पंकज भोसले

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

धावपटू मुराकामीनं वाचकांना आत्मपर तपशील दिले, तसा हा ‘टीशर्ट-संग्राहक’ मुराकामी कमी किमतीच्या या वस्तूतून भावविश्व उलगडतो..

आपल्याकडच्या रस्ता पुस्तकांच्या दालनातील विक्रेत्यांनाही जपानी लेखक हारुकी मुराकामी हे नाव माहिती होण्याआधीच्या काळात ‘टोनी टाकितानी’ या त्याच्या कथेवर जगातल्या फेस्टिव्हल वर्तुळामध्ये त्याच नावाचा चित्रपट दाखल झाला होता. चित्रपटाचे कौतुक मर्यादित झाले, पण ही कथा अनुवादित स्वरूपात मुद्दाम मिळवून वाचणारे वाढले. एकटेपणाची कळसावस्था दाखविणारी ‘टोनी टाकितानी’ ही कथा गेल्या दहा-पंधरा वर्षांत जागतिकतेचे टोक गाठणाऱ्या मुराकामीच्या लेखनाची चटक लागलेल्यांच्या आवश्यक वाचनातील बनलेली असते. पण त्या कथेमागच्या व्यक्तिगत संदर्भाचा उलगडा आजवर प्रकाशित झालेल्या त्याच्या आत्मचरित्राऐवजी असलेल्या ‘वॉट वी टॉक अबाऊट, व्हेन वी टॉक अबाऊट रिनग’ किंवा ‘नॉव्हेलिस्ट अ‍ॅज ए व्होकेशन’ या ग्रंथांतून होत नाही. मुराकामीच्या लहान-मोठय़ा कादंबऱ्या, कथा आणि ही आत्मचरित्रात्मक पुस्तके यांचे एकसलग वाचन केल्यास हा लेखक आपल्या जगण्यातल्या सर्वच घटना-तपशिलांना कोरून काढत कथाशिल्प कसे उभारू शकतो याचे ज्ञान होऊ लागते. म्हणजे ‘जॅझ कॅफे’च्या संदर्भापासून ते इंग्रजी पुस्तके जपानीत अनुवाद करणाऱ्या कंपन्यांतील कामांचे तुकडे कथासंहितेत मुराकामीने पेरले आहेत. त्यामुळे एका पुस्तकातील संदर्भाचा उलगडा दुसऱ्या कुठल्या तरी कथेत- कादंबरीच्या भागात डोकावताना मुराकामी वाचनाची गंमत वाढू लागते. त्यामुळे त्याचे वाचक आणि कथाअभ्यासक नव्याने येणाऱ्या अ-कथनात्मक पुस्तकांची आतुरतेने वाट पाहतात. कारण त्यांतून लेखन केलेल्या कित्येक जागा आणि काळ यांची सांगड घालता येणे शक्य होते. अमेरिकेत आणि युरोपमध्ये कादंबऱ्या गाजू लागल्यानंतर मुराकामीच्या सर्व जपानी कथा, प्रवासवर्णन, संगीतावरचे लेख, सदरांचे इंग्रजी अनुवाद विद्युतवेगाने यायला लागले. तेव्हा ‘टोनी टाकितानी’ न्यू यॉर्करमधून एप्रिल २००२ च्या अंकात पहिल्यांदा अनुवादित स्वरूपात प्रसिद्ध झाली. पण तब्बल वीस वर्षांनी त्या कथेमागची कहाणी पहिल्यांदाच मुराकामीच्या अलीकडे प्रकाशित झालेल्या ‘मुराकामी टी’ या टीशर्ट आत्मचरित्र असलेल्या पुस्तकामधूून समोर आली आहे.

