सुकल्प कारंजेकर
चार जणांच्या कथनातून उलगडणारे कादंबरीचे कोडे वाचकांना खिळवणारेच ठरते..
आयर्लंडमधील एका छोटाशा गावाजवळील टेकडीवर एक प्रशस्त बंगला आहे. बंगल्यामागे नजर जाईल तिथपर्यंत दाट झाडी पसरली आहे. झाडीच्या मध्यभागी भग्नावशेष आहेत. हा सगळा भाग ‘गोल्डन हिल’ नावाने ओळखला जातो. ही सगळी जागा आहे बार्न्स कुटुंबाची. आई-वडील आणि एक मुलगा, एक मुलगी असं सुबक चौकोनी कुटुंब. पॉल मरे यांची महाकादंबरी ‘द बी स्टिंग’ ही या कुटुंबाची गोष्ट आहे. एका मोठय़ा कॅनव्हासचे चार भाग करावेत आणि त्यातील एक भाग रंगवायला सुरुवात करावी. तो भाग रंगवताना इतर भागांवर किंचित रंगांची फेरणी करावी. चित्राचा अर्थ हळूहळू कळतो आहे असा भास होईस्तोवर दुसरा भाग रंगवायला घ्यावा आणि आधीच्या चित्राचा बाज आणि अर्थ संपूर्ण बदलावा. मग तिसरा भाग रंगवायला घ्यावा. हळूहळू चित्र साधेसुधे नसून एक भलेमोठे कोडे आहे हे लक्षात यावे. चित्राचा रंग गडद होत जावा. चित्रात लपलेले भयावह आकार दृष्टिक्षेपात येऊ लागावेत. आपण भयभीत आणि थक्क होऊन सतत बदलणाऱ्या चित्राकडे बघत राहावे आणि शेवटी आपल्या अनामिक भीतीनेच ते चित्र पूर्ण करावे असा काहीसा अनुभव हे पुस्तक वाचताना येतो.
‘द बी स्टिंग’ ही पॉल मरे या प्रतिभावान आयरिश लेखकाची चौथी कादंबरी. पॉल मरे यांच्या आधीच्या तीन कादंबऱ्या आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजल्या आणि अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांसाठी नामांकित झाल्या आहेत. पी. जी. वूडहाऊस या जगप्रसिद्ध विनोदी लेखकाच्या स्मृतीसाठी असलेला पुरस्कार त्यांना मिळाला आहे. विनोद आणि शोक यांचे तरल मिश्रण मरे यांच्या लिखाणात दिसते. ‘द बी स्टिंग’ पुस्तकदेखील एक विनोदी शोकांतिका आहे. पण पुस्तकाचा पट मोठा आहे. कुटुंबातील चार व्यक्ती, त्यांना जोडली गेलेली इतर महत्त्वाची पात्रे यांच्या आयुष्यात घडणारे नाटय़, यांबरोबरच बदलत जाणारी सामाजिक परिस्थिती, जागतिक तापमानवाढ, आर्थिक मंदी, गुन्हेगारी आणि व्यसनाधीनतेचा प्रश्न असे अनेक विषय पुस्तकात येतात. अनेकपदरी वास्तव हे पुस्तक वाचताना हळूहळू उलगडत जाते. ६०० हून अधिक पाने असलेले हे पुस्तक शेवटच्या पानाच्या शेवटच्या ओळीपर्यंत गुंतवून ठेवते. थरारनाटय़ाचा अनुभव देते. पुस्तकाच्या शेवटच्या ओळीतून पुस्तकाच्या पहिल्या ओळीचा वेगळाच अर्थ लक्षात येतो. शेवट वाचल्यावर परत सुरुवात वाचायचा मोह होतो.
हेही वाचा >>> बुकबातमी : भारत-संबंधावर पुरस्कारांची मोहोर..
