अरुंधती देवस्थळे
एका फ्रेंच शर्विलकानं २०० संग्रहालयांतून ३०० कलावस्तू चोरूनसुद्धा विकल्या नाहीत, या सत्यकथेची रंजक उकल..
कलाजगतात कला, प्रदर्शनं आणि संग्रहालयांचा विषय असला की त्याला असलेली चौर्यकर्माची भीतीही चर्चेत येते. लूव्रच्या कडेकोट बंदोबस्तातून लिओनार्दो द विंचीच्या ‘मोनालिसा’चं कुशलतेने तिच्या देशबांधवांकडून झालेलं अपहरण (२०११) आणि त्यामागचा तिने मायदेशी असावं हा हेतू, एका दृष्टीनं समजण्यासारखा. तिची लूव्रमध्ये वापसी (२०१३) झाल्यावर तमाम जगाने नि:श्वास सोडल्याचं आपण मागच्याच तर दशकांत पाहिलंय. महत्त्वपूर्ण कलाकृतींच्या चोऱ्या, गडगंज पैसे कमावण्यासाठी किंवा तिच्या अस्सल वाटाव्या अशा प्रतिकृती निर्माण करण्यासाठी होतात असा अनुभव. पण जगात कलाकृतींच्या चोऱ्यांचा उच्चांक स्थापित करणाऱ्या आजच्या आपल्या फ्रेंच शर्विलकाची, स्तेफान ब्रेटवाईजरची बातच निराळी.. याने फक्त त्याच्या मैत्रिणीच्या साहाय्याने १९९५-२००१च्या दरम्यान, जगातल्या २०० छोटय़ा- मोठय़ा म्युझियम्समधून केवळ हातचलाखीने तीनेकशे अभिजात कलापूर्ण वस्तू, जास्त वर्दळ नसताना उचलेगिरीने आपल्या घरी आणून ठेवल्या होत्या. विशेष म्हणजे कुठल्याही चोरीत त्याने न कुणाला इजा केली होती, ना तोडफोड करून प्रवेश. चोरीचं तंत्र ‘मिनिमलिस्टिक’, एकमेव अवजार : स्विस नाईफ. शांतपणे, घाई न करता केलेली हातचलाखी, ती केल्यावरही पळून- बिळून नाही जायचं, चुपचाप निसटायचं. गाडीत बसल्यावर मात्र सुसाट गतीने घरी पोहोचायचं. जिवावर खेळून केलेल्या या गुन्ह्यांमागचा उद्देश साधा सरळ : ‘म्युझिअममध्ये काचपेटय़ांमागे ठेवलेली कला, तुरुंगात डांबून ठेवल्यासारखी. तिला मुक्त करावं आणि मुख्य म्हणजे स्वत:ला अशा उत्कृष्ट सौंदर्याकृतींनी वेढलेलं जीवन जगता यावं.’ त्याचा कलेचा व्यासंग दांडगा आणि व्यसनही!
हेही वाचा >>> बुकमार्क: ईशान्येकडील राज्यांचा ‘ओघवता’ इतिहास
स्तेफान आणि त्याची प्रियतमा अॅन कॅथरिन यांनी आर्थिक स्थिती डळमळीत असतानाही, यातलं काही विकून पैशाची कल्पना करणं मरणप्राय वाटावं इतकं उत्कट प्रेम या कलाकृतींवर केलं. पूर्व फ्रान्समधल्या अल्सेशिअन खेडय़ात, स्तेफानच्या आईच्या घरात वरच्या मजल्यावर ही दोघं राहात. घर त्या कलाकृतींच्या लायक नक्कीच नव्हतं; पण तो मुद्दा वेगळा. त्यांच्या त्या साध्याशा खोलीला खचाखच भरलेल्या कलापूर्ण वस्तू, शिल्पं आणि चित्रांमुळे लूव्रच्या एखाद्या कक्षाचं स्वरूप आलेलं. हे जोडपं नेमकं करतं काय हे आईनं जाणून घ्यायचं कारण नव्हतं. त्या समाजात गृहीतच असते तशी त्यांची प्रायव्हसी सांभाळलेली. पण हा प्रकार उघडकीस आला तेव्हा तो युरोपातला एक अत्यंत खळबळजनक खटला ठरला.
हे चित्तथरारक कथेत घडल्यासारखं, घडलं कसं? याची फ्रेंच, इंग्लिश आणि जर्मन भाषक ब्रेटवाईजरशी संवादातून उघडलेली कहाणी, जानेमाने कलापत्रकार मायकेल फिन्केल यांनी ‘द आर्ट थीफ’ या उत्कंठावर्धक शैलीत लिहिलेल्या पुस्तकात आहे. असे सायकोलॉजिकल थ्रिलर प्रत्यक्षात घडतात कसे, त्यामागची तपशीलवार तयारी, मनोवृत्ती व मानसशास्त्रीय चिकित्सा, पोलीस व न्याययंत्रणेची तंत्रशुद्ध तपासणी, भरपूर शोधकार्याअंती वाचकांसमोर मांडलेली आहे. ही सत्यकथा ‘शेरलॉक होम्स’च्या एखाद्या कहाणीइतकीच सुरस, वाचकांना बांधून ठेवणारी.
