सई केसकर

शेजारपाजारच्या मुलांबरोबर मैदानात खेळत, प्रत्यक्ष समोर बसून गप्पा मारत मोठ्या झालेल्या पालकांच्या पिढीला मोबाइलच्या स्क्रीनवरून जगभरातील बिनचेहऱ्याच्या मित्रांशी गेम्स खेळत, चॅट करत वाढणाऱ्या ‘जेन झी’चं विश्व, त्यातील धोके उलगडून दाखवणाऱ्या पुस्तकाविषयी…

How to get rid of mobile addiction from kids parents did this trick viral video
मुलाने चक्क मोबाइल सोडला आणि अभ्यासाला बसला! पालकांनी केलेला ‘हा’ प्रयोग पाहून तुम्हीही व्हाल चकित, पाहा VIDEO
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
academic degree on experience
विश्लेषण : अनुभवाच्या आधारे पदवी कशी मिळणार?
Sexual assault on three year old girl in Ghatanji Yavatmal crime news
यवतमाळ: संतापजनक! तीन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार
Mother strangled her child shocking video viral on social media
आई की वैरीण? चिमुकल्या मुलाला जमिनीवर झोपवलं, गळा आवळला अन्… VIDEO पाहून होईल काळजाचं पाणी पाणी
Man beaten Young woman on stage who was performing shocking video viral on social media
कोणाच्या परिस्थितीचा असा फायदा घेऊ नका! त्याने भरस्टेजवरच तरुणीबरोबर ‘असं’ काही केलं की…, VIDEO पाहून येईल संताप
Ministry of Statistics report reveals 25 6 percent youth deprived of education employment and skills
आजचे तरुण ‘बिन’कामाचे आणि ‘ढ’?
loksatta readers response loksatta news
लोकमानस : सत्यकथनासाठी निवृत्तीचा मुहूर्त

बदलाची भीती वाटणे हा मानवी गुणधर्म आहे. आपल्या सवयीचं काहीही बदलू लागलं की माणसं अस्वस्थ होतात. तंत्रज्ञानाच्या बाबतीत तर ही कुरकुर प्रत्येक पिढीनं केली आहे. अगदी, घाऊक प्रमाणात पुस्तकं छापणारे छापखाने आले तेव्हापासून ही कुरकुर कोणत्या ना कोणत्या कारणाने अव्याहतपणे सुरू आहे. पुढे रेडिओ, टेलिव्हिजन, संगणक अशा प्रत्येक पायरीवर धोक्याच्या घंटा वाजल्या. माझ्या पालकांना टीव्हीबद्दल भीती वाटल्याचं स्मरणात आहे. परीक्षा जवळ आल्यावर ‘केबल तोडणे’, मुलं दहावी-बारावीत गेल्यावर घरातल्या आया-आज्यांनी त्यांच्या संध्याकाळच्या मालिकांचा ‘त्याग’ करणे, असे काही उपाय त्या काळी, म्हणजे नव्वदीच्या दशकात केले जात. २००० साल उजाडता, आपलं जग असं काही बदलून गेलं की मुलं १२-१३ वर्षांची झाली की आपण आता नेमकं कशाला घाबरलं पाहिजे याचा अभ्यास आधी पालकांना करावा लागतो. आंतरजालीय समाजमाध्यमांचा खच मुलांसमोर पडलेला असतो. त्यातून त्यांच्या मित्रमैत्रिणींचा ज्या माध्यमावर सर्वाधिक वावर आहे ते माध्यम मुलं निवडतात. ते कोणतं हे पालकांना माहीत असेलच असं नाही.

जेमतेम २५ वर्षांपूर्वी, सधन, उच्चमध्यमवर्गीय घरांच्या दिवाणखान्यातल्या किरकिरणाऱ्या मॉडेममधून घरात शिरणारं जग आता अगदी दोन आणि तीन वर्षांच्या आणि सर्व आर्थिक गटांतल्या लहान मुलांच्या हातात आलं आहे. आधी घरातला डेस्कटॉप, मग लॅपटॉप, २००७ साली आलेला पहिला ‘क्रांतिकारी’ आयफोन आणि त्यानंतर हातातल्या या मोबाइलमध्ये तयार झालेलं अनेक मितींचं जग- हे सगळं अगदीच न कळत्या वयात पाहणारी, अनुभवणारी किमान एक पिढी आता वयात आलेली आहे. या पिढीवर आंतरजालीय समाजमाध्यमांचा कसा परिणाम झाला हे तपासून बघणं गरजेचं आहे. न्यू यॉर्क युनिव्हर्सिटीतील स्टर्न स्कूल ऑफ बिझनेस या संस्थेत प्राध्यापक असणाऱ्या मानसशास्त्रज्ञ जोनाथन हाइट यांनी या विषयावर, ‘द अँक्शियस जनरेशन’ या नावाचं एक प्रबंधवजा पुस्तक लिहिलं आहे. ‘न्यू यॉर्क टाइम्स’च्या ‘बेस्टसेलर’ यादीतल्या या पुस्तकाचं जितकं कौतुक झालं तितकीच या पुस्तकावर टीकाही झाली. पण पुस्तकाचा विषयच असा आहे की टीका करायची की कौतुक ते स्वत: वाचूनच ठरवावं असं कोणत्याही सुजाण, सजग पालकाला वाटावं.

