निखिलेश चित्रे

‘गॉथिक भयकथा’ या प्रकारातला एक महत्त्वाचा घटक म्हणजे भूतकाळाचं वर्तमानावर असलेलं वर्चस्व. ते या कादंबरीतही आहे भूतकाळातली अपूर्ण राहिलेली फिल्म किंवा त्याहीपेक्षा जुने अघोरी पंथ यांनी पात्रांच्या वर्तमानावर कब्जा केलेला आहे. पण तरीही ती निव्वळ भयकथा नाही…

Opinion of artists in The Mumbai Literature Live Festival about Jaywant Dalvi Mumbai news
सूक्ष्म निरीक्षणातून मानवी भावभावनांचा वेध घेणारे लेखक म्हणजे जयवंत दळवी; ‘द मुंबई लिटरेचर लाईव्ह फेस्टिव्हल’मध्ये कलाकारांचे मत
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Loksatta lokrang A collection of poems depicting the emotions of children
मुलांचं भावविश्व टिपणाऱ्या कविता
star pravah new serial tu hi re maza mitwa starring sharvari jog and Abhijit amkar
नव्या मालिकांची मांदियाळी! ‘स्टार प्रवाह’वर पुनरागमन करतेय ‘ही’ लोकप्रिय अभिनेत्री, जाहीर केली मालिकेची वेळ अन् तारीख…
Loksatta chaturang article English playwright Christopher Marlowe Dr Faust plays journey of life
मनातलं कागदावर : स्वर्ग की नरक?
chaturang article
‘भय’भूती : भयातून अभयाकडे
Star Pravah New Serial Lagnanantar Hoilach Prem
लग्नानंतर होईलच प्रेम : नव्या मालिकेची संपूर्ण स्टारकास्ट माहितीये का? मृणाल दुसानिस अन् ज्ञानदाच्या भूमिकेविषयी जाणून घ्या…

सिल्विया मोरेनो गार्सिया ही लेखिका समकालीन नवभयकथालेखकांमध्ये महत्त्वाची मानली जाते. चार वर्षांपूर्वी आलेल्या ‘मेक्सिकन गॉथिक’ या कादंबरीमुळे गार्सियाचं नाव जागतिक साहित्याच्या पटलावर ठळकपणे उमटलं. तिची गेल्या वर्षी प्रकाशित झालेली ‘सिल्व्हर नायट्रेट’ ही कादंबरी लेखिकेची प्रतिष्ठा अधोरेखित करणारी आहे.

गार्सियाच्या कादंबऱ्या समकालीन वास्तवात अलगद झिरपत जाणारं विलक्षणाचं तत्त्व जगण्याच्या मूलभूत प्रश्नांशी जोडतात. त्यामुळे भयकथेचे घटक प्रभावीपणे वापरलेले असूनही या कादंबऱ्यांचा गांभीर्यानं विचार करावा लागतो. तिच्या २०१५ साली (स्पॅनिशमधून) इंग्रजीत आलेल्या ‘सिग्नल टू नॉईज’ या कादंबरीत ग्रामोफोन तबकड्यांच्या खाचांमध्ये दडलेल्या अद्भुताचं भेदक चित्रण होतं. ‘सिल्व्हर नायट्रेट’ त्याच्या एक पाऊल पुढे जाते. कादंबरीच्या शीर्षकात उल्लेख येणारं सिल्व्हर नायट्रेट हे संयुग विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात सिनेमाच्या फिल्मची रिळं बनवण्यासाठी वापरलं जायचं. पण ते अति-ज्वलनशील असल्यामुळे १९५० नंतर त्याचा वापर बंद झाला. सिल्व्हर नायट्रेटच्या ज्वलनशीलतेचा वापर टॅरॅन्टिनोच्या ‘इनग्लोरियस बास्टर्ड्स’ या सिनेमात केलेला सिनेरसिकांना आठवत असेलच. गंमत म्हणजे सिल्व्हर नायट्रेटचा वापर ज्या काळी सिनेमाच्या रिळांमध्ये केला जायचा, त्याच काळात ते स्फोटकांमध्येही वापरलं जायचं.

हेही वाचा >>> अन्वयार्थ: चंद्राबाबूंचे चोचले चालतील?

