पंकज भोसले
‘बुकर पारितोषिका’च्या अंतिम स्पर्धेत उरलेल्या सहा कादंबऱ्यांबद्दलच्या या वार्षिक सदरातलं पहिलं पुस्तक आकारानं लहान, पण मोठी अस्वस्थता देणारं. बिल फरलाँगची गोष्ट सांगताना आर्यलडमधील स्त्री अन्याय छावण्यांचा इतिहास उघड करणारी ही कादंबरी..
आयरिश लेखिका क्लेअर कीगन यांची ‘स्मॉल थिंग्ज लाइक दीज’ ही कादंबरी बुकर पारितोषिकाच्या लघुयादी स्पर्धक इतिहासातील आत्तापर्यंतची आकाराने सर्वात लहान कादंबरी. पुस्तकाची ११६ पाने भरणारी. किंडलवर हाताळल्यास दोन तास पंचेचाळीस मिनिटांचा वाचनकाल दाखवणारी आणि ‘ऑडिबल’वर एक तास ५७ मिनिटांत आटोपणारी. बारा वर्षांपूर्वी ‘न्यू यॉर्कर’मध्ये त्यांची ‘फॉस्टर’ नावाची दहा-बारा पाने भरतील इतकी कथा आली होती. त्या कथेत किंचित भर घालून त्यांनी नव्वद पानांचे छोटेखानी पुस्तक केले. आर्यलडमधील छोटेखानी गावातील माणसांच्या गोष्टी गेली तीसेक वर्षे रचणाऱ्या या लेखिकेच्या ९९ टक्के कथा या इथल्या खेडेगावांत घडतात. ‘न्यू यॉर्कर’, ‘ग्रॅण्टा’, ‘द पॅरिस रिव्ह्यू’ या कथेसाठी अव्वल मानल्या जाणाऱ्या नियतकालिकांत त्या छापूनही येतात. २००२ साली जपानी लेखक हारुकी मुराकामी यांनी निवडलेल्या आणि संपादित केलेल्या ‘बर्थडे स्टोरीज’ या कथा संकलनात त्यांच्या कहाणीची उपस्थिती दिसते, तसाच ‘बेस्ट अमेरिकन शॉर्ट स्टोरीज’ (२०११) मध्येही त्यांच्या कथेचा सन्मानाने समावेश झालेला पाहायला मिळतो. दोन कथासंग्रह, ‘फॉस्टर’ ही लघुकादंबरी आणि त्यानंतर बारा वर्षांनी आलेली ‘स्मॉल थिंग्ज लाइक दीज’ ही लघुतम कादंबरी एवढय़ाच त्यांच्या आत्तापर्यंतच्या प्रकाशित कलाकृती. पैकी याच वर्षी त्यांच्या ‘फॉस्टर’वर ‘द क्वाएट गर्ल’ हा चित्रपट आला आणि याच वर्षी ‘स्मॉल थिंग्ज लाइक दीज’ने बुकरच्या लांबोडक्या यादीतून लघुयादीत शिरकाव करीत वाचकांचे बृहद्क्षेत्र व्यापले.
हेही वाचा >>> अग्रलेख : ‘फेडरर रिपब्लिक’..
एका बैठकीत संपणारी ही लघुकादंबरी बुकर स्पर्धेच्या अंतिम यादीत आली, याचे कारण हे टापटीप- खुमासदार वाचन संपवल्यानंतर निर्माण झालेल्या आर्यलडच्या लपवून ठेवलेल्या इतिहासातील प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी, तपशिलांच्या अधिक जोडणीसाठी वाचकाकडून सुरू होणारा तपास. कथालेखिकेकडून प्रस्तुत लेखन काल्पनिक असून त्याचा वास्तवातील अमुक संस्थेशी, तिथल्या व्यक्तींशी संबंध नाही, असा दाखला दिला गेला आहे. मात्र या जाहिरातीकरणानंतर कटकटींचा, मानसिक त्रासाचा संभाव्य जाच टाळत तिला कल्पनेच्या आवरणाखाली खऱ्या इतिहासाचा तुकडा रांधता आला आहे. त्यामुळे आकाराने आणि नावाच्या अर्थानेही ‘लहान’ असलेल्या या कादंबरीतील आशयद्रव मात्र अजिबातच तितका नाही.