हेही वाचा >>> अन्वयार्थ: दोनचाकी ‘टॅक्सी’ला हवा नियमांचा ब्रेक…

आंतरजालीय माध्यमं आणि आंतरजालीय समाजमाध्यमं असा महत्त्वाचा फरक हाइट सुरुवातीलाच नोंदवतात. जे माध्यम वापरकर्त्यांना एकाच दिशेने माहिती पुरवतं, जिथे वापरकर्त्यांचा आणि माध्यमांचा परस्परसंवाद नसतो त्याला हाइट समाजमाध्यम म्हणत नाहीत. उदा., यूट्युबसारखी चलचित्र दाखवणारी, विकिपीडियासारखी माहिती पुरवणारी आणि लहान मुलांसाठी म्हणून तयार केलेली गाणी/ गोष्टी सांगणारी माध्यमं. याउलट फेसबुक, इन्स्टाग्राम, टिकटॉकसारखी माध्यमं मुलामुलींना इतरांचे संदेश, प्रतिक्रिया दाखवून अव्याहतपणे गुंतवून ठेवतात. या पुस्तकाची व्याप्ती केवळ या समाजमाध्यमांपुरती आहे. खेळण्याऐवजी घरात बसून तासंतास स्क्रीन बघणाऱ्या सर्वच लहान मुलांवर विपरीत परिणाम होत असतात. पण त्यातही किशोरवयीन मुलामुलींवर समाजमाध्यमं वापरण्याचे विशेष वाईट परिणाम होतात, असा मुद्दा हाइट मांडतात. सतत समाजमाध्यमांचा वापर करणाऱ्या किशोरवयीन व्यक्तींमध्ये चिंताक्रांत असण्याचं आणि नैराश्याचं प्रमाण अधिक असतं, असं निरीक्षण हाइट नोंदवतात. हा मुद्दा मांडण्यासाठी त्यांनी या विषयावर झालेल्या अनेक अभ्यासांचे संदर्भ दिले आहेत. या सर्वांमधून असं दिसून येतं की खरोखरीच किशोरवयीन मुलामुलींमध्ये, विशेषत: मुलींमध्ये – नैराश्य आणि चिंतेचं प्रमाण वाढण्याचा आलेख, आणि स्मार्टफोनवरील समाजमाध्यमं सर्रास उपलब्ध होण्याचा आलेख जणू एकमेकांचे हात धरूनच पुढे चालले आहेत. हा निव्वळ परस्परसंबंध नसून तिथे कार्यकारणभावही आहे असं सिद्ध करण्याचा हाइट कसोशीनं प्रयत्न करतात. अशा प्रकारच्या, काळाचा विशाल पट असलेल्या अभ्यासांत कार्यकारणभाव सिद्ध करणं अवघड असतं. काही ठिकाणी हाइट सुलभीकरण करताहेत ही काय अशी शंकाही येते. या मुद्द्यावरूनच या पुस्तकावर टीका झालेली आहे. पण या अभ्यासात घेतलेले अनेक मुद्दे मुलांनाच नव्हे, तर त्यांच्या पालकांना आणि आजी-आजोबांनादेखील लागू आहेत! आपण फोनमधून थोडं डोकं वर काढून बघितलं तर हाइट देतात तशी ५० उदाहरणं आपल्याला आजूबाजूलाच दिसतील.

