जयराज साळगावकर

क्रूरकर्मा हुकूमशहा ही जोसेफ स्टालिनची एकतर्फी ओळख. त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे अभ्यासक, संपादक, द्रष्टा नेता असे विभिन्न पैलू होते..

book review pen america best debut short stories 2017 best debut short stories 2024
बुकमार्क : ‘नव्या हेमिंग्वे’च्या शोधातला कथाप्रकल्प…
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Kiran Samant On Rajan Salvi
Kiran Samant : “…म्हणून त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला नाही”, किरण सामंत यांचा राजन साळवींबाबत मोठा दावा
article written by tarkatirtha on future of marxism topic
तर्कतीर्थ-विचार : मार्क्सवादाचे भवितव्य
PM Narendra Modi Speech
JKF’S Forgotten Crisis हे पुस्तक विरोधकांनी वाचावं, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी का दिला? नेहरुंबाबत काय दावे आहेत?
PM Narendra Modi Speech
Narendra Modi : ४० मिनिटांच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांना कसं लक्ष्य केलं?
Prithviraj Chavan On Budget 2025
Prithviraj Chavan : “अर्थसंकल्पाने आमची घोर निराशा केली”, पृथ्वीराज चव्हाण यांची अर्थसंकल्पावरून टीका
Gandhi assassination Hindu Mahasabha Mangutiwar Narayan Apte Gwalior
‘गांधीहत्या’ म्हणताच काय आठवते?

‘’We are 100 years behind the advanced countries.We must make good this lag in ten years.  Either we do it,or they crush us!’’

– Josef  Stalin, (Fourth Plenum of Industrial Managers,  Feb. 4, 1931.)

जोसेफ स्टालिन हे ‘सोव्हिएत रशियाचे संघराज्य़ या देशाच्या  इतिहासातील महत्त्वाचे नाव. १९२२ ते १९५३ दरम्यान साम्यवादी रशिया स्टालिनच्या आधिपत्याखाली होता. यापैकी बराच काळ भारत पारतंत्र्यात होता. त्यामुळे भारतीय प्रसारमाध्यमांच्या मजकुराचे धोरण इंग्रज राजवट ठरवत होती. ब्रिटिशांचे धोरण टोकाचे स्टालिनविरोधी राहिल्यामुळे भारत सरकारची (ब्रिटिश इंडिया) प्रसारमाध्यमे स्टालिनबद्दल चांगले काही न लिहिता वाईट तेवढय़ा गोष्टींवरच भर देत असत. त्यामुळेच की काय, स्टालिनची दुसरी बाजू भारतीय जनमनात कधी उतरलीच नाही. उलट कम्युनिस्टांविषयी ब्रिटिशांचा एकतर्फी तिरस्कार भारतीय प्रसारमाध्यमांत व जनमानसात ठळकपणे दिसतो. स्टालिन जर इतका नराधम, गुन्हेगारी, नीच वृत्तीचा असता तर तो ३० वर्षे सत्तेत राहू शकला नसता.

रशियन युवक-युवतींच्या लोकप्रियतेच्या गुणांकनामध्ये गेली अनेक वर्षे पहिल्या क्रमांकावर झार निकोलाय (दुसरा) विराजमान होता. परंतु गेल्या दशकापासून ती जागा स्टालिनने घेतली आहे. हे शक्य झाले त्याला काही सबळ कारणे असतील. स्टालिनकडे पुन्हा नव्या नजरेने पाहात, या गोष्टींचा विचार व्हायला हवा. त्यातील एक गोष्ट म्हणजे, स्टालिनचे महाकाय ग्रंथालय. या ग्रंथालयात रोज तीन ते चार तास वाचन, मनन, लेखन आणि नोंदी करण्याची सवय त्याला होती. तो रोज ३०० ते ५०० पाने वाचायचा. तसेच त्यातील महत्त्वाच्या मजकुरावर लाल, निळय़ा व हिरव्या पेन्सिलने वेगवेगळय़ा खुणा करून ठेवायचा. मग त्याविषयी जाणकारांशी, अर्थतज्ज्ञांशी, प्रकाशकांशी, लेखकांशी व विचारवंतांशी चर्चा करायचा. अन्यथा स्टालिनला लिऑन ट्रॉटस्कीसारख्या प्रखर बुद्धिमान विचारवंताशी वैचारिक लढा देऊन त्याला पराभूत करणे अशक्य होते.