कादंबरीची कथा १९९३ सालात घडते. मात्र तिची पूर्वपीठिका चाळीसच्या दशकातल्या एका न बनलेल्या (काल्पनिक) सिनेमाशी संबंधित आहे. आबेल उरुएता नावाचा दिग्दर्शक ‘बिहाइंड द यलो वॉल’ नामक फिल्म नुआर प्रकारातली फिल्म बनवत असतो. ती फिल्म पूर्ण होऊ शकत नाही, कारण तिच्या चित्रीकरणात अनेक अडचणी येत राहतात. ही अपूर्ण फिल्म लवकरच एक दंतकथा बनते. अशीच वर्षं जातात. उरुएता निनावी आयुष्य जगत असताना त्याला मॉन्तसेरात नामक ध्वनी संपादक भेटते. ती उरुएताच्या अपूर्ण सिनेमानं झपाटलेली असते. ते पाहून उरुएता तिच्या मदतीनं फिल्म पूर्ण करायचं ठरवतो आणि विलक्षण घटनांची मालिका सुरू होते.

सिल्विया मोरेनो गार्सिया वाचकाला सिनेमाच्या इतिहासाची अद्भुत सफर घडवते. त्यात भयकथेचे घटक खुबीनं पेरलेले असतात. जादूटोणा असतो. भानामती असते, आणि हे सगळं नात्झी संघटनांशी संबंधित असतं. या कादंबरीच्या निवेदनात सिनेमा-तत्त्व ठळकपणे येतं. ते केवळ दृश्यात्मक किंवा चित्रमय वर्णनांपुरतं मर्यादित नाही, तर सिनेमात ज्याप्रमाणे दृश्य, ध्वनी, रंग आणि काळ हे घटक संपादनाच्या आधारे एकत्र आणून विशिष्ट परिणाम साधला जातो किंवा विशिष्ट अभिव्यक्ती साधली जाते, तशीच अभिव्यक्ती लेखिकेनं या कादंबरीत साधली आहे. कादंबरीत लेखिका खऱ्या आणि काल्पनिक सिनेसंदर्भांचा रोचक मेळ घालते. प्रमुख पात्र ध्वनी संपादक असल्यानं सिनेनिर्मितीशी संबंधित फोली साऊंड, री-रेकॉर्डिंगसारख्या संज्ञांचीही कादंबरीत रेलचेल आहे. या तपशिलांमधून निवेदनाला घनत्व लाभतं. कादंबरीचं अंतर्गत वास्तव ठोसपणे उभं राहायला मदत होते. या तपशिलांच्या आधारे मोरेनो गार्सिया वाचकाला मेक्सिकन बी ग्रेड सिनेमाच्या अधोविश्वात खोल बुडी मारायला लावते. मॉन्तसेरातची ध्वनिमिश्रणाची कौशल्यं फिकुटलेली फिल्म पोस्टर्स, प्रोजेक्टरचा लुकलुकणारा झोत आणि सभोवतालचे आवाज या तपशिलांतून अधिक उठून दिसतात. लेखिकेनं हे तपशील गोळा करण्यासाठी आणि निर्माण करण्यासाठी घेतलेले श्रम सिनेमाची एक दुर्लक्षित उपसंस्कृती जिवंत करतात.

हेही वाचा >>> संविधानभान: संविधानातील मातृप्रेम

सिनेमाच्या सुरुवातीच्या काळात त्याची तुलना जादूशी केली जायची. प्रोजेक्टरचा पूर्वज असलेल्या चित्रं प्रक्षेपित करणाऱ्या सतराव्या शतकातल्या उपकरणाला तर ‘मॅजिक लॅन्टर्न’ किंवा जादूचा कंदील म्हटलं जायचं. मोरेनो गार्सिया या कादंबरीत सिनेमाचा जादू आणि अतींद्रिय गोष्टींशी असलेल्या संबंधांचा अधिक खोलवर शोध घेण्याचा प्रयत्न करते. सिनेनिर्मितीची तंत्र आणि तांत्रिक साधना यातल्या सीमारेषा पुसट करते. त्यातून एक सुरस आणि चमत्कारिक आख्यान तयार होतं.