‘टोनी टाकितानी हाऊस डी’ लिहिलेला टीशर्ट या लेखकाला अनेक वर्षांपूर्वी हवाई बेटांवरच्या प्रवासात रस्त्यावरील स्थानिक बाजारात एक डॉलर या किमतीला सापडला. खरेदी केलेल्या टीशर्टवर नमूद केलेली ‘टोनी टाकितानी’ व्यक्ती कोण असेल, कशी दिसत असेल, काय करीत असेल याची माहिती उपलब्ध नसल्याने मुराकामीने ‘टोनी टाकितानी’ या नावाचा काल्पनिक नायक आपल्या कथेतून उभा केला. त्यानंतरच्या काही वर्षांत या कथेबाबत काय घडले, याचा रंजक तपशील ‘मुराकामी टी’ पुस्तकातील एका निबंधात व्यापला आहे. पुस्तकाचे निव्वळ हे आकर्षण आहेच. पण अशासारखे अनेक निबंध असल्याने त्याच्या चाहत्यांसाठी यात स-छायाचित्र भरपूर मेवा आहे.

करोनाची दुसरी लाट आपल्याकडे सक्रिय असताना मुराकामीचा ‘फस्र्ट पर्सन सिंग्युलर’ हा कथासंग्रह आला. त्यानंतर प्रकाशित झालेले ‘मुराकामी टी’ हे पुस्तक आपल्या ग्रंथदालनांत यायला फार उशीर झाला. ‘टीशर्ट्स आय लव्ह’ हे उपशीर्षक असलेले हे पुस्तक त्याच्या आधीच्या अकथनात्मक पुस्तकांसारखे आहे. धावण्यावरच्या पुस्तकातून जसे तीस-चाळीस वर्षांचे आत्मचरित्र येऊ लागते, तसेच यातही होते. जगभराच्या शहरांत पुस्तक प्रसिद्धी कार्यक्रमांच्या निमित्ताने फिरताना स्वस्त दुकाने- समुद्रकिनाऱ्यांवरील विक्रेते यांच्याकडून विकत घेतलेल्या आवडत्या टीशर्टाविषयी लिहिली गेलेली ही लेखांची मालिका आहे. आकर्षक आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या कपडे विक्री दालनांना टाळूनच झालेली ही खरेदी मुराकामीतल्या अतिहौशी टीशर्टप्रेमीची आहे. एका जपानी मासिकाला मुलाखत देताना जॅझ रेकॉर्ड जमविण्यासह असलेल्या ‘टीशर्ट खरेदी’च्या छंदाबद्दल आणि अशा खरेदी केलेल्या टीशर्टनी भरलेले शेकडो खोके घरात असल्याबद्दल मुराकामीने सांगितले होते. या मासिकाने पुढल्या काही दिवसांत त्यातल्या निवडक टीशर्ट खरेदीच्या स्मृतींबाबत सदर स्वरूपात लिहिण्यास मुराकामीला उद्युक्त केले आणि निबंध तसेच आकर्षक छायाचित्रांसह असलेल्या या पुस्तकाची उभारणी झाली. हे निबंध मधून कुठूनही वाचले तर मुराकामीच्या छोटय़ा प्रकरणांत चटकदार लिहिण्याची हातोटी कळते आणि एकसलग वाचले तर सूत्रबद्ध कथामालिका किंवा कादंबरी अनुभवत असल्याची जाणीव होते.