या पुस्तकावर नजर टाकण्याआधी या लेखिकेविषयी थोडक्यात. काही काळ अमेरिकेत राहून- शिकून वगैरे पुन्हा आर्यलडमध्ये परतलेल्या या लेखिकेने आपल्या कथालेखनाच्या प्रवासाबद्दल एका मुलाखतीत म्हटले आहे, की ‘उच्चशिक्षण मिळवूनही मला माझ्या देशात नोकरी मिळवणे अवघड होऊन बसले.’ आईच्या आवडीच्या, दुपारी लागणाऱ्या टीव्ही कार्यक्रमात ‘लघुकथा’ स्पर्धा आयोजित केल्याचे समजले. बेकारीच्या या दिवसांत तेथे पाठविलेली लघुकथा हजारो स्पर्धकांमध्ये पहिल्या दहांमध्ये निवडली गेली. त्यानंतर गांभीर्याने कथालेखन सुरू झाले आणि साहित्यिक पार्श्वभूमी नसलेल्या या लेखिकेच्या गावगोष्टी जगाच्या वाचननकाशावर आल्या. अॅलिस मन्रो यांच्या कॅनडातील खेडेगावातील कथांसारख्याच त्या नावाजल्याही गेल्या. पोस्टमन, वाफाळलेल्या तरुणी, धर्मगुरू, पापभीरू माणसे, प्रेमिक, वाताहत झालेली कफल्लक कुटुंबे, आर्थिक ओढगस्तीही सन्मानाने जगणाऱ्या व्यक्ती त्यांच्या कथांचे विषय बनले. अमेरिकी आणि युरोपीय विद्यापीठांत त्या सर्जनशील कथालेखन शिकवतात आणि ‘मी चांगले लिहायला नाही, तर आधी चांगले वाचायला शिकवते’ हे सातत्याने सांगतात. लेखक हा भरपूर आणि प्रचंड वाचनातूनच घडू शकतो हे त्या बिंबवतात. ‘किती वाचन चांगले लेखन घडवू शकते, अशा पोकळ चर्चा करणारे लोक वाचन टाळण्याच्या सबबी कायम शोधत असतात’ हा त्यांचा सिद्धांत असून स्वत:च्या कथा ३० ते ५० पुनर्लेखनानंतरच प्रसिद्ध करण्यास धजावतात, हे त्या कबूल करतात.
कीगन यांच्या कथांची पारंपरिक मराठी वाचकाच्या नजरेतून तुलना करायला घेतली, तर इथल्या कुण्या एका काळातील ग्रामीण कथांच्या धोपट ‘झुंजुमुंजु झालं’, ‘पूर्वेकडून नुकताच निघालेला सूर्यदेव आग ओकीत होता’ छापातील निसर्गवर्णनांनी आरंभ होणाऱ्या कथांसारखी ओळखीची पार्श्वभूमी सापडायला सुरुवात होईल. अनेकदा ऋतुबदलाचे दृश्यात्मक तपशील मांडत त्यांच्या कथा गावातील वळणावळणांची, तिथे राहणाऱ्या माणसांची ओळख करून देतात. ‘स्मॉल थिंग्ज लाइक दीज’मध्येही असेच पानगळीपासून नाताळाच्या दिवशी बफरेत्सव होण्याआधीच्या दिवसांच्या वर्णनांचा अंतर्भाव आहे. पण य.गो. जोशी, साने गुरुजी छापाच्या वळणाने सुरू होणारी कीगन यांची कुटुंबकथा भाऊ पाध्ये, दि.पु. चित्रे आणि श्रीकांत सिनकर या वास्तववादी लेखकांचा ‘समाजातील कीड’ दाखवणारा पथ कसा स्वीकारते, हे पाहताना गुंगायला होते.
