हृषीकेश गुप्ते

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भयनिर्मितीसाठी दरवेळी पारलौकिक विश्वाचा आधार घेण्याची किंवा कथानकाला अविश्वसनीय कलाटणी देण्याची गरज नसते. सामान्य माणसाच्या रोजच्या जगण्यातूनही भयनिर्मिती करता येऊ शकते. मानवाच्या अनपेक्षित वर्तनातून धक्कातंत्राचा परिणाम साधता येऊ शकतो, हे सिद्ध करणाऱ्या पॉल जी. ट्रिंबले यांच्या कथासंग्रहाविषयी..

भयनिर्मितीसाठी दरवेळी पारलौकिक विश्वाचा आधार घेण्याची किंवा कथानकाला अविश्वसनीय कलाटणी देण्याची गरज नसते. सामान्य माणसाच्या रोजच्या जगण्यातूनही भयनिर्मिती करता येऊ शकते. मानवाच्या अनपेक्षित वर्तनातून धक्कातंत्राचा परिणाम साधता येऊ शकतो, हे सिद्ध करणाऱ्या पॉल जी. ट्रिंबले यांच्या कथासंग्रहाविषयी..

Not all gifts are easy to accept.  The most important gifts are often the ones we wish with all our hearts to refuse –  Paul Tremblay, 

The cabin at the end of the world

इंग्लिश साहित्यविश्वात अ‍ॅडगर अ‍ॅलन पोपासून स्टीवन किंगपर्यंत भयसाहित्याची अत्यंत वैविध्यपूर्ण परंपरा आहे. यात एच. पी. लव्हक्राफ्ट, मेरी श्ॉली, आर्थर मशेन, रामसे कॅम्पबेल, रिचर्ड मथेसन, रे ब्रॅडबरी या पूर्वसुरींपासून ते डॅन सिमन्स, टॉप पिक्रिल्ली, स्कॉट स्मिथ, नॉर्मन पॅट्रीज, नील गेमन – सारख्या आजच्या लिहित्या लेखकांचाही समावेश होतो. भयनिर्मिती ही निव्वळ पारलौकिक विश्वातूनच नव्हे तर सामान्य माणसाच्या रोजच्या जगण्यातून आणि त्या जगण्याशी जोडल्या गेलेल्या दैनंदिन धारणांतूनही करता येते, हे नंतरच्या पिढीतील भयकथालेखकांनी हिरिरीने दाखवून दिले. ही भयनिर्मिती तंत्रज्ञानाच्या बेजबाबदार वापरातून संभवणारी अटळ आणि अजेय संकटे, मानवास अद्यापि न आकळलेली ब्रह्मांडाची विविध रूपे इ. अनेक अभिनव कथानकांतून सद्यकाळात साधली जात असून अशा साहित्यकृतींतून वाचकाच्या मनात भय, अद्भुतादी भावना जागृत करण्याकडचा कल वाढत चाललेला आहे. अशाच अभिनव कथाकल्पनांचा वापर करून भय, गूढ, विस्मयादी भावना सद्यकालीन साहित्यकृतींद्वारे वाचकांच्या मनात जागृत करणारा या पिढीतील लेखक म्हणजे पॉल जी. ट्रिंबले.

हेही वाचा >>> बुकमार्क : निवडणुका जिंकण्याचे चमत्कारिक किस्से

पॉल जी. ट्रिंबले हे गेल्या काही वर्षांपासून भय, अद्भुत आणि विज्ञानविषयक काल्पनिका – लेखनातील अग्रेसर नाव आहे. ‘द केबिन अ‍ॅट द एंड ऑफ द वल्र्ड’, ‘अ हेड फुल ऑफ घोस्ट्स’, ‘सव्‍‌र्हायवर साँग’, ‘डिसॅपियरन्स अ‍ॅट द डेव्हिल रॉक्स’ अशा कादंबऱ्यांप्रमाणेच काही कथासंग्रहही त्यांच्या नावावर आहेत. भय आणि अद्भुत साहित्यनिर्मितीत अत्यंत सन्मानाचे समजले जाणारे ब्रॅम स्टोकर आणि ब्रिटिश फॅन्टसी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले असून याच लेखकाच्या २०२३ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘द बीस्ट यू आर’ या कथासंग्रहावर टाकलेला हा दृष्टिक्षेप.

‘द बीस्ट यू आर’ या कथासंग्रहात एकूण १५ कथा आहेत. या सर्वच कथा शब्दसंख्येच्या दृष्टीने वैविध्यपूर्ण आहेत. काही कथा निव्वळ ५०० शब्दांच्या आणि पानभर लांबीच्या असून शीर्षककथा ‘द बीस्ट यू आर’ ही जवळपास एखाद्या लघुकादंबरीच्या आकाराची आहे. या सर्वच कथांना रूढार्थाने भयकथांच्या साच्यात बसवता येणार नाही. पण या सर्व कथांमध्ये एक अनपेक्षित असे अघटित – पात्रांच्या नियतीत लेखकाने वाढून ठेवलेले आहे. या अघटिताच्या स्पर्शाने वाचकाचे अनुभवविश्व वेळोवेळी ढवळून निघते. जागतिक साहित्यातील पारंपरिक भयगूढकथा ही मुख्यत्वे धक्कातंत्रावर अवलंबून असल्याचे आधार सर्वत्र पाहायला मिळतात. नवगूढकथेने या धक्कातंत्रावरचे अवलंबित्व नाकारले आणि पात्रांच्या वा कथापर्यावरणाच्या वैचित्र्यावर, वैविध्यावर आधारित अशा कथानक उभारणीकडे अधिकचे लक्ष पुरवण्यास सुरुवात केली. धक्कातंत्र घासून गुळगुळीत झाले आहे. शिवाय साहित्यकृतीत त्याचा समावेश करण्यासाठी लेखकाला बरेचदा कथानकाला अविश्वसनीय कलाटणी द्यावी लागते. यामुळे वाचनानुभव सपक होण्याचा धोका संभवतो. धक्कातंत्राचा परिणाम हा साहित्यकृतीला कलाटणी देऊन साधण्यापेक्षा मानवी भावभावना आणि स्वभावाच्या अनपेक्षित वर्तनातून सामोरे आणण्याचे कसब पॉल जी. ट्रिंबले या लेखकाने ‘द बीस्ट यू आर’ या संग्रहातील कथांमधून साधले आहे. या सर्वच कथा म्हणूनच एक अत्यंत वैशिष्टयपूर्ण आणि अकल्पित अनुभव देतात.

‘हॉन्टेड हाऊस वन: पर पर्सन’, ही या संग्रहातील पहिलीच कथा वातावरण निर्मितीत रूढ भयकथेची वाट चोखाळते. ही एक विलक्षण आणि भयप्रद अनुभव देणारी कथा आहे. कथानायकाला त्याने त्याच्या बालपणी रेखाटलेले एका भुताचे चित्र सापडते आणि एक जुनाट भय त्याच्या आयुष्यात पुन्हा एकदा प्रवेश करते. ‘आय नो यू आर देअर’ या कथेतील कथानायकाच्या आयुष्यात जोडीदाराच्या मृत्यूनंतर भरून राहिलेल्या पोकळीचे आणि वेदनेचे अत्यंत चित्रमय आणि संवेदनक्षम वर्णन लेखकाने केलेले आहे. कथेतील विलक्षण आणि रोमांचक असे वातावरण, कथेतील अनवट वळणे आणि सोबतच मृत्यू नामक वास्तवाचा अतिदु:खद स्पर्श कथेला निव्वळ भयकथेच्या अनुभवापर्यंतच मर्यादित ठेवत नाही, तर एका तीव्र जीवनानुभवाच्या पातळीवर घेऊन जातो. ‘द केबिन अ‍ॅट द एंड ऑफ द वल्र्ड’ ही रचनाबंधाच्या बाबतीतील एक अत्यंत प्रयोगशील कथा आहे. फाऊंड डॉक्युमेंट्स वा सापडलेली कागदपत्रे या प्रकारात मोडणारी ही कथा कालानुरूप उलटया क्रमाने सांगितलेली असून जगाच्या सर्वनाशाविषयी ती भाष्य करते. इंग्रजी साहित्यात अपॉकॅलिप्टिक फिक्शन म्हणजेच जगबुडीच्या कथानकांची कमतरता नाही. पण या कथेचा घाट आणि रचनाबंध हे या कथेचे एक अधिकचे वैशिष्टय ठरते. आय नो यू आर देर या कथेतून लपंडाव या बालपणीच्या खेळाचे सूत्र वापरत लेखक वाचकाला एका विचित्र भयप्रद अनुभवाच्या सफरीवर घेऊन जातो, तर हाऊस ऑफ विंडोज या कथेतून मोठाल्या खिडक्या असणाऱ्या आणि सतत जागा बदलणाऱ्या एका विचित्र घराची गोष्ट सांगतो. एका अत्यंत सहज आणि सोप्या निवेदनातून लेखक वाचकासमोर एक खिळवून ठेवणारी बहुपदरी कथा मांडतो.

या कथा वाचताना एक महत्त्वाची गोष्ट ध्यानात ठेवावी लागते ती म्हणजे, भयनिर्मिती साधताना लेखक कोणत्याही विशिष्ट कथाविषयापुरता स्वत:ला मर्यादित ठेवत नाही. या कथानकांतून फॅन्टसी, जगबुडी, मानवी जगण्यातील वैचित्र्य, अगदी तंत्रज्ञानाच्या अतिरेकी वापरापर्यंत सर्वच विषयांचा, तंत्रांचा आणि पद्धतींचा वापर करत लेखक पात्रांच्या नियतीचा प्रवास हा भयचकित करणाऱ्या शेवटाच्या दिशेने हाकारत राहातो.

