अभिजीत रणदिवे

काही पुस्तकं अगदी सुरुवातीपासूनच विलक्षणाचे संकेत देतात. सेरा बर्नस्टाईन यांचं बुकर नामांकित ‘स्टडी फॉर ओबिडियन्स’ त्यांपैकी एक आहे. ‘एका डुकरिणीनं आपल्या सर्व पिलांचा नायनाट केला ते हे वर्ष होतं’ अशी कादंबरीची सुरुवात होते. लगेचच ‘एका स्थानिक कुत्रीला आपण गरोदर असल्याचा भास होत होता’, असंही सांगितलं जातं. पहिल्याच परिच्छेदात पुढे हे वाक्य येतं : ‘त्यांचं मला जबाबदार धरणं योग्यच होतं.’ एका स्त्रीच्या प्रथमपुरुषी निवेदनातून उलगडणारी ही कादंबरी जसजशी वाचत जावं, तसतशी धक्कादायक गोष्टी सहज जाता जाता सांगायची लेखिकेची शैली लक्षात येऊ लागते.

Opinion of artists in The Mumbai Literature Live Festival about Jaywant Dalvi Mumbai news
सूक्ष्म निरीक्षणातून मानवी भावभावनांचा वेध घेणारे लेखक म्हणजे जयवंत दळवी; ‘द मुंबई लिटरेचर लाईव्ह फेस्टिव्हल’मध्ये कलाकारांचे मत
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
lokrang article on marathi author saniya s kahi aatmik kahi samajik book
सर्जनाच्या वाटेवरील प्रवास
Poetess Ushatai Mehta believed she only wrote poetry but discovered she also wrote prose
बहारदार शैलीचा कॅनव्हास
eradication of caste book review
बुकमार्क : जातीय जनगणना की जातिव्यवस्थेचे निर्मूलन?
Viral video of a daughter dancing in the hospital where her mother is admitted craze for reel
अशी मुलगी नसलेलीच बरी! आई रुग्णालयात दाखल असताना पोटच्या पोरीने केलं असं काही की…, VIDEO पाहून नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप
author samantha harvey wins the booker prize 2024 with orbital novel
समांथा हार्वे यांच्या ‘ऑर्बिटल’ला बुकर ; अंतराळावरील कादंबरीचा पहिल्यांदाच सन्मान

कादंबरीचं कथासूत्र थोडक्यात सांगता येण्यासारखं आहे आणि कादंबरीत फार काही घडतही नाही. इथे व्यक्तिरेखांच्या नावा-गावांचे उल्लेख नाहीत (बर्ट नावाच्या कुत्र्याचा अपवाद). निवेदिका एक मध्यमवयीन स्त्री आहे. कायदेविषयक कामं करणाऱ्या एका कंपनीत ती नोकरीला असते. वकिलांचं बोलणं ऐकून त्यापासून सुसंगत मजकूर टाइप (ट्रान्सक्राइब) करण्याचं हे काम असतं. म्हणजेच भाषेचं आकलन आणि भाष्याचं सुयोग्य अर्थनिर्णयन यावर तिचं पोट अवलंबून असतं. नुकताच घटस्फोट झालेल्या आणि उत्तरेकडच्या एका थंड हवामानाच्या देशात राहणाऱ्या आपल्या मोठ्या भावाच्या आज्ञेनुसार ती काही काळ त्याचं घर सांभाळायला त्याच्याकडे येते, इथपासून कादंबरीच्या वर्तमानातला घटनाक्रम सुरू होतो. भाऊ जिथे राहतो त्या गावाचं वर्णन भयकथेसारखी वातावरणनिर्मिती करतं. उदा. दिवसातून तीन वेळा गावातले सर्व कुत्रे एकसाथ विव्हळतात.

