डॉ. मीरा कुलकर्णी
शब्द आणि रेषांतून आयुष्याचं गमक उलगडून दाखवणाऱ्या कादंबरीविषयी, वाचन प्रेरणा दिनानिमित्त..
‘आजवर तू केलेलं सगळय़ात मोठं धाडस कोणतं?’ मुलगा विचारतो. ‘मदत मागणं’ घोडा उत्तरतो. घोडा पुढे म्हणतो, ‘मदत मागणं म्हणजे हार मानणं नाही, तर हार न मानण्याची सुरुवात आहे.’ घोडय़ाच्या पाठीवर बसलेला छोटा मुलगा आणि सोबत चाललेला एक कोल्हा अशा चित्रासोबतचा हा संवाद. इतक्या साध्या पण प्रगल्भ चित्र संवादासोबत जन्म झाला एका चित्रकथेचा- ‘द बॉय, द मोल, द फॉक्स अॅण्ड द हॉर्स’. चार्ली मॅकेसी या ब्रिटिश लेखकाने लिहिलेली ही चित्रमय कादंबरी (ग्राफिक नॉव्हेल). एक छोटा मुलगा आणि त्याचे तीन प्राणीमित्र- चिचुंद्री, कोल्हा आणि घोडा, यांच्या आगळय़ावेगळय़ा मैत्रीची ही कथा. जगाच्या पाठीवर कुणीही सहज वाचावी अशी. कुणालाही सहज समजेल अशी.
या पुस्तकाची भाषा वैश्विक आहे. म्हणूनच पहाता पहाता त्याच्या काही मिलियन प्रती खपल्या. अनेक भाषांमध्ये भाषांतरं झाली. अनेक दिवस हे ‘न्यूयॉर्क टाइम्सच्या बेस्टसेलर’ यादीत झळकत होतं. आता ताजी खबर ही आहे, की या कथेवरची अॅनिमेशन फिल्म तयार होतेय. लवकरच ती बीबीसी-वन आणि आयप्लेयरवर प्रदर्शित होणार आहे. पुस्तकातल्या प्रत्येक पानावरची देखणी रेखाटनं देखील चार्ली यांनीच केली आहेत. ही कथा शब्दांतून जास्त उलगडते की चित्रातून, हे सांगणं कठीण आहे. मात्र दोन्हीही गोष्टी मनाची कवाडं उघडून सहज आत येतात.
चार्ली यांनी सुरुवातीला ‘द स्पेक्टेटर’ या इंग्लिश मासिकात व्यंगचित्रकार म्हणून आणि नंतर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसच्या पुस्तकांसाठी चित्रं काढण्याचं काम केलं. ते बरेचदा त्यांची चित्रं इन्स्टाग्रामवर पोस्ट करायचे. आयुष्यात त्यांना पडलेले प्रश्न, मनातली घालमेल, त्यासंबंधी मित्रांशी झालेलं बोलणं, हे सारं ते एखादं चित्र आणि संवाद यातून मांडत. हे त्यांच्यासाठी चित्र आणि शब्दांच्या सहाय्याने कागदावर केलेलं विचारमंथन असायचं. आयुष्यातल्या एका कठीण प्रसंगातून जाताना त्यांनी वर उदधृत केलेला संवाद लिहिला. हा चित्रसंवाद इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला. रुग्णालयं, समुपदेशन केंद्र, शाळा, हॉटेलांच्या भिंतींवर त्याची पोस्टर्स लागली. अशा अनेक चित्र संवादांतून कथानक जन्मलं आणि उण्यापुऱ्या १२८ पानांचं पुस्तक तयार झालं. मुखपृष्ठावर कथेतल्या चार पात्रांचं सुंदर रेखाचित्र आहे. आतल्या पानांवरचा लेखकाने स्वत:च्या हस्ताक्षरात कर्सिव्ह लिपीत लिहिलेला मजकूर वाचकाला सहज साद घालतो. खूप दिवसांनी आलेल्या मित्राच्या पत्रासारखी. जेव्हा काळ कठीण असतो, हिंसा, द्वेष यांची सभोवती गर्दी असते अशा वेळी प्राण्यांच्या रूपकातून शहाणीव सांगणं सोपं जात असावं. इसापने पण असाच काहीसा मार्ग चोखाळला होता. या पुस्तकाचं विशेष हे की यात कुठेही उपदेशाचा सूर नाही. लेखक या चार पात्रांमध्ये स्वत:ला बघतो. प्रत्येकात उणिवा आहेत आणि बलस्थानंही.. छोटा मुलगा निरागस आणि चौकस आहे. त्याला घर शोधायचं आहे. चिचुंद्री उत्साही आहे, तिला केक प्रचंड आवडतो. कोल्हा जगाकडून फसवला गेल्यामुळे आयुष्यावर नाराज आहे, पण तरी त्याला या साऱ्यांची सोबत हवी आहे. घोडा प्रेमळ आणि समंजस आहे.
