सौरभ सद्योजात

मुळातून राष्ट्रभक्त असलेल्या अनेकांनी कधी समोरून तर कधी पडद्यामागे राहून अनेक लहानमोठ्या लढाया लढलेल्या असतात. त्यापैकी एक पडद्यामागे राहिलेली वादळी सत्यकथा…

reviews of held by anne michaels
बुकरायण : युद्धांनी माणसांवर लिहिलेला इतिहास…
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
loksatta editorial on inflation
अग्रलेख: थाली बचाव…!
Stampede at Mumbai s Bandra
अग्रलेख: पंचतारांकितांचे पायाभूत
mharashtra total registered voters
अग्रलेख : अवघा हलकल्लोळ करावा…
nude painting
अन्वयार्थ: असभ्य, म्हणून अश्लील!
formation of the earth
भूगोलाचा इतिहास : धरतीची जन्मकथा
chip industry Chinese
चिप-चरित्र: ड्रॅगनची राक्षसी महत्त्वाकांक्षा!

‘‘Three measures of Gordon’s; one of vodka; half a measure of Kina Lillet. Shake it over ice, and add a thin slice of lemon peel.’’

कसिनो रोयालमधला जेम्स बाँड ज्या थाटात त्याचं ड्रिंक आणायला सांगतो, ते पडद्यावर पाहत असताना त्याच्या पौरुषाचा आणि स्थिरतेतून आलेल्या स्पष्टतेचा आपल्याला हेवा वाटत राहतो. उंचपुरा, देखणा आणि काळ्या रंगातला टक्सिडो घातलेला हा गुप्तचर जेव्हा एखाद्या ललनेला घायाळ करतो, तेव्हा ‘आपणच बाँड असतो तर’ची स्वप्ने पडू लागतात. पण हेरगिरी करणाऱ्यांचं जग या अशा झगमगाटात शोधणं म्हणजे अगदी बाळबोध विचार! कित्येक मुखवटे चढवून खऱ्या चेहऱ्याचा आकार आणि भाव लपवत आणि रोज मृत्यूला टाळत, दिलेलं काम चोख बजावणारी ही जमात जगासमोर येते ती केवळ अपयश पदरी पडलं तरच. इनाक्षी सेनगुप्ता यांनी लिहिलेली ‘दी सिल्क रूट स्पाय’ ही कादंबरी स्वातंत्र्यपूर्वकाळातील अशाच एका गुप्तहेराचं खरंखुरं आयुष्य मांडू पाहते.

मुळात ही कादंबरी बिल्डंग्जरोमन पद्धतीची असून या प्रकारच्या लेखनात कथेतलं मुख्य पात्र आणि त्याची काळानुरूप होणारी जडणघडण मांडलेली असते. नंदलाल कपूर, ऐन तारुण्यात ब्रिटिशांशी जोडला गेलेला एक पंजाबी तरुण, ज्याच्या हेरगिरीची कारकीर्द आणि खासगी आयुष्यातले चढउतार या कादंबरीत वाचायला मिळतात. पण ब्रिटिशांसाठी हेरगिरी करताना भारतीय क्रांतिकार्याला त्याने केलेली मदत ही या कथानकाची दुसरी आणि महत्त्वाची बाजू आहे. या दोलायमान अवस्थांमध्ये घडत – बिघडत गेलेली पात्रे, परिस्थिती आणि स्वातंत्र्यपूर्व काळाचा मोठा अवकाश यांची सांगड लेखिकेने लीलया घातली आहे. आपल्या कल्पनेत आणि सिनेमात दिसणारे व गुप्तचरांचं पात्र वठविणारे चकचकीत नायक व खऱ्या गुप्तचरांच्या जीवनकथा यात मोठंच अंतर असतं. जेम्स बाँड आणि त्याचा जबरदस्त प्रभाव एका बाजूस आहेच, पण दुसऱ्या बाजूस ‘डी डे’ मधला, इरफान खान यांनी साकारलेला ‘वली खान’ आहे. शत्रुराष्ट्रात राहत, मध्यमवर्गीय कुटुंबाच्या पांघरुणाखाली लपत देशासाठी बित्तंबातमी शोधताना त्याच्या कुटुंबाची वाताहत होते. या कादंबरीचा नायक वर नमूद केलेली आयुष्याची दोन्ही टोकं अनुभवतो. प्रवास पंजाबातल्या फिरोजपूरपासून सुरू होऊन तो जपानमधल्या कोबे शहरात येऊन स्थिरावतो. हा एकूणच वादळी आणि रोमहर्षक प्रवास आहे. नंदलाल कपूर यांचा हा सत्यानुभव लेखिकेने रंगवून सांगितला आहे. आणि त्यात काही प्रमाणात लेखनस्वातंत्र्य घेतलं असणार हे स्वाभाविक आहे. कथावस्तू उत्कंठा निर्माण करणारी असली तरी काही ठिकाणी कथेच्या प्रवासात पुढे काय होऊ घातलं आहे याचा वाचकाला अंदाज येऊ शकेल, पण तरीही औत्सुक्य टिकून राहील याची काळजी हे लेखन घेतं.

