मीरा कुलकर्णी

पिको अय्यर यांनी अनेकदा प्रवासवर्णनपर लेखन केल्यानंतर, काही ठिकाणी पुन्हा जाऊन स्वत:चाही शोध घेतला.. त्यातून काय मिळालं?

Scientist Rahul Damale selected for Netaji Subhash ICAR International Fellowship
वडील तिसरी उत्तीर्ण तर आई निरक्षर, मुलगा शास्त्रज्ञ झाला, आता परदेशी शिक्षणासाठी निवड
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Beed Sarpanch Murder Case Prime Accused Valmik Karad Cast
अग्रलेख : कूच बिहार!
Correlation between geological events and their time
कुतूहल : भूवैज्ञानिक कालमापन
shikaayla gelo ek marathi drama review
नाट्यरंग : शिकायला गेलो एक! व्यंकूची ‘आज’ची शिकवणी
ulta chashma
उलटा चष्मा: असला भुसभुशीतपणा नको!
Ravindra Chavan responsibility BJP state president post
भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी रवींद्र चव्हाण यांना प्रतीक्षा
Indus Script
Harappan Script: हडप्पाकालीन लिपी उलगडणं इतकं कठीण का आहे?

इराणमधील एक छोटं शहर, तूस. प्रसिद्ध फारसी कवी फिरदौसीचं गाव. तिथल्या एका उद्यानात फिरदौसीची कबर असलेल्या संगमरवरी इमारतीत लेखक पिको अय्यर पोहोचले. मागून येणाऱ्या त्यांच्या ड्रायव्हरने डोक्यावरची टोपी काढून छातीशी धरली. कबरीच्या थंडगार दगडाला मोठय़ा श्रद्धेने स्पर्श केला आणि अचानक धीरगंभीर आवाजात फिरदौसीच्या कवितेतल्या ओळी म्हणायला सुरुवात केली. ओळींचा मथितार्थ होता, ‘मी हे जग शब्दांच्या स्वर्गातून निर्माण केलं. मिनार, महाल हे सगळं काही काळाच्या ओघात नष्ट होईल. पण हा शब्दांचा महाल अभेद्य राहील’. अय्यर भारावून ऐकत होते. भानावर आल्यावर त्यांना प्रकर्षांने आठवत राहिला एकच शब्द, स्वर्ग. त्यांच्या मनात आलं – या शब्दाला आणि त्याच्यात सामावलेल्या अर्थाला शोधत तर ते इथवर आले होते.

पिको अय्यर यांच्या ‘द हाफ नोन लाइफ: इन सर्च ऑफ पॅराडाइज’ या पुस्तकातला हा प्रसंग. पिको अय्यर हे न्यू यॉर्क टाइम्स, टाइम, हार्पर मॅगझीन, द न्यू यॉर्क रिव्ह्यू ऑफ बुक्स अशा दिग्गज संस्थांसाठी लिहिणारे प्रथितयश निबंधकार. कादंबऱ्याही लिहिल्या असल्या तरी प्रामुख्याने ते प्रवासवर्णनात्मक लेखन करतात. हे पुस्तक म्हटलं तर प्रवासवर्णन आहे, पण थोडं वेगळय़ा धाटणीचं. आधी केलेल्या प्रवासांची एका शोधाच्या सूत्रात केलेली ही देखणी गुंफण आहे. कशाचा शोध? स्वर्ग या संकल्पनेचा. हा प्रवास दिसण्यापलीकडच्या असण्याच्या शोधाचा.. आंतरिक शोधाचा आहे.

हेही वाचा >>> ग्रंथमानव : जुन्या चित्रांकडे नव्यानं पाहणारा विद्वान..

जुन्या पिढीतले लेखक काका कालेलकर यांचं एक वाक्य आहे, ‘माणूस पायाने चालतो तेव्हा ती यात्रा होते, पण प्राणाने चालतो तेव्हा जीवन.’ पिको अय्यर स्वर्गाबद्दलचं कुतूहल घेऊन, सारासार विचार करण्याची क्षमता घेऊन, सौंदर्य टिपणारी दृष्टी घेऊन, स्वत:सोबत अनेक संस्कृतींची शिदोरी घेऊन, माणसातलं माणूसपण जाणून घेण्याची समज घेऊन, जे दिसलं त्याच्या मुळाशी जाण्याची वृत्ती घेऊन जगभर ‘प्राणाने’ फिरले. जेव्हा शोध जीवनभराचा होतो तेव्हा अंतर्मनातही एक समांतर शोध चालतो. पुस्तक वाचताना हे जाणवत राहतं की बाहेरच्या जगातील सारी ठिकाणं ते जितक्या रसिकतेने पाहतात तितकीच असोशी त्यांना आत्मशोधाचीही आहे.