मुलगा एकटाच निघालेला असतो. त्याला चिचुंद्री भेटते. त्या दोघांना पुढे सापळय़ात अडकलेला कोल्हा दिसतो. चिचुंद्री विचार करते की याला सोडवलं तर हा मला खाईल पण नाही सोडवलं तर हा थंडीने मरून जाईल. ती मुलाला म्हणते, ‘एखाद्या प्रसंगात कसं वागायचं हे पूर्णपणे आपल्या हातात असतं.’ या ठिकाणी मला एकदम व्हिक्टर फ्रँकल या मानसोपचार तज्ज्ञांचं वाक्य आठवलं. ते म्हणतात की समोरची घटना आणि आपली त्यावरची प्रतिक्रिया यामध्ये एक स्पेस असते. ज्यात असतो आपला चॉइस. चिचुंद्री सापळा कुरतडून कोल्ह्याला सोडवण्याचा पर्याय निवडते. पुढे कोल्हा त्यांचा मित्र होतो. शेवटी त्यांना घोडा भेटतो. या चौघांसोबत आपलाही प्रवास सुरू होतो. एकमेकांना सांभाळून घेत, धीर देत, उभारी देत पुढे जात राहतात. कधी निरभ्र आकाशातल्या चांदण्यांचं सौंदर्य निरखतात तर कधी स्वप्नांचे पंख लावून घोडय़ासोबत आकाशात उडतात. निव्र्याज मैत्री काय चीज आहे, हे सांगणारं हे पुस्तक.
ही चौघं बोलतात त्यांना पडलेल्या प्रश्नांबद्दल. तसेच प्रश्न आपल्यालाही पडत असतात. पण या पुस्तकातले प्राणी फार वेगळी उत्तरं देतात, आपल्याला कधीही न सुचलेली. घोडा म्हणतो, ‘मी स्वत:ला सगळय़ात धीट तेव्हाच समजतो जेव्हा मी माझ्या कमतरता सहज मान्य करतो.’ आपण समजतो का असं कधी? उलट आपला धीटपणा आपण त्या कमतरता दडवून ठेवण्यासाठी वापरतो. मुलगा म्हणतो, ‘कधी कधी मला वाटतं की मी खूप सामान्य आहे.’ चिचुंद्री उत्तरते, ‘प्रेम करण्यासाठी असामान्य असणं जरुरी नाही, तू जसा आहेस तसाच आम्हाला आवडतोस.’
मला वाटतं जगातल्या सगळय़ा नात्यांच्या मुळाशी स्वत:चा आणि इतरांचा इतका सहज स्वीकार असायला हवा. चिचुंद्रीचं एक वाक्य मला खूप आवडलं, ‘देअर शुड बी अ स्कुल ऑफ अनलर्निग’. आपण शिकलेलं विसरायला लावेल अशी एक शाळा हवी. आपल्या धारणा किंवा विचारांचं वळण इतकं ठरलेलं असतं की आपण एखाद्या घटनेकडे वेगळय़ा दृष्टिकोनातून पाहूच शकत नाही. मग स्वत:साठी आणि आपल्या नात्यांसाठी हे फायद्याचं नसलं तरीही.
‘तुझा पेला अर्धा भरलेला की अर्धा रिकामा?’ हा गेली अनेक वर्ष विचारला गेलेला घिसापिटा प्रश्न. पण त्याचं उत्तर चार्लीचा मुलगा देतो की माझ्याकडे पेला आहे हीच मुळात मोठी गोष्ट आहे. पेला अर्धा भरला की रिकामा याची विवंचना नाही. साधं सोप समाधान आहे की माझ्याजवळ पेला आहे. आपण माणसंच आपल्या जगण्यातला गुंता वाढवतो. एकदा मुलगा विचारतो, ‘आपण इथे कशासाठी आहोत?’ चिचुंद्री पटकन म्हणते, ‘केकसाठी.’ आपल्याला स्वत:साठी जे मिळवायचं आहे त्यासाठी आपण इथे आहोत अशाच प्रकारची उत्तरं आपल्यापैकी बरेच लोक देतील. मात्र घोडा म्हणतो, ‘आपण इथे आहोत, एकमेकांवर प्रेम करण्यासाठी, प्रेम करवून घेण्यासाठी.’ आपल्याला वाटतं की जगात द्वेष जास्त आहे. पण हे पुस्तक वाचताना खात्री वाटते की प्रेमाचं पारडं नक्कीच जड आहे.
घराच्या शोधात निघालेला मुलगा शेवटी म्हणतो की घर म्हणजे फक्त भौतिक जागाच असते असं नाही ना? जिथे तुम्हाला शांत निवांत वाटतं ते ठिकाण, ज्यांच्या सहवासात तुम्ही मोकळेपणाने राहू शकता तिथे असतं घर. चार प्राण्यांच्या संवादातून आणि सोबतच्या रेखाचित्रांतून निर्मळ जगण्याचं मर्म आपल्यापर्यंत सहज पोहोचवण्यात लेखक यशस्वी झाला आहे. कुठेही ते बोजड वाटत नाही. हेच या पुस्तकाचं बलस्थान आहे. फार तर दोन वाक्यं आहेत प्रत्येक पानावर, पण एक एक वाक्य आणि चित्र थांबवून ठेवतं, विचार करायला लावतं, आपल्या आत डोकावायला लावतं. प्रत्येकाच्या मनात एक मूल दडलेले असतं. या पुस्तकातली चित्र पाहून ते हरखून जातं.
