दहा वर्षे झाली अमेरिकी कादंबऱ्यांसाठी ‘बुकर’ क्षेत्र खुले करून. अन् आता इथले सर्वाधिक स्पर्धकच अमेरिकेतील. पूर्वी कसे राष्ट्रकुल देशांपुरते असलेल्या या पुरस्काराच्या दीर्घ यादीत एक तरी भारतीय वंशाचे नाव असे. लेखक जन्मापासून ब्रिटन, आफ्रिकेत वा दुबईमध्ये राहत असलेल्या या पुरस्काराच्या यादीत भारतीय नाव पाहून इथली माध्यमे अन् अर्धाळलेले वाचकही सुखावत. आता ते भाग्य जसे भारतीयांच्या वाट्याला नाही, तसे खुद्द पुरस्कार देणाऱ्या ब्रिटिशांच्या माथीही नाही. कारण सहा अमेरिकीपैकी तीन तगडी (रेचल कुशनेर, पर्सिव्हल एव्हरेट, रिचर्ड पॉवर्स), दोन पूर्वी लघु याद्यांमध्ये झळकलेली (एक चार वेळा दीर्घ यादीत डोकावलेला), दोन बऱ्यापैकी प्रसिद्ध (क्लेअर मेस्यूड, टॉमी ऑरेंज) आणि एक पहिल्याच कादंबरीद्वारे प्रतिस्पर्ध्यांना ठोसा द्यायला सिद्ध झालेली लेखिका (रिटा बुलविंकल) या सहांपैकी लघु यादीत उरणाऱ्यांची संख्याही अधिक असणार यात शंका नाही. येत्या काही वर्षांत ब्रिटिश आणि राष्ट्रकुल देशांतील लेखक तक्रार करतील इतके अमेरिकेने या पुरस्काराच्या स्पर्धेत वर्चस्व राखले आहे. अमेरिकेचे ‘नॅशनल बुक अॅवार्ड’ आणि ‘पुलित्झर’सह बरीच (नाव आणि पैशांनीही) मोठी पारितोषिके जसे आपल्या देशांपलीकडे पाहत नाहीत, तसे ‘बुकर’नेही का करू नये, अशी चर्चा आता ब्रिटिश माध्यमे करू लागली आहेत. यंदा या १३ जणांच्या दीर्घ यादीत फक्त तीन ब्रिटिश, एक आयरिश लेखक आहे. भारतीय उपखंडातील, दक्षिण आशियाई देशातीलदेखील एकही लेखक नाही. आफ्रिकी देशांतूनही एकही लेखक दीर्घ यादीत येऊ शकलेला नाही. एडमंड डी वाल या कला क्षेत्रातील ‘दादा’ लेखक व्यक्तीच्या अध्यक्षतेखाली असलेल्या निवड समितीत यंदा कादंबरीकार सारा कॉलिन्स, गार्डियन वृत्तपत्राच्या फिक्शन एडिटर जस्टिन जॉर्डन, कथालेखिका आणि प्राध्यापिका यियून ली आणि ब्रिटिश संगीतकार नितीन स्वानी यांचा समावेश आहे. त्यांनी १ ऑक्टोबर २०२३ ते ३० सप्टेंबर २०२४ या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या (होणाऱ्याही) शेकडो कादंबऱ्यांतून ही १३ नावे निवडली आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा