ब्रिटनचे राजपुत्र हॅरी आणि त्याची पत्नी मेगन यांच्यावर राजे चार्ल्स आणि त्यांची दुसरी पत्नी कॅमिला यांनी कसा अन्यायच केला, हे सांगणाऱ्या या पुस्तकानंतर राजघराणं कधी तरी एकत्र येईल का?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘ब्रिटिश राजघराण्याचा बडिवार कमी केला पाहिजे,’ असा विवेकी विचार ब्रिटनचे विद्यमान राजे तृतीय चार्ल्स यांनी फार पूर्वीपासून, म्हणजे ते युवराज होते तेव्हापासून मांडलेला आहे. पण त्यांच्याच धाकटय़ा मुलाचं- हॅरीचं- जे नवीन पुस्तक नुकतंच बाजारात आलं आहे, त्यामुळे तर हा विचार आकस्मिकरीत्या खरा ठरू शकतो!

हे धाकटे राजपुत्र हॅरी राजवाडा आणि शाही तनखा सोडून अमेरिकेत राहातात, पण अद्याप तरी ‘डय़ूक ऑफ ससेक्स’ या उपाधीनं ओळखले जातात. ‘स्पेअर’ नावाच्या पुस्तकातून हॅरी यांनी आपण राजघराण्यापासून का विभक्त झालो, त्यामागे कोणत्या कटू घटना आहेत, याच्या आठवणी अगदी तपशीलवार सांगितलेल्या आहेत. हे पुस्तक १० जानेवारी रोजी अधिकृतरीत्या बाजारात येण्याआधीच त्यातला मजकूर उघड होऊ लागला. चर्चामधून चघळला जाऊ लागला. हॅरी यांचे मोठे बंधू युवराज विल्यम, विल्यमची पत्नी कॅथरीन ऊर्फ केट, वडील (राजे) चार्ल्स, त्यांची पत्नी कॅमिला (हॅरीची सावत्र आई) यांच्याबद्दल तक्रारीच्या सुरातला इतका मजकूर आहे की, यापुढे हॅरी हे वडिलांशी समेट करून परत येतील अशा कोणत्याही शक्यता नजीकच्या काळात तरी नष्टच झालेल्या आहेत.

थोरला पुत्र म्हणून विल्यमचा क्रमांक वरचा, हे ठरल्यामुळे ब्रिटिश राजघराण्याबद्दल सर्रास वापरल्या जाणाऱ्या शब्दांत विल्यम हेच ‘हेअर’ (वारस) आणि हॅरी ‘स्पेअर’ (वारसासाठी पर्याय) म्हणून ओळखले गेले.. पण अमेरिकेत प्रकाशित झालेल्या या पुस्तकाचं ‘स्पेअर’ हे नाव जणू ‘सुटा भाग’ या अर्थाचा अवमानकारक शब्द म्हणूनच पाहिलं जातं आहे! (पुस्तकात विल्यम आणि हॅरीच्या एका मारामारीचा प्रसंग आहे- त्यात म्हणे विल्यम म्हणतो : मी तुला फार नाही मारणार.. तू तर ‘स्पेअर’ आहेस!)

तडा सांधणं कठीण

हॅरीच्या म्हणण्यानुसार, त्याच्या वडिलांच्या आणि सावत्र आईच्या एका सहायकानं विल्यम आणि त्याची पत्नी कॅथरीन यांच्याबद्दल लंडनच्या वर्तमानपत्रांमध्ये नकारात्मक कथा छापवून आणल्या- मग या असल्या कागाळय़ांचा पायंडाच पडला. त्या चिखलफेकीच्या प्रथेचा त्रास त्याला आणि मेगनलाही झाला, त्यामुळे तर राजवाडा सोडण्याच्या निर्णयाला हातभारच लागला.