स्टालिन अभिमानाने ‘द एडिटर ऑफ यूएसएसआर’ असे बिरुद मिरवीत असे. त्याच्या अभ्यासानुसार त्याला जर आपल्या स्वत:च्या प्रस्थापित विचारसरणीशी तडजोड करावी लागली, तरी तो ती करत असे. स्वत: प्रखर मार्क्‍सवादी असूनही समाजवादी वर्णसंघर्षांवर त्याचे मार्क्‍सच्या विचारांशी जुळले नाही. तेव्हा त्याने त्यावर तोडगा सुचवून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. स्टालिन नसता तर दुसऱ्या महायुद्धाच्या विजयानंतर चर्चिल-रूझवेल्ट जोडीने रशियाचा, पूर्व युरोपचा मोठा लचका तोडला असता. चर्चिलने दुसऱ्या महायुद्धानंतर वाटण्यांची चर्चा करताना रूझवेल्टला असे सांगितले होते की, ‘तू आणि मी आपण भविष्यातील दशकांचा अभ्यास करतोय तर हा स्टालिन पुढील शतकांचा विचार करतोय, तेव्हा त्याच्याशी चर्चा करताना अतिशय सावध राहिले पाहिजे.’

जगाच्या अलीकडच्या इतिहासात रक्तरंजित क्रांती आणणारा क्रूरकर्मा हुकूमशहा म्हणून ज्याची एकतर्फी ओळख आहे, अशा जोसेफ स्टालिनचे विचारवंत आणि अभ्यासक म्हणून वर्णन करणाऱ्या जेफ्री रॉबर्टच्या ‘स्टालिन्स लायब्ररी – अ डिक्टेटर अ‍ॅण्ड हिज बुक्स’ या पुस्तकात, रशियाचा एक विद्वान, संवेदनशील, अभ्यासू नेता आपल्याला भेटतो. नुकत्याच प्रकाशित झालेल्या या पुस्तकात स्टालिनविषयी असे म्हटले आहे की, तो प्रज्ञावंत, आदर्श अनुशासक (स्टेट्समन) होता. त्याला इतिहास, मार्क्‍सवाद तसेच लिऑन ट्रॉटस्कीचे विचार वाचण्याची आवड होती. स्टालिनने ना कधी डायरी लिहिली, ना आठवणी. तो स्वत:च्या व्यक्तिगत जीवनाविषयीही कायम गप्पच राहिला.

इतिहास हा त्याचा सर्वाधिक आवडता विषय, अर्थात मार्क्‍सवादाचा त्याने सखोल अभ्यास केला होता. लेनिन हा त्याचा आवडता लेखक होता. मात्र त्यासोबत रशियन कादंबऱ्याही तो आवडीने वाचत असे. केवळ रशियनच नाही, तर इतर भाषांमधील साहित्यही वाचायची त्याला आवड होती. मात्र परदेशी भाषा येत नसल्याने केवळ रशियन भाषेत अनुवादित झालेले साहित्यच तो वाचू शकत असे. त्याच्या महाकाय वाचनालयात २५ हजारांपेक्षा जास्त पुस्तके होती. या चरित्रपर ग्रंथाच्या पहिल्याच, ‘ब्लडी टायरन्ट अ‍ॅण्ड बुकवर्म’ या प्रकरणात स्टालिनचे विद्वान आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व उलगडले आहे. पुस्तके माणसाचे आयुष्य, त्याचा विचार आमूलाग्र बदलू शकतात, यावर स्टालिनचा गाढ विश्वास होता. त्याच्या संग्रही असलेल्या पुस्तकांतून आपल्याला त्याच्या व्यापक दृष्टिकोनाची कल्पना येते. स्टालिन हा क्रूर मनोरुग्ण शासक नव्हता, तर अत्यंत बुद्धिमान, संवेदनशील अभ्यासक होता, हे या प्रकरणातून आपल्याला कळते.

दुसऱ्या प्रकरणात स्टालिनच्या खासगी आयुष्यातल्या घटनांचा वेध लेखकाने घेतला आहे. त्याने वेळोवेळी लिहिलेल्या लेखांचा, त्याच्या भाषणांचा समग्र संग्रह त्याला प्रकाशित करायचा होता. त्याच्या आत्मचरित्रात त्याला हे सारे लेखन समाविष्ट करायचे होते. मात्र त्याच्या मृत्यूपर्यंत हे काम पूर्ण होऊ शकले नाही आणि नंतर ख्रुश्चेव्हने हा सगळा प्रकल्पच रद्द केला. मात्र, जे १३ खंड आधी प्रकाशित झाले होते, ते स्टालिनच्या जीवनकार्यावर उत्तम प्रकाश टाकणारे आहेत.