वर्गीकरणच करायचं झालं तर या कादंबरीला ‘गॉथिक भयकथा’ या प्रकारात बसवता येईल. अठराव्या शतकातली हॉरेस वॉलपोल लिखित ‘द कासल ऑफ ओत्रांन्तो’ ही या प्रकारातली पहिली कादंबरी मानली जाते. अशा कादंबऱ्यांची संविधानकं सर्वसाधारणपणे जुने किल्ले, गढ्या किंवा वाड्यात घडतात. या वास्तूंच्या गॉथिक स्थापत्याशी असलेल्या संबंधामुळे या साहित्याप्रकाराला हे नाव पडलं असावं. गॉथिक भयकथेतला आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे भूतकाळाचं वर्तमानावर असलेलं वर्चस्व. ‘सिल्व्हर नायट्रेट’मध्येही हा घटक ठळकपणे वापरलेला दिसतो. भूतकाळातली अपूर्ण राहिलेली फिल्म किंवा त्याहीपेक्षा जुने अघोरी पंथ यांनी पात्रांच्या वर्तमानाचा कब्जा घेतलेला आहे. गॉथिक साहित्यातल्या भयावह घटना किंवा प्रसंग पात्रांच्या मानसिक किंवा सामाजिक संघर्षाचं रुपक म्हणून येतात. कादंबरीत मॉन्तसेरातचं दैनंदिन कामाच्या एकसुरीपणाला उबगलेलं असणं किंवा तिच्या प्रियकराचं टीव्ही मालिकांमध्ये अभिनय करून विटणं अशा मानसिक परिस्थितीचंच पुढे भयावह घटनांमध्ये रूपांतर होत असावं. त्यामुळे ही कादंबरी वाचकाला केवळ घाबरवून घटकाभर करमणुकीचा विरंगुळा देत नाही, तर त्या पुढे जाऊन पात्रांच्या मानसिक आणि सामाजिक परिस्थितीविषयी काही मार्मिक भाष्य करते.

लेखिकेनं पात्रनिर्मितीकडेही विशेष लक्ष दिलेलं जाणवतं. कादंबरीतली दोन प्रमुख पात्रं, मॉन्तसेरात आणि तिचा प्रियकर त्रिस्तान यांची पात्रं विशिष्ट स्वभाववैशिष्ट्यं, दैनंदिन आयुष्यातले लहानमोठे तपशील, भूतकाळाचे संदर्भ या साधनांच्या माध्यमातून जिवंतपणे साकारतात. मॉन्तसेरात ही एकलकोंडी आणि सिनेमावेडी आहे. विशेषत: तिला हॉरर सिनेमा विशेष प्रिय आहे. ध्वनिसंपादनाचं आपलं कामही तिला अतिशय प्रिय आहे. त्यामुळे त्यातल्या आव्हानहीनतेला कंटाळूनही ती ते काम सोडत नाही. त्रिस्तान एक अपयशी अभिनेता. तो स्वत:च्या आयुष्यातली पोकळी भरून काढण्यासाठी मॉन्तसेरातचा वापर करतो. तो अपराधगंडानं ग्रस्त आहे. हा अपराधगंड त्याला आयुष्यात नवं पाऊल उचलण्यापासून रोखतो. थोडक्यात, मॉन्तसेरात आणि त्रिस्तान ही दोन रिक्त आयुष्यं एकमेकांच्या आधारे काहीतरी भरीव निर्माण करण्याचा प्रयत्न करत राहतात. ही ठोस वास्तववादी सुरुवात दोन कामं करते. एक तर ती मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे आवश्यक तपशिलांच्या आधारे कादंबरीचं विश्व भक्कमपणे उभं करते आणि दुसरं म्हणजे वाचकाला गाफील ठेवत उत्तरार्धात वेगळ्याच दिशेला जाते.

कादंबरी काहीशा विलंबित लयीत पुढे जाते. त्यामुळे काहीतरी थरारक आणि चटपटीत वाचण्यासाठी ती हाती घेणाऱ्यांची निराशा होण्याची शक्यता आहे. मात्र, ही संथ लय धीराच्या वाचकाला कादंबरीच्या विश्वात हळूहळू ओढून घेते. काही पानांनंतर निवेदनाची लय संथ असली तरी वाचनाचा वेग मात्र वाढत जातो.

सिल्व्हर नायट्रेट या कादंबरीत भयकथेचे घटक प्रामुख्यानं येत असले, तरी तिला निव्वळ भयकथा म्हणणं तिच्यात असेल्या इतर बहुकोनी, बिलोरी आशयघटकांवर अन्यायकारक ठरेल. ही कादंबरी एकीकडे सिनेमा या माध्यमाचं गारूड शोधण्याचा प्रयत्न करते, तर दुसरीकडे भयजाणिवेच्या विविध कंगोऱ्यांनाही स्पर्श करते. तिच्यात मानवी एकटेपणाचा आशयघटकही तेवढाच महत्त्वाचा आहे, तर दैनंदिन आयुष्यातली असंगती हाही तिच्या आशयाचा अभिन्न भाग आहे, म्हणून तिला भयकादंबरी न म्हणता भयजाणिवेचा धांडोळा घेणारी सिनेकादंबरी म्हणणं जास्त योग्य ठरावं.

सिल्व्हर नायट्रेट

लेखिका : सिल्विया मोरेनो-गार्सिया

प्रकाशक : रॅण्डम हाउस

पृष्ठे : ३२३; किंमत : १५९८ रु.

satantangobela@gmail.com