प्रफुल्ल शिलेदार – संपादक, ‘युगवाणी’ त्रैमासिक
ओडिया भाषेत गेल्या पाच दशकांत निर्माण झालेल्या साहित्यातील निवडक लेखन इंग्रजीतून अन्य भाषकांपर्यंत आणि देशविदेशातील पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचविणाऱ्या पुस्तकाविषयी…
‘द बिग बुक ऑफ ओडिया लिटरेचर’ हे पेंग्विन रँडम हाऊसने काढलेलं भलं थोरलं- पावणेआठशे पानी पुस्तक म्हणजे ओडिया साहित्य परंपरेतील सुमारे ६०० वर्षांतील निवडक श्रेष्ठ साहित्याचे संपादन आहे. ओडिया ही अभिजात भाषेचा दर्जा मिळालेल्या मोजक्या सहा भाषांपैकी एक भाषा आहे. पंधराव्या शतकापासून ते विसाव्या शतकापर्यंतच्या साहित्यातून निवड करून त्याचा इंग्रजी अनुवाद भाषेबाहेरच्या वाचकापर्यंत पोहचवणे ही मोठीच कामगिरी ओडिया कवी-संपादक मनु दाश यांनी पार पडलेली आहे.
भारतीय भाषांमधील साहित्याचे इंग्रजीत आणि इतर भारतीय भाषांमध्ये अनुवाद सातत्याने होत आहेत, मात्र हे बहुतेक प्रयत्न सुटे-सुटे असतात. एखाद्या भारतीय भाषेतील साहित्याचे असे सम्यक संपादन इंग्रजीत निघण्याची ही कदाचित पहिलीच घटना असावी. ओडिया साहित्याच्या उगमापासूनच्या परंपरेचा आणि त्यातील काही महत्त्वाच्या वेच्यांचा इथे वाचकास परिचय होतो आणि त्या भाषिक परंपरेची साहित्यातून थेट ओळख होते.
हेही वाचा >>> लोकमानस: पदकांचा दुष्काळ पडतो, कारण…
‘द बिग बुक ऑफ ओडिया लिटरेचर’मध्ये कविता, कथा, नाटक आणि निबंध असे चार विभाग आहेत. अशा ग्रंथाला आवश्यक असलेल्या प्रस्तावनेत संपादक मनु दाश यांनी ओडिया भाषेचा इतिहास थोडक्यात मांडून ओडिया साहित्य परंपरेविषयी आपली काही निरीक्षणे नोंदवली आहेत.
एक वेगळी गोष्ट अशी की या संपादनात फक्त प्रमाण ओडिया भाषेतील साहित्याचा समावेश न करता ओडिशात बोलल्या जाणाऱ्या बोलीभाषांचादेखील प्रातिनिधिक समावेश केलेला आहे. एरवी असे संपादन करताना बोलीतील साहित्याकडे संपादकांचे दुर्लक्षच होण्याची शक्यता असते. पण या संकलनात आपल्याला संथाली, संबलपुरी-कोसली, मुंडारी, खडिया, सादरी अशा बोलीभाषांतील साहित्य दिसते. आणखी एक गोष्ट अशी की जयंत महापात्रा, निरंजन मोहंती यासारखे अस्सल ओडिया परंतु इंग्रजी भाषेत लिहिणारे कवीदेखील येथे दिसतात. एवढेच नव्हे तर ‘गीत गोविंद’ लिहिणारा बाराव्या शतकातील जयदेव ओडिशातील पुरी जवळच्या एका गावचा असल्याने त्याच्या मूळ संस्कृतमधील ‘गीत गोविंद’च्या काही भागांच्या मणी राव यांनी केलेल्या इंग्रजी अनुवादाचाही समावेश इथे केला आहे. अशा पद्धतीने या संपादनात भाषिक समावेशकता आणणे आगळे ठरते.
दुसरे वेगळेपण असे की अशा संपादनात मुख्य भाषिक प्रदेशांतील साहित्याचा अंतर्भाव करण्यावर जास्त भर असतो. या संपादनात देशात ज्या ज्या भागात ओडिया भाषा बोलली जाते त्या भागांतील लेखकांचे लेखनही गुणवत्तेच्या निकषावर समाविष्ट केलेले आहे.