बायबलपासून मार्क्‍सकडे !

तिसरे प्रकरण- ‘रीिडग, रायटिंग अ‍ॅण्ड रिव्होल्यूशन’मध्ये तरुण स्टालिनचे चरित्र रंगवले आहे. युवा वयात स्टालिन क्रांतीच्या विचारांकडे कसा ओढला गेला, त्याचे शिक्षण, एक अभ्यासक म्हणून त्याचे व्यक्तिमत्त्व, वाचनाची आवड या साऱ्याचे वर्णन केले आहे. सुरुवातीच्या काळात स्टालिन मिशनरी शाळेत शिकला. महाविद्यालयीन शिक्षण सेमिनरी कॉलेजमध्ये सुरू असताना त्याला प्राध्यापक व्हायचे होते, मात्र त्याच काळात रशियात झारच्या अत्याचाराविरोधात सुरू असलेल्या बंडात सहभागी व्हायचे, असे त्याने ठरवले आणि क्रांतिकारक नेता अशी कलाटणी त्याच्या आयुष्याला मिळाली.

तरुण वयात, स्टालिन नियमितपणे बायबल वाचत असे, असे या पुस्तकात म्हटले आहे. मात्र, धार्मिक विचारांचा त्याच्या मनावर पगडा होता का? हे सांगणारे कोणतेही पुरावे नाहीत. युवा स्टालिनच्या मनात, जी धर्मभावना होती, तिला इहवादी म्हणता येईल. मात्र नंतरच्या काळात मार्क्‍सवादी झाल्यानंतर, इतर बोल्शेविक नेत्यांप्रमाणे त्यानेही चर्चविरोधी आक्रमक भूमिका घेत संपूर्ण धर्मशक्तींचे दमन केले होते. दुसऱ्या महायुद्धकाळात, तडजोड किंवा गरज म्हणून काही काळ त्याच्या साम्यवादी शासनाने धर्मसंस्थांशी जुळवून घेतले होते, मात्र, स्टालिन त्याच्या जीवनकाळातल्या कुठल्याही टप्प्यावर सश्रद्ध होता, असे पुरावे नाहीत. १९२२ साली स्टालिनची बोल्शेविक पार्टीच्या सरचिटणीसपदी निवड झाली. त्यानंतर दोनच वर्षांनी लेनिनच्या मृत्यूनंतर त्याच्या वादग्रस्त मृत्युपत्रात त्याने स्टालिनविरुद्ध मांडलेली भूमिका आणि त्यानंतर उठलेले वादळ, यातून स्टालिनचा राजकारणातील एक प्रबळ शक्तिशाली नेता म्हणून कसा उदय झाला, याचेही वर्णन पुस्तकात आहे.

पुस्तकाचे चौथे प्रकरण संपूर्णपणे स्टालिनच्या खासगी वाचनालयाची रचना, मोडतोड आणि त्याची पुन्हा उभारणी याची रंजक कथा सांगते. स्टालिनची वाचनाची आवड आणि त्याची अभिरुची यात आहे, पुस्तकांमधून तो काय शिकला, याचाही शोध घेतला आहे. स्टालिनचे कौटुंबिक जीवन, त्याच्या पत्नीची आत्महत्या आणि त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या या वाचनालयाचे काय झाले, हेही या प्रकरणात आहे.

पाचव्या प्रकरणात, स्टालिनची हीच वाचनाची; नव्हे तर अध्ययनाची आवड अत्यंत विस्तृत स्वरूपात मांडली आहे. स्टालिन जी पुस्तके वाचत असे, त्यातल्या नोंदी, टिपणे लिहून ठेवत असे. या वाचनाच्या ध्यासातून आणि त्याने काढलेल्या नोंदी पाहिल्या तर त्याचे वाचन किती सखोल आणि अभ्यासपूर्ण असे, याची माहिती मिळते. प्रत्येक पुस्तकावरचे त्याचे विश्लेषण हा अभ्यासू पद्धतीने पुस्तक परीक्षणाचा एक वस्तुपाठ होता, त्याशिवाय स्टालिनच्या भावनिक स्वभावाचे कंगोरेदेखील पाहायला मिळतात. ज्यांना असा संवेदनशील, बुद्धिमान स्टालिन समजून घ्यायचा असेल, त्यांनी या नोंदी आणि टिपणे बघायला हवीत.