स्तेफान ब्रेटवाईजरची कौटुंबिक पार्श्वभूमी सभ्य, सुसंस्कृत आणि महत्त्वाचं म्हणजे कलाप्रेमी मंडळींची, जराशी विक्षिप्तही. आजोबा, आईचे वडील स्तेफानला बरोबर फिरायला समुद्रावर, आडनीड ठिकाणी घेऊन जात आणि आपल्या छडीने अमुक ठिकाणी ठक- ठक करून खोदायला सांगत आणि नेमकं तिथे काहीतरी जुनं- पुराणं सापडे. अशा अनेक छोटय़ा वस्तू त्यांच्या घरच्या संग्रहांत सामील होत. एरवी उदास, गंभीर, जरा चिडचिडय़ा पोराचं सगळंच वेगळं. समवयीन मुलांत राहून खेळण्यापेक्षा त्याला म्युझिअममध्येच दिवस घालवायला आवडायचा. जमेल तेवढय़ा वस्तू हा हात लावून पाही. स्ट्रासबर्ग आर्किऑलॉजिकल म्युझियममध्ये रोमन शवपेटिकेचा एक लाखेच्या बटनासारखा तुकडा सुटून त्याच्या हाती आला होता, ते तो घरी घेऊन आला. ही शालेय वयातली त्याची पहिली चोरी, आईला माहीत असून तिने काणाडोळा केला. आजोबांनी वेळोवेळी दिलेल्या पैशांतून स्तेफान जुनी वाद्यं , पोर्सेलीनच्या वस्तू, टपालतिकिटं, नाणी, हस्तिदंती वस्तू असं काहीबाही खरेदी करून आपल्या तळघरात जमवून ठेवी. आईवडिलांच्या रागाची पर्वा न करता. पौगंडावस्था संपता संपता आई वडील वेगळे झाले, घरातील सर्व पुराणकलावस्तू वडील घेऊन गेले. घरात आधुनिक फर्निचर पाहून त्याला संताप यायचा. वयाच्या विसाव्या वर्षी त्याने ‘मलहाऊस हिस्ट्री म्युझियम’मध्ये स्वत:साठी पहिली गार्डची नोकरी मिळवली होती. तिथे तो जेमतेम महिनाभर टिकला पण त्यातून त्याला म्युझियमची सुरक्षा यंत्रणा आणि त्यातील खाचाखोचा बरोब्बर जाणून घेता आल्या. नोकरी सोडण्याआधी त्याने इ. स. पूर्व ५०० च्या सुमाराचं राजाच्या पट्टय़ाचं बक्कल कोणाला कळू न देता गुपचूप घरी आणलं होतं.
हेही वाचा >>> खेळ, खेळी खेळिया : खाशाबांच्या राज्यात!
पुस्तकाच्या पहिल्याच प्रकरणात अँटवर्पच्या रुबेन्सच्या म्युझिअममधून त्याने ‘अॅडम अँड ईव्ह’ हे जर्मन शिल्पकार जॉर्ज पेटलचं हस्तिदंती शिल्प स्तेफान आणि त्याची बहुतेक गुन्ह्यातली साथीदार अॅन कॅथरिन यांनी दोन कळीचे स्क्रू सोडवून किती कौशल्याने अलगद काढून घेतलं आणि ढिल्या कोटामध्ये लपवून घेत सफाईदार चोरी केली याची चित्तथरारक कहाणी बारकावे टिपत सांगितली आहे. हे शिल्प त्याचं सर्वात लाडकं! घरी त्याच्या पलंगासमोर मांडलेलं. दिवसाची सुरुवात आणि अखेर अतिशय सुंदर करून देणारं. त्या नंतरच्या एकेक सटीक प्रकरणात एकेक कलाकृतीच्या चोरीची कहाणी आहे. ‘मॅडलीन द फ्रान्स’, ‘टोबॅको बॉक्स’ (ज्यां बाप्तिस्त ईजाबे), ‘सिबिल ऑफ क्लीव्ज’ ( लुकास क्रानाख ), ‘अॅलेगरी ऑफ ऑटम’ (यान ब्रॉइगल / एच. फ्रँकने), ‘स्लीपिंग शेफर्ड’ (फ्रान्स्वां बुशेय), ‘फ्लिंटलॉक पिस्तोल’ (बार्थ ए. कोल्मर ), ‘पिएटा’ ( क्रिस्तोफ श्वार्झ), ‘दि बिशप’(युस्ताश ल स्यूर), बाराव्या शतकातल्या किल्ल्यामधल्या मध्ययुगीन संग्रहालयातून उचललेलं, लाकडासह हाडंसुद्धा वापरून बनवलेलं धनुष्य (क्रॉसबो), ब्रुसेल्सच्या आर्टस् अँड हिस्ट्री म्युझियममधून अभ्यासासाठी बाजूला काढून ठेवलेल्या ढिगाऱ्यातून एकेक करून ढापलेली सोळाव्या शतकातली चांदीची जुनी भांडी, किनखापी टॅपेस्ट्री अशा अनेक बहुमोल वस्तू. याचं हत्यार म्हणजे फक्त एक स्विस नाईफ (त्यातला स्क्रू ड्रायव्हर किंवा कधी छोटीशी कापाकापी करण्याजोगी करवत), तल्लख मेंदू, धाडसी मन, ‘हाथ की सफाई’, पटकन संकटातून स्वत:ला सोडवून घेणारा हजरजबाबीपणा आणि अगदी सुमार चारचौघांसारखं व्यक्तिमत्त्व, संशयास्पद काहीच नाही. स्वित्र्झलडमधल्या चोरीत पकडले गेल्यावर १० वर्ष तिथे जायला बंदी होती खरी. पण नंतर वेशांतर करून तिथेच परत जाऊन चोरी करायची मुजोरी स्तेफानमध्ये कुठून आली असावी? छोटय़ा म्युझियम्सच्या व्यवस्थापनाला अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा / देखरेख परवडत नसल्यानं हे गुन्हे शक्य होतात.