लेखक म्हणतो तसं, ‘कुठल्याही पुस्तकातली चित्रं शब्दांच्या समुद्रात बेटांसारखी असतात. त्यांच्यावर थोडा विसावा घेता येतो.’ यातली चित्रं फारसे रंग न वापरता डिप पेन आणि शाईने काढलेली आहेत. बारीक, जाड, गुंतलेल्या उलगडलेल्या, सरळ, गोलाकार रेषा! प्रेमाने मारलेल्या मिठीबद्दल एके ठिकाणी लेखकाने लिहिलं आहे. त्या पानावर मुलाने चिचुंद्रीला मारलेली मिठी, घोडय़ाने मुलाच्या डोक्यावर प्रेमाने टेकवलेलं डोकं, मुलाने कोल्ह्याला मारलेली मिठी अशी चित्र आहेत. नुसत्या चित्रांतून त्या मिठीतली आपुलकी आणि प्रेम जाणवतं. क्षणभर वाटलं करोनाच्या काळातून जाताना भीतीमुळे स्पर्शातून व्यक्त होणं विसरलो आहोत का आपण?
तरल वॉश आणि सशक्त बोलक्या रेषांनी वादळी रात्र, काळे ढग, जंगल फार सुंदर दाखवलं आहे. चित्रांमध्ये कधी ही पात्रं पूर्ण पान व्यापतात तर कधी निसर्गाच्या परिप्रेक्ष्यात खूप छोटी दिसतात. दोन समोरासमोरच्या पानांवर नुसत्या रेषांनी जंगलातलं वादळ काढलं आहे. चित्राचा खालच्या कोपऱ्यात हे चार मित्र अगदी छोटे दाखवले आहेत. रौद्र निसर्गपुढे आपण प्राणिमात्र किती क्षुद्र आहोत, हतबल आहोत याची प्रकर्षांने जाणीव करून देतं हे चित्र. आजूबाजूच्या परिस्थितीतील कितीतरी गोष्टी आपल्या नियंत्रणात नाहीत याची जाणीव झाल्यावर काय करायचं असतं? घोडा उत्तरतो, ‘ज्यावर तुम्ही मनापासून प्रेम करता त्यावर लक्ष केंद्रित करा.’ खूप काळे ढग येतात तेव्हा मुलगा घाबरतो. तेव्हा घोडा म्हणतो, ‘जसं जमेल तसं चालत राहा.’
पुस्तकाच्या प्रत्येक पानावरल् मोकळी जागा आहे. ही जागा वाचकांच्या दृष्टीला आणि विचारांनाही अवकाश मिळवून देते. लेखकाचं म्हणणं तर असं आहे की आता माझं चित्र काढून आणि लिहून झालं आहे. आता या जागेत तुम्ही चित्र काढा किंवा काही लिहा. पुस्तकाचा प्रवास असा असावा. पानातून मनात आणि मनातून पुन्हा पानात.
चार्लीने निर्माण केलेलं पुस्तकातलं हे जग भरलेलं आहे प्रेम, आपुलकी, मैत्री, दयाळूपण, साहचर्य, आस्था, परोपकार यांनी. समाधानाने जगण्यासाठी या भावनांनी तयार झालेली भावनिक बुद्धिमत्ताच जास्त गरजेची आहे याचा आज आपल्याला विसर पडला आहे. म्हणूनच की काय समाज स्वार्थी आणि कोरडा होत चालला आहे. या भावनांची जाणीव लेखक प्राण्यांच्या रूपकातून करून देतो. छोटय़ा मुलांनी हे वाचलं तर त्यांच्या मनात या भावनांची बीजं पेरली जातील आणि मोठय़ांनी वाचलं तर आपण एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकू. पुस्तकाच्या शेवटी मुलगा म्हणतो आपल्याला अजून कितीतरी अंतर कापायचं आहे. तेव्हा घोडा उत्तरतो, ‘पण आपण किती अंतर पार करून आलोत ते तर एकदा मागे वळून बघ.’
पुस्तकातला प्रवास इथे संपतो. आपल्या मनात मात्र तो सुरूच राहतो. जेव्हा तुम्ही कुठल्यातरी कठीण प्रसंगातून जात असाल तेव्हा यातलं प्रेम, करुणा, आस्था, लवचीकता सारं तुमच्या सोबत असेल. तुमच्याशी मैत्रीचा हात मिळवायला. तुम्हाला सांगायला की, ‘कीप गोइंग’
‘द बॉय, द मोल, द फॉक्स अॅण्ड द हॉर्स’
लेखक : चार्ली मॅकेसी
प्रकाशन : इबरी प्रेस
पृष्ठे : १२८ ; किंमत : ६९९ रुपये
drmeerakulkarni@gmail.com