दर्शनी भागात असलेले विविध शिक्के, चित्रे, कंपन्यांनी आपल्या उत्पादनांची जाहिरात करण्यासाठी खास बनवून घेतलेले टीशर्ट्स, वाचनालयांनी कार्यक्रमाचा भाग म्हणून, गायक-गायिकांच्या, कलावंतांच्या प्रसिद्धीसाठी संगीत कंपन्यांनी बनविलेल्या टीशर्ट्सचा स्थानिक बाजारांत विक्रीसाठी आलेला साठा हा गेली कित्येक वर्षे मुराकामीच्या कुतूहलाचा विषय बनला आहे. त्यामुळे आपल्या प्रमुख उद्देशाने चाललेल्या फेरफटक्यांत या बाजारांमध्ये दर्शनी भागात ठेवलेली टीशर्टची उपखरेदी त्याला कधीच चुकली नाही. नव्या देशात पाय ठेवल्यावर पहिले जुन्या बाजारातील रेकॉर्डसची दुकाने शोधण्याने त्याची पर्यटनाला सुरुवात होते. ती धुंडाळताना गाण्यांच्या तबकडय़ा (रेकॉर्डस) मध्यभागी छापलेल्या विविध देशांत गवसलेल्या टीशर्ट्सवरचा एक निबंध आहे. त्यात पन्नास वर्षांच्या रेकॉर्ड प्लेअरसंग्रहात कुठल्या देशातल्या कुठल्या शहरांमध्ये दुर्मीळ आणि महत्त्वाच्या रेकॉर्डस मिळतात याचा सविस्तर आढावा आहे. न्यू यॉर्क, स्टॉकहोम, कोपेनहेगन, बोस्टन या शहरांसह पॅरिस, लंडन, बर्लिन, रोममधील रेकॉर्ड विक्रीचे नमुनेदार किस्से वाचायला मिळतात. ऑस्ट्रेलियातील मेलबोर्न शहरात अशा दुकानांचे दुर्भिक्ष किती याची वर्णने सुरू असताना सिडने शहरात धक्कादायकरीत्या जुन्या रेकॉर्ड विक्रीची संस्कृती शाबूत राहिल्याचा शोध लागतो. ‘चार्ली पार्कर प्लेज बोसानोव्हा’ या त्याने अलीकडेच लिहिलेल्या कथेमागची कथा या निबंधातून अधिक उमगू लागते. यातला निवेदक असाच परदेशी शहरांत जुन्या रेकॉर्ड मिळणाऱ्या दुकानांतून जगाच्या लेखी अस्तित्वात नसलेल्या ध्वनिमुद्रिकेच्या सान्निध्यात आल्याचे पाहायला मिळते.

अनाकलनीय वाटावी अशी शब्दकळा पेरणारे टीशर्ट्स, प्राण्यांची-पक्ष्यांची चित्रे असलेले टीशर्ट्स हा ठेवा मुराकामीने कुठून मिळवला, किती रुपयांना मिळवला आणि ते निवडताना काय निकष होता, हे सगळेच वाचताना मुराकामीतल्या निष्णात लेखकाच्या खुणा कळतातच, पण त्याचा टीशर्टतज्ज्ञ अवतारही जगापुढे समोर येतो. समाधान होईस्तोवर पुढय़ात ओतलेल्या शेकडो टीशर्ट्सची आरास उलथापालथ करीत उत्तम टीशर्ट काढण्यातली मौज काय आहे, याचे वर्णन अनेक निबंधांमध्ये रंगले आहे. वाहनांचे छाप असलेले, बीअर कंपन्यांची नावे असलेले, पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाची माहिती असलेले, कित्येक छोटय़ा-मोठय़ा सामाजिक कार्यक्रमांमधील स्वेच्छा मदतनीसांसाठी तयार केले गेलेले कित्येक टीशर्ट्स त्यांच्या छायाचित्रांसह येथे पाहायला मिळतात. ‘द इकॉनॉमिस्ट’ या साप्ताहिकाने आपल्या प्रसिद्धीसाठी केलेल्या ‘थिंक रिस्पॉन्सिबली’ हा संदेश असलेल्या टीशर्टला पाहताना जुन्या मद्य जाहिरातींमध्ये असलेल्या ‘ड्रिंक रिस्पॉन्सिबली’ जाहिरातीची आठवण करीत पुढे मुराकामीची लेखणी मद्यपानाचीही रसाळ वर्णने असलेल्या ‘व्हिस्की कंपनीची’ नावे असणाऱ्या टीशर्टच्या दालनांत नेते. त्याच्या पहिल्या ‘रॅट’ या कादंबरीत्रयीतील क्रेट्सवर क्रेट बीअरपानाची वर्णनेही अशीच न पिणाऱ्यामध्ये बीअरआस्था जागृत करणारी असल्यामुळे इथल्या काही प्रकरणांत अस्सल अभिजात प्यालेवीरांची सारी वैशिष्टय़े उतरली आहेत. ‘बीअर टीशर्ट’ या लेखात गिनेस या प्रसिद्ध आयरिश स्टाऊटची चव आणि तापमान वेगवेगळय़ा पबमध्ये कसे बदलत जाते याची ओळख मुराकामी करून देतो. सुपरहिरोंच्या जपानी ते अमेरिकी अवतारांचे टीशर्ट्स मुराकामी दाखवतो आणि त्यांच्याबद्दल आपल्याला आधी अजिबातच लक्षात न येणारी निरीक्षणे नोंदवतो.