हेही वाचा >>> अन्वयार्थ : ‘ब्रिक्स’चा सांगावा

या कादंबरीच्या केंद्रस्थानी असणारा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रवास. मोठमोठ्या शहरांत प्रवास करण्याच्या आणि पुरेशी माया जमवून कुटुंबाला सुखवस्तू आयुष्य देण्याच्या हेतूने एक तरुण हेर होतो यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. पण या कामानिमित्त त्याने केलेले प्रवास आणि लेखिकेने शब्दांनी उभी केलेली तत्कालीन शहरं (विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातली) या कथानकाला रंजक करतात. फिरोजपूरची मोहरीची शेतं, मोकळी हवा ते कलकत्ता व रंगून मधल्या कोंदट गल्ल्या आणि शांघायची श्रीमंत चमक असं सगळं मुद्देसूद आणि विपुल वर्णनांच्या साहाय्याने यात उभं केलं आहे. कलकत्ता, रंगूनमधलं अस्वच्छ आणि भयावह वातावरण पुढे शांघाय किंवा जपानमधल्या कोबे शहरात वेगळ्या रूपात पाहायला मिळतं. तिथली तत्कालीन सामाजिक आणि राजकीय उलथापालथ अधिक विस्ताराने यायला हरकत नसली तरीही या कथेच्या संदर्भात ती पुरेशी आहे. नायकाला भारतीय उपखंडातील शहरांत जाणवणारी अस्वच्छता आणि त्याच्या अगदी विरुद्ध म्हणजे स्वच्छता राखणारा आणि भवताल टापटीप ठेवणारा जपानी समाज अनुभवायला मिळतो. अर्थात आजही याहून वेगळं काय आहे? यासह ज्या त्या शहरांत असलेली तत्कालीन आव्हानं आणि घटना लेखिकेने छान गुंफल्या आहेत. चितगाव कट, लाला लजपतराय यांची हत्या, काळ्या पाण्याची शिक्षा भोगायला निघालेले राजकीय कैदी, शांघाय शहरातलं गँग वॉर आणि जपानमधली महायुद्धापूर्वीची ‘नानजिंग’ची कत्तल असे संदर्भ यात येतात. यामुळे कथेचा पट अधिक विस्तीर्ण होऊन तत्कालीन शहरांतली आव्हानं आणि भयकारी समाजस्थिती समजू लागते.

