अभिजीत रणदिवे

कोणत्याही एकाच प्रकारच्या धारणेशी, धर्माशी, विचारसरणीशी, नैतिकतेशी, किंवा कोणत्याही सामूहिकतेशी घट्ट बांधिलकी पाळलीत तर तुमची कादंबरी सिद्ध होणार नाही असा विश्वास असलेला हा लेखक होता..

डॉ. आंबेडकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसचा वार अन् भाजपाचा पलटवार, दिल्लीत एनडीएच्या बैठकीत काय ठरलं? (फोटो सौजन्य पीटीआय)
BJP vs Congress : डॉ. आंबेडकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसचा वार अन् भाजपाचा पलटवार, दिल्लीत एनडीएच्या बैठकीत काय ठरलं?
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray
Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, “२०१९ मध्ये मोठी गद्दारी…”
shradhha kapoor shakti kapoor
शक्ती कपूर यांनी ‘ही’ सवय सोडण्यासाठी बिग बॉसमध्ये घेतला होता सहभाग; आठवण सांगत म्हणाले, “मी श्रद्धाला सिद्ध करून…”
Manikrao Kokate On Chhagan Bhujbal
Manikrao Kokate : “ओबीसी म्हणून त्यांना फक्त मुलगा अन् पुतण्या दिसतो”, राष्ट्रवादीच्याच नेत्याची भुजबळांवर खोचक टीका
Central government Digital arrest
देशभरात ‘डिजीटल अरेस्ट’ची धास्ती, काय दिला जातो जनजागृतीपर संदेश
Balasaheb-Thorat
Balasaheb Thorat : बाळासाहेब थोरात यांची सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणावरुन सरकारवर टीका, “सरकारची मानसिकता…”
Pankaja Munde and Dhananjay Munde vs Suresh Dhas new controversy on political stage after elections
मुंडे बहीण-भाऊ विरुद्ध सुरेश धस, निवडणुकीनंतर राजकीय पटलावर नवा वाद

‘अनबेअरेबल लाइटनेस ऑफ बीइंग’ हे शीर्षक पाहून गालिमार या विख्यात फ्रेंच प्रकाशनसंस्थेत काही नाकं मुरडली गेली होती. पण कादंबरीचा लेखक मिलान कुंदेरा त्याविषयी आग्रही राहिला. नंतर अर्थात इतिहास घडला. या शीर्षकाला एव्हाना एक वलय प्राप्त झालं आहे. ‘एकच आयुष्य जगता येत असेल तर ते अजिबातच न जगण्यासारखं आहे.’ अशासारखी त्यातली वाक्यं आजही उद्धृत होत राहतात.

मायभूमी चेकोस्लोव्हाकियातल्या काही लोकांनी नाराजीचा सूर लावत ‘कादंबरी परदेशी वाचकांचं लांगूलचालन करण्यासाठीच लिहिली आहे’ अशी टीकाही केली. ते साहजिकच होतं. शीतयुद्धाच्या काळातली ही कादंबरी होती (१९८४). तोमास ही त्यातली एक व्यक्तिरेखा शल्यचिकित्सक असते. कम्युनिस्ट राजवटीवर टीका केल्यामुळे त्याला आपला व्यवसाय सोडून खिडक्या धुण्याचं काम पत्करावं लागतं. १९६८ साली चेकोस्लोव्हाकियानं सोव्हिएत रशियाच्या वर्चस्वाखालून बाहेर पडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. (‘प्राग वसंत’) रशियानं आपले रणगाडे घुसवून हे बंड चेचून टाकलं होतं. त्यानंतर या देशात हवं तसं जगता येणं अशक्य आहे हे जाणून हजारोंनी चेकोस्लोव्हाकिया सोडला. कुंदेराही सत्तरच्या दशकात फ्रान्समध्ये स्थायिक झाला. अशा ‘देशद्रोह्या’नं शत्रूपक्ष पश्चिम युरोपला जाऊन आपल्या देशावर अशी टीका करणं सत्तानिष्ठ लोकांना आवडणार नव्हतंच.

मात्र, भांडवलशाही-साम्यवाद किंवा तत्सम काळय़ा-पांढऱ्या द्वैताच्या चष्म्यातून कुंदेराकडे पाहिलं तर फसवणूकच होईल. कारण ठोकळेबाज नजरेला कुंदेरा दिसणार नाही. त्यामागचं एक ठळक कारण म्हणजे त्याचा खेळकरपणा. ‘माणूस कसा हसतो ते पाहूनच मी स्टालिनिस्ट नसलेल्यांना ओळखतो’ असं कुंदेरा म्हणतो. भयग्रस्त स्टालिनिस्ट वातावरणात विनोदबुद्धी दुर्मीळ झाली होती; ज्यांची विनोदबुद्धी शाबूत होती अशा माणसांवर विश्वास ठेवता येई.