पुस्तकाची सुरुवात चौकोनी कुटुंबातील कॅसी किंवा कॅसॅन्ड्रा बार्न्स या नवतरुणीच्या भावविश्वातून होते. कॅसीचे शालेय शिक्षण पूर्ण होत आले आहे आणि तिला पुढील शिक्षणासाठी मोठय़ा शहरात – डब्लिनला जाण्याचे, स्वातंत्र्य अनुभवण्याचे वेध लागले आहेत. एलेन ही कॅसीची जिवलग मैत्रीण. पण एलेनबद्दलच्या कॅसीच्या भावना नकळत मैत्रीच्या पलीकडे जाणाऱ्या आहेत. नवतरुणांच्या भावविश्वातील मैत्री, प्रेमात पडणे, लैंगिक आकर्षण, मत्सर, असूया, पीअर प्रेशर, भविष्याबद्दलची स्वप्ने आणि असुरक्षितता या सगळय़ा भावनांचे मिश्रण कॅसीच्या भागात येते. त्याशिवाय या भागात कुटुंबातील इतर व्यक्तींचा थोडक्यात परिचयदेखील होतो. कॅसीचे वडील डिकी बार्न्स हे गाडय़ांचे मोठे विक्रेते आहेत. हा व्यवसाय डिकीच्या वडिलांनी – मॉरिस बार्न्स यांनी सुरू केला. डिकी हे डब्लिनला ट्रिनिटी महाविद्यालयात शिकलेले, तत्त्वज्ञान आणि जगाच्या प्रश्नांबद्दल संवेदनशील असलेले. एकदा शाळेचा प्रकल्प म्हणून जागतिक तापमानवाढीवर निबंध लिहिण्याचा विषय कॅसीला मिळतो. ती वडिलांबरोबर या निबंधावर काम करू लागते. निबंध लिहिताना आपण वैयक्तिक पातळीवर किती प्रमाणात तापमानवाढीला कारणीभूत आहोत हे कॅसीच्या आणि डिकीच्या लक्षात येते. पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या गाडय़ा विकताना, परदेशात सुट्टीत फिरायला जाताना आपण मोठय़ा प्रमाणात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष तापमानवाढ करत आहोत याचा अपराधगंड डिकीला येतो. याचा त्याच्या विक्रीवरही परिणाम होतो. त्याच सुमारास आर्थिक मंदीचेही सावट पसरते. सगळय़ाच व्यवसायांवर ओहोटीची चिन्हे दिसू लागतात, मुख्य बाजारातील दुकाने बंद पडू लागतात. गेल्या शंभर वर्षांमध्ये कधीही न पडला इतका पाऊस पडतो. गावातील रस्ते पाण्याने ओढय़ांसारखे ओसंडून वाहू लागतात. काही दिवसांनी पूर आटोक्यात येतो.
पण जागतिक तापमानवाढीमुळे अशा घटना वारंवार घडणार, अन्न, पाण्याची अडचण निर्माण होणार. कदाचित जागतिक अर्थव्यवस्था कोसळून अराजकता माजणार. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आणि स्वत:च्या कुटुंबाला वाचवण्यासाठी आपत्कालीन परिस्थितीत राहायला एक निवास असायला हवा असे डिकीचा प्लम्बर, इलेक्ट्रिशियन मित्र व्हिक्टर सुचवतो. डिकीला व्हिक्टरचे विचार फक्त अंशत: पटत असतात. घरामागील झाडीमध्ये, मोडक्या खोलीजवळ डिकी त्याची मुले लहान असताना त्यांच्याबरोबर शिकार शिकार खेळायचा. आता मात्र कॅसीला घर सोडून डब्लिनला जाण्याचे वेध लागले असतात आणि मुलगा पीजे हा व्हिडीओ गेम्स खेळण्यात जास्त व्यस्त असतो. पीजेच्या व्यक्तिमत्त्वाचे थोडक्यात चित्रण कॅसीच्या भागात येते. चित्रविचित्र माहिती पाठ असलेला, काहीसा लाजराबुजरा. आपत्कालीन खोली आणि छोटीशी विहीर खोदण्याच्या प्रकल्पात डिकी पीजेला मदत करायला सांगतो. सुट्टीचा बराच वेळ बाप-मुलगा या प्रकल्पावर घालवतात, अनेकदा रानात झोपतात. डिकीच्या बायकोला- इमेल्डाला मात्र हा खुळचटपणा वाटतो. तापमानवाढीच्या खुळामुळे गाडय़ांची विक्री कमी झाल्याबद्दल ती डिकीला आणि त्याच्या मनात हे विचार भरवल्याबद्दल कॅसीला दोष देते.
