पंकज भोसले
बुकर पुरस्कार मिळो किंवा न मिळो, त्याने जिची महत्ता अंमळही कमी होणार नाही अशी ही कादंबरी! ती लिहिणाऱ्या पर्सिव्हल एव्हरेटच्या अन्य २० पुस्तकांकडेही यानिमित्ताने लक्ष जायला हवे…
पर्सिव्हल एव्हरेट यांची ‘द ट्रीज’ ही कादंबरी कुण्या एके काळी लगदा कागदावर छापल्या जाणाऱ्या आणि प्रचंड वाचनीयता असलेल्या मसाला रहस्य कादंबरीचा अवतार घेऊन समोर येते. ज्या पल्प कादंबऱ्यांत ‘खुना-खुनांच्या बांधून माळा’ पुढे लेखक आपली लाडकी पोलीसपात्रे हत्याकर्त्यांच्या मागावर लावतात आणि वाचकांसाठी नवनव्या धाडस-डोंगरांच्या सफरी आयोजित करतात. तंतोतंत असाच या कादंबरीचा तोंडवळा आहे. त्यामुळे ‘बुकर’ लघुयादीतील गेल्या दहा वर्षांतल्या कादंबऱ्यांच्या विषय-गांभीर्य आग्रहामुळे तयार होणाऱ्या कष्टप्रद वाचनाशी फारकत घेणारी ‘द ट्रीज’ ही तीव्र विनोदी कादंबरी ठरते. पण कृष्णवर्णीय नागरिकांवर श्वेतवर्णीयांकडून केल्या गेलेल्या खऱ्या छळइतिहासाला उत्तर म्हणून काल्पनिक सूडपारंब्यांनी लगडलेल्या वृक्षाचे तिचे स्वरूप खूप हसवता हसवता भीषण रडवण्याचीही ताकद बाळगते. याचे कारण पर्सिव्हल एव्हरेट हे काही रहस्यकथाकार नाहीत. गेल्या ४० वर्षांत प्रयोगाधिष्ठित तब्बल २१ कादंबऱ्यांचा नैवेद्य अमेरिकी वाचकाधीशांसमोर ठेवल्यानंतर यंदा त्यांचा लेखनप्रयोग जगात पुस्तक पोहोचवणाऱ्या मान्यवर बुकर पारितोषिकासाठी स्पर्धेत आला आहे.
धीट आणि थेट विधानांतून त्यांनी अनेक मान्यवरांची आणि आफ्रिकी-अमेरिकी मानसिकतेची लक्तरे उतरवली आहेत. ‘ओप्रा विन्फ्रे या बयेला साहित्यातले काडीचे कळत नसून तिने बुक क्लब नावाचे जे थोतांड सुरू केले आहे, ते बंद करावे.’ ‘आफ्रिकी अमेरिकी कादंबऱ्यांमध्ये अमेरिकी श्वेतवर्णीयांकडून काळ्यांवर होणारा अन्यायाचा टाहोसदृश सूर मला आवडत नाही.’ ‘ट्वेल्व्ह इयर्स अ स्लेव्ह’सारख्या सिनेमांमधून कृष्णवंशीयांवरील अन्यायाचे चुकीचे आणि मर्यादित चित्रीकरण केले जात आहे.’ ‘टु किल ए मॉकिंगबर्ड’ ही अत्यंत रद्दड आणि ढिसाळ कादंबरी असून तिच्या वाक्यावाक्यांत, परिच्छेदा-परिच्छेदांत दोष असल्याने मी तिचा प्रचंड तिरस्कार करतो.’ घाऊक सहानुभूती लाटण्यासाठी अन्यायाचा धोपट पाढा वाचणाऱ्या लेखन परंपरेच्या एव्हरेट पूर्णपणे विरोधात आहेत. त्यामुळे त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये त्यांचे कृष्णवंशीयपण लेखक म्हणून ओतप्रोत भरलेले नसते. त्यांनी रखरखीत वाळवंटावरच्या ‘वेस्टर्न’ कादंबऱ्या लिहिल्या. ग्रीक मिथकांचा वापर करून कथा लिहिल्या. पर्यावरणाच्या हानीसंबंधीही लघुकादंबरी लिहिली. ‘ए हिस्ट्री ऑफ आफ्रिकन-अमेरिकन पीपल (प्रपोज्ड) बाय स्ट्राॅम थरमाॅण्ड, ॲज टोल्ड डू पर्सिव्हल एव्हरेट ॲण्ड जेम्स किन्केड’ हे त्यांच्या पत्ररूपात चालणाऱ्या एका कादंबरीचे लांबलचक नाव. त्यात ‘पर्सिव्हल एव्हरेट’ ही लेखकाच्या नावाचीच काल्पनिक व्यक्तिरेखा वावरते. ‘पर्सिव्हल एव्हरेट बाय व्हर्जिल रसेल’ हेदेखील त्यांच्या आणखी एका कादंबरीचे नाव. ‘आफ्रिकी-अमेरिकी’ लेखकांच्या कादंबऱ्यांचा उदोउदो करण्याचा अमेरिकी प्रकाशन व्यवहाराचा अलीकडे वाढत चाललेला कोता उद्योग, हादेखील त्यांच्या एका कादंबरीचा विषय, तर प्रेमकथा लिहिणाऱ्या खूपविक्या लेखकाचा सूडप्रवास हा दुसऱ्या कादंबरीचा. घोड्यांचा प्रशिक्षक म्हणून काम केले असल्याने तो संदर्भ डोकावणारी कादंबरी आहेच. तंतुवाद्यदुरुस्ती करण्याचा उर्वरित वेेळेचा उद्योग सांभाळत असल्याने त्याचबरोबर छंदवेळेत जॅझ गिटारिस्ट असल्यामुळे संगीताचा संदर्भ असलेल्या कादंबरीचाही त्यांच्या लेखनात समावेश आहे. एकसारख्या शैलीची आणि आशय-विषयाची कादंबरी दरवेळी सादर न करण्याचा अट्टहास आणि अतिछोट्या- हौशीसदृश प्रकाशकांकडून पुस्तके छापण्याची खोड, यांमुळे पर्सिव्हल एव्हरेट यांचे लेखन लक्षवेधी असूनही वाचकांचा मर्यादित परीघ राखून आहे. ‘द ट्रीज’ कादंबरी बुकरच्या लघुयादीत आल्यानंतर आता त्यांच्या आधीच्या कम-लक्षित लिखाणाला मागणी वाढली असून, पुरस्कार मिळाल्यास त्यांचा नव्याने अन्वयार्थ लावला जाईल, यात शंका नाही.
‘‘वाचन हा जगण्याचा अत्यंत महत्त्वाचा विषय असून विद्यापीठात मी ‘कथा’ हा विषय शिकवत असल्याने त्याव्यतिरिक्त विविध विषयांचा वाचनसोस मला आहे. मला अजिबात माहिती नसलेला विषय आकळून घेण्यासाठी वाचनआधार लागतो.’’ हे सांगणाऱ्या एव्हरेट यांच्या मते वाचन ही माणसाकडे असलेली सर्वोत्तम वेळ-विध्वंसक कृती आहे. ‘द गार्डियन’मध्ये नुकत्याच छापून आलेल्या त्यांच्या मुलाखतीत त्यांनी चिनी भाषेतील टाइपरायटरच्या प्रगतीबाबत असलेल्या ‘किंग्डम ऑफ कॅरेक्टर्स’ या जिंग त्सू यांच्या पुस्तकाची शिफारस केली आहे. शिवाय लोक माझा तिरस्कार करतील, असे लेखन करायला मला आवडेल, अशी इच्छाही व्यक्त केली आहे. ‘ट्रीज’ या बुकरसाठी लघुयादीत स्थान मिळविलेल्या रहस्य काल्पनिकेचा मात्र कुणी अद्याप तिरस्कार करीत नाही. दडवलेल्या इतिहासाचा वास्तवभाग कल्पनेच्या मुलाम्यातून अधिकाधिक लख्ख करण्याच्या लेखकाच्या हातोटीचे उलट कौतुकच होत आहे.