सघन गंभीर आशय आणि हलका भासणारा खेळकर घाट ही कसरत कुंदेराला साधे. उदा. :

ज्यू लोकांमध्ये एक सुंदर म्हण आहे : ‘माणूस विचार करतो, देव हसतो.’ पण देव का हसतो? कारण, माणूस विचार करतो, आणि सत्य त्याला गुंगारा देतं. कारण, माणसं जितका अधिक विचार करतात, तितके एका माणसाचे विचार दुसऱ्या माणसाच्या विचारांपासून दूर जातात. आणि अखेर, माणूस स्वत:विषयी जसा विचार करतो तसा तो कधीच नसतो.

(जेरूसलेम पुरस्कार स्वीकारताना केलेलं भाषण, १९८५.)

किंवा हे पाहा :

डझनावारी चित्रपटांत हे दृश्य पाहिल्याचं तुम्हाला नक्कीच आठवत असेल : एका छानशा वासंतिक वातावरणातल्या दृश्यात एक मुलगा आणि एक मुलगी हातात हात घेऊन धावत जात असतात. धावत, धावत, धावत, आणि हसत. हसण्यामधून ते दोघं सगळय़ा जगासमोर, सगळय़ा सिनेगृहांतल्या प्रेक्षकांसमोर जाहीर करत असतात : ‘आम्ही मजेत आहोत, या जगात आम्ही आनंदी आहोत, अस्तित्वाशी एकतान आहोत!’ हे दृश्य बावळट आहे, ठोकळेबाज आहे, पण त्यातून एक मूलभूत मानवी प्रवृत्ती व्यक्त होते : गंभीर हास्य, जे ‘विनोदापल्याड’ असतं असं हास्य.

सगळी धर्मस्थळं, सगळे अंतर्वस्त्रांचे निर्माते, सगळे जनरल्स, सगळे राजकीय पक्ष या प्रकारच्या हास्याविषयी सहमत असतात, आणि ही प्रतिमा जाहिरातफलकावर डकवून आपापल्या धर्माची, उत्पादनाची, आदर्शवादाची, राष्ट्राची, िलगभावाची, भांडी घासण्याच्या पावडरीची जाहिरात करायला आतुर असतात.

(द बुक ऑफ लाफ्टर अँड फरगेटिंग, १९७९)

त्याच्या कादंबऱ्यांचा घाट अनेकदा एखाद्या सांगीतिक रचनेसारखा असतो. त्यात कधी धूसरपणा असतो, तर कधी हेतुपुरस्सर पोकळय़ा ठेवलेल्या असतात. कधी कुंदेरा आपले विचार निवेदकाच्या किंवा व्यक्तिरेखेच्या तोंडी घालतो, तर कधी तो अनेक निवेदकांचे परस्परविरोधी सूर मिसळतो. कादंबरीत कधी आवर्तनं असतात, तर कधी काळातल्या कोलांटउडय़ा असतात. एखादी व्यक्तिरेखा कशी मेली हे तो सांगून टाकतो, आणि काही पानांनंतर तिच्या भूतकाळातला अतीव आनंदाचा प्रसंग घालतो. कधी कथानक बाजूला टाकून कुंदेरा निवेदनातून एखादा तत्त्वचिंतनात्मक निबंधच लिहून ठेवतो. ठोस व्यक्तिरेखा आणि बांधेसूद कथानकात गुंगून जाऊ इच्छिणाऱ्या वाचकांना त्यामुळे कुंदेराचं साहित्य कंटाळवाणं वाटू शकतं, पण विनोद आणि चिंतनाच्या या मिश्रणानं अनेकांना झपाटून जायला होतं.