१९८० -१९९६ या काळात जन्माला आलेल्या पिढीचं, ‘मिलेनियल पिढी’ असं नामकरण झालं. त्यानंतर जन्माला आलेल्या पिढीला ‘जेन झी’ म्हणतात. मिलेनियल पिढीतल्या बहुतांश व्यक्तींनी आंतरजालाचा कोणताही प्रभाव नसलेलं बालपण अनुभवलं. ही पिढी वयात येत असताना अगदी प्राथमिक स्वरूपातली आंतरजालीय माध्यमं त्यांच्यापर्यंत पोहोचली. संगणकावरून विविध चॅटरूम्स वापरण्याची, घर किंवा मग भारतासारख्या देशात, सायबर कॅफे अशी मोजकीच ठिकाणं असत आणि त्यावरही पालकांचं नियंत्रण असे. फेसबुकसारखी समाजमाध्यमं आंतरजालावर आणि नंतर स्मार्टफोनवर सहज उपलब्ध झाली तोपर्यंत मिलेनियल पिढी वयात येऊन कमावती झाली होती. या पिढीनं वर्ल्ड ट्रेड सेंटर कोसळताना बघितलं. त्यानंतर, २००८ साली आलेली आर्थिक मंदीदेखील बघितली. तरीही ‘जेन झी’पेक्षा या पिढीमध्ये नैराश्य आणि चिंतेशी संबंधित मनोविकारांचं प्रमाण कमी आहे असं अभ्यासातून दिसतं. या पुढच्या पिढीत मात्र या मनोविकारांचं प्रमाण लक्षणीय प्रमाणात वाढलेलं दिसून येतं. हे असं होण्यासाठी स्मार्टफोनमुळे झालेलं लहानपणाचं ‘रिवायरिंग’ जबाबदार आहे असा दावा हाइट करतात. २०१० नंतर इंग्लंड, अमेरिका यांसारख्या देशांत घराघरांत स्मार्टफोन रुजले. किशोरवयीन मुलं जो वेळ खेळण्याच्या निमित्तानं एकत्र घालवत होती तो वेळ ती एकट्यानं घरात, पण तरीही समाजमाध्यमांच्या आभासी जगात घालवू लागली. समाजमाध्यमं समूहात असल्याचा आभास निर्माण करत असली तरीही तो मुळातच ‘अशारीर’ आणि ‘स्थळकाळापलीकडला’ अनुभव आहे. म्हणजेच, समाजमाध्यमांवर मुलं एकमेकांना थेट भेटत नाहीत आणि गटांतल्या गप्पा, चर्चा जशा एकरेषीय आणि क्रमवार घडतात तशा त्या समाजमाध्यमांवर घडत नाहीत. अशा प्रकारची देवाणघेवाण आपली मैत्रीची, समूहात राहण्याची नैसर्गिक गरज भागवू शकत नाही. प्रत्यक्ष भेटींतून मुलांना जी जीवन कौशल्ये शिकता येतात – उदाहरणार्थ: समोर असलेल्या व्यक्तीला बोलू देणं, तिचं म्हणणं शांतपणे ऐकून घेणं, आपल्याला बोलण्याची संधी मिळाल्यावर मग बोलणं – ती अशा अशारीर आणि स्थळकाळाच्या पलीकडच्या आभासी भेटींतून शिकता येत नाहीत. याबद्दल सांगत असताना मुलांच्या आयुष्यात ‘निरुद्देश’ खेळाचं किती महत्त्व आहे हे हाइट वारंवार सांगतात. तसंच गेल्या तीसएक वर्षांत पालक मुलांना अधिकाधिक जपू लागले आहेत, ज्यामुळे खऱ्या जगात वावरताना घ्यायची माफक जोखीम मुलांना घेता येत नाही. याउलट, आंतरजालीय समाजमाध्यमांवरील धोक्यांबद्दल- ते सगळे अशारीर अनुभव असल्यामुळे – पालक तितकेसे सजग नसतात असाही मुद्दा हाइट मांडतात.

सतत येणाऱ्या संदेशांमुळे एकाच वेळी अनेक ठिकाणी असण्याचा अनुभव कुणालाच नवीन नाही. पण माध्यमिक शाळांत शिकणारी मुलं वर्गातले तास बदलू लागल्यावर पूर्वी जशी दंगा करू लागायची तसं न करता, तातडीनं त्यांच्या फोनकडे धाव घेतात. आठवड्याला ४० तास समाजमाध्यमांवर घालवणारी किशोरवयीन मुलं-मुली आहेत. आपल्या फोटोवर, व्हिडीओवर कुणाकुणाची टिप्पणी आली आहे, किती प्रतिक्रिया आल्या आहेत हे पुन्हा पुन्हा तपासायचं व्यसन लागतं. सिगरेटसारखे पदार्थ मेंदूवर जसा परिणाम करतात, अगदी तसाच परिणाम समाजमाध्यमांचा होतो. समाजमाध्यमांच्या अतिवापरामुळे शरीराला धोका संभवत नसला तरी सतत फोनवर वेळ वाया घालवणं योग्य नाही हे माहिती असूनही त्याची ओढ लागणं याला व्यसन नाहीतर वेगळं काय म्हणता येईल? हाइट त्यांच्याच सहा वर्षांच्या मुलीचं उदाहरण देतात. एकदा गाडीतून प्रवास करत असताना त्यांची चिमुकली मुलगी तिच्या आयपॅडकडे बघून उद्गारली, ‘बाबा मला हे बघायचं नाहीये. पण मला हे सोडताही येत नाहीये!’