‘द पोस्टल झोन: द पझेशन एडिशन’, ही मांडणी आणि घाटाचा विचार करता फार वेगळी कथा नसली तरी ही पत्रांच्या माध्यमातून उलगडत जाते. कथानकात ज्या बिंदूवर भय आणि कथावास्तूतील वैचित्र्य यांचा संयोग होतो तिथे कथा आपली पकड अधिक घट्ट करते. द लास्ट कन्व्हर्सेशन ही कथा संग्रहातील सर्वाधिक रोचक कथा ठरावी. कथानायक एका अनामिक रुग्णालयातील पलंगावर जागा होतो आणि कथेला सुरुवात होते. कथानायकाला रूढार्थाने नाव आणि गाव नाही. अ‍ॅन नावाची नर्स त्याची देखभाल करत असते. कथानक पुढे सरकत जाते, तसे प्रत्येक दिवसागणिक वा नोंदीगणिक थोडी अधिकाधिक माहिती वाचकाला मिळत जाते आणि एका वळणाशी येऊन एक अनपेक्षित धक्का देत कथा संपते.

‘द बीस्ट यू आर’ ही शीर्षककथा म्हणजे पुस्तकाची जवळपास अर्धी पृष्ठसंख्या व्यापणारी एक कादंबरिका आहे. या सर्वच कथांमधील सर्वाधिक विचित्र कथापर्यावरण असणारी ही कथा आहे. फक्त प्राण्यांचा निवास असणाऱ्या शहरातील एका अर्वाचीन प्रथेभोवताली फिरणारी ही कथा. कथेत या वैशिष्टयपूर्ण प्रथेद्वारे एका राक्षसाला बळी देण्यासाठी दोन प्राण्यांची निवड करण्यात येते. बळी देण्यासाठी निवडलेले हे प्राणी आहेत, एक कुत्रा आणि एक मांजर. हे दोन प्राणी आणि त्यांचा बळी घेण्यासाठी आलेला राक्षस अशा या तिघांच्या अंतिम काळातील मानसिकतेची, अस्तित्व टिकवून ठेवण्याच्या धडपडीची, बिकट काळ जवळ येताच जागृत होणाऱ्या प्रत्येक जिवाच्या संघर्ष करण्याच्या मूलप्रवृत्तीची ही एक अनोखी कथा आहे. या कथानकात भय, अद्भुत आणि वैचित्र्य ठासून भरलेले असून हिचे निवेदन सातत्याने वाट बदलते. कधी मुक्त काव्यात्म, कधी गद्यमय, तर कधी अर्धपद्यमय निवेदनात लिहिलेली ही कथा संग्रहातील सर्वाधिक प्रयोगशील कथा ठरावी.

वातावरणनिर्मिती हे बरेचदा भयकथांचे बलस्थान ठरते. भयनिर्मितीसाठी वातावरणनिर्मितीचे एक महत्त्वाचे अंग लेखकाकडे असणे गरजेचे असतेच, पण पॉल ट्रिंबले हे वातावरण निव्वळ आपल्या भाषिक अभिव्यक्तीद्वारेच साधत नाही, तर बरेचदा विलक्षण घटना आणि प्रसंगनिर्मितीतूनही जिवंत करतो. या कथांचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे अनेक कथानके लेखकाच्या आधीच्या प्रसिद्ध कथाकादंबऱ्यांतील कथावास्तूंची, पात्रांची, शहरांची, रचनांची पुनर्भेट घडवून आणतात. त्या अर्थाने या कथा मेटाफिक्शन वा स्वसंवेद्य प्रकारात मोडणाऱ्या कथाही ठरतात.

अखेरीस लेखकाने कथानिर्मितीविषयी काही विशेष टिपणे लिहिलेली आहेत. या टिपणांतून लेखक संग्रहातील जवळपास सर्वच कथांच्या जन्मकथा वा त्या कथा लिहिण्यामागच्या प्रेरणा वाचकाला उलगडून दाखवितो. कथाजन्माच्या कहाण्या हा लेखकाला समजून घेण्याचा, त्याचं अंतरंग उलगडून पाहण्याचा एक गमतीदार अनुभव ठरू शकतो. कल्पनाशील लिखाण करणाऱ्या लेखकांच्या बाबतीत ही प्रातिभ प्रक्रिया नेमकी कशी साधली जाते, याचे अनेक वस्तुनिष्ठ दाखले अशा नोंदींतून सापडू शकतात. त्याच त्या विषयांच्या गर्तेत फसून संपृक्त होऊ पाहणारी जागतिक भयकथा नव्याने समृद्ध करण्याचे प्रयत्न अनेक भय, गूढ, अद्भुतकथा लेखक जागतिक साहित्याच्या पटलावर सातत्याने करताना दिसतात. पॉल ट्रिंबले हे या लेखकांमधील एक आघाडीचे नाव आहे.

द बीस्ट यू आर

पॉल जी. ट्रिंबले

प्रकाशक : टायटन बुक्स प्रा. लि.

पृष्ठे : ४९६ मूल्य : रु. ५२०/-

rushikesh.gupte@gmail.com

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Book review the beast you are stories by paul tremblay zws
Show comments