राजकीय बंडखोर लेखक ही ओळख कुंदेराला मर्यादित करते. ‘द जोक’ ही त्याची कादंबरी १९६७मध्ये, म्हणजे प्राग वसंताच्या मुक्त वातावरणात आली होती. ‘धर्म ही अफूची गोळी आहे’ या मार्क्‍सच्या विख्यात उद्धरणावर कोटी करत त्यातला तरुण आपल्या मैत्रिणीला पोस्टकार्डावर लिहून पाठवतो : ‘आशावाद ही अफूची गोळी आहे. निरोगी मनाला मूर्खपणाचा घाण वास येतो. ट्रॉट्स्की अमर आहे!’ (ट्रॉट्स्कीनं स्टालिनला विरोध केला होता.) त्यानं केलेला विनोद मैत्रिणीला कळत नाही. अधिकारी लोकांनाही कळत नाही. त्यामुळे पक्षातून आणि कॉलेजातून त्याची हकालपट्टी होते. कादंबरीची आधीची भाषांतरं असमाधानकारक वाटल्यानं कुंदेरानं १९८५-८७ दरम्यान या आणि इतर काही पुस्तकांची भाषांतरं त्यानं स्वत:च्या देखरेखीखाली करून घेतली. या नव्या फ्रेंच आवृत्तीच्या प्रस्तावनेत कुंदेरा सांगतो : स्टालिनिझमवरची टीका म्हणून कादंबरीकडे पाहू नका. ही एक प्रेमकथा आहे.

‘अनबेअरेबल लाइटनेस ऑफ बीइंग’मधली साबिना कुंदेराप्रमाणेच मूळची चेक, पण पश्चिमेत राहते. ती स्वत:विषयी बोलते तेव्हा तिच्या प्रेमी फ्रान्झला त्यात केवळ तुरुंग, छळ, रणगाडे, बंदी घातलेली पुस्तकं असंच ऐकू येतं. या पाश्चात्त्य चष्म्यातून साबिनाला संतत्व प्राप्त होऊ लागतं. मग ती मुद्दाम लोकांना आपल्याविषयी थोडीथोडी खोटी माहिती पुरवू लागते. अखेर, ती अमेरिकेला पोचते तोपर्यंत तिची ‘चेक बंडखोर’ ही ओळखच पुसली गेली असते. प्रागवर चालून आलेले सोव्हिएत रणगाडे जड असतातच, पण उदारमतवादाच्या ‘जबाबदारी’तून आलेला फ्रान्झच्या प्रेमाचा आविष्कारही जड असतो. डावं-उजवं, हलकं-जड, प्रेम-कामेच्छा, मृत्यू-अस्तित्व अशा द्वैतांना कुंदेराच्या साहित्यात स्थान मिळालं. दोन्ही बाजूंच्या मर्यादा, त्यांचं फोलपण दाखवायला त्याला आवडे.

राजकीय मांडणी कुंदेरानं टाळली असा मात्र याचा अजिबात अर्थ नाही. ज्याची कसलीच संगती लागत नाही असं एक भयस्वप्नागत विश्व (प्रागमध्येच जन्मलेल्या आणि वाढलेल्या) फ्रान्झ काफ्कानं याआधीच आपल्या लिखाणातून उभं केलं होतं. रशियन रणगाडय़ांनी प्राग वसंताचा चिखल केल्यानंतर हे ‘काफ्काएस्क’ विश्व प्रत्यक्षात आलं. कुंदेरा म्हणतो, ‘रशियनांना केवळ आपल्या आज्ञांचं पालन झालेलं पुरेसं नव्हतं; लोकांनी आपल्यावर प्रेम करावं अशी त्यांची अपेक्षा होती’.  या  विसंगतींचं दर्शन कुंदेरा घडवतो. उत्तम कवींना आपली प्रतिभा निर्घृण राजवटींच्या सेवेसाठी का वापरावीशी वाटते, असे प्रश्न त्याला पडतात. ‘असं तर नसेल, की कविमनाच्या लोकांचं खरं आयुष्य दुसरीकडेच कुठे तरी असतं, आणि म्हणून ते ‘स्व’ इतरांपासून दूर ठेवू शकतात,’ असंही तो म्हणून जातो. (लाइफ इज एल्सव्हेअर, १९६९)