समाजमाध्यमांचा मुलींवर जसा परिणाम होतो, तसा मुलांवर होत नाही. किंबहुना मुलं ज्या समाजमाध्यमांमध्ये रमतात (जगभरातून कुठूनही जोडलेल्या लोकांबरोबर व्हिडीओ गेम खेळणं) त्या प्रकारच्या माध्यमांमध्ये मुली रमत नाहीत. मुलांचा कल स्वत:चं कौशल्य सिद्ध करण्याकडे, इतरांशी स्पर्धा करण्याकडे असतो तर मुलींचा कल एखाद्या गटात जागा मिळवणं, तिथल्या सदस्यांची वाहवा मिळवण्याकडे असतो. समाजाच्या स्त्रियांकडून आणि पुरुषांकडून ज्या ठोकळेबाज अपेक्षा असतात – उदा., स्त्रियांनी सुंदर असावं, आज्ञाधारक असावं तर पुरुषांनी कर्तबगार असावं – समाजमाध्यमंदेखील त्याच अपेक्षांमध्ये त्यांना अडकवून ठेवतात. वयाच्या सोळाव्या वर्षी आपल्या दिसण्याबद्दल शंका/गंड वाटावा हे काहीसं साहजिक म्हणता येईल. समाजमाध्यमं वापरता येण्याचं वय अधिकृतपणे १३ वर्षं इतकं आहे. पण नवीन खातं उघडताना, उघडणारी व्यक्ती नक्की १३ वर्षांपेक्षा जास्त वयाची आहे याची कोणतीही काटेकोर शहानिशा होत नाही. याबद्दल ही माध्यमं तयार करणाऱ्या कंपन्यांना वारंवार प्रश्न विचारण्यात आले आहेत. तरीही त्यात कोणतीही सुधारणा नाही. याचा एक भयंकर परिणाम असा की दहा वर्षांच्या मुलीदेखील त्यांच्या बाह्यरूपाची चिंता करू लागतात. तसंच, फोटोशॉप किंवा तत्सम साधनं वापरून चकचकीत केलेल्या इतरांच्या प्रतिमांशी स्वत:ची तुलना करू लागतात.

आपल्या मुलांनी समाजमाध्यमांच्या आहारी जाऊ नये म्हणून काय करता येईल? ही फक्त पालकांच्या हातातली गोष्ट नाही. शाळा, सरकारं आणि न्यायव्यवस्था या सर्वांनी एकत्र येऊन यावर उपाय शोधण्याची गरज आहे, हा या अभ्यासाचा ढोबळ निष्कर्ष. यावर उपाय शोधताना एका प्रकरणात हाइट, विविध धर्मांतील आचार आणि विधींचाही विचार करतात. व्यक्तिकेंद्री आणि धर्मनिरपेक्ष समाजांत एकटेपण अधिक अनुभवास येतं हे सत्य नाकारता येत नाही. धार्मिक प्रथा जशा लोकांना एकमेकांच्या सहवासात आणतात तशी एकी मानवतावाद साधू शकत नाही. पण धर्मग्रंथांतून केवळ शांतता, प्रेम आणि बंधुभावासाठी पोषक अशा प्रथा उचलून त्या वाटेवर चालत राहण्याचं शहाणपण आपल्याकडे आहे का? मुलांना मोकळेपणाने, मोठ्यांच्या लुडबुडीशिवाय एकत्र येता येईल अशा जागा तयार करणं हाच सगळ्यात महत्त्वाचा उपाय आहे या निष्कर्षावर एक वाचक म्हणून मी येऊन थांबले. दोन दशकांपूर्वी ‘संगणक वापरणारी मुलं’ हा श्रीमंतांचा प्रश्न होता. साखर, तंबाखूप्रमाणेच याही व्यसनाची सुरुवात समाजातल्या तथाकथित लाभसंपन्न वर्गांतून झाली. पण लवकरच या वस्तू समाजाच्या सर्व स्तरांच्या आवाक्यात आल्या. आज स्मार्टफोन आणि त्यावर मिळणाऱ्या डेटाचीही हीच परिस्थिती आहे. त्यामुळे, मुलांना खेळू देणाऱ्या, बागडू देणाऱ्या, त्यांचं बालपण जपणाऱ्या आणि सर्वसामान्य पालकांना सहज परवडणाऱ्या शाळा असणं महत्त्वाचं आहे.

द अँक्शियस जनरेशन

लेखक : जोनाथन हाइट

प्रकाशक : पेन्ग्विन प्रेस

पृष्ठे : ४००, मूल्य : ८९९

saeekeskar@gmail.com

Story img Loader