दिसत नाही. जिथे ते नाणावलेले संपादक पोहोचू शकत नाहीत तिथे ‘बेस्ट डेब्यू शॉर्टस्टोरीज’साठी नेमलेला संपादकांचा ताफा संशोधन करीत राहतो. यातून पहिल्या तीनेक वर्षांत शॅनन सॅण्डर्स, प्रीती वांगारी आदी पुढे सातत्याने उत्तम लिहिणारे लेखक सापडले. यास्मिन अदिल माजिद (२०२२ संचातील कथा : ए वेडिंग इन मुलतान १९७८), डेलिहाना इ अल्फोन्सेका (२०२३ संचातील कथा : स्पॅनिश सॉप ऑपेरा किल्ड माय मदर), अनाबेला उलाका (२०२३ संचातील कथा माय ग्रॅण्डमदर्स फेलिन सोल), मोहित मनोहर (२०२० संचातील कथा : समरटाइम) आदींच्या कथा वाचल्या तर या खंडांची महत्ता समजेल.
मोहित मनोहर हा निव्वळ २३ वर्षांचा तरुण. २०२० ला करोनाच्या वर्षात त्याची ‘समरटाइम’ ही कथा घडते. सध्या पीएचडी केलेल्या या तरुणाचा अमेरिकी विद्यापीठात पीएचडीचा प्रबंध ‘बाबरी मशीद’च्या स्थापत्त्यावर आहे. येल विद्यापीठात विज्ञानात पदवी घेण्यासाठी तो गेला. पण नंतर त्याने आपली अभ्यासशाखा बदलली आणि भारतातील स्थापत्यसौंदर्याचा अभ्यास सुरू केला. सध्या देशातील कुठल्याच साहित्यिक वर्तुळात तो नाही. पण त्याची कथा ‘बेस्ट डेब्यू’च्या संचातील महत्त्वाची गणली जाते. या ‘समरटाइम’ नामक कथेत मुंबईतील नवश्रीमंत कुटुंबातल्या तरुणाची उन्हाळी सुट्टीत येल विद्यापीठाजवळ संशोधनाची वारी आहे. नुकतीच आपल्या लैंगिकतेची ओळख झालेला हा तरुण मुंबईतील बोरिवली शहरात सकाळी बसच्या रांगेत उभे राहण्याचा तपशील सांगतो. आई-वडिलांसह बोरिवली ते चर्चगेटपर्यंतचा रविवारचा प्रवास, गेट वे ऑफ इंडियाजवळ सुट्टीच्या दिवसांतले कुटुंब पर्यटनदेखील रंगवतो. वडिलांकडे अचानक वैध मार्गाने अविरत पैशांचे डबोले दाखल होते. बोरिवलीची जागा सोडून दक्षिण मुंबईतील उच्चभ्रू वसाहतीत या कुटुंबाचे स्थलांतर होते. नवश्रीमंती मिरविण्यासाठी वडिलांच्या कुटुंबसहली देशोदेशी सुरू होतात. मुलाला आणि आईला अद्याप श्रीमंती झाकझोक जमत नाही. त्याबाबतच्या सराईतपणासाठी ‘येल’मध्ये दाखल होऊनदेखील त्याचे वागणे मुंबईतील मध्यमवर्गी तरुणासारखेच उरलेले असते. या निवेदकाची एका गोऱ्या तरुणाकडून होणारी फसवणूक हा कथेचा विषय. पण तो मांडताना येल विद्यापीठाचे आवार ते मुंबईतल्या आठवणी यांचा अफलातून कोलाज समरटाइममध्ये आला आहे. गेल्या वर्षीच्या म्हणजेच २०२३ च्या संचात अनाबेला उलाका या तरुणीची ‘माय ग्रॅण्डमदर्स फेलिन सोल’ ही कथा आहे. ज्यात चार वेळा डॉक्टरांनी मृत घोषित केलेली निवेदिकेची आजी अंत्यसंस्काराच्या काही काळ आधी जिवंत होण्याचा अद्भूत प्रकार आहे. यंदाच्या खंडातील जेसन बाऊम या लेखकाची ‘रॉकेट’ नावाची विचित्र कथा व्यसनमुक्ती केंद्रात घडते. तऱ्हेवाईक व्यसनांधांमध्ये अतिकृश शरीरामुळे ‘टी-रेक्स’ हे नाव पडलेला आणि दारूदुराव्यामुळे बरा होण्याकडे निघालेला तरुण केंद्राच्या आवारात ‘रॉकेट’ बनविण्याच्या उद्योगाला लागतो. म्हणजे व्यसन सोडण्यासाठी शहाणपणाच्या उपायांच्या माऱ्यात जुजबी शिक्षणही नसलेल्या व्यक्तीला वैज्ञानिक बनण्याचा वेडझटका आणि त्याभोवतीची गंमत या कथेचा विषय. दरवर्षी नव्या संपादक-शोधकांचा सात खंडांमधून ‘पुढला हेमिंग्वे’ शोधण्याचा अट्टहास थांबलेला नाही. त्या दिशेने प्रवास करताना उत्तम लेखकांना हुडकण्याचा आनंद हीच या संग्रहांची मिळकत.