ही शोधयात्रा त्यांना जगातल्या दूरदूरच्या ठिकाणी घेऊन जाते. तेहरान, बेलफास्ट, जेरुसलेम, श्रीलंका, जपान, कोरिया, लेह, श्रीनगर, वाराणसी. यांत कित्येक ठिकाणं पवित्र स्थळं आहेत. काहींना भूतलावरचा स्वर्ग मानलं जातं. आज मात्र बहुतेक ठिकाणी युद्धभूमीसदृश परिस्थिती आहे. अशी ठिकाणं आणि तिथले कलह यांच्यातला गोंधळात टाकणारा संबंध पुस्तकातून प्रकर्षांने समोर येतो. मग खरंच स्वर्ग स्वर्ग म्हणतात तो लेखकाला या ठिकाणी सापडतो का, की हे ‘प्राणाने’ चालणं त्यांना काही वेगळा विचार देऊन जातं, हे पुस्तक वाचताना उमजतं. प्रवास माणसात परिवर्तन घडवून आणतो असा विश्वास असणारे हे लेखक. ठिकठिकाणच्या संस्कृतींच्या सरमिसळीचा सुगंध देणारी प्रवासवर्णनं इतकी चित्रवत आणि ओघवत्या भाषेत आहेत की लेखकासोबत आपणही त्या ठिकाणी जाऊन येतो.

शीर्षकातल्या ‘द हाफ नोन लाइफ’ या भागाबद्दल पिको अय्यर यांनी एका (बनयान बुक्स- यूटय़ूब) मुलाखतीत म्हटलं आहे की आपल्या जगण्याचा अर्धा भाग जो आपल्याला माहीत आहे, त्यातच आपण खूप व्यग्र झालो आहोत. इतकी प्रचंड माहिती आपल्या अंगावर कोसळत असते की आपलं चित्त नेहमीच विचलित असतं. आपल्या आत काय चाललंय हे आपण जाणून घेत नाही. कुठल्याही संस्कृतीतील शिकवण हेच सांगते की अंतर्मन जर जाणून घेता आलं नाही तर तुम्हाला अर्धच आयुष्य माहीत आहे. पुढे ते (विनयाने) म्हणतात की गेल्या अठ्ठेचाळीस वर्षांत ते इतक्या ठिकाणी गेले पण ती ठिकाणं, तिथली माणसं, तिथलं जीवन त्यांना पूर्ण कळलेलंच नाही. म्हणूनही हे शीर्षक.   

मला अर्धच आयुष्य माहीत आहे याची जाण असणं हेच तर शहाणिवेच्या मार्गावर पुढे जाण्याचं पहिलं पाऊल असतं.  पिको अय्यरांच्या शोध यात्रेतला पहिला पडावं इराण आहे. इराण यासाठी की paradise या इंग्रजी शब्दाचा उगमच  Paradaijah या मूळ पर्शियन शब्दापासून झाला. तिथे हा शब्द भिंतींत बंदिस्त पण अत्यंत देखण्या उद्यानासाठी वापरला जातो. अशा उद्यानांना इराणमध्ये स्वर्गाचं जमिनीवरचं प्रतिरूप मानतात. पण आज तेहरान ही एक युद्धभूमीच झाल्याचं अय्यर पाहतात. ते पवित्र ठिकाणी फिरतात, लोकांशी बोलतात, फिरदौसीबद्दल जाणून घेतात. ‘सेपरेशन’सारख्या अभिजात सिनेमाबद्दल विस्तारानं लिहितात. तिथलं वातावरण पाहून त्यांना अनेक प्रश्न पडतात. एखाद्या क्षणी पुढे काय घडेल याचा एक विचार मनात असतो पण दुसऱ्या क्षणी आपलं अनुमान चुकलं याची जाणीव होते. कदाचित इराणची जगण्याची हीच रीत असावी असं लेखकांना वाटतं. काही प्रश्नांना इतक्या बाजू असतात की कोणती लक्षात घ्यावी ते नीट समजत नाही. आपण गालिचाच्या डिझाइनमध्ये आहोत असं वाटतं. ज्यात प्रत्येक गोष्ट जलद हलत असते. पण एकत्रितपणे पाहिल्यास अस्वस्थ शांतता जाणवत राहते. लेखकाचा गाइड प्रवासादरम्यान त्यांना म्हणतो की पॅलेस्टाईन आणि इस्रायलमध्ये प्रश्न नाही तर समस्या आहे. प्रश्नावर उत्तर शोधू शकतो पण समस्येसोबत जगावं लागतं.