२००१ मध्ये स्वित्र्झलडमधल्या ल्यूसर्नच्या वॅग्नर म्युझियममध्ये त्याची चोरी पकडली गेली. त्याला प्रथम अटक झाली वेगवेगळय़ा कलावस्तूंच्या चोरीसाठी. स्तेफान ब्रेटवाईजर गेली २०-२२ वर्ष तुरुंगाच्या आत-बाहेर करतोय, आजही खटले लढतोय. त्याच्यावरच्या आरोपपत्रांतही त्याचं कृत्य बेकायदा असलं तरी त्याच्या पारखी नजरेला दाद देण्यात आली आहे. गुन्ह्यात साथीदार असणाऱ्या अॅन कॅथरिनला आणि त्याच्या आईला मात्र त्याने आरोपमुक्त ठेवलं आहे. त्याच्या पहिल्या तुरुंगवासानंतर काही वस्तू कलासंग्रहालयं, चर्च आणि इतर मालकांना परत केल्या गेल्या, पण घरावर छापा पडला तेव्हा खोलीत त्यापैकी कशाचाही गंध मिळाला नाही, त्याच्या आईने बऱ्याचशा वस्तू तोडफोड करून ऱ्हाईन अँड ऱ्होन कॅनालमध्ये टाकून दिल्या असाव्यात असं बोललं जातं; पण पुराव्याने सिद्ध करता आलेलं नाही. पाटातून काढलेल्या वस्तूंची किंमत नुकसानीनंतरही काही कोटींमध्ये आहे, त्या परत सुस्थितीत आणण्याचं काम सुरू आहे.
इतके खटले, आरोप प्रत्यारोप ऐकूनही आपण काही गुन्हा केला आहे असं गोंधळलेल्या चेहऱ्याच्या ब्रेटवाईजरला आजही वाटतच नाही. वर्तन चुकीचं होतं इतपत त्याला मान्य आहे. एकंदर सगळंच सर्वसामान्यांना चकित करणारं!
हेही वाचा >>> अन्वयार्थ : कसं पिकावं विकासाचं रान?
या पुस्तकासाठी फिन्केलने स्तेफानच्या घेतलेल्या मुलाखतीतला एक किस्सा. फ्रान्समधल्या एका हॉटेलच्या खोलीत झालेल्या दीर्घ संभाषणात आपणा सगळय़ांना पडणारा प्रश्न फिन्केलने त्याला विचारला, ‘केवळ हातचलाखी? पण तू हे केलंस कसं?’ स्तेफान म्हणाला, ‘जरा बघ आसपास ,तुझ्या खोलीत काही बदल दिसतोय?’ फिन्केलने नजर फिरवत नकार दिला, सगळं जसंच्या तसंच तर होतं. तेव्हा स्तेफानने उठून पाठीमागून स्वत:चा शर्ट वर करून दाखवला. त्याच्या ट्राऊजर्समध्ये फिंकेलचा लॅपटॉप व्यवस्थित खोवून ठेवलेला होता!! चोरीनंतर शर्ट खाली करून चालू लागल्यास त्याचा मागमूस कोणाला लागणं शक्य नव्हतं!
प्रकाशनानंतर फक्त ३ महिन्यांत हे पुस्तक ‘न्यू यॉर्क टाइम्स’च्या पहिल्या दहा पुस्तकांमध्ये जाऊन बसलंय. विक्रीचे नवे उच्चांक गाठत आहे. अव्वल दर्जाच्या कला चोराची अनोखी सत्यकथा आहे ही.. थ्रिलरचं लेणं लेऊन आलेली!
‘द आर्ट थीफ’ लेखक : मायकेल फिन्केल प्रकाशक : सायमन अॅण्ड शूस्टर पृष्ठे : २४० ; किंमत : ६९९ रु.
arundhati.deosthale@gmail.com