आपल्याकडे सत्तरच्या दशकापासून ‘रेऊ’ कथा स्पर्धांचा घाट ‘अनुष्टुभ’ ते ‘मिळून साऱ्याजणी’पर्यंत सुरू आहे. त्यातून फार पूर्वी काही खंडदेखील प्रकाशित झाले. १९७९ सालच्या खंडात भारत सासणे, सुकन्या आगाशे यांसारखे लक्षवेधी लेखक पुढल्या दशकात मराठी साहित्याच्या केंद्रस्थानी आले. हिंदीत ‘हंस’ मासिकाने ‘मुबारक पहिला कदम’ याअंतर्गत नवोदित लेखकांच्या कथा छापल्या. त्याच्या पहिल्या पंचवीस वर्षांच्या खंडात नंतर चाळिसेक वर्षांनी ‘इंटरनॅशन बुकर’ मिळविलेल्या गीतांजली श्री यांची पहिली कथा सापडते.
‘रेऊ’ कथांचे तुरळक खंड आणि श्रीविद्या प्रकाशनाने घेतलेल्या स्पर्धांतून तयार झालेल्या कादंबऱ्या या आपल्याकडे अलक्षित राहिलेले नवोदितांसाठीचे प्रकल्प. नव्वदनंतर त्याकडे दुर्लक्ष झाले आणि नव्या लेखकांना प्रोत्साहन देणारी व्यासपीठेही थांबली. नवोदितांसाठी अशा व्यासपीठ उभारणीचा विचारही मराठीत प्रकाशवर्षे दूर असताना, समाधानाचे बेट परभाषेतल्या ‘बेस्ट डेब्यू शॉर्ट’सारख्या खंडाद्वारे सापडू शकते.
लेखात उल्लेख असलेल्या मोहित मनोहर यांच्या ‘समरटाइम’ या कथेचा दुवा. https://shorturl.at/06hAh
pankaj.bhosale@gmail.com
बुकनेट : पुस्तकमॉल आणि इतर…
व्हिडीओ आणि रील्स बनविण्याचा नाद पुस्तकवेड्यांना लागला तर त्यातून काय तयार होऊ शकते याचे उदाहरण बनलेली अ-तारांकित व्यक्ती आणि व्लॉगरची क्लिप. करोनापूर्वी लंडनमधील चार पुस्तकालयांना भेट दिली होती. यातील एक पुस्तकाचे दुकान आपल्याला ज्ञात असलेल्या मॉल इमारतीच्या आकाराचे. दुसरे एक दोनशे वर्षांपूर्वीचे आणि तिसरे फक्त चित्र कादंबऱ्या म्हणजेच ग्राफिक नॉव्हेल्सना वाहिलेले. शहरांच्या प्रगतीच्या खुणा कुुठे सापडू शकतात, त्याचे उत्तर येथे असेल.
https://tinyurl.com/ps8v4 k52
नवे कादंबरीकार
‘ऑब्झर्व्हर’ या दैनिकाच्या जानेवारी महिन्यातील साप्ताहिक पुरवणीचा विभाग गेल्या काही वर्षांपासून लक्षवेधी ठरतो. ब्रिटनमधील नव्या लेखकांच्या कोणत्या पहिल्याच कादंबऱ्या वर्षभरात दाखल होणार आहेत, याविषयीची खास मुलाखत-बातमी असा हा ऐवज असतो. यातच झळकलेल्या काहींना बुकर मिळाले, तर काही बुकरच्या मानांकनांमधून तळपत राहिले. यंदाच्या यादीत गुरुनाईक जोहल या ब्रिटिश-पंजाबी लेखकाचाही तपशील सापडेल.
https://tinyurl.com/3jcyf4em
एक छोटेखानी कथा…
कमिला शम्सी या पाकिस्तानी-ब्रिटिश लेखिका. म्हणजे जन्म आणि जडण-घडण कराचीत. नंतर कर्मभूमी लंडन. समांतर काळातील पाकिस्तान-ब्रिटिश जगण्यावर त्यांच्या कथा असतात. चुरेल (चुडेल) या नावाची कथा गेल्या वर्षीच्या ‘बेस्ट ब्रिटिश शॉर्टस्टोरी’ संचामध्ये समाविष्ट झाली होती. ती ‘बार्सिलोना रिव्ह्यू’च्या ताज्या अंकात पूर्णपणे मोफत वाचता येईल. https://tinyurl.com/5n8yudsz