पुस्तकातलं आणखी एक प्रकरण नॉर्दर्न आयर्लंडच्या बेलफास्टबद्दल आहे. लेखकाला तिथे जागोजागी संघर्षांच्या खुणा दिसतात. एका पुलाचं नावच ‘शत्रूकडे जाणारा पूल’ असं आहे. इथे लेखक बेलफास्टशी ‘टायटॅनिक’ आणि ‘गेम ऑफ थ्रोन’ची संगती सांगतात, लहानपणापासून वाचलेल्या व्हॅन मॉरीसनच्या कवितेत वर्णन केलेली दृश्यं, रस्ते आणि वास्तू बेलफास्टमध्ये प्रत्यक्ष अनुभवल्यानं ते लहान मुलांसारखं हरखून जातात. त्यांना वाटतं की इतका विध्वंस आजूबाजूला होत असताना मॉरिसनच्या कवितांमधून आशेचा स्पष्ट सूर कसा येत असेल?

पुस्तकातल्या अनेक प्रकरणांत लेखक त्याच्या आयुष्यातल्या स्मृतींना अशी साद घालतात. जेव्हा एखादी आठवण आकार घेते तेव्हा आपल्या मेंदूत न्यूरॉन्सच्या जोडणीमुळे एक रस्ता तयार झालेला असतो. पुढे हा रस्ता नवीन आठवणींमुळे मागे पडतो. पण कधी कधी एखाद्याचं बोलणं, एखादा प्रसंग, एखादं दृश्य आपल्याला पुन्हा त्या रस्त्यावर आणून सोडतं. आणि त्या स्मृती जाग्या होतात. अशा कित्येक जाग्या झालेल्या आठवणी लेखक मोकळय़ा मनाने वाचकांसमोर ठेवतात. लेखकाचा इराणमधला गाइड जेव्हा लंडनमधल्या त्याच्या शाळेबद्दल बोलतो तेव्हा लेखकालाही त्यांची कडक शिस्तीची शाळा, तिचा परिसर आठवतो. त्यांचे शाळेतले दिवसही तेहरानमधल्या दिवसांसारखे कडक देखरेखीखाली गेले असं त्यांना वाटतं. कॅलिफोर्नियात डोंगराळ प्रदेशात राहणारे आणि तिथं तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक असलेले आई वडील, दलाई लामांचं त्यांच्या घरी जाणं-येणं, पुढे जवळपास १९ वर्षे त्यांचा दलाई लामांसोबतचा प्रवास, पत्नीसह जपानमधलं वास्तव्य असे अनुभव वाचकांना टप्प्याटप्प्यानं वाचायला मिळतात. कॅलिफोर्नियात बरेचदा ते आश्रमांमध्ये जाऊन राहतात. जगण्यातलं शांततेचं महत्त्व त्यांना तिथे कळतं. या सगळय़ातून आपल्याला लेखक अधिकाधिक परिचित होतात आणि त्या अर्थानं हे एक आत्मचरित्रच आहे.

या पुस्तकातला लेखकाचा प्रवास संपतो वाराणसीत. त्याआधीही सगळय़ा ठिकाणी आपण लेखकाच्या शब्दांसोबत पोहोचतो तेव्हा एक गोष्ट ठळकपणे जाणवते :  एखाद्या स्थळाचं वर्णन ते फक्त एक जागा म्हणून न करता, तिथले भू-सांस्कृतिक आणि भू-मानसिक संदर्भही देतात. तिथल्या माणसांची त्या जमिनीशी घट्ट नातं सांगणारी मानसिकता, या लोकांच्या धारणा, त्यांची सुखदु:खं, त्यांची स्वप्नं अशा अनेक अंगांनी ते ठिकाण आपल्या समोर येतं. तिथल्या माणसाच्या जगण्याचा पोत आपल्याला समजतो. हे पुस्तक वाचताना मला जिव्या सोमा मशेचं वारली चित्र आठवलं. त्यात घराच्या आतली माणसं, घराबाहेरची माणसं, घराबाहेरचे प्राणी, पक्षी, गाव, जंगल सारं एकाच प्रतलावर मांडलेलं असतं. तसं पिको यांचं लिखाण वाचकाला त्या ठिकाणचं समग्र दर्शन घडवतं. तिथल्या भू-राजकीय स्थितीचा ते ऊहापोह करतात, पण त्यांना जास्त आकर्षण त्या ठिकाणच्या संस्कृतीचं, माणसांचं आहे. 

 पुस्तकात अनेक ठिकाणी सुफी संतांच्या, ओमर खय्यामच्या, हेन्री डेव्हिड थोरोच्या कवितांचे उल्लेख येतात. त्यांना अनेक अभिजात सिनेमे आठवतात. हे सारे संदर्भ इतक्या सहजतेने त्या ठिकाणच्या वर्णनात मिसळतात की जणू मुख्य पाण्याच्या प्रवाहात येऊन मिळालेला स्वत:चं वेगळेपण सांभाळत येणारा झरा.