‘स्मॉल थिंग्ज लाइक दीज’ला सरळरेषी कथानक नाही. इथला मध्यमवयीन कथानायक बिल फरलाँग हा आर्यलडमधील खेडय़ातला कोळसा व्यापारी. गावातील लोकांचे जगण्यासाठीचे प्रमुख इंधन कोळसा असल्याने त्याचे गावासाठी अवलंबित्व मोठे. पण हा नुसता नावालाच ‘व्यापारी’. प्रत्यक्षात घरोघरी कोळसा पुरवण्याचे, त्यासाठी कपडे खराब करीत आपली लॉरी हाकण्याचे काम अव्याहत तो करतो. आयलिन या आपल्या पत्नीवर तो खूप प्रेम करतो. त्याच्या या ‘खूप प्रेमा’ची पावती, त्याच्या पाच मुलींद्वारे लक्षात येते. शिवाय वंशाचा दिवा उजळविण्यासाठी या पाच मुली झाल्या नसल्याचेही पुढे वाचकाला लक्षात आणून दिले जाते. तो पापभीरू असून दर रविवारी न चुकता प्रार्थनेसाठी सहकुटुंब चर्चमध्येही जातो. कुटुंबावर अतीव सुरक्षेची चादर पांघरण्यासाठी झटत असलेला बिल फरलाँग आपल्या गिऱ्हाईकांच्या घरी अँथ्रासाइट हा उच्च दर्जाचा कोळसा लॉरीमधून पोहोचवत असताना कीगन या संपूर्ण खेडय़ाची रपेट घडवून आणतात. नाताळात पूर्ण खेडे बर्फाच्छादित होण्याआधी मागणी असलेल्या कोळशाची पूर्तता करण्यात गुंतलेला बिल फरलाँग घरात आणि घराबाहेर जगत असलेल्या शांत-साध्या क्षणांमधून ‘स्मॉल थिंग्ज लाइक दीज’ची कथा फुलत जाते.
१९८५ सालात फारशी प्रगती न झालेल्या या खेडय़ात बिल फरलाँगची ओळख झाल्यानंतर, त्याचा भूतकाळ हा त्याच्या स्मरणातून जिवंत केला जातो. सोळा वर्षांच्या, लग्न न झालेल्या मुलीच्या पोटी अपघाताने आलेल्या बिल फरलाँगची जडण आणि घडण त्याची आई ज्या घरात काम करते, त्याच्या मालकिणीच्या औदार्यामुळे बरी झालेली असते. वडील कोण, याची माहिती हयातभर घेत असलेल्या बिलसाठी ती गोष्ट पूर्णपणे अशक्य बनलेल्या या दिवसांत, लहानपणापासून त्यामुळे सोसाव्या लागलेल्या घटनांची मालिका समोर आणली जाते. पण ती जुजबी स्वरूपात. आता आपल्या आणि आपल्या कुटुंबाला सर्वसंपन्नतेचा स्पर्श झालेला नसला, तरी कोणतीही तोशीस नसल्याचे समाधान बिल आणि आयलिन या दाम्पत्याला आहे. फार संपत्ती नसली, तरी घरातील प्रत्येक जण सुखाने दोन घास खातो आणि खेडय़ातील आर्थिक ओढगस्तीच्या वातावरणातही आपण कर्जविरहित जगतो, याचाही त्यांना अभिमान आहे. वाढत्या पाच मुलींचे जगाच्या वाईट नजरेतून, वाईट प्रवृत्तीपासून संरक्षण करणे हे त्याचे कर्तव्य कीगन यांच्या वर्णनांतून जागोजागी दिसते. यात नाताळसाठी केक बनविण्याचा कुटुंबाचा उत्साह प्रत्येक जण करीत असलेल्या मदतीसह आणि वापरत असलेल्या साहित्यासह आला आहे.