इमेल्डा ही सोनेरी केसांची, एखाद्या मॉडेलसारखी भासणारी सुंदर स्त्री. कॅसीच्या भागात इमेल्डाचा थोडक्यात परिचय येतो. सतत नवीन फॅशनचे कपडे, शूज इत्यादी खरेदीची आवड असलेली, पार्टी आवडणारी, काहीशी उथळ – मनात आलेला प्रत्येक विचार बोलणारी असे चित्रण येते. कॅसीच्या मैत्रिणीला, एलेनला इमेल्डाच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आदरयुक्त आकर्षण जाणवत असते. इतक्या सुंदर स्त्रीने डिकीसारख्या साधारण माणसाशी लग्न का केले, हा प्रश्न एलेनला पडतो. आईवडिलांच्या स्वभावात इतकी तफावत असताना त्यांचे नेमके कसे आणि का जुळले, हा प्रश्न कॅसीलाही पडतो. कदाचित इमेल्डाने डिकीच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती पाहून लग्न केले असावे आणि डिकी फक्त तिच्या रूपावर भाळला असावा असे कॅसी आणि एलेनला वाटते. डिकीचा गाडय़ांचा व्यवसाय अडचणीत येतो तेव्हा अचानक घरातील आर्थिक परिस्थिती बिघडते. आर्थिक चणचण जाणवू लागते. सुरुवातीला ज्या भरमसाट वस्तू खरेदी केल्या त्या विकण्याची वेळ येते. अखेर डिकीचा गाडय़ांचा व्यवसाय बंद पडतो. डब्लिनमध्ये आपल्या शिक्षणाचा खर्च परवडेल की नाही अशी भीती कॅसीला वाटते. अशा स्थितीमध्ये डिकीने त्याच्या वडिलांकडे, मॉरिसकडे मदत मागावी अशी कॅसी आणि इमेल्डाची इच्छा असते. डिकी मात्र वडिलांकडे पैसे मागणे टाळत असतो. शिवाय मॉरिस मदत करेल की नाही हीदेखील अनिश्चितता असते. त्यामुळे घरात विलक्षण ताण निर्माण झालेला असतो. त्यात कुटुंबातील सदस्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील नाटय़ाची आणि भूतकाळातील रहस्यांची भर पडते.
कॅसीच्या भागानंतर पीजे, इमेल्डा, डिकी यांचा भाग येतो. व्यक्तिचित्रणात मरे थक्क व्हावे इतके तपशील भरतात. त्यामुळे पात्रे सजीव होतात. त्यांचे बालपण, त्यांचे चांगलेवाईट अनुभव, त्यांची स्वप्ने आणि भीती सगळे स्पष्ट दिसतात. त्यांचे व्यक्तिमत्त्व काळानुसार कसे आणि का बदलले याचा प्रवास दिसतो. पीजेला एक गुंड प्रवृत्तीचा मोठा मुलगा त्रास देत असतो. तुझ्या वडिलांनी गाडी दुरुस्त करताना मला फसवले, असे म्हणून पैशांची मागणी करत असतो. दुसरीकडे आर्थिक स्थैर्य कोसळल्यावर घरात डिकी आणि इमेल्डाची भांडणे वाढली असतात. त्यांच्यात जर घटस्फोट झाला तर आपली रवानगी दूरवरच्या निवासी शाळेत केली जाईल, आपण एकटे पडू अशी भीती पीजेला वाटत असते. त्याच्या मनातील ताणतणावाची घरातील इतरांना कल्पना नसते. व्हिडीओ गेम्स विकून गुंडाने मागितलेले पैसे जमा करायचा पीजे प्रयत्न करतो. पण तरीही पैसे अपुरे पडत असतात. गुंड सतत धमकावत असतो. घर सोडून पळून जावे का? आपण घर सोडून पळून डब्लिनला किंवा इंग्लंडला गेलो आहोत, तिथे खूप पैसे कमावले आहेत. मोठे झाल्यावर आलिशान गाडी, मस्त कपडे घालून आपण परततो