हेही वाचा >>> बुकबातमी : मुंबईच्या ‘लिटफेस्ट’चे दिवस…

डुकरिणीच्या उदाहरणाप्रमाणे पुढे येऊ घातलेल्या भयस्वप्नवत घटनांचं पूर्वसूचन कादंबरीत अगदी सुरुवातीपासूनच आहे. तसेच, भूतकाळातल्या काही महाभयंकर घटनांचेही उल्लेख कादंबरीत येतात. यांपैकी एक घटना ऐतिहासिक आहे : दुसऱ्या महायुद्धात झालेलं ज्यूधर्मी लोकांचं शिरकाण. निवेदिका ज्यूधर्मी आहे. भाऊ-बहीण आता जिथे आहेत त्या प्रदेशात पूर्वी झालेल्या वांशिक अत्याचारांमुळे त्यांचे पूर्वज एका आंग्लभाषक देशात स्थलांतरित झालेले असतात. भावाला आपल्या मूळ गावी येऊन राहण्याची इच्छा झाल्यामुळे तो आता इथे स्थायिक झालेला असतो. त्याच्या राहत्या घराची मूळ मालकी पूर्वी त्यांच्या कुटुंबीयांचा छळ करणाऱ्या गावकऱ्यांचं नेतृत्व भूषवलेल्या एकाची असते. तिथे येण्यापूर्वी निवेदिकेचा आपल्या पूर्वजांच्या या देशाशी काही संबंध आलेला नसतो. स्थानिक भाषाही तिला अवगत नसते. (स्वत: लेखिका ज्यूधर्मी कुटुंबात जन्मलेली आहे. तिचे आजी-आजोबा पूर्व युरोपातून कॅनडात आले. तिच्या आजीचे अनेक नातेवाईक ज्यूंच्या वंशसंहारात मारले गेले. लेखिका आता आपली जन्मभूमी सोडून स्कॉटलंडच्या पर्वतीय भागात राहते. कादंबरी आत्मचरित्रात्मक मात्र नाही.)

कादंबरीच्या दुसऱ्याच परिच्छेदात व्यक्तिगत पातळीवरच्या एका भयानक गोष्टीचा निसटता उल्लेख येतो. ‘मला बोलताही येत नव्हतं आणि माझ्या हातापायांची हालचालही नीटशी होऊ लागली नव्हती त्या वयापासून माझ्या अनेक भावंडांच्या सर्व कामनांची पूर्ती करायला मी शिकले,’ असा उल्लेख निवेदिका करते. या वयातलं मूल भावंडांची कामनापूर्ती नक्की कशी करत असेल याविषयीचे तपशील दिले जात नाहीत, परंतु कादंबरीत नंतर काही उल्लेख येतात: वर्तमानातल्या मध्यमवयीन निवेदिकेला खासगीपणा उपलब्ध नाही. भाऊ तिला पाहू शकेल ह्यासाठी आपल्या खोलीचा दरवाजा तिनं उघडा ठेवणं अपेक्षित आहे. भावालाही आपल्या खोलीचा दरवाजा उघडा ठेवायची सवय आहे; बहीण पाहते आहे याची खात्री करून तो कपडे घालतो. बहीण त्याला नित्यनेमाने आंघोळ घालते. यावरून तान्ह्या वयापासून बहिणीचं लैंगिक शोषण होत असावं आणि आताही घटस्फोटित भावाच्या लैंगिक गरजा ती भागवत असावी असं वाटतं.

कादंबरीच्या शीर्षकातला आज्ञाधारकपणा काय प्रकारचा असावा याचाही मग अंदाज येऊ लागतो. निवेदिकेनं किती टोकाचा आज्ञाधारकपणा अंगीकारला आहे याचे विविध नमुने कादंबरीत दिसतात. भावंडांकडून होणारं शोषण निवेदिकेला शोषण वाटतच नसतं. तिच्या लेखी भावंडांची कामनापूर्ती हे तिचं आद्या कर्तव्य असतं. त्यामुळेच मोठ्या भावाच्या आज्ञेवरून ती लगोलग परदेशी, तेही आपल्या पूर्वजांवरच्या वांशिक अत्याचाराचा इतिहास असलेल्या या गावी आलेली असते.

हेही वाचा >>> चतु:सूत्र: एका युवा ताऱ्याचा उल्कापात…

भावाचं घर गावाबाहेर असतं. सुरुवातीला बहिणीचे दिवस घरकामात किंवा आसपासच्या निसर्गरम्य परिसरात हिंडण्यात जातात. भाऊ कामानिमित्त काही दिवसांसाठी बाहेरगावी गेला असताना घरात एकटी राहण्याऐवजी ती गावकऱ्यांशी सौहार्दाचे संबंध स्थापण्याचे प्रयत्न करते तिथपासून कथानकातला भयप्रद भाग वेग घेतो. त्या शेतीप्रधान गावात निवेदिका स्वयंसेवक म्हणून नाव नोंदवते. गुरांच्या गोठ्यातलं शेण उचलण्यापासून पडतील ती कष्टाची कामं करू लागते. अशा कामांचा काहीही अनुभव नसताना ती स्वत:हून स्वीकारण्याची ऊर्मी तिच्या आज्ञाधारकतेचाच एक भाग आहे. गावातले लोक मात्र या आपल्यापेक्षा वेगळ्या व्यक्तीकडे संशयानं पाहतात. तिनं कष्ट करायला गावाची काहीच हरकत नसते, मात्र कुणाशीही न बोलता निमूटपणे तिनं आपलं काम करावं, अशी त्यांची अट असते. त्यात ज्यूविद्वेषाची तर गावाला परंपराच असते. याची परिणती म्हणजे पुढे गावात घडणाऱ्या अनेक विचित्र घटनांसाठी निवेदिकेला जबाबदार धरलं जातं – कादंबरीच्या पहिल्या परिच्छेदाला हा संदर्भ आहे. या घटना भयकथेत शोभाव्यात अशा आहेत : डुकरीण आपल्या लुचणाऱ्या पिलांना अंगाखाली चिरडून ठार मारते; गरोदर मेंढी कुंपणात अडकलेली असतानाच मृत पिलाला जन्म देते; कुत्रीला गरोदर असल्याचा भास होतो; गाई भैसाटल्यासारखं वागू लागतात; बटाट्याच्या पिकावर बुरशी येते, वगैरे. निवेदिका चेटूक करते आहे असं त्यामुळे गावकरी मानू लागतात. ती गावात कुठेही दिसताच आपली मुलं तिच्या नजरेला पडू नयेत म्हणून लोक त्यांना लपवू लागतात. कचरा उचलणारा माणूसही हे घर टाळू लागतो. त्यातच, भाऊ गावी परतल्यावर आजारी पडतो. काहीही विपरीत घडलं तर त्याची जबाबदारी आपलीच असणार हे निवेदिकेनं आधीपासूनच ठरवलेलं आहे. तिच्या आज्ञाधारकतेचाच तो भाग आहे. त्यामुळे तीही या घटनाक्रमाकडे अपराधी भावनेनं पाहात राहते.