मिसिसिपीमधील ‘मनी’ या छोट्या शहरात घडणाऱ्या हत्यामालिकेने ‘ट्रीज’ या कादंबरीला सुरुवात होते. शहराचे नाव तेथे राहणाऱ्या कफल्लकांच्या जगण्याचे विरोधाभासी प्रतीक भासू लागते. इथल्या हत्यांचे स्वरूप दरवेळी एकसारखे विचित्र आणि जुळे असते. म्हणजे दरवेळी गोऱ्या माणसाची हत्या होते. त्याच्या शेजारी काळ्या माणसाचादेखील मृतदेह असतो. पण त्या कृष्णवंशी मृतदेहाच्या हाती गौरवर्णीयाचा उचकून काढलेला अंडकोश दिसतो. काळ्या माणसाने गोऱ्या माणसाची केलेली निर्घृण हत्या म्हणावी, तर काळा माणूसदेखील शवावस्थेत असल्याने गोऱ्या पोलिसांसमोर खुनी कोण हे कोडे पडते. त्यांचे हे कोडे अधिक विस्तारते, जेव्हा दरवेळी काळ्या व्यक्तीचा मृतदेह शवागृहातून एकाएकी अदृश्य होतो. हत्यामालिकेचा दुसरा भाग भरल्या कुटुंबात घडतो, तेव्हा मिसिसिपी इन्व्हेस्टिगेशन ब्युरोतून (एमबीआय) एड माॅर्गन आणि जिम डेव्हिस ही कृष्णवंशीय डिटेक्टिव्ह दुक्कल खुन्याचा आणि गायब होणाऱ्या काळ्या मृतदेहाच्या रहस्याचा छडा लावण्यासाठी दाखल होते. रेड जेटी या गोऱ्या आणि मनी प्रांतातील मुख्य पोलिसाला आपले काम करण्यासाठी आपल्या डोक्यावर बसविण्यात आलेल्या या काळ्या डिटेक्टिव्हांचे येणे रुचत नाही. तो त्यांच्या कामाची डिटेक्टिव्हगिरी करायला आपल्या ताफ्यातले बावळट्टोत्तम अधिकारी लावतो. शहरात एक खाणावळसदृश हॉटेलात एड माॅर्गन आणि जिम डेव्हिस उतरतात. त्यांची एका मुलीशी गट्टीदेखील जमते. शहरात गोऱ्यांचे अंडकोशी हत्याकांड वाढत जाते, तेव्हा गायब होणारा काळा मृतदेह भूत असल्याच्या वदंताही उठू लागतात. एड माॅर्गन आणि जिम डेव्हिस हे डिटेक्टिव्ह त्या शक्यतेचा विचार गृहीत धरून जारण-मारण विद्येत पारंगत १०५ वर्षांच्या ममा-झी हिला गाठतात. तिकडे त्यांना मनी, मिसिसिपीच नाही तर १९१३ सालापासून ते २०१८ सालापर्यंत अमेरिकेत कृष्णवंशीयांवर झालेल्या अत्याचारांचा, गोऱ्या लोकांनी नाहक मारलेल्या काळ्या लोकांचा इतिहास तारीख-तिथीनुसार नोंदविलेला सापडतो. जारण-मारण विद्येऐवजी भलत्याच गोष्टीची विद्या असलेल्या ममा-झी आणि तिची पणती गर्टूर्ड यांच्याआधारे मिसिसिपी, मनीमध्ये खरोखर घडलेल्या इतिहासाच्या एका पानापर्यंत डिटेक्टिव्ह दुक्कल येऊन पोहोचते. कादंबरीत हा भाग विस्ताराने येत नाही. पण यात घडणाऱ्या खुना-खुनांच्या माळा या घटनेशी संबंधितांच्या कुटुंबवृक्षाशी संबंधित असल्याचे लक्षात येते.
१९५५ साली एमिट टिल नावाच्या १४ वर्षीय काळ्या मुलाची मिसिसिपी, मनीमध्ये गोऱ्या व्यक्तींनी अत्यंत क्रूरपणे हत्या केली. कारण इतकेच, की किराणा मालाच्या दुकानाजवळ या मुलाने एका गोऱ्या विवाहितेशी बोलण्याचा प्रमाद केला. त्या गोऱ्या महिलेने हा तरुण आपल्याला त्रास देत असल्याचा बनाव केल्यामुळे त्या लहानग्याला शिक्षा दिली गेल्याचे पुढे समोर आले. या घटनेनंतर अमेरिकी नागरी हक्क चळवळीला बरेच इंधन मिळाले. एमिट टिल हा कादंबऱ्या आणि सिनेमाचा विषय बनला. बॉब डिलन या गायकाने १९६२ साली ‘डेथ ऑफ एमिट टेल’ हे गाणे लिहून घडलेली सारी घटना साडेचार मिनिटांच्या धूनमधून लोकप्रिय केली होती. (२०२० साली त्यावर आलेला चित्रपट करोनाच्या पार्श्वभूमीत झाकोळला गेला; पण) पुढच्या महिन्यात प्रदर्शित होणाऱ्या ‘टिल’ या नव्या चित्रपटाद्वारे या मुलाची बळीकथा मोठ्या प्रमाणावर जगाला नव्याने कळणार आहे.