‘कीप काम अ‍ॅण्ड रीड मुराकामी’ या मुराकामीच्या कादंबऱ्यांच्या स्पॅनिश आवृत्तीच्या प्रचारासाठी तयार करण्यात आलेल्या संदेशाचा दुसऱ्या महायुद्धानंतर बेचिराख शहरांत वापरल्या जाणाऱ्या ‘कीप काम अ‍ॅण्ड कॅरीऑन’ संदेशाशी नाते जोडत मुराकामी आपली नावे असलेल्या कोणत्याही टीशर्टला कधीच वापरत नसल्याची माहिती देतो आणि पुढल्या एका निबंधात वार्षिक धावण्याची स्पर्धा भरविणाऱ्या जपानमधील ‘मुराकामी’ नावाच्या शहराविषयी सांगतो. आडनावाचे साधम्र्य असलेल्या या शहराशी त्याचा किंवा त्याच्या प्रसिद्धीचा काडीमात्र संबंध नाही. येथील स्पर्धामध्ये वापरल्या जाणाऱ्या टीशर्टवर आपले आडनाव हा केवळ योगायोग असल्याचे मुराकामी निबंधांतून सांगतो.

मुराकामीची यापूर्वीची सगळी अकथनात्मक पुस्तके ही वैयक्तिक इतिहासाच्या भरमसाट नोंदींनी भरलेली आहेत, त्यात आता या टीशर्ट आत्मचरित्राचीही भर पडली आहे. ज्यांनी मुराकामी वाचनातून थोडा-अधिक अनुभवला आहे, त्यांच्यासाठी हे आवर्जून वाचण्याचे पुस्तक आहे. ‘टोनी टाकितानी’ या मुराकामीच्या कथेतल्या नाही तर टीशर्टवर नाव कोरलेल्या वास्तवातल्या व्यक्तीने अनेक वर्षांनंतर मुराकामीची कथा वाचून त्याच्याशी केलेला संपर्क आणि त्या टीशर्टवर असलेल्या ‘हाऊस डी’ या शब्दमाळांचा मुराकामीला करून दिलेला उलगडा या निबंधाच्या पुस्तकाला रहस्यखेचक कादंबरीत परावर्तित करतो. निबंधांच्या निवडीपासून त्याच्या क्रमवारीतील सूचक कल्पकता या पुुस्तकाचा अंमल खूप काळ उतरू न देणारी आहे. या निबंधांसह मुराकामीच्या टीशर्ट संग्रहाच्या वेडावरची प्रदीर्घ मुलाखतही शेवटी देण्यात आली आहे, ज्याकडे अर्थातच अंमलानंतरचा अंमळ ‘बोनस’ म्हणून पाहावे लागेल.

‘टी शर्ट्स आय लव्ह’

लेखक : हारुकी मुराकामी

प्रकाशक : पेन्ग्विन रॅण्डम हाऊस

पृष्ठे : १९२; किंमत : ९९९ रु.

pankaj.bhosale@expressindia.com

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Book review the t shirts i love by author haruki murakami zws