१८४३ साली जन्मलेले फकीर मोहन सेनापती हे प्रेमचंदपूर्व काळातले महत्त्वाचे भारतीय कथाकार आहेत. ‘रेबती’ ही त्यांची कथा १८९८ साली प्रकाशित झालेली पहिली ओडिया कथा. त्यांच्या एका कथेसह सुमारे ३० कथा, ६०० वर्षांच्या कालखंडातील १००हून अधिक कविता, १५० वर्षांतील २३ वाङ्मयीन आणि सामाजिक निबंध, एक एकांकिका आणि एक नाट्यांश असा मजकूर या संकलनात आहे.
अशा अन्थॉलॉजीचे काही फायदे असतात. एक तर आपली भाषिक परंपरा आणि थोरवी इतर भाषकांपर्यंत पोहोचवण्याचा हा उत्तम मार्ग आहे. चांगल्या प्रकाशन संस्थेकडून इंग्रजीत आल्यामुळे परदेशी भाषकांकरिताही हे सहज उपलब्ध झाले आहे. दुसरे असे की, आपल्याच भाषेतील- देशातील-परदेशातील हळूहळू मातृभाषेपासून दुरावत चाललेल्या ‘पुढच्या पिढी’च्या हाती आपण आपल्या मातृभाषेतील वारशाचा एक महत्त्वाचा ठेवा इंग्रजीतून ठेवतो. त्यानंतर तरी आशा करायला हरकत नसावी की ही पिढी इंग्रजीच्या चष्म्यातून आपल्या मातृभाषेकडे सहृदयतेने बघेल. जे वास्तव डोळ्यांसमोर दिसते आहे त्यामुळे असे प्रयत्न करताना वाङ्मयीन उद्देशांसह हा हेतूही मनात ठेवण्यास हरकत नाही.
अशा संपादनात जागेअभावी सर्व गोष्टींचा समावेश शक्य नसतो. तरीही असा प्रयत्न भाषेकरिता स्वागतार्ह आहे. हा ग्रंथ वाचल्यावर मनात प्रश्न आला की हजार-बाराशे वर्षांची परंपरा असलेल्या, संत साहित्यापासून ते आधुनिक-आधुनिकोत्तर साहित्यापर्यंत समृद्ध वारसा लाभलेल्या, अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी धडपड करणाऱ्या आपल्या मराठी भाषेचे ‘बिग बुक’ कधी येणार?
shiledarprafull@gmail.com
हेही वाचा
डॉना टार्ट या अमेरिकी कादंबरीकार. ‘द गोल्डफिंच’ (२०१३) या त्यांच्या कादंबरीला पुलित्झर पारितोषिक मिळाले होते. नावावर अवघ्या तीन कादंबऱ्या. त्यादेखील दहा वर्षांच्या अंतराने आलेल्या. त्याआधीच्या सिक्रेट हिस्ट्री (१९९२), द लिटिल फ्रेण्ड (२००२) च्या नियमाप्रमाणे या लेखिकेची कादंबरी या किंवा पुढील वर्षात येणे अपेक्षित आहे. निनावी कादंबरीची घोषणाही झाली आहे. पण लेखनासाठी ही लेखिका वट्ट दहा वर्षांत कशी मेहनत घेत होती, याविषयीचा लेख.
https://shorturl.at/Ng2fx
आफ्रिकेतील बुकर ही ओळख असलेल्या ‘केन’ पारितोषिकाची लघुयादी जाहीर झाली आहे. या स्पर्धेत कथांना पारितोषिक दिले जाते. तूर्त आफ्रिकेतील कोणत्या देशातील आणि कुणाच्या कथा आल्या आहेत याचा तपशील. नायजेरियातील पेमी आगुडा ही जगभरात बऱ्यापैकी माहीत होत असलेली लेखिका पुरस्काराची प्रमुख स्पर्धक मानली जात आहे.
https://shorturl.at/cmdVI
‘प्लोशेअर’ मासिकाच्या समर विशेषांकामधील गेल्या आठवड्यात सांगितलेली ‘हवालदार ऑफ रंगून’ ही कथा आवडली असल्यास या आठवड्यात एक वेगळी संपूर्ण कथा त्यांनी (पुढील काही दिवसांसाठीच फक्त) उपलब्ध केली आहे. या कथेला टाळे लागण्याआधी येथे वाचता येईल.https://shorturl.at/yAlaE