मात्र, कादंबरी हळूहळू वाचकांना निवेदिकेविषयी साशंक करते. ती खरंच पूर्णपणे निरागस आहे का? ती स्वत: शोषणाचा बळी असली म्हणून घडणाऱ्या घटनांत तिची काहीच जबाबदारी नाही का? कादंबरी केवळ निवेदिकेच्याच नजरेतून आहे आणि वास्तवाचं तिचं आकलनच तिरपागडं आहे. गावकऱ्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी ती जे जे करते त्यातल्या काही कृतीही संशयास्पद आहेत – उदा. ती वेताच्या बाहुल्या विणून विविध घरांच्या प्रवेशद्वारांपाशी रातोरात गुपचूप ठेवून जाते. त्यामुळे ती चेटूक करत असल्याचा गावकऱ्यांच्या मनातला संशय दृढ होतो.

वर दिलेल्या घटनाक्रमाव्यतिरिक्त कादंबरीचा मोठा भाग तत्त्वचिंतनात्मक आहे. त्यात अनेक साहित्यकृतींचे आणि तत्त्वज्ञानाचे संदर्भ आहेत. त्यांच्या विश्लेषणातूनही वाचक साशंक होतात. कोणत्याही परिस्थितीसाठी दोष/जबाबदारी स्वत:कडे घेऊन निवेदिका तिच्यावर होणाऱ्या अन्यायाला विरोध करणं, त्या दिशेनं कुठलीही कृती करणं टाळते. हे एक प्रकारे नैतिक जबाबदारी टाळणं असू शकतं का? भावाच्या वर्तनाचं ती वर्णन करते. वाचकांना त्यात तिचं शोषण दिसतं. पण ती स्वत:च्या मर्जीनंच परमुलखात भावाकडे येते; त्याला हवं तसं वागण्यातच तिला परिपूर्ती लाभते. एका अर्धमेल्या सशाचं आतडं उचकटून काढणाऱ्या घारीचं वर्णन एका ठिकाणी येतं. सशाविषयी अनुकंपा वाटली तरी घारीलाही आपलं पोट भरायचं असतं, असं म्हणून निवेदिका आपल्या शोषकांचं समर्थन करते का?

तिच्या व्यावसायिक कामासंबंधीही काही विचित्र संदर्भ येतात. पूर्वीच्या नोकरीच्या ठिकाणी झालेल्या छळाचे पुसटसे उल्लेख कादंबरीत येतात. तिच्या सध्याच्या कंपनीचं एक अशील म्हणजे गैरव्यवहाराचा आरोप असलेली एक बलाढ्य, बहुराष्ट्रीय तेल उत्पादक कंपनी आहे. गावातला एकमेव पेट्रोल पंपही याच कंपनीच्या मालकीचा असतो. ही कंपनी एका सामान्य व्यक्तीला कशी छळते त्याचं वर्णन कादंबरीत येतं. त्याच्याशी संबंधित मजकूर टाइप करताना त्यावर फार विचार न करता केवळ कामापुरतं आकलन होण्याइतकंच ती त्याकडे लक्ष देते, कारण अन्यथा आपला समतोल ढासळू शकतो, हे तिला कळतं. पण मग तिचा समतोल खरंच शाबूत आहे का? अस्वस्थ करणारे असे इतरही संदर्भ कादंबरीत पेरलेले आहेत.

