भारतीय बायकांसाठी धावपळ ही तशी नित्याचीच गोष्ट. पण ही धावपळ सांभाळून किंवा नाकारून खुल्या मैदानात, पदपथांवर, गच्चीवर, सोसायटीच्या आवारात फक्त आणि फक्त व्यायाम म्हणून धावणाऱ्या कितीशा महिला दिसतात? ही संख्या आजही अल्पच असते. स्पर्धेसाठी धावणाऱ्या तर नगण्यच! मग १९७०च्या किंवा त्याहीआधीच्या ५०च्या दशकातले चित्र कसे असेल? तेव्हाही भारतीय मुली धावण्याच्या स्पर्धात भाग घेत होत्या. त्यासाठी अथक सराव करत होत्या. त्यांच्यापुढे कोणती आव्हाने असतील, समाजाची यावर काय प्रतिक्रिया असेल? सोहिनी चट्टोपाध्याय यांचे ‘द डे आय बिकेम अ रनर’ हे पुस्तक अशा स्पर्धेसाठी धावणाऱ्या मुलींच्या संघर्षांची गाथा कथन करते.
हेही वाचा >>> चिंतनधारा : ग्रामगीता- आजच्या युगाची संजीवनी!
१९८०-९०च्या दशकापर्यंत धावणाऱ्या मुलीला नेहमी एकच संबोधन असे- पी. टी. उषा! महिला धावपटूंबाबत सर्वसामान्य भारतीयाच्या सामान्यज्ञानाची धाव तोवर तिथवरच होती. मात्र सोहिनी या पुस्तकात १९५२ साली ऑलिम्पिक्समध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या मेरी डिसोझाशी आपला परिचय करून देतात. बँकॉकमध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेत सुवर्णपदकावर नाव कोरणारी कमलजीत संधूही या पुस्तकात भेटते. नुकत्याच स्वतंत्र झालेल्या देशाला क्रीडाविश्वात ओळख मिळवून देणाऱ्या अशा अनेक परिचित- अपरिचित मुली- महिलांचा संघर्ष हे पुस्तक कथन करते. देशाचे नाव उज्ज्वल करण्याची क्षमता असलेल्या मात्र समाजव्यवस्थेच्या साचात बसविले गेल्यामुळे चूल-मूलच्या चौकटीपलीकडे जाऊ न शकलेल्यांच्या व्यथाही मांडते.
बदलत्या काळाबरोबर महिला धावपटूंसमोरचे प्रश्न बदलले, मात्र ते अद्याप पूर्णपणे दूर झालेले नाहीत; हे पुस्तक वाचताना प्रकर्षांने जाणवते. शांती सौंदराजन.. दोहा येथे २००६ साली झालेल्या आशियाई स्पर्धेत भारताला रौप्यपदक मिळवून देणारी धावपटू. या स्पर्धेनंतर काही काळातच तिला लिंगनिश्चिती तपासणीला सामोरे जावे लागले. ती महिला असल्याचे सिद्ध न झाल्याचा निकाल देत पदक काढून घेण्यात आले, स्पर्धेत उतरण्यावर कायमस्वरूपी बंदी घालण्यात आली. मात्र खचून न जाता तिने प्रशिक्षक म्हणून कारकीर्द घडविली. तिच्या या लढयाची कहाणी प्रेरक असली, तरीही आजच्या समाजव्यवस्थेचे वास्तव अधोरेखित करणारी आहे.
सोहिनी यांनी या सर्व धावपटूंच्या कथा आणि व्यथा स्वत:च्या व्यायामासाठी धावण्याच्या प्रवासाशी जोडल्या आहेत. महिला धावपटू असो, नोकरदार असो वा गृहिणी तिच्यासमोरचे प्रश्न थोडयाफार फरकाने सारखेच असल्याचे त्यातून जाणवते. ‘फोर्थ इस्टेट इंडिया’ने प्रकाशित केलेल्या ३६४ पानांच्या या पुस्तकाची किंमत ४३१ रुपये आहे.