विशेष म्हणजे, ट्रॉटस्की या आपला राजकीय विरोधक असलेल्या नेत्याविषयीदेखील त्याने आपल्या टिपणांमध्ये अत्यंत आदराने लिहिले आहे. स्टालिनच्या आत्मचरित्रातील काही भाग, ज्यात त्याच्या आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यांचा विचार करण्यात आला आहे त्यात साधारण १९३० ते ४० दरम्यानच्या रशियातील घडामोडींचा उल्लेख आहे.

पुस्तकाचे सहावे प्रकरण- ‘रिव्हर्स इंजिनीअरिंग: स्टालिन अ‍ॅण्ड सोव्हिएत लिटरेचर’ या प्रकरणात स्टालिनचे प्रसिद्ध वाक्य – ‘समाजवादी समाजरचनेत लेखकांची भूमिका मानवी मन (आत्मा) घडविण्याची असावी,’ हे उद्धृत केले आहे. स्टालिन स्वत: अनेक कादंबऱ्या, नाटके, कथा, कविता वाचत असे. या पुस्तकांतून मानवी व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होते, असे त्याचे मत होते.

अभ्यासक, वाचक स्टालिनचा आणखी एक पैलू या पुस्तकात आला आहे, तो म्हणजे तो उत्तम संपादकही होता. त्याने अनेक कागदपत्रांचे संपादन केले होते. त्याच्या आत्मचरित्रासह अनेक पुस्तकांचे संपादनही त्याने केले होते.

उतारवयापर्यंत स्टालिनने मोठी ग्रंथसंपदा वाचून उत्तम ज्ञान आत्मसात केले होते. वयाच्या सत्तराव्या वर्षीसुद्धा त्याचे वाचन सुरू होते. रशियन लष्करी अधिकारी अनातोली लुनाचास्र्की यांनी स्वत:चेच वर्णन करताना, ‘मी बोल्शेविकांमधील विद्वान आहे आणि विद्वानांमधील बोल्शेविक’ असे केले आहे. हेच वर्णन स्टालिनलाही चपखलपणे लागू होते.

काळ बदलत जातो, मूल्ये बदलत जातात, विचार बदलत जातात, प्रतिमा नवे रूप घेऊन येतात, त्याप्रमाणे बदल घडवून आणणारे नेहमी पुढे जातात. हे बदल नाकारणारे आणि जुन्याच गोष्टींना कवटाळत बसणारे, असतात तिथेच राहतात. पर्यायाने मागेच जातात. आपणही आपली मते काळानुसार गरज वाटल्यास बदलली पाहिजेत. मनाची आणि मेंदूची कवाडे सतत उघडी ठेवली नाहीत, तर आपणही त्या ‘बशा’ लोकांसारखे होतो आणि मागे पडतो. स्टालिनसारख्या विवादात्मक, वादळी व्यक्तिमत्त्वाबद्दल तर हे अधिक प्रकर्षांने जाणवते. जॉन मेनार्ड केन्स या अर्थतज्ज्ञाने जाहीररीत्या एकदा आपले एका विषयावरील मत अचानक बदलले, तेव्हा कॉन्झव्‍‌र्हेटिव्ह पक्षाने त्याला आक्षेप घेतला. त्यावर केन्सने ‘आपले मत बदलण्याचा आपल्याला पूर्ण अधिकार आहे, असे आपले मत आहे,’ अशा काहीशा शब्दांत कॉन्झव्‍‌र्हेटिव्ह पक्षातील लोकांना खडसावले होते. ‘इतिहासाकडे इतिहास म्हणूनच पाहायला हवे,’ हे ब्रिटिश इतिहासकार ई. एच. कार यांचे मत खरे आहे. हे माझे मत खऱ्या पुराव्यांसह असलेल्या इतिहासाबद्दल असून खोडसाळपणे आपल्या सोयीनुसार चुकीचे अर्थ लावलेल्या (सोयीच्या इतिहासाबद्दल खचितच नाही.). स्टालिनसारखे वाचणारे धोरणी राजकारणी आता विरळाच!

पुस्तकाचे नाव :  स्टालिन्स लायब्ररी- अ डिक्टेटर अ‍ॅण्ड हिज बुक्स

लेखक :  जेफरी रॉबर्ट्स

प्रकाशक : येल युनिव्हर्सिटी प्रेस

पृष्ठे : २५९, किंमत : रु. १,५४५/-

(अ‍ॅमेझॉनवरील सवलत मूल्य)

jayraj3june@gmail.com

Story img Loader