लेहमधल्या स्वच्छ प्रसन्न सकाळी त्यांना थोरो आठवतात. कारण त्यांच्या काव्यातून कित्येकदा नवी सकाळ जाणवते. लडाखच्या वातावरणात त्यांना ‘लॉस्ट होराइझन’मधली काल्पनिक सुंदर जागा – शांग्री ला आठवते. एमिली डिकिन्सनच्या बाबतीत ते म्हणतात- क्षेत्रसन्यास घेऊन राहिल्यासारखं एकाच ठिकाणी वर्षोनवर्षे राहणारी ही कवयित्री मनाने खूप लांबचे, अज्ञाताचे प्रवास करते.

शेवटचं ठिकाण वाराणसी. असं शहर जिथून दुसऱ्या जगाच्या प्रवासाला जाता येतं. इथे शहराच्या मध्यभागी गंगेच्या घाटावर कलेवरं दिवसरात्र जळत असतात. त्यांच्या लाल-पिवळय़ा ज्वाळा अनंतात विलीन होत असतात. छोटय़ा गल्ल्या, माणसांची लगबग, अस्वच्छता, काठावरची मंदिरं, विविध आवाज या साऱ्यांचं  कोलाज गंगेच्या तीरावर निरखत असताना त्यांना एक परिचित बौद्ध भिक्खू भेटतात. लेखकाला ते म्हणतात की हे जीवन, हे समोर दिसणारं मरण आणि याच्या मधलं गोंधळ कोलाहलाने भरलेलं हे जगणं, सगळय़ाला किती त्याचं त्याचं वलय आहे ना! तुम्हाला नाही वाटत का की यावर आपण मनापासून प्रेम करायला हवं? कारण खरा खुरा स्वर्ग तर या जगण्याच्या धडपडीतच सापडणार आहे. लेखकांना जाणवतं की, सुखदु:खानं भरलेलं हे जीवन त्याच्यापासून दूर पळण्यासाठी, त्याचा त्रागा करण्यासाठी नाही, तर त्याचा प्रेमानं स्वीकार करण्यासाठी आहे.. इतरांशी जोडलं जाण्यासाठी आहे, हे समजण्याची दृष्टी त्या त्या भिक्खूपाशी होती.

 वाराणसीच्या मुक्कामात लेखकांना जाणवतं की मृत्यूची इतकी समीपता असूनही हे शहर भयाण नाही. यात करिश्मा आहे. वाराणसीहून लेखक एक दिवसासाठी सारनाथला जातात. तिथे दलाई लामांची प्रवचनं चालू असतात. दलाई लामा लेखकाचं श्रद्धास्थान.  ते स्वर्गाचा उल्लेख एखादी दूर असणारी जागा असा करत नाहीत. तुमच्या आजूबाजूला जिथे सेवा करण्याची संधी आहे तिथेच स्वर्ग आहे.  सारनाथहून परतल्यावर लेखक ठरवतात- आता पवित्र मंदिरांमध्ये, स्वर्ग शोधायचा नाही.  भोवतालच्या जगण्याचा सुखदु:खांसह स्वीकार करायचा.. कारण स्वर्ग त्या गंगेच्या पल्याडच्या तीरावराही नाही, की त्या ज्वाळांमधूनच जिथे जाता येईल अशा ठिकाणीही नाही. तो इथेच आसपास आहे!

 इथे मला आपले बोरकर आठवले. ‘‘स्वर्ग नको सुरलोक नको मज लोभस हा इहलोक हवा। तृप्ति नको मज मुक्ती नको पण येथील हर्ष नि शोक हवा।’ असं म्हणणारे! पिको अय्यर यांचं हे पुस्तक मिटताना एक सुखद भावना मन व्यापून राहते. मनमोकळय़ा निवेदनामुळे अय्यर वाचकांचे सुहृद बनले असतात. वाचताना साहित्यिक जाणिवा थोडय़ा प्रगल्भ झालेल्या असतात. जगात चाललेल्या लढाया, भांडणं, संघर्ष यात खरंच स्वर्ग सापडेल का या लेखकाला आणि कधी आपल्यालाही पडलेल्या प्रश्नांचं उत्तर धूसर का होईना समजू लागलेलं असतं : खरा स्वर्ग या क्षणी आणि या ठिकाणीच आहे. प्रसन्न वृत्तीनं आपल्या ‘स्व’शी आणि इतरांशी जोडलं जाण्यात आहे.

द हाफ नोन लाइफ : इन सर्च ऑफ पॅराडाइज

पिको अय्यर

पृष्ठे २४०; किंमत ५९९

प्रकाशक पेंन्ग्विन

(हॅमिश हॅमिल्टन) प्रकाशन

 drmeerakulkarni@gmail.com

Story img Loader