पोलादी पडद्याआडचा पूर्व युरोप म्हणून पश्चिम ज्याकडे बघत होती ते पोलंड, हंगेरी किंवा चेकोस्लोव्हाकियासारखे देश खरं तर मध्य युरोपचा भाग आहेत, कम्युनिझमपूर्वी त्यांचा रशियाशी विशेष संबंध नव्हता, त्यामुळे त्यांच्याकडे केवळ कम्युनिस्ट गट म्हणून पाहू नका असं तो म्हणतो. (अ किडनॅप्ड वेस्ट, १९८३) सर्वंकष सत्तेविरोधात जसा त्यानं आवाज उठवला, तसेच पुढे आधुनिकतेवरही प्रहार केले. चालू घडामोडी, तात्कालिकता यांच्यात हरवलेल्या आधुनिक जगात गुंतागुंत, हळूहळू उलगडणारे पदर, आणि त्यासाठी द्यावा लागणारा काळ नाहीसा होताना पाहून तो चिंतित होई. कम्युनिस्ट राजवटीत पोलीस तुमचं खासगीपण उद्ध्वस्त करतात, तर लोकशाही राजवटीत पत्रकारही तेच करतात, असं तो म्हणे. (तेही ऐंशीच्या दशकातच!)

कुंदेराच्या कादंबरीत लैंगिक वर्णनं खूप असतात असं म्हणतात. मात्र, ‘नीट पाहिलं तर प्रत्यक्ष लैंगिक क्रियेच्या उद्दीपक वर्णनांपेक्षा त्याद्वारे होणारे अनपेक्षित साक्षात्कार माझ्या साहित्यात महत्त्वाचे असतात’ असं कुंदेरा म्हणतो. ‘फेअरवेल पार्टी’मधला (१९७६) याकुब कम्युनिस्ट पक्षाला विरोध केल्याबद्दल तुरुंगवास भोगून आलेला असतो. तो आपल्या नैतिक अधिष्ठानाच्या दबावाखाली इतका असतो, की आपल्या दिवंगत मित्राच्या मुलीशी (जी त्याला अजिबात आकर्षक वाटत नाही) तो संबंध ठेवतो, केवळ तिची तशी इच्छा असते म्हणून. हा मित्र राजवटीविरोधात बंडखोरीपायी मारला गेला असतो. त्यामुळे त्याच्या मुलीची इच्छापूर्ती याकुबसाठी एक पवित्र कर्तव्य असतं. ‘लाफेबल लव्ह्ज’ (१९७०) कथासंग्रहातल्या ‘एडवर्ड अँड गॉड’मधला एडवर्ड आवडत्या मुलीवर छाप मारण्यासाठी धार्मिक असल्याचं सोंग रचतो. तो चर्चमधून बाहेर पडताना दिसल्यामुळे त्याची शिक्षकाची नोकरी धोक्यात येते (कारण ‘धर्म ही अफूची गोळी’) पण मिशाळ मुख्याध्यापिका त्याला सुधारण्याची संधी देऊ पाहते. नोकरी टिकवण्यासाठी त्याला तिच्याबरोबर लैंगिक संबंध ठेवावे लागतात. इकडे धार्मिक असण्यापायी त्याचा छळ होत आहे हे कळल्यामुळे ती मुलगीही त्याला वश होते. पण तिच्या प्राप्तीमुळे एडवर्ड सुखी होत नाही, कारण त्याचा पाया एक असत्य आहे. अशा दु:खी मन:स्थितीत तो तिचा त्याग करतो, पण मिशाळ मुख्याध्यापिकेसोबत संबंध चालू ठेवतो! ‘लाफ्टर अँड फरगेटिंग’मध्ये एका विद्यार्थ्यांसमोर एक विचित्र तिढा उभा ठाकतो : जिच्याविषयी आकर्षण वाटतं त्या (खाटकाची पत्नी असलेल्या) तिशीतल्या बाईबरोबर संध्याकाळ घालवावी, की प्रिय लेखकाबरोबर? हा लेखक दुसरातिसरा कुणी नसून विख्यात जर्मन लेखक ग्योथं असतो. व्होल्तेअर, पेट्रार्क, व्हेर्लेन, बोकाचिओ आदि लेखकांबरोबर तो प्राग रायटर्स क्लबमध्ये जेवणार असतो. खाटकाची पत्नी त्याला ग्योथंकडे जायला सांगते, तर ग्योथं त्याला परत तिच्याकडे पाठवतो. आणि एवढं करून अखेर लैंगिक सुख अप्राप्य राहतं.