तेव्हा सुंदर एलेन आपल्या प्रेमात पडते अशी स्वप्ने पीजेला पडतात. ऑनलाइन गेम खेळताना एकाबरोबर पीजेची ओळख होते. ही व्यक्ती पीजेला घरून पळून जाण्यासाठी उद्युक्त करत असते. इमेल्डाच्या भागात लक्षात येते की तिचे बालपण अगदी हलाखीच्या परिस्थितीत गेले. तिचे वडील खूप तापट, गुन्हेगार प्रवृत्तीचे असतात. तिच्या बालपणात आणि तरुण वयात अनेक चढउतार आले असतात, खूप काही भोगावे लागले असते. दुसरीकडे डब्लिनमध्ये उच्च शिक्षणासाठी गेलेल्या डिकीच्या आयुष्यातही खूप काही घडले असते, ज्याची कल्पना फक्त डिकीला असते. इमेल्डा आणि डिकीच्या आयुष्यात भूतकाळात काही घटना घडून गेल्या असतात, त्यांची काही रहस्ये असतात जी हळूहळू उलगडत जातात. प्रत्येक प्रकरणामध्ये त्यांच्या आयुष्यातील माहितीचे नवे तुकडे पुढे येतात, ज्यातून एक भले मोठे कोडे जुळत जाते. या कोडय़ात गावातील, डब्लिनमधील लोक गुंतले असतात. प्रत्येक प्रकरणागणिक कथानकाचा वेग वाढत जातो. भूतकाळातील काही रहस्ये भयावह स्वरूपात परत येतात आणि मानगुटीवर बसतात. पुस्तकाच्या शीर्षकामागेही एक गोष्ट आहे. ज्याची एक बाजू कॅसीच्या भागातून कळते, पण हळूहळू इतरांच्या भागांतून पूर्ण सत्य पुढे येते.
मरे यांच्या लिखाणाचे वैशिष्टय़ असे की प्रत्येक पात्राचे व्यक्तिचित्रण त्या व्यक्तीच्या पातळीवर जाऊन केले आहे. उच्चशिक्षित असलेल्या डिकीच्या भागात शब्दप्रयोग त्या पातळीवर येतात. इमेल्डा मात्र फारसे शिकलेली नाही. तिच्या भागात सोपे शब्द येतात. इमेल्डाच्या भागात एकही स्वल्पविराम, पूर्णविराम असे काहीच येत नाही. तिच्या मनातील विचारांचा गुंता लिखाणाच्या शैलीतून हुबेहूब उतरतो. पीजेच्या भागात त्याच्या विचारांमध्ये व्हिडीओ गेम्स आणि चित्रपटांचे संदर्भ येतात. पुस्तकातील प्रत्येक व्यक्तीचे वय, अनुभव, पार्श्वभूमी यावरून त्यांचे भावविश्व कसे असेल याचा सखोल विचार लेखकाने केल्याचे जाणवते.
एकीकडे बाह्य जगात जागतिक तापमानवाढ, प्रदूषण, तीव्र उष्णता, अतिवृष्टी अशा घटना घडत आहेत. संकुचित दृष्टिकोनावर आधारित अर्थव्यवस्था खिळखिळी होते आहे, तर दुसरीकडे कुटुंबांच्या आणि व्यक्तीच्या भावनिक पातळीवरही अनेक उद्ध्वस्त करणाऱ्या घटना घडत आहेत. ‘द बी स्टिंग’ ही एकविसाव्या शतकाला साजेशी कादंबरी आहे.
यंदाचे ‘बुकरायण’ या लेखाबरोबर समाप्त
द बी स्टिंग लेखक : पॉल मरे प्रकाशक : हॅमिश हॅमिल्टन (पेंग्विन) पृष्ठे : ६५६; किंमत : ८९९ रु.
वाचनदुवे :
पॉल मरे यांची मुलाखत :
https://www.theguardian.com/books/2023/may/27/paul-murray-i-just-dumped-all-my- sadness-into-the-book-the-bee-sting
पॉल मरे यांची एक कथा :
https://www.irishtimes.com/culture/books/the-dragon-ship-a-short-story-by-paul-murray-1.2670064
write to sukalp@gmail.com