‘अशा प्रकारे वापरून घेतलं गेल्याबद्दल मला चीड होती. मेगनबाबत असं केलं जात असल्याबद्दल मी संतापलोच होतो’ असं हॅरीने पुस्तकात म्हटलं आहे. ‘पण त्याआधी विलीच्या बाबतीत असंच घडत होतं हे मला मान्य करावं लागलं. आणि तो त्याबद्दल न्याय्यपणे चिडलादेखील होता’ असंही त्याच परिच्छेदात नमूद आहे. तरीही, विल्यमबद्दल फारशी सहानुभूती या पुस्तकात नाही.

‘बकिंगहॅम पॅलेस’ राजवाडा या पुस्तकाबद्दल इतके दिवस काहीही बोललेला नाही.. लंडनमधल्या त्या राजवाडय़ात राहणारं ब्रिटनचं राजघराणं सहसा कधीही पुस्तकं/ चित्रपट आदींमधून आपल्यावर होणाऱ्या टीकेसंदर्भात काहीही भाष्य करीत नाही. इथं मात्र खुद्द घरातल्या- मुलाने आरोप केलेले आहेत.

ब्रिटनच्या राजघराण्याबद्दल बातम्या देणारे बातमीदार, या राजेशाहीचे इतिहासकार आणि अभ्यासक यांचं साधारण मत मात्र, ‘राजघराण्याने हॅरीच्या या आरोपांबाबत काहीएक पावलं उचलणं गरजेचं आहे’, या बाजूनं झुकलेलं दिसतं. ‘राजे चार्ल्स यांच्या राज्याभिषेकाचा मोठा सोहळा येत्या मे महिन्यात होणार आहे. त्याआधी विल्यम आणि हॅरी यांची दिलजमाई दिसावी लागेल, अन्यथा राज्याभिषेकासाठी हॅरी यांना निमंत्रणच नसणं हे त्या सोहळय़ावरील सावटच ठरेल,’ असं या अभ्यासकांना वाटतं.

खुद्द राजावरच आरोप

तत्कालीन युवराज्ञी (हॅरी आणि विल्यम यांची आई) डायना यांचा १९९७ मध्ये अपघातात मृत्यू झाला होता. त्यानंतर हॅरी-मेगन  हेच सर्वात मोठं वादळी प्रकरण आहे, असं अनेक तज्ज्ञांनी सांगितलं. डायनाच्या मृत्यूनंतर राणी एलिझाबेथ गप्प राहिल्या. त्यानंतर आता राजे चार्ल्स यांच्याबद्दल ‘ते गप्प का?’ हा प्रश्न टोकदार ठरू शकतो. बीबीसीसाठी राजघराण्याच्या बातम्या देणारे माजी वार्ताहर पीटर हण्ट म्हणाले, ‘‘भूतकाळात प्रत्येक वेळी त्यांची सुटका करणारी मुख्य गोष्ट म्हणजे राणी निंदेच्या वर होती.. परंतु आता राजावरच भावाभावांमध्ये फूट पाडल्याचा आरोप होतो आहे.’’

‘‘राजवाडय़ानं असं सूचित केलं आहे की, हॅरी आणि मेगन यांना राज्याभिषेकासाठी आमंत्रित केलं जाऊ शकतं. असं सुचवलं आहे की, चार्ल्स अजूनही सामोपचाराची आशा करताहेत.  पण आधीच इतकं घडलं आहे की हॅरी राजेशाही पोशाखात, वडील आणि थोरल्या भावासोबत वेस्टमिन्स्टर अ‍ॅबीकडे कूच करत आहे याची कल्पना करणंही आता कठीण आहे, ’’ – असं पीटर हण्ट यांचं म्हणणं आहे.

राजघराण्याचं संस्थात्मक अपयश

ब्रिटिश इतिहासकार एड ओवेन्स यांचा राजघराणं आणि प्रसारमाध्यमे यांच्या संबंधांवर विशेष अभ्यास आहे. त्यांच्याही मते, दिलजमाई कठीणच दिसते. ‘‘हे राजघराणं दिसतं तितकं घट्ट नाही, त्याची वीणच उसवली आहे; हे एव्हाना पुरेसं उघड झालेलं आहे. राजघराण्याचंच हे संस्थात्मक अपयश आहे’’ – असा निष्कर्ष ओवेन्स यांनी मांडला.