‘आर्ट ऑफ द नॉव्हेल’ या निबंधसंग्रहात कुंदेरानं युरोपियन कादंबरीशी आपलं नातं उलगडून दाखवलं. तो स्वत:ला लेखक म्हणवून घेण्याऐवजी कादंबरीकार म्हणवून घेणं पसंत करे, कारण त्याच्या लेखी कादंबरी या साहित्यप्रकाराकडे मोठी ताकद असते. कादंबरीतल्या व्यक्तिरेखांना सत्य गवसत नाही, पण आपल्याला समजून घेतलं जावं हा हक्क त्यांना असतो. माणसाला ज्ञानाकडे घेऊन जाण्याचा मार्ग कादंबरीकडे असतो. कादंबरी विचार करायला प्रवृत्त करू शकते. या अपेक्षा खूप आहेत हे मान्य करतानाच त्यांच्या पूर्ततेसाठी काव्यमयता आणि अस्तित्वविषयक चिंतन हे गुण कादंबरीकडे असावे लागतात असं कुंदेरा मानायचा. हे होण्यासाठी कादंबरीकाराकडे एक शहाणीव लागते. कोणत्याही एकाच धारणेशी, धर्माशी, विचारसरणीशी, नैतिकतेशी, किंवा कोणत्याही सामूहिकतेशी घट्ट बांधिलकी पाळलीत तर तुमची कादंबरी सिद्ध होणार नाही असा त्याचा विश्वास होता. आपण का लिहितो, यावरचं कुंदेराचं उत्तर : ‘लिहिणं म्हणजे विरोधाभास उत्पन्न करण्यातलं सुख, साऱ्यांविरोधात एकटं असण्यातला आनंद, शत्रूंना चिथावण्यातली आणि मित्रांना चिडवण्यातली मजा.’ कोणतीही आशा उरली नसते तेव्हा उपहास आणि बोचरा विनोद ही अखेरची शस्त्रं असतात, असंही तो म्हणतो. त्याच्या लेखी अस्तित्वाचं सार म्हणजे (माणसाचं) क्षुल्लक असणं.

‘अनबेअरेबल लाइटनेस ऑफ बीइंग’मधल्या तोमासला हे क्षुल्लक असणं अनुभवता येतं. प्रत्येक नागरिक कम्युनिस्ट पक्षाचा सदस्य असणं अपेक्षित होतं त्या काळात तो पक्षातून आणि त्याच्या शल्यचिकित्सेच्या व्यवसायातून बाहेर फेकला जातो तेव्हा त्याला हे अस्तित्वाचं हलकेपण जाणवतं. याउलट कम्युनिस्ट व्यवस्थेविरोधात बंड करून पॅरिसमध्ये स्थायिक झालेली एक व्यक्तिरेखा आपल्या कम्युनिस्टविरोधी भूमिकेच्या वजनाखाली इतकी येते की तिच्यात आणि त्या सर्वंकष राजवटीत साम्यस्थळं दिसू लागतात.

आपण कुणाच्या खिजगणतीत नाही या जाणिवेतून माणूस प्रेमाविषयी, अस्तित्वाविषयी चिंतन करायला मोकळा होतो. तशीच, आपण कोणत्याच विचारसरणीच्या कंठाळी आग्रहाशी बांधील नाही ही जाणीव माणसाला हलकं करून जाते. अर्थात, हे हलकेपण सोसता येईल असं मात्र अजिबातच नाही. अशी गुंतागुंत कुंदेराच्या साहित्यात नेहमी आढळते. त्याच्या व्यक्तिरेखांना अनेकदा छोटेमोठे निर्णय घ्यावे लागतात, पण निर्णय कोणत्याही बाजूचा घेतला तरी त्यात काहीतरी मेख असतेच. माणूस असाल तर तुम्ही सापेक्षता (आणि त्यामुळे येणारी गुंतागुंत) टाळू शकणार नाहीत. जणू काही त्यातून सुटकेचे पर्याय म्हणून आपल्या अस्तित्वाचं विस्मरण होऊ देण्याच्या अनेक शक्यता आधुनिक जगण्यात असतात, पण कादंबरी तुम्हाला त्यापासून वाचवू शकते असं कुंदेरा म्हणतो. किंबहुना म्हणूनच सर्वंकष सत्तेची आकांक्षा असणाऱ्या विचारसरणींना कादंबरी मानवत नाही, आणि सोप्या चटपटीत उत्तरांची चटक लागलेल्या चंगळवादी समाजालाही ती रुचत नाही. जगावं कसं  याचं स्पष्ट उत्तर शोधणाऱ्या लोकांनी कुंदेराच्या नादी लागू नये. पण जर नादी लागाल तर काही लखलखीत, तरीही ओंजळीतून सुळकन निसटून जाणारी सत्यं काही क्षणांपुरती दर्शन देऊ शकतील हेही लक्षात ठेवावं.

rabhijeet@gmail.com

Story img Loader