आयुष्यात अनेकवार असं दिसून येतं की सार्वजनिक परिघात बेधडकपणे काम करणारी माणसं खासगी आयुष्यातल्या नाजूक घटनांनी अधिक घायाळ होतात. या कादंबरीचा नायकही त्याला अपवाद नाही. आयुष्यात आलेलं आणि दुरावलेलं प्रेम जेव्हा परतून येतं तेव्हा तो अधिकची आव्हानं स्वीकारतो आणि खासगी क्षणांतून पळ काढू पाहतो. ढाक्यातून आलेल्या दोन अनाथ भावंडांत, त्याला दूर पंजाबात मागे सुटलेली त्याची भावंडं दिसतात. आईने सुनेसाठी शिवलेली लाल चादर, आई-बापाचं देहावसान आणि मातृभूमीपासून दूर असल्याची भावना त्याला पोखरत राहते. जगण्याच्या या दोन टोकांचं संतुलन प्रसंगी नाकी नऊ आणतं. चकित आणि कष्टी करून सोडतं. या अशा खासगी आणि मानसिक गुंतागुंतीच्या संदर्भांमुळे हे लेखन अधिक खरं आणि जिवंत वाटू लागतं. लेखनस्वातंत्र्याची निकड भासली असणार पण म्हणून ते कितीही आणि कसंही खेचल्याचं जाणवत नाही. ब्रिटिशांनी चलाखीने इथल्या व्यक्तींच्या चातुर्याचा आणि गाफीलपणाचाही आत्यंतिक हुशारीने वापर केल्याचं दिसून येतं. पण मुळातून राष्ट्रभक्त असलेल्या अनेकांनी कधी समोरून तर कधी पडद्यामागे राहून अनेक लहानमोठ्या लढाया केल्या यात शंका नाही. नंदलाल कपूर हे एक असंच व्यक्तिमत्त्व, ज्यांची ही सत्यकथा पडद्यामागे घडलेल्या वादळी आयुष्याला प्रातिनिधिक स्वरूपात मांडते.

पुस्तक वाचताना हे पुनश्च स्मरणात येतं की भारतीय सिनेनिर्मितीच्या क्षेत्रात हेरगिरीचा विषय केवळ ‘नायक’केंद्री राहून कथेच्या बाबतीत दर्जाहीन असतो. आणि मराठी साहित्याचा विचार केला तर भयकथा, थरारकथा आणि रहस्यकथांना बरीच वर्षं दुय्यम ठरवण्याचे प्रयत्न झाल्याचं दिसतं. परंतु आजची पिढी त्यात काही अंशी बदल करू पाहतेय असं म्हणायला जागा आहे. अशा सर्व पुस्तकांच्या नवीन आवृत्त्या त्याची साक्ष देत आहेत. इनाक्षी सेनगुप्ता यांची ‘दी सिल्क रूट स्पाय’ ही कादंबरी या प्रकारच्या नवलेखनाला अधिक प्रोत्साहित करू शकेल असा विश्वास वाटतो.

दी सिल्क रूट स्पाय

लेखिका : इनाक्षी सेनगुप्ता

प्रकाशक : हार्पर कॉलिन्स पब्लिकेशन

पृष्ठे : २१६

मूल्य : २९९ रुपये

हेही वाचा…

फाइट क्लब’ ही कादंबरी लिहिणाऱ्या चक पाल्हानिक याची ‘शॉक इंडक्शन’ ही ताजी कादंबरी प्रकाशित झाली. धक्कादायक सामाजिक संदर्भांना वापरणाऱ्या या कादंबरीनिमित्ताने आलेला लेख.

http://surl.li/aahuia

प्लोशेअरया अमेरिकी मासिकाचा ताजा अंक नुकताच आला. त्यांनी काही दिवसांसाठी मोफत उपलब्ध करून दिलेली कथा बेंजामिन हॉफमन या लेखकाची असून त्याचा निवेदक जपानी लेखक हारुकी मुराकामी आहे. आपल्या कादंबऱ्यांबद्दल, लिखाणाच्या प्रक्रियेबद्दल हा निवेदक सांगतो. ‘मुराकामे’ या नावाची काल्पनिका संकेतस्थळावर कुलूप लागण्याआधी पाहा.

https://shorturl.at/Quewc

भयकथांचा आरंभ अमेरिकी लेखक एडगर अॅलन पो यांनी केल्याचे मानले जाते. त्यांच्या कथांवर ‘नेटफ्लिक्स’ वर मालिका पाहायला मिळतात. एका व्हिएतनामी लेखकाने त्याच्या देशी साहित्यावर पडलेला पो यांचा प्रभाव उलगडून दाखविला आहे, तो इथे वाचावा. https://shorturl.at/dzHhr