ओवेन्स म्हणाले की,  विल्यमचं या पुस्तकामुळे विशेषत: नुकसान झालं आहे. हा मोठा भाऊ वाईट स्वभावाचा, आयतं मिळालेला आणि मारकुटा आहे असं चित्रण हॅरी करतो. ‘‘आता हॅरीला ते कसं सांभाळून घेणार, यावरच सारं अवलंबून राहील’’ – अशा शब्दांत पुढल्या काळात हे संबंध सहजपणे सांधले जाणार नसल्याचं ओवेन्स यांनी स्पष्ट केलं.

हॅरी यांनी दोन अमेरिकी वाहिन्यांना (आयटीव्ही आणि सीबीएस) मुलाखती देऊन या पुस्तकाचा प्रचार गेल्या आठवडय़ात सुरू केला. पेंग्विन रँडम हाऊसने प्रकाशित केलेलं हे पुस्तक प्रकाशन तारखेच्या जवळपास एक आठवडा आधीच, स्पेनमध्ये ‘चुकून’ विक्रीसाठी आलं आणि ब्रिटिश व अमेरिकी वृत्तपत्रांनी त्या पुस्तकाचे भाग छापण्याचा सपाटाच लावला. 

समेटाचं दार उघडं आहे?

मेगनला पहिलं मूल होणार असताना राजघराण्यातील एका व्यक्तीने त्या भावी अपत्याबद्दल वर्णविद्वेषी मल्लिनाथी केली तेव्हा मी भडकलो, हा २०२१ सालच्या ‘ओप्रा विनफ्रे शो’मध्ये हॅरीनेच सांगितलेला असल्यामुळे अनेकांना माहीत असलेला प्रसंग. मात्र पुस्तकात त्याबद्दल काहीच तपशील कसा नाही, याविषयी काही दैनिकांनी नवल व्यक्त केलं आहे.

‘हलक्या- फार अपायकारक नसलेल्या अमली पदार्थाची नशा मी गंमत म्हणून करायचो’ इथपासून ते ‘एका पबच्या मागे असलेल्या शेतात मी कौमार्य कसं गमावलं,’ इथवरचे सारे प्रसंग अगदी खुल्लमखुल्ला सांगणाऱ्या या पुस्तकात वर्णद्वेषाच्या आरोपांचा काहीही उल्लेख नाही, याचा अर्थच मुळी ‘समेटाचं एक दार हॅरीने उघडं ठेवलं आहे’ असा होतो, असाही दावा आता काही जाणकार करू लागलेले आहेत!

सावत्र आई- आता राजपत्नी- कॅमिला यांच्यावरच या पुस्तकाचा रोख असल्याने समेट होणार कसा, हे कोडंच आहे. दोन्ही बाजूंना बरेच क्षमाशील व्हावं लागेल, बरीच व्यापक दृष्टी बाळगावी लागेल.. अशा शब्दांत, समेट अशक्यच असल्याचा निर्वाळा पीटर हण्ट यांच्यासह सारेच ब्रिटिश इतिहासकार देताहेत.

(मूळ मजकूर ‘द न्यू यॉर्क टाइम्स’मध्ये प्रकाशित झाला असून तो अधिकृत करारानुसार येथे संकलित करण्यात आलेला आहे.) ‘स्पेअर’ या ४१६ पानी पुस्तकावर लेखक म्हणून प्रिन्स हॅरी असाच उल्लेख असला तरी, ते कुणाकडून तरी लिहवून घेतलं आहे, हे उघडं गुपित आहे! १९ तारखेनंतर ते मुंबई-दिल्लीच्या दुकानांमध्ये थडकेल.