आर्यलडमधील ‘मॅग्डालीन लॉण्ड्रीज’चे रूप असलेल्या गावातील जोगिणींच्या मठात कोळसा पुरवण्याच्या निमित्ताने जाताना त्याची गाठ या मठात राबवल्या जाणाऱ्या तरुण जोगतिणींशी होते. प्रेमव्यवहारांतील चुकीमुळे, चवचाल ठपका लागल्यामुळे, कुमारी माता बनल्यामुळे नाकारलेल्या कुटुंबातून रवानगी होणाऱ्या आणि चर्च-सरकारच्या आश्रयामुळे जवळजवळ कोंडण्यात आलेल्या या तरुणींचे दु:ख त्याला उमजते. आपल्या आईवर तिच्या मालकिणीने दाखविलेल्या औदार्यामुळे या यातना छावणीपासून तिची सुटका झाली, याची जाणीव तीव्र व्हायला लागते. मूल हिसकावून कोळसागृहात खितपत पडलेल्या एका जोगतिणीला मदत करताना मन द्रवलेला हा पापभीरू माणूस एका ठोस निर्णयावर येऊन पोहोचतो. त्याची ही कहाणी. गावाचे कोनाडे-कोनाडे फिरवून आणणारी. नदीत लॉरीचे प्रतििबब असेल किंवा खानावळीत जेवताना तिथल्या मालकिणीने दिलेला सल्ला असेल, कीगन त्याचे खिळवून ठेवणारे वर्णन करतात. अगदी भुरकटल्या-धुरकटल्या रात्री गल्ल्यांमधील कचरापेटय़ांत अन्न शोधत तोंड खुपसणारे कुत्रे किंवा सधन कुटुंबांनी कुत्र्या-मांजरांच्या डब्यात ठेवलेल्या दुधावर ताव मारण्याची वेळ आलेले गरीब पोरही त्यांच्या नजरेतून सुटत नाही.
कादंबरी संपल्यानंतर दिलेल्या विशेष नोंदीत १९९६ पर्यंत सुरू असलेल्या ‘मॅग्डालीन लॉण्ड्रीज’चे आणि त्यानंतर त्यातील व्यवहाराचे तपशील खोडून टाकण्याच्या प्रयत्नांबाबतची छोटीशी माहिती कीगन यांनी दिली आहे. तेवढी माहितीही कथेत न मांडलेल्या जागा भरून काढण्यास पुरेशी आहे. पण गेल्या दहा वर्षांत ‘मॅग्डालीन लॉण्ड्रीज’चा इतिहास-वास्तव मांडणारे अनेक माहितीपट तयार झाले आहेत. त्यांचे ओझरते दर्शनही या कादंबरीला आणि त्यातल्या बिल फरलाँगला अधिकाधिक उमजून घेण्यासाठी संदर्भपूरक ठरतील. आर्यलडमधील स्त्री अन्याय छावण्यांचा इतर जगासाठी लपविण्यात आलेला इतिहास (किंचितही उग्र न करता) सर्वसामान्य नायकाद्वारे नाताळी कुटुंबकथेतून सादर करण्याचा क्लेअर कीगन यांचा हा कथाप्रयोग लघुयादीत या पुस्तकाचे स्थान का, हे स्पष्ट करणारा आहे.
‘स्मॉल थिंग्ज लाइक दीज’
लेखिका : क्लेअर कीगन
प्रकाशक : ग्रूव्ह प्रेस, पृष्ठे :११६
किंमत : ५९९ रु. (हार्डकव्हर)
कीगन यांची गाजलेली ‘फोस्टर’ कथा वाचण्यासाठी
या वर्षी फेब्रुवारीत ‘न्यू यॉर्कर’ने छापलेली कथा वाचण्यासाठी https://www.newyorker.com/magazine/2022/02/28/fiction-claire-keegan-so-late-in-the-day ‘मॅग्डालीन लॉण्ड्रीज’बद्दल बीबीसीचा वृत्तपट https://www.youtube.com/watch?v=ChDRDrb7e-U