गावकऱ्यांवर चेटूक करणारी काही अघोरी शक्ती तिच्यात खरोखरच असेल का? मग भावाचं आजारी पडणं आणि त्याचं पूर्णत: परावलंबी होत जाणं, म्हणजेच बहिणीवर अवलंबून राहणं हेदेखील त्या शक्तीचं द्याोतक म्हणून पाहता येईल का? आयुष्यभर झालेल्या शोषणाचा सूड अखेर निवेदिका (जाणूनबुजून किंवा नकळत) अशा प्रकारे घेत असेल का? थोडक्यात, जी व्यक्ती कुणा इतर माणसाकडून परिपूर्ण आज्ञाधारकतेची अपेक्षा ठेवते तिचं (म्हणजे इथे, निवेदिकेच्या भावाचं) त्यातून काही नुकसान होऊ शकतं का? निवेदिकेच्या संगतीतून भावाला हानी पोहोचते का? कादंबरीच्या सुरुवातीला एक उद्धरण आहे. स्त्रिया एकाच वेळी आज्ञाधारक आणि खुनी प्रवृत्तीच्या असण्याची शक्यता त्यात दर्शवली आहे. त्याचा इथे संबंध लागतो. याउलट, एखादी व्यक्ती जेव्हा आयुष्यभर निमूटपणे सोसत राहिलेली असते, तेव्हा तिची बाजू ‘रास्त’ वाटण्यासाठी किंवा तिच्याविषयी अनुकंपा वाटण्यासाठी तिचं निरागस असणं आवश्यक आहे का, असाही नैतिक प्रश्न मग उपस्थित होतो.

कादंबरीची शैली वास्तववादी नसून एखाद्या बोधकथेसारखी किंवा नीतिकथेसारखी आहे. नाव नसलेली निवेदिका नाव नसलेल्या देशात राहात असली तरी तपशिलांचा असा अभाव आशयाला मारक ठरत नाही. त्याचप्रमाणे ज्यूधर्मीय व्यक्तिरेखा दुसऱ्या महायुद्धातल्या वंशसंहाराचा आणि वर्तमानातल्या ज्यूविद्वेषाचा संदर्भ देत असली तरीही कादंबरी केवळ तेवढ्यापुरती मर्यादित राहात नाही. तशीच ती शोषित स्त्रीची कहाणी किंवा परमुलखात टिकाव धरू पाहणाऱ्यांना स्थानिकांच्या विद्वेषाला सामोरं जावं लागणं, अशा चौकटीत बसत नाही. कोणत्याही समूहात उपरेपणा जाणवणाऱ्या व्यक्तींविषयीची मग ही वैश्विक कादंबरी होते का? मात्र, वाचकांना निव्वळ कणव वाटावी असं शोषितांचं ठोकळेबाज चित्रण करण्यापेक्षा ती विस्मयकारी अनुभव देते. व्यक्तिरेखांशी समरस होऊन भावनेच्या भरात किंवा कथेच्या आवेगात वाहू जाऊ इच्छिणाऱ्या वाचकांना कादंबरी कंटाळवाणी वाटेल. गांभीर्यानं कादंबरीच्या गाभ्यापर्यंत पोहोचू पाहणाऱ्या वाचकांना मात्र उलट अनुभव येईल. लेखिकेची भाषेवर जबरदस्त पकड आहे. त्यामुळे तिची गोळीबंद वाक्यं आशयानं संपृक्त आहेत. त्यांद्वारे विविध तात्त्विक मुद्द्यांवर लेखिका करत असलेलं भाष्य गुंतागुंतीचं असल्यामुळे त्यातले अनेक भाग मागे जाऊन पुन:पुन्हा वाचावेसे वाटतील. अशा पुनर्वाचनात आधीपेक्षा काही तरी वेगळं गवसेल. जागतिक कादंबरीच्या इतिहासातले टप्पे पाहता एकविसाव्या शतकात कादंबरीत काही नवा प्रयोग करण्यासारखं आता काही उरलेलंच नाही असं वाटू शकतं. अशा काळात ही कादंबरी थक्क करणारा अनोखा अनुभव देते.

‘स्टडी फॉर ओबिडियन्स’ लेखिका : सेरा बर्नस्टाईन प्रकाशक : ग्रॅण्टा बुक्स पृष्ठे : २०८; किंमत : ६९९ रुपये 

वाचनदुवे :

कादंबरीतील एक कथारूपी प्रकरण : https://granta.com/a-dying-tongue/

सेरा बर्नस्टाईन यांची मुलाखत : https://www.publicbooks.org/gestures-of-refusal-a-conversation-with-sarah-bernstein-and-daisy-lafarge/

पुढील आठवड्यात : प्रॉफेट साँगया पुस्तकावर सई केसकर यांचा लेख.

rabhijeet@gmail.com