पर्सिव्हल एव्हरेट यांनी ‘द ट्रीज’मधून केले काय, तर एमिट टेलच्या हत्येचे तब्बल ६० वर्षांनी होणारे सूडसत्र रंगविले. मनी, मिसिसिपीमध्ये आधी एमबीआयची काळी डिटेक्टिव्ह दुकली येते, त्याचप्रमाणे नंतर एफबीआयची हिंड आडनावाची काळी महिला डिटेक्टिव्ह दाखल होते. शहरात होणाऱ्या खून मालिकांची मुळे पसरत पसरत संपूर्ण अमेरिकेस व्यापतात. ट्रम्प यांच्या व्हाइट हाऊसचाही त्यातून बचाव होऊ शकत नाही.
अमेरिकेत निरनिराळ्या भागांत गेल्या काही वर्षांत घडलेल्या वांशिक विद्वेषाची उदाहरणे बातम्यांमधून वाचणाऱ्याला त्या सगळ्या घटना शोषून पर्सिव्हल एव्हरेट यांनी रचलेल्या कथाविश्वाची इमारत लक्षात येईल. पण तो संदर्भकोश माहिती नसला, तरी इथल्या वाचनात किंचितही अडथळा येत नाही.
एमिट टिलला आरोपी ठरवणारी महिला वृद्धावस्थेत जगत असताना सुरू होणारे तिच्या कुटुंबापासूनचे हत्याकांड अमेरिकेतील एकूणेक शहरात त्याच्यावरील अत्याचाराची प्रतिक्रिया म्हणून कादंबरीत घडत जाते. ‘कू क्लक्स क्लॅन’ या मिसिसिपीमध्येच तयार झालेल्या गोऱ्या उग्र पंथाच्या व्यक्तींपासून ते मनीमधील निम्नमध्यमवर्गीयांच्या घरात डोकावणाऱ्या या कादंबरीत इतिहासाचा प्रचंड ऐवज विनोदाच्या आधारे उतरवला आहे. मठ्ठ आणि कृतिशून्य गोरे पोलीस, लठ्ठ आणि कृति-वजा कार्य करणारे काळे पोलीस यांच्या गमतीशीर व्यवहारांतून फुलत जाणारे हे कथानक रहस्यकथेचा तोंडवळा घेऊन किती वास्तव घटना संदर्भांना सामावून घेऊ शकते, याचा रांगडा वाचनानुभव देते. कादंबरीतील एक प्रकरण नाहक मारल्या गेलेल्या काळ्या नागरिकांच्या असंख्य नावांनी भरले आहे. तर एक प्रकरण अंडकोशी हत्याकांडाचे लोण कोणकोणत्या शहरात पसरले हे नावांनिशी सांगणारे. कादंबरीच्या १०८ प्रकरणांचा पाठलाग करत वाचक रहस्य कादंबरीच्या पारंपरिक प्रारूपानुसार ‘खुनी कोण?’ याचा शोध घेण्याचा छडा लावायच्या फंदात पडत नाही. त्याचा शोध लावण्याची गरज का पडत नाही, याचे रहस्य उलगडण्यासाठी ही कादंबरी वाचणे अनिवार्य आहे. मग तिला बुकर पुरस्कार मिळो किंवा न मिळो, त्यातून तिची महत्ता अंमळही कमी होणार नाही.
संबंधित लिंक्स
एव्हरेट यांच्या लिखाणाचा बाज समजवून देणारी कथा. २०१५ च्या ओ हेन्री पारितोषिकाने तिचा गौरव झाला होता.
बिलिव्हर मासिकातील एव्हरेट यांची गाजलेली मुलाखत.
‘द ट्रीज’
लेखक : पर्सिव्हल एव्हरेट
प्रकाशक : ग्रेवुल्फ प्रेस (अमेरिका), इनफ्लक्स प्रेस (ब्रिटन)
पृष्ठे : ३०९, किंमत : १२७३ रु.
